* गरिमा पंकज

३१ डिसेंबर, २०१६ रोजी रात्री बंगळुरू शहरात महिलांसोबत झालेल्या सामूहिक छेडछाडीच्या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावली. ही घटना महात्मा गांधी रोड आणि बिग्रेड रोल परिसरात घडली, जिथे नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे हजारोंची गर्दी जमायची. रात्री जवळपास १२ वाजता हॅप्पी न्यू इयरच्या गडबडगोंधळात अचानक अंदाधुंदी माजली. आपले बूट-चपला सोडून अनेक मुली आपली अब्रू वाचवत रस्त्यावर धावताना पळताना दिसल्या, ज्यांच्यासोबत येथे जवळपास अर्धा तास सामूहिक छेडछाड, जोरजबरदस्ती, अश्लील शेरेबाजी करण्याचा आणि त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला गेला. आश्चर्याची बाब ही आहे की घटनाप्रसंगी १५०० पोलीस कर्मचारी ड्यूटीवर होते.

काही तासांनीच (१ जानेवारी, २०१७) अंदाजे अडीच वाजता, बंगळुरूच्या कम्मानहल्ली रोडवर पुन्हा एकद छेडछाडीचं प्रकरण समोर आलं. येथे बाइकवर बसलेल्या २ तरुणांनी एका तरुणीसोबत गैरवर्तणूक केली, ज्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने संपूर्ण देशात हल्लकल्लोळ माजला. फुटेजनुसार बाइकवरील दोन तरुण एकाकी रस्त्यावर मुलीचा मार्ग रोकताना दिसून आले, एका व्यक्तिने बाइकवरून उतरून त्या तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तिला बाइककडे ओढून नेत तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही मुलीवर नियंत्रण साधता येत नाही पाहून अखेरीस तिला रस्त्यावर फेकून दोघे बाइकवरून पसार झाले. लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की घटनेच्या वेळी तिथे अनेक लोक उपस्थित होते, परंतु कुणीही मुलीला वाचवण्याचा वा मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला नाही.

याच रात्री (३१ डिसेंबर, २०१६) रोजी दिल्लीच्या मुखर्जीनगर परिसरातही एका मुलीसोबत छेडछाडीचा प्रकार घडला. एका गल्लीतून एक तरुण-तरुणी बाइकवरून जात होते, इतक्यात काही तरुणांच्या टोळक्याने त्यांची वाट अडवण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्यामुळे एक हवालदार तिथे आला. तिथे खूप गर्दी जमली होती, ज्यामुळे आरोपी तिथून पळ काढण्यात यशस्वी ठरले, परंतु बघताबघता तिथे उभ्या मवाली मुलांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केली, ज्यात २० पोलीस कर्मचारी त्या १०० तरुणांच्या टोळक्यापासून अक्षरश: आपला जीव वाचवून तिथून पळू लागले. या घटनेने पोलीस हादरलेच शिवाय सामान्य माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला.

प्रसिद्ध शॉपिंग वेबसाइट स्नॅपडिलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर २४ वर्षीय दीप्ती सरनासोबतही काही कालावधीपूर्वी अशीच घटना घडली होती. दीप्ती १० फेब्रुवारी, २०१६ रोजी रात्री ८ वाजता गुडगाव येथील ऑफिसमधून बाहेर पडून वैशाली मेट्रो स्टेशनला उतरली आणि मग नेहमीप्रमाणे शेअरिंग रिक्षा घेऊन गाझियाबाद येथील बसस्थानकाकडे गेली, जेथून वडील आणि भाऊ तिला रोज आपल्यासोबत घरी घेऊन जात.

परंतु दीप्तीला कुठे ठाऊक होतं की शेअरिंग ऑटोमध्येही ती सुरक्षित नाहीए. रिक्षात बसल्यावर ४ लोकांनी तिचं अपहरण केलं. त्या रिक्षामध्ये एक मुलगीसुद्धा बसली होती, जिला चाकूची भीती दाखवून मीरत मार्गावर उतरवण्यात आलं. चार मुलांनी दीप्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि मग आपल्यासोबत घेऊन गेले.

