* आरती प्रियदर्शिनी
राखी काही दिवसांपासून खूपच तणावात दिसत होती. ऑफिसमधील कामात तिचे लक्ष लागत नव्हते. तिचे पद जबाबदारीचे होते. अशावेळी बॉसने तिच्यावर चिडणे स्वाभाविक होते.
तिची सहकारी नीलिमाला याचे वाईट वाटले. एक दिवस जेवणाच्या सुट्टीत तिने राखीच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि राखीने मन मोकळे केले.
‘‘नीलिमा, मी आणि मिहीर वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. लग्नासाठी मी आईवडिलांनाही तयार केले होते. मात्र आता तो या नात्याला कंटाळला आहे. त्याला स्पेस हवीय. काही आठवडयांपासून आम्ही एकाच छताखाली पण अनोळखी असल्यासारखे राहतोय. तीन दिवसांपासून तर तो मला भेटलाही नाही. मेसेज नाही, कॉल नाही, रिप्लायच देत नाही,’’ असे सांगून ती ढसाढसा रडू लागली.
नीलिमाने तिला मनमोकळेपणे रडू दिले. त्यानंतर स्वत:च्या घरी घेऊन गेली. नीलिमा आईवडील आणि भाऊ-वहिनीसोबत राहत होती. राखीला एका कुटुंबाचा भावनिक आधार मिळाला आणि मैत्रिणीचा पाठिंबा. यामुळे तिचे मनोबल वाढले आणि ती पुढील आयुष्य हसतमुखाने जगू शकली.
राखीसारख्या कितीतरी मुलींना सहजीवन किंवा लिव्ह इन रिलेशनशिपने मोहजालात अडकवले आहे, यातून बाहेर पडताना त्या पूर्णपणे कोलमडून जातात आणि हाती लागतो तो केवळ हताशपणा, मानसिक निराशा.
काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता दिली होती, तेव्हा तरुणाई आनंदित झाली. जणू मोकळे आकाश आणि स्वच्छंद विहारासाठी त्यांना सोनेरी पंख गवसले होते. परंतु आता या नात्यातील स्वच्छंदीपणा अनेकांना घायाळ करत आहे. यात महिला, मुली अधिक आहेत.
नॅन्सीसोबत तर खूपच वाईट घडले. प्रकाशसोबतच्या ६ महिनांच्या सहजीवनानंतर अचानक एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. या दु:खातून ती कशीबशी बाहेर पडत नाही तोच आपण आई होणार असून गर्भपाताची वेळही निघून गेल्याचे तिला समजते. हताशपणे ती आत्महत्येचे चुकीचे पाऊल उचलते आणि मागे सोडून जाते ते आपले दु:खी कुटुंब व त्यांची अनमोल स्वप्नं जी कधीकाळी त्यांनी नॅन्सीसाठी पाहिली होती.
महानगरात अशी कितीतरी उदाहरणं दिसतील. आता प्रश्न असा आहे की लग्नसंस्था हे बंधन आणि लिव्ह इन स्वातंत्र्य आहे तर मुलींना इतका त्रास का सहन करावा लागतोय? याचे उत्तर आहे समाजाची दुतोंडी मानसिकता.
भारतीय महिलांसाठी सामाजिक आणि भावनात्मक स्तरावरही संबंध तोडणे अजूनही सोपे नाही. पुरुष असे संबंध तोडून लग्नही करतात आणि समाज ते स्वीकारतेही, पण तोच समाज महिलांच्या चारित्र्यावर बोट ठेवतो.
अशा परिस्थितीत आपण काही गोष्टींचे पालन करून सुखी जीवन जगू शकतो. लिव्ह इनचे नाते तुटल्यानंतर पळपुटेपणा पत्करण्यापेक्षा हा आपला अनुभव समजून त्यातून धडा घ्या. हे खरे आहे की महिलांसाठी जोडीदाराचा सहवास विसरणे आणि भविष्यातील संघर्षाचा सामना करणे सोपे नाही. परंतु जीवन प्रवाही आहे. म्हणूनच यातून बाहेर पडण्यासाठी गरज आहे ती या नात्याशी जोडल्या गेलेल्या काही पैलूंचा सारासार विचार करण्याची.
