* मिनी सिंग
सयुक्त अरब अमिरातीमध्ये एका महिलेला लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या महिलेवर आरोप आहे की तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वत:ला अपयशी ठरलेल्या लग्नाचा बळी म्हणून संबोधले आणि आपल्या मुलांच्या संगोपनासाठी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आणि १७ दिवसांत ५० हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ३५ लाख गोळा केले. या महिलेने ऑनलाइन खाते तयार केले आणि आपल्या मुलांच्या छायाचित्रांद्वारे त्यांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत मागितली. परंतु जेव्हा या महिलेच्या पूर्वीच्या पतीस हे समजले की ती मुलांची छायाचित्रे दाखवून लोकांकडे भीक मागत आहे, तेव्हा त्याला धक्का बसला. मग त्याने दुबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला फोन करून सूचना दिली आणि त्यांची मुले त्याच्याबरोबर राहत असल्याचे सिद्ध केले. केवळ पैशासाठी या महिलेने सोशल मीडियावर आपल्या मुलांना बदनाम करुन १७ दिवसांत ३५ लाखांची कमाई केली.
७ वर्षांचा तेजा आपल्या वडिलांसोबत इंदूर येथे राहतो. तेजाला ब्रेन पोलिओचा त्रास आहे, परंतु त्याच्या वडिलांसाठी तर जणू पैसे कमवणारे मशीन. भीक मागविणाऱ्या टोळीकडे वडिल त्याला काही काळ भाडयाने देतात. मग टोळीकडून मिळालेल्या पैशातून वडील नशा करतात.
याचप्रमाणे आणखी एक प्रकरण आहे. एक मूल स्वत:ला गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे भासवत विकलांगाच्या गेटअपमध्ये व्हीलचेअरवर बसून भीक मागत होता. जेव्हा तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीला संशय आला आणि चौकशी केली गेली तेव्हा त्या प्रकरणाचे बिंग फुटले. पोलिसांच्या विचारपूसवर त्या मुलाने सांगितले की त्याला भीक मागण्यासाठी सहारनपूरहून जयपूर येथे आणले गेले. मुलाने सांगितले की सर्व मुले दररोज रुपये १,००० ते रुपये १,५०० पर्यंत भिक मागून मास्टरमाइंडला देतात. भिक्षेचा २० टक्के भाग मास्टरमाइंड मुलांच्या कुटुंबांना पाठवतो.
अतिरिक्त डीसीपी धर्मेंद्र्र सागर यांनी सांगितले की मुलाकडून रुपये १०,५९० ची चिल्लर, एक व्हीलचेअर, बॅटऱ्या, अँप्लिफायर, स्पीकर इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
मास्टरमाइंड समीर अपंगांना उत्तर प्रदेशातून जयपूर येथे आणत असे आणि त्यांना रेल्वे स्थानकात किंवा जवळपास कुठेही भटक्या विमुक्तांप्रमाणे ठेवत असे. अश्या मुलांना भिकाऱ्यांच्या गेटअपमध्ये व्हीलचेअरवर बसवायचा, जे अशक्त असतील आणि दिसायला आजारी वाटत असतील. भीक मागण्यासाठी मुलांना दुर्गंधीयुक्त व फाटलेले जुने कपडे घालायला देई तसेच व्हीलचेअर ढकलण्यासाठी एका मुलाला तयार करी. व्हीलचेअरवर बॅटरी, अँप्लिफायर आणि लहान स्पीकर्स लावत असे. व्हॉईस रेकॉर्डिंगद्वारे असे म्हटले जात असे की व्हीलचेअरवर बसलेल्या मुलास हृदयविकाराचा गंभीर आजार आहे. यावर उपचार करण्यासाठी पैशांची गरज आहे.
जितके अधिक मुले तितका जास्त नफा
आपल्या देशात भिकाऱ्यांची टोळी आहे हे आपल्याला कदाचित माहिती नसेल. जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या टोळीत सामील करण्याचा या टोळीचा प्रयत्न असतो आणि बहुतेक त्यांच्या टोळीत मुले सामील असतात, कारण त्यांना याचा अधिक फायदा होतो. कारण, या टोळीच्या प्रमुखाला भीक मागणाऱ्या मुलाला जास्त पैसे द्यावे लागत नाहीत.
