* वीना श्रीवास्तव

समोरच्या त्या बंगल्याची साफसफाई अन् रंगरंगोटी सुरू होती. चारी बाजूंनी उगवलेलं गवत व झाडंझुडपं यामुळे तो बंगला भयाण वाटायचा. कितीवर्षापासून एक गंजलेलं कुलुप मुख्य दरवाजावर दिसायचं. आज जी बंगल्याचं तेज आणि वैभव झाकोळलेलं असलं तरी कोणे एके काळी तो बंगला नक्कीच फार सुंदर असावा. ऊन, पाऊस, वादळ, वारा सोसून बंगल्याच्या भिंती काळपटल्या होत्या. खिडकी दरवाजांची कळा गेली होती. पण भक्कम कडी कोयंड्यांच्या आधारे अजूनही दारं खिडक्या जागेवर होती.

कोण येणार आहे इथं रहायला? तनीषाची उत्सुकता चाळवली गेली होती. कुणी विकत घेतलाय का बंगला? इतका भव्य बंगला विकत घेणारा कुणी पैसेवालाच असणार. पण हल्ली तर लोकांना अर्पाटमेंट अन् फ्लॅटमध्येच रहायला आवडतंय. मग ही कोण वल्ली असणार जी या जुन्या वाड्याला नटवून सजवून इथं मुक्कामाला येणार आहे?

मनांत उत्सुकता हिंदोळत असतानांच एक तरूण तिच्याच घराकडे येताना दिसला. त्यालाच विचारावं का कोण येतंय इथं रहायला? पण नको, असेल कोणी चक्रम किंवा पुरातत्त्ववेत्ता जो इथं येऊ घातलाय, खरं तर या बंगल्याला काही ऐतिहासिक किंवा पौराणिक महत्त्व नाहीए, एवढं तिला ठाऊक होतं. पण कुणाला काय आवडेल हे आपण कसं ठरवणार?

‘‘माफ करा,’’ तो तरूण तिच्या गेटाशी उभा होता.

तिनं दचकून बघितलं…तो तिच्याशीच बोलला का? तिनं इकडं तिकडं बघितलं.

‘‘हॅलो, मावशी, मी तुमच्याशीच बोलतोय.’’ त्यानं म्हटलं. आपल्यासाठी त्यानं मावशी संबोधन वापरावं हे तिला जरा खटकलं. मी खरंच इतकी वयस्कर दिसते का? वय पन्नाशीला आलंय हे खरं असलं तरी दिसते तर अजून पन्नाशीचीच. बांधाही अटकर आहे. कुठं तरी केसात एखादा चंदेरी तार दिसतो पण बाकी केस काळेभोरच आहेत.

तिला थोडं विचित्र वाटलं पण ती गेटाकडे गेली. तो तरूण दिसायला देखणा अन् शालीन दिसत होता. ‘‘माझं नाव अनुज पंडित आहे. मला पाणी मिळेल का? आता घरात काम सुरू केलंय. पाण्याची लाइन आज सायंकाळपर्यंत सुरू होईल. पण आत्ताच्या गरजेचं काय?’’

‘‘बरोबर आहे. ये, आत ये. पाणी मिळेल.’’ तिनं माळ्याला हाक मारून सांगितलं, ‘‘नळाला पाईप लावून समोरच्या बंगल्यात पाणी जाऊ दे. त्यांचं काम होई तो नळ बंद करू नकोस.’’

‘‘ये रे, आत ये. मी चहा करते. भूकही लागली असेल ना?’’

चहा फराळ करता करता अनुजनं त्याच्या कुटुंबाची माहिती सांगितली. तो बंगला अविनाश पंडितांचा वडिलोपार्जित वारसा होता. अविनाशचे वडील अभय पंडित खूप वर्षांपूर्वी धंद्याच्या निमित्तानं नैरोबीला गेले अन् तिथंच स्थायिक झाले. अविनाशचं सगळं आयुष्य तिथंच गेलं. त्यांनीही धंदा छान वाढवला. त्यांची मुलंही तिथंच मोठी झाली. पण आता त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न, अनुजच्या बहिणीचं लग्न भारतातून करायचं आहे तेही आपल्या वडिलोपार्जित बंगल्यातून. म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय.