वास्तविक एक दिवसानंतर दीप्तीला नरेला मेट्रो स्टेशनजवळ सोडून देण्यात आलं; कारण हे काम देवेंद्र नावाच्या मुलाने एकतर्फी प्रेमाच्या रोषातून केलं होतं.

आजपासून ६७ वर्षांपूर्वी फ्रान्सच्या प्रसिद्ध लेखिका सिमोन डे ब्यूवोर यांनी आपल्या ‘द सेकंड सेक्स’मध्ये एक प्रश्न विचारला होता की हे जग कायम पुरुषांचं होतं, स्त्रियांना त्यांच्या आधिपत्याखाली राहावं लागलं, असं का?

आपल्या पुस्तकात लेखिकेने अत्याचाराचं बिंग फोडलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की कशाप्रकारे लैंगिक असमानता समाजातील बुरसटलेल्या रूढींद्वारे थोपवली जाते. स्त्रिया जन्माला येत नाहीत, त्या बनवल्या जातात. पुरुषांनी समाजात स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला आहे, स्त्रियांच्या चहूबाजूंना दांभिक नियम कायदे बनवून त्यांच्यावर हा विचार लादला आहे की पुरुष श्रेष्ठ आहे.

लेखिकेचा हा प्रश्न आणि विचार बऱ्याच प्रमाणात आजही तितकाच योग्य आहे, जितका त्या काळात होता. आजही स्त्रिया आपलं अस्तित्व शोधत आहेत, आजही एका स्त्रीसाठी आपला आत्मसन्मान आणि इभ्रत सांभाळून जगणं पूर्वीइतकंच कठीण आहे.

स्त्री-संरक्षणाचा मुद्दा

या संदर्भात युगानुयुगांपूर्वी ग्रीक तत्त्वज्ञानी अॅरिस्टॉटलने म्हटलं होतं, ‘‘पुरुष सक्रिय आणि स्त्री निष्क्रिय आहे. स्त्री शारीरिकरित्या कनिष्ठ आहे, तिची योग्यता, तर्कशक्ती व निर्णय घेण्याची क्षमता, सर्व काही पुरुषापेक्षा कमी आहे. त्यामुळे पुरुषाचा जन्म राज्य करण्यासाठी आणि स्त्रीचा आज्ञा पाळण्यासाठी झाला आहे.’’

आजही लोकांच्या मनातील वर्षांनुवर्षांपासून साचलेलं दांभिक पारंपारिक मानसिकतेचं शेवाळ स्वच्छ झालेलं नाही. धर्माच्या बेड्यांमध्ये जखडलेली मानसिकता बदललेली नाही. काही स्त्रिया भले प्रत्येक क्षेत्रात सफलतेची शिखरं पादाक्रांत करत आहेत परंतु स्त्रियांच्या सुरक्षेचा मुद्दा कायम संदिग्ध राहिला आहे.

दरवर्षी स्त्रियांसोबतच्या गुन्ह्यांची प्रकरणं वाढत चालली आहेत. दर ५ मिनिटाला एक स्त्री हिंसा/अत्याचाराला बळी ठरते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, २०१३मध्ये स्त्रियांसोबत १,१८,८६६  कौटुंबिक हिंसाचाराच्या, ३३,७०७ बलात्काराच्या व ३,०९,५४६ घटना इतर गुन्ह्यांच्या नोंदवल्या गेल्या आहेत.

वास्तविक दररोज न जाणे कित्येक निर्भया आपल्या मानसन्मानासाठी झगडत असतात. परंतु त्यांचा बचाव करणारं कुणीही आसपास नसतं.

कधी विचार केला तुम्ही की स्त्रीला सन्मानपूर्वक सुरक्षित वातावरण का मिळू शकत नाही, ज्याचा त्यांना पुरेपूर अधिकार आहे.