केवळ भिक्षा मागण्यासाठी मुलांना अपंग बनविले जाते आणि त्यांना कुबड्या दिल्या जातात जेणेकरून लोक त्यांच्याकडे दयाळूपणाने बघत भीक देतील. महानगरांमध्ये भिकाऱ्यांची दहशत सातत्याने वाढत आहे. शहरातील मुख्य चौकासह भिकाऱ्यांनी रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावरही ताबा मिळवला आहे. भिकाऱ्यांकडून भीक मागवून घेण्यात प्रचंड माफिया गुंतलेले आहेत, जे या भिकाऱ्यांना मुख्य चौकासह इतर ठिकाणी पाठविण्याचे कामदेखील करतात.
लोकांना त्यांच्याबद्दल कळवळा यावा यासाठी जे लोक अपंग नाहीत त्यांनादेखील कुबड्या दिल्या जातात, जेणेकरून भिकाऱ्याला अपंग मानले जाऊ शकेल आणि त्याला अधिकाधिक भीक मिळू शकेल. संध्याकाळ होताच माफिया लोक चौक किंवा इतर ठिकाणी येऊन भीक मागणाऱ्या लोकांकडून पैसे गोळा करतात. यानंतर या भिकाऱ्यांना खाण्यापुरते पैसे देऊन ते उर्वरित पैसे नेतात.
कोणत्या भिकाऱ्याला कोणत्या चौकात किंवा इतर ठिकाणी लावायचे आहे, त्याचा निर्णय भिकारी माफियांचा गुंडच घेतो. त्यानंतर तो इतर माफियांना हे चौक, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि इतर ठिकाणांचे प्रभारी बनवतो जेणेकरून एखादा भिकारी बाहेरून आला आणि यांच्या जागी भीक मागू लागला तर भिकारी माफियांचे लोक त्याला तेथून पळवून देतील.
धार्मिक स्थळी भिकारी माफिया
चौकांसह भिकारी माफियांनी धार्मिक स्थळांच्या बाहेरदेखील स्वत:चा कब्जा जमवला आहे. या ठिकाणी केवळ अशाच लोकांना उभे केले जाते, ज्यांची स्थिती अत्यंत दयनीय असेल जेणेकरून धार्मिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांना त्यांच्यावर दया येईल आणि ते त्यांना जास्तीत जास्त पैसे देतील. त्यांना असेही प्रशिक्षण दिले जाते की जेव्हा कोणी पैसे देईल तेव्हा त्याबरोबर त्यांना आशीर्वाददेखील द्यायचे आहेत.
सराईत भिकाऱ्यांना पॉश परिसर
पॉश परिसरातील चौक व बाजारपेठांमध्ये केवळ सराईत भिकाऱ्यांनाच भिकारी माफिया उभे करतो, कारण लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचे अनेक मार्ग सराईत भिकाऱ्यांना माहित असतात, ज्यामुळे लोक त्यांच्यावर दया करतात आणि मग त्यांना पैसे देतात.
गुन्हेगार आणि भीक मागण्यांमधील संबंध
शहरात भिकाऱ्यांच्या वाढीबरोबरच गुन्हेगारांनाही आश्रय मिळत आहे. बऱ्याचदा दुष्कृत्य केल्यानंतर गुन्हेगार या भिकाऱ्यांमध्ये जाऊन लपून बसतात आणि पोलिसांना त्यांचा सुगावा लागणे कठीण होते. रेल्वे स्थानक आणि इतर अशा ठिकाणी जिथे प्रवासी रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणातून जातात, तेव्हा गुन्हेगार त्यांना आपले लक्ष्य बनवतात आणि नंतर पुन्हा भिकाऱ्यांमध्ये जाऊन झोपी जातात. पोलिसांनी बऱ्याच वेळा अशा टोळयांचा खुलासा केला आहे.
आपणास दिसेल की एखादे मुल अचानक कारच्या समोर किंवा मागे येऊन टकटक करू लागतो आणि ड्रायव्हरचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात करतो. ड्रायव्हर कारमधून खाली उतरताच काही इतर मुले खिडकीतून मोबाईल किंवा कारमध्ये ठेवलेल्या इतर वस्तू चोरी करतात. ही मुले त्याच माफिया टोळीच्या हातातील कठपुतळया असतात, जी त्यांच्याकडून भीक मांगवितात. हीच मुले मोठी होऊन संपूर्ण समाजासाठी विनाशक ठरतात. चोरी, पॉकेटमारी, चेन स्नॅचिंगपासून ते ड्रग्सच्या व्यापारापर्यंत सामील होतात.