‘‘लग्नं कधी आहे?’’

‘‘पुढल्या महिन्यांत, २५ तारखेला. आता वेळ तसा कमी उरलाय त्यामुळे खूप घाई करावी लागतेय. तेवढ्यासाठी मला बाबांनी भारतात पाठवलंय.’’ चहाफराळ आटोपून तो निघून गेला. जाताना तीनतीनदा आभार मानले. तनु लगेच आरशासमोर जाऊन उभी राहिली. त्यानं मला मावशी का म्हटलं? तिनं निरखून स्वत:कडे बघितलं. अजूनही ती सुंदरच दिसंत होती

तनीषा एकटीच राहते. ती अविवाहित आहे, कॉलेजात प्रोफेसर आहे अन् एकटीच राहते हे आजूबाजूच्या सर्वांना ठाऊक आहे. तिचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. कुणी तरी कधी खासगीत तिच्या लग्न न करण्याबद्दल बोलतो पण कारण कुणालाच ठाऊक नाहीए. तनीषाला मात्र ती अजूनही कुमारी का आहे हे पूर्णपणे माहीत आहे. यात दोष कुणाचा होता? तिचा? नियतिचा, तिच्या घरच्यांचा? तिचाच? वेळेवारी तिच लग्नं झालं असतं तर आजा अनुजएवढा मुलगा असताच ना तिचाही? तिनं एक दीर्घ श्वास घेतला. ती स्वत:शी पुटपुटली, ‘‘प्रसन्न, कुठे आहेस रे? तुला माझी आठवण येते की पूर्णपणे विसरलास मला?’’ स्वत:शीच बोलताना ती तिच्या तारूण्यात शिरली.

‘‘तनु, आज क्लासनंतर भेटूयात.’’ प्रसन्ननं तिला म्हटलं. तिच्या तनीषा नावाचं लघुरूप तनु त्यानंच केलं होतं.

‘‘अरे, पण आज माझं प्रॅक्टिकल आहे. तेही शेवटच्या तासाला…त्यानंतर लगेच मला घरी जावं लागेल तुला ठाऊक आहे, थोडा ही उशीर झाला तरी आई खूप रागावते.’’

प्रसन्नला तिच्या भावनांची जाणीव होती. तरीही निघता निघता तो म्हणाला, ‘‘ठीक आहे, तरीही, मी तुझी वाट बघेन.’’

‘‘बघते,’’ हसून तनीषा म्हणाली.

तनीषा एम.ए, करत होती. प्रसन्न तिचा सीनियर होता. तो पीएचडी करत होता. तिला अभ्यासात मदतही करायचा. तो विलक्षण हुषार होता. प्रोफेसर नाही आले तर तो क्लासही घ्यायचा. प्रिंसिपनीच त्याला तसं सांगितलं होतं.

त्याची शिकवण्याची, समजवण्याची पद्धत फारच छान आणि आकर्षक होती. तनुला ते फार आवडायचं. प्रसन्नलाही तनीषा विषयी ओढ वाटायची. तिचं सौंदर्य त्याला भुरळ घालायचं. कॉलेजमध्ये त्यांच्याबद्दल चर्चाही चालायची.

ही चर्चा तनीषाच्या घरापर्यंतही पोहोचली. आईबाबांच्या कानावर काही ती आलं असावं. ते विचारू लागले.

‘‘तनीषा, खरं काय ते सांग, हा प्रसन्न कोण आहे? शुभ्रा त्याच्या नांवानं तुला चिडवंत होती, ते का?’’

‘‘काही नाही गं आई. माझा सीनियर आहे. मला प्रॅक्टिकल्समध्ये अभ्यासात वगैरे मदत करतो. बाकी काही नाही. शुभ्राला तो भाव देत नाही म्हणून ती मला चिडवते.’’ तनीषानं सांगितलं.