स्वत:ला कामात गुंतवून ठेवा : तुम्ही नोकरी करत असाल तर स्वत:ला कामात गुंतवून ठेवणे थोडेसे सोपे आहे. आपल्या कामावरील टार्गेटवर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराला आपलेसे कसे करावे, याचा सतत विचार करू नका कारण त्याने पूर्ण मानसिक तयारीनिशीच तुम्हाला सोडून दिले आहे. त्यामुळे तो परत येणार नाही.
नोकरी न करणाऱ्या मुलींनी जास्तीतजास्त वेळ कुटुंबासोबत घालवावा स्वत:मधील एखाद्या कलेला विकसीत करा. ती सर्व कामे करा जी यापूर्वी वेळ कमी असल्यामुळे तुम्ही करू शकला नाहीत. कधीतरी आपल्या भावनांना कागदावर शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करा. मनातील वेदना काहीशी कमी होईल.
लोक तर बोलणारच : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेताना तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले असेल. लोग काय म्हणतील, याची पर्वा केली नसेल. मग आताही तसेच करा. शांतपणे त्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आपली बाजू मांडण्याचा किंवा आपणच कसे बरोबर आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही.
न्यूनगंड बाळगू नका : तुम्ही केवळ मैत्रीच्या एका नात्यापासून वेगळे झाला आहात. तेव्हा स्वत:ला घटस्फोटीत समजू नका. तुम्ही कुठला गुन्हा केलेला नाही. यौनशुचितेच्या तराजूवरही स्वत:ला तोलू नका. शारीरिक संबंध ठेवणे एक नैसर्गिक क्रिया आहे. त्याचा न्यूनगंड बाळगू नका. जोडीदारासोबत घालवलेल्या सुखद क्षणांनाच जीवनात स्थान द्या. त्याच्याबद्दल मनात द्वेष नसावा. समोरासमोर आल्यानंतरही ओरडू नका, टोमणे मारू नका तर मैत्रीपूर्ण वागा.
कायदा तुमच्यासोबत आहे : तुम्ही दीर्घ काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल आणि तुम्हाला मूल असेल आणि तरीही तुमचा जोडीदार तुमच्या मर्जीशिवाय तुम्हाला सोडू इच्छित असेल तर तुम्ही कायद्याचा आधार घेऊ शकता. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये असा निकाल दिला आहे की लिव्ह इनमुळे जन्माला आलेले मूल अनावरस समजता येणार नाही. तुम्ही सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत मुलांच्या उदरनिर्वाहासाठी पोटगी देण्याची याचिका दाखल करू शकता. कारण दीर्घ काळपर्यंत लिव्ह इनच्या नात्यात राहिल्याने तुम्हाला कायदेशीरपणे पत्नीचा दर्जा मिळतो.
जोडीदाराने मारहाण किंवा जबरदस्ती केल्यासही तुम्ही न्यायालयात घरगुती हिंसा कायद्याअंतर्गत न्याय आणि उदरनिवार्हासाठी पोटगी मागू शकता. किंवा हिंदू अॅडॉप्शन अँड मेंटनन्स अॅक्टच्या कलम १८ अंतर्गतही याचिका दाखल करू शकता.
भावी जीवनसाथीपासून काही लपवू नका : तुटलेल्या नात्याच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी लग्न चांगला पर्याय आहे. पण लग्नापूर्वी भावी जीवनसाथीला आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपबाबत नक्की सांगा. सोबतच त्याला असा विश्वास द्या की तुम्ही जुने नाते नव्या नात्याआड येऊ देणार नाही.
पुरुषांनीही लक्ष द्या : सहजीवनातून वेगळे होण्याचा परिणाम सर्वाधिक मुलींनाच सहन करावा लागतो हे मान्य, पण संवेदनशील पुरुषांवरही याचा परिणाम होतो हे नाकारता येणार नाही.
जयंतच्या पार्टनरने त्याला सोडल्यानंतर त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. खूप समस्यांचा सामना केल्यानंतर तो यातून सुटू शकला.
दिल्ली उच्च न्यायालयाने अशा प्रकरणांत पोलिसांना बलात्काराऐवजी विश्वासघाताचा (क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट) खटला दाखल करून तपासाचे आदेश दिले आहेत, जेणेकरून पुरुषांनाही न्याय मिळेल.