पारंपरिक मानसिकता ठरतेय वरचढ

वास्तविक आजही मुलींना लहानपणापासून नम्रता, त्याग, सहनशीलता, परोपकार यांसारख्या गुणांचे धडे दिले जातात. पिता व भावांना घाबरून राहायला शिकवलं जातं, परंतु हे सांगितलं जात नाही की कशाप्रकारे वेळ पडल्यास त्यांनी स्वत:साठी संघर्ष करायचा, आवाज उठवायचा आहे, आत्मविश्वासाने प्रगती साधायची आहे. हे कारण आहे की मुली लहानपणापासूनच स्वत:ला दबलेल्या, बंधनात, उपेक्षित असल्याचं अनुभवतात. त्या आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराला व गैरवर्तनाला जीवनपद्धतीचा एक भाग मानतात. दुसरीकडे येथील पुरुषप्रधान समाजाला महिलेचं शोषण करणं आपला जन्मसिद्ध अधिकार वाटतो. तिला उपभोगाची वस्तू मानतो. परिणामी, प्रत्येक वळणावर स्त्रियांना शोषण सहन करायला तयार राहावं लागतं.

आजही खूप कमी कुटुंब आहेत जिथे मुलीच्या जन्माचा आनंद साजरा केला जातो. स्त्रियांसाठी स्वतंत्रपणे फिरणं, शिक्षण घेणं, आपल्या पायांवर उभं राहाणं, आपल्या मर्जीने जीवनसाठी शोधणं, संघर्षपूर्ण ठरतं. क्षणोक्षणी आपल्या कुटुंबाशी व समाजाशी तिला संघर्ष करावाच लागतो.

धर्माचा हस्तक्षेप

धार्मिक पुस्तकं असोत वा धार्मिक गुरू, धर्माने नेहमी स्त्रियांवर आपला नेम साधला आहे. पती जिवंत असेल तर दासी बनून राहायचं, त्याच्या नावाचं कुंकू लावा, त्याचं आयुष्य वाढण्यासाठी व्रतवैकल्य करा, त्यांच्या इच्छाआकांक्षासमोर स्वत:चं अस्तित्त्व शून्य करा आणि जेव्हा पतीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या नावावर जळून मरा वा विधवा म्हणून जीवन जगा. आपल्या इच्छाआकांक्षांचा गळा घोटा. जीवनाच्या प्रत्येक वळणावर धर्म स्त्रीला पददलितांचं जीणं जगायला भाग पाडतो. तरीदेखील लोकांची आस्था आणि विश्वास या दांभिकतेप्रती डळमळत नाही आणि याचा फटका स्त्रियांना भोगावा लागतो.

घाबरू नका धाडस करा

लहानपणापासूनच मुलींना आपल्या भावाच्या धाकात राहायला शिकवलं जातं. ती आपल्या आईला वडिलांकडून मार खाताना पाहात लहानाची मोठी होते. कौटुंबिक हिंसेचं समर्थन स्त्रियांना वारसाहक्काने मिळतं. दुसरीकडे मुलं याला आपला धर्मसिद्ध अधिकार मानतात. स्त्रियांना सहनशीलता वाढवण्याचे व शांत राहाण्याचे धडे दिले जातात. जसजशी ती मोठी होते, तिच्या योनी शुचितेबाबत संपूर्ण कुटुंब गंभीर होतं. लहानपणापासूनच तिच्यावर बिंबवलं जातं की जर तिचा पाय घसरला, तर ते घराच्या मानमर्यादेला धक्का पोहोचवणं आहे. तिचं जीवन कागदाच्या नावेसारखं आहे. हलकंसं वादळही तिला बुडवण्यासाठी पुरेसं आहे. बदनामीचा छोटासा डागही तिचा पदर कायमस्वरूपी कलंकित करेल वगैरे. हे मान्य आहे की मुलीवर निशाणा साधणाऱ्यांची कमतरता नाही. परंतु या गोष्टीला घाबरून घरात बसणं हा निश्चितच उपाय नाही.