‘‘एवढंच ना? मग ठीक आहे. पण अजून काही असलं तर मात्र मला विचार करावा लागेल हं!’’ आईनं तंबीच दिली.

‘‘आईनं असं का बरं म्हटलं? प्रसन्न खरंच माझ्या आयुष्यात इतका महत्त्वाचा आहे का?’’ तिनं स्वत:लाच प्रश्न केला.

‘‘इतका?’’ दुसरं मन उत्तरलं ‘‘तो तुझ्या आयुष्यात खूपच महत्त्वाचा आहे. जरा आरशात चेहरा बघ, त्याला बघताच कशी लाललाल होतेस तू? मनांतून तू सतत त्याची वाट बघत असतेस ना? तोही सतत तुझ्या मागावर असतो ना? मग? हे प्रेमच आहे गं बाई!!’’

म्हणजे आता शंकेला वाव नव्हता. एक दिवस ती लायब्ररीत अभ्यास करत असताना अवचित प्रसन्न येऊन थडकला.

‘‘अरे? तू इथं का आलास? काही खास बोलायचं आहे का?’’ तिनं विचारलं.

‘‘होय, खासच बोलायचंय. मला सांग. तुझ्या आयुष्यातस माझी जागा काय आहे?’’ प्रसन्नच्या आवाजात उतावळेपणा होता.

‘‘असं का विचारतो आहेस? माझ्या आयुष्यात तुझं काय स्थान आहे हे वेगळ्यानं सांगायला हवं का? तुझ्या विना माझं अस्तित्त्वच नाहीए रे. प्रसन्न आहे तर तनीषा आहे. झाडाला बिलगलेल्या वेलीला सांगावं लागतं का की तिच्या जीवनात त्या झाडाचं काय महत्त्व आहे ते?’’ तनीषा बोलून गेली अन् मग जीभ चावून गप्प बसली. मनांतच म्हणाली, ‘‘देवा रे, मी काय बोलून गेले…प्रसन्नला काय वाटेल? मी कित निर्लज्ज आहे असं वाटेल ना त्याला?’’

‘‘बोल बोल, तनु, गप्प का झालीस? शेवटी खरं काय ते तुझ्या तोंडून निघालं. मला वाटंत होतं पण खात्री नव्हती. तुझ्या तोंडून ऐकलं अन् खात्री पटली.’’ त्यानं क्षणांत तिला मिठीत घेतलं अन् तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तनीषानं स्वत:ला सोडवून घेतलं अन् तिथून धूम ठोकली. लाजेनं लालेलाल झाली होती ती.

आता तर सगळे उघडच म्हणायचे यांची जोडी फारच छान आहे. जणू एकमेकांसाठीच आहेत दोघं. त्यांचं प्रेम आईवडिलांनाही जाणवलं होतं. त्यांचं लग्न करून द्यावं असं वाटत होतं. प्रसन्नलाही पुण्यात लेक्चरर शिप मिळाली होती. दोन्ही घरातून होकार होता. दोघंही आनंदात होती पण प्रसन्नच्या आजीनं दोघांची पत्रिका जुळवण्याची टूम काढली अन् दुर्दैवानं तनीषाला मंगळ निघाला.

तनीषाच्या आईवडिलांचा या गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यांनी कधी पत्रिका वगैरे केलीच नव्हती. त्यांना या सगळ्या अंधश्रद्धा वाटत होत्या पण प्रसन्नची आजी मात्र हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम होती. प्रसन्न तिचा एकुलता एक नातू अन् घराण्याचा वारस होता. खरं तर तो शिकलेला होता. त्याला तनीषाखेरीज इतर कुणाही मुलीशी लग्न करायचं नव्हतं. तो ही अडून बसला की तनीषा खेरीज तो कुणाशीही लग्न करणार नाही.

तनीषाला ही गोष्ट कळली तेव्हा तिनंच हे लग्न मोडण्याचं ठरवलं. ‘‘हे बघ प्रसन्न, जर आपल्या लग्नांमुळे तुझ्या जिवाला धोका संभवंत असेल तर मी तुला या बंधनातून मुक्त करते. मला तुझ्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढायचं आहे. फक्त तुला मिळवणं किंवा त्यासाठी लग्न करणं याला काय अर्थ आहे? तुला काही झालं तर मी स्वत:ला क्षमा करू शकणार नाही…’’ तनीषानं म्हटलं.

प्रसन्नला धक्काच बसला. आश्चर्यानं त्यानं विचारलं, ‘‘आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतोय तर या असल्या गोष्टींवर आपण विश्वास का ठेवायचा? कुठल्या तरी काल्पनिक भयानं तू पाऊल मागे का घेते आहेस? तुझ्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही का? बी लॉजिकल.’’

तनीषा मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. तिनं प्रसन्नच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पण प्रसन्ननं आपल्या नावांची हिऱ्याची अंगठी तिच्या डाव्या हाताच्या तर्जीत घातली अन् तो म्हणाला, ‘‘ही अंगठी आपल्या साखरपुड्याचं प्रतीक आहे. मी तुझ्या होकाराची वाट बघेन.’’ अन् मागे वळून बघता तो तिथून निघून गेला.

लवकरच तो नव्या नोकरीत रूजू झाला. तनीषानं त्याला भेटणं कमी केलंच होतं, आता फोनवरचा संपर्कही कमी केला. प्रसन्नला भेटल्यावर कदाचित आपला निश्चय बारगळेल अशी तिला भीती वाटत होती. प्रसन्न मात्र तिची वाट बघत होता. तनीषालाही कॉलेजात नोकरी मिळाली. तिनं स्वत:ला कॉलेजच्या इतर व्यापात गुंतवून घेतलं.

प्रसन्नला कॅनडाची एक फेलोशिप मिळाली. तो दोन वर्षांसाठी तिकडे गेला अन् मग तिथलीच एकेक कामं मिळत गेली म्हणून त्याचा कॅनडामधला मुक्काम वाढतच गेला. कधीतरी फोन, कधी तरी व्हॉट्सअॅपवर बोलणं व्हायचं, ते ही कमी कमी होत गेलं अन् एक दिवस शुभ्रानं तिला त्याच्या लग्नाची बातमी दिली.

ज्या आजीमुळे प्रसन्न तनीषाचं लग्न मोडलं होतं ती मृत्युशय्येवर होती अन् तिला प्रसन्नला वरवेषात बघायचं होतं. नातसून बघायची होती. शेवटी तिच्या इच्छापूर्तीसाठी प्रसन्ननं लग्नं केलं होतं. हे ऐकून मात्र तनीषाचे डोळे भरून आले. प्रसन्ननं तिच्या बोटात घातलेल्या अंगठीमुळे ती स्वत:ला त्याची वाग्दत्त वधू समजत होती. प्रसन्न तर आजीची इच्छा धुडकावून तिच्याशी लग्न करायला तयार होता. तिनंच नकार दिला. आता रडून काय होणार? पण तिला तेही मान्य होईना?

‘‘नाही, मी त्याची अन् तो माझा आहे. त्याचं लग्न कुणा बरोबरही झालं तरी माझ्या बोटातली अंगठी त्याच्या प्रेमाची खूण आहे.’’ तिनं स्वत:लाच समजावलं यापुढे ती एकटीच जगणार होती.

तिचा निश्चय ऐकून आई वडिलांनी तिच्या भावाचं लग्न करून दिलं. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ती भावासोबत राहत होती. पण वहिनीला हळूहळू तिचं राहणं खटकू लागलं. ती वेडवाकडं बोलायची, टोमणे मारायची. तनीषा आजारी पडली तव्हा वहिनीला तिची सेवा करावी लागली तेही ती बोलून दाखवायची पण वहिनीची तिन्ही बाळंतपण तनीषानं निस्तरली होती, तिचे माहेरचे फिरकलेही नव्हते, हेही सोयीस्करपणे विसरली होती. वहिनीला निवांत रात्रीची झोप मिळावी म्हणून ती मुलांना आपल्याजवळ झोपवंत होती. सकाळी सगळा स्वयंपाक आटोपून कॉलेजला जायची. आल्यावरही सतत बाळाच्या व बाळंतिणीच्या तैनातीत असायची. पगारातली ठराविक रक्कम वहिनीच्या हातात दिल्यावरंच ती आपला खर्च करायची.