याऐवजी जर मुलीला जीवनात येणाऱ्या अनेक संभाव्य धोक्यांपासून सावध करत तिला बचावाचे व्यावहारिक उपाय समजावले, तर ते अधिक योग्य ठरणार नाही का? अलीकडे मोबाइल आणि नेटच्या काळात कनेक्टीव्हिटीची काही समस्या नाही. मुलीच्या हातात मोबाइल आहे, तर ती सतत तुमच्या संपर्कात राहू शकते आणि कोणत्याही प्रकारची समस्या दिसून येताच तुम्हाला सूचित करू शकते.

मुलीला केवळ मानसिक पातळीवरच नव्हे, शारीरिक पातळीवरही मजबूत बनवा. कराटे, कुंगफूपासून ते शरीर बळकट बनवणारे प्रत्येक प्रकारचे खेळ खेळायला तिला प्रोत्साहित करा, तिला नाजूक बनवून ठेवू नका. तिच्यामध्ये सदैव परावलंबित्वाऐवजी आत्मनिर्भरतेची बीजपेरणी करा. तिला सांगा की भविष्यात तिलाच कुटुंबाचं नाव उज्ज्वल करायचं आहे. तुम्ही जोवर तिच्यावर विश्वास दाखवणार नाही, समाजात ती आपलं स्वतंत्र अस्तित्त्व प्रस्थापित करू शकणार नाही.

मुलं असतात सोपी शिकार

लहान मुलं सोपं लक्ष्य असतात; कारण ती कमकुवत असतात. मोठ्यांच्या तुलनेत त्यांच्यावर सहज नियंत्रण मिळवत येतं. अनोळखी लोकांशी ही मुलं लवकर मैत्री करतात. ते सहज कुणावरही विश्वास ठेवतात. आश्चर्याची बाब ही आहे की ९८ टक्के गुन्हेगार घरातील वा शेजारपाजारचे वा ओळखीतील लोकच असतात, जे आपलेपणाच्या आवरणात लपून अशी दुष्कृत्य करतात.

तुमची मुलगी अशा फसव्या जाळ्यात अडकू नये वा तिच्यासोबत वाईट घटना घडू नये म्हणून जरुरी आहे आपण लहानपणापासूनच तिला व्यावहारिक माहिती द्यावी.

* मुलींना सुरूवातीपासूनच हे शिक्षण द्यायला हवं की त्यांनी अनोळखी व्यक्तिंशी मैत्री करू नये वा कुणी बोलावल्यास पटकन् त्यांच्याकडे जाऊ नये.

* अनोळखी व्यक्तिने दाखवलेल्या कोणत्याही लोभास बळी पडू नये.

* अनोळखी नव्हे, आपले काका, शेजारी, नातलग वगैंरेसोबतही एकटं जाण्याची सवय मुलींना लावू नये.

* मुलींना योग्य-अयोग्य स्पर्शाचा अर्थ समजावून सांगा. त्यांना सांगा की जर कुणी स्पर्श करू लागलं तर त्याच्यापासून दूर जा.

* लहान मुलींना अंघोळीच्या वेळेस आईने त्यांच्या शारीरिक अवयवांविषयी समजावून सांगावं की शरीराचा कोणता भाग असा आहे ज्यांना आईशिवाय इतर कुणी स्पर्श करू शकत नाही.

संवाद जरुरी

अनेकदा संकोचापायी मुली आपल्यासोबत घडलेल्या एखाद्या वाईट घटनेचा उल्लेखही आईवडिलांकडे करत नाहीत. तुम्ही आपल्यातील आणि मुलीमधील संकोचाची भिंत दूर सारावी. तिच्यासोबत मैत्रीपूर्ण वागावं, कमीत कमी रोज संध्याकाळी मुलीसोबत क्वालिटी टाइम व्यतीत करावा. संवाद साधून दिवसभरातील घटना तिला सांगायला प्रोत्साहित करा. अशाप्रकारे जेव्हा मुलीमध्ये रोज सर्वकाही सांगण्याची सवय विकसित होईल, तेव्हा ती कोणत्याही वाईट घटनेबद्दल माहिती द्यायला संकोचणार नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...