शेवटी भावानं वेगळा फ्लॅट घेतला. बहीण एकटी पडेल याची काळजी त्याला वाटली नाही. आता तर ती अगदी एकटी होती.

दाराची घंटी वाजली तशी ती भानावर आली. दार उघडलं तर दारात अनुज होता. बहिणीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका द्यायला आला होता. तिनं पत्रिका बघितली. नीरजा+प्रतीक अशी नावं वाचली. वराच्या वडिलांचं नांव प्रसन्न दीक्षित बघून तिच्या तोंडून आश्चर्य आनंदाचा चित्कार बाहेर पडला…हा प्रतीक म्हणजे माझ्या प्रसन्नचा मुलगा आहे का? नसेलही…हा दुसराच कुणी प्रसन्न दीक्षित असू शकतो…तिनं स्वत:लाच समजावलं.

‘‘मावशी, लग्नाला नक्की या हं!’’ तीन तीनदा बजावून अनुज निघून गेला.

आज ती खूप वेळ स्वत:लाच आरशात निरखंत होती. खरंच ती म्हातारी झाली होती? शक्यता आहे. परिस्थितीशी झुंज घेताना दमछाक होतेच. काळचक्र मागे फिरवता आलं असतं तर तिनं प्रसन्नला घट्ट मिठी मारली असती.

‘‘ये रे प्रसन्न, तुझा तनू आजही तुझी वाट बघतेय.’’ एक नि:श्वास तिच्या तोंडून बाहेर पडला.

आज पंचवीस तारीख. सायंकाळी नीरजाची वरात येणार आहे. जाऊ की नको जाऊ, या मानसिक द्वंदात तिनं काहीच तयारी केली नव्हती. वधूसाठी काही भेट वस्तू ही घेतली नव्हती. वेळेवर पाकिटात घालून कॅश देता येईल असं तिनं ठरवलं.

बँडच्या आवाजानं ती पुन्हा भानावर आली. वरात आली वाटतं. तिनं पटकन आवरलं. केसांचा सुंदर अंबाडा घातला. निळ्या रंगाची सिल्कची साडी, त्यावर मोत्याचे दागिने, बोटात प्रसन्ननं दिलेली अंगठी होतीच. प्रसन्नचं प्रेम होतं ते.

सगळा बंगलाही नववधूसारखा नटला होता.

वरात दारात आली होती. तिची नजर नवरदेवाच्या वडिलांकडे गेली. प्रसन्नच होता. आपल्या व्याह्यांनी केलेल्या विनोदावर खूप खूप हसंत होता. तनीषाची नजर तिच्या प्रसन्नला शोधंत होती, तो कुठंतरी हरवला  होता. डोक्यावरचे अर्धे पांढरे, अर्धे काळसर केस, कल्ल्यांजवळ पांढरे झालेले केस त्याचं वय सांगत होते. थोडं सुटलेलं पोट सुखसमृद्धीचं प्रतीक होतं…छे! हा माझा  प्रसन्न नाहीए. तिनं स्वत:लाच समजावलं. तेवढ्यात मैत्रिणीच्या घोळक्यातली सुंदर नटलेली नववधू हातात वरमाळा घेऊन येताना दिसली. तनिषानं झटक्यात निर्णय घेतला अन् पुढे होऊन नीरजाच्या बोटात आपली अंगठी घातली. नीरजाला काही कळायच्या आत ती तिथून निघाली. आता तिचं तिथं काहीच काम नव्हतं.

जेव्हा प्रसन्न सुनेच्या बोटात ती अंगठी बघेल तेव्हा त्याला माझी आठवण येईल का? या विचारातच तिला गाढ झोप लागली. आता प्रसन्न कधीच परत येणार नव्हता. आता तिला कुणाविषयी कसलीच तक्रार नव्हती. तिचं मन शांत शांत झालं होतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...