सुशिक्षित भिक्षुक
केवळ मुले आणि मोठी माणसेच नाहीत तर आज सुशिक्षित लोकदेखील भीक मागण्याच्या व्यवसायात गुंतले आहेत. एका अहवालानुसार, देशात मोठया संख्येने पदवी आणि डिप्लोमा धारक भिकारी आहेत. देशातील रस्त्यांवर भीक मागणारे सुमारे ७८,००० भिकारी असे आहेत आणि त्यातील काहींजवळ तर व्यावसायिक पदव्या आहेत. ही धक्कादायक बाब सरकारी आकडेवारीतून समोर आली आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार ज्यांना रोजगार नाही आणि त्यांच्या शैक्षणिक स्तराची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, देशात ३.७२ लाखाहून अधिक भिकारी आहेत. यापैकी सुमारे ७९ हजार म्हणजेच २१ टक्के भिकारी १२ वी उत्तीर्ण आहेत. इतकेच नाही तर त्यातील ३ हजार असे भिकारी आहेत, ज्यांचा कुठल्या न कुठल्या तरी तांत्रिक किंवा व्यावसायिक कोर्समध्ये डिप्लोमा आहे. आज देशात असे अनेक भिकारी आहेत, जे २ वेळेच्या भाकरीसाठी नव्हे तर मालमत्ता बनविण्याच्या इच्छेने भीक मागण्याच्या व्यवसायात जोडली गेली आहेत. होय, आज देशात असे अनेक भिकारी आहेत, जे कोटयधीश आहेत. तरीही आपणास असे वाटत असेल की या भिकाऱ्यांचे या धंद्यात येण्याचे कारण फक्त निरक्षरता आहे, तर आपण चुकीचे आहात.
लोक भीक का मागतात
हैद्रराबादमध्ये एमबीए पास असलेल्या फरजोना नावाच्या एका तरुणीला भीक मागताना पकडले गेले. ती लंडनमध्ये अकाऊंट ऑफिसर म्हणून राहून चुकली होती. तिने सांगितले की तिचा नवरा मेला आहे आणि आता ती आपल्या आर्किटेक्ट मुलासह राहते. जीवनातून त्रस्त होऊन जेव्हा ती एका बाबाकडे गेली तेव्हा त्या बाबाने तिला भिकारी बनविले. त्याचप्रमाणे अमेरिकन ग्रीन कार्डधारक रबिया हैद्रराबादमध्येच एका दर्ग्यासमोर भीक मागताना पकडली गेली. तिने सांगितले की तिच्या नातेवाईकाने फसवणूक करून तिची सर्व मालमत्ता बळकावली.
आंध्रप्रदेशाच्या गुत्तूर जिल्ह्यातील एक शिक्षित २७ वर्षीय भिकारी म्हणतो की कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिक्षण मध्येच सोडावे लागले. कामाच्या शोधात मुंबईत आलो. काम मिळाले पण गुलामगिरीतील मजुरासारखे. मग काम सोडून भिक मागू लागलो. भीक मागण्याने इतकी कमाई होते की मी माझ्या कुटुंबीयांचीदेखील आर्थिक मदत करतो.
भीक मागणे एक व्यवसाय
भीक मागण्याचा व्यवसाय आता गोरगरीबांची विवशता नव्हे तर देशातील सुशिक्षित लोकांकरिता हा कमाईचा सर्वात सोपा स्त्रोत बनला आहे. मर्यादा तर तेव्हा पार होते जेव्हा पैशाची मागणी करणारे भिकारी लाजेने डोळे झाकवून नव्हे तर अक्कड दाखवत जोर जबरदस्तीने पैसे मागतात. दिले नाहीत तर ते शिवीगाळही करतात. आजकाल तर भिकारी भीक मागताना स्वत:ला अपमानित वाटून घेण्याऐवजी देणाऱ्यांनाच अपमानित करतात. येथपर्यंत की भिकारी आवश्यकता पडल्यास धर्मानुसार आपली वेशभूषासुद्धा बदलतात. हे सर्व दर्शविते की आजकाल लोकांसाठी भीक मागणे ही कुठली विवशता नव्हे, तर व्यवसाय बनला आहे.
भीक मागणे कायदेशीर गुन्हा म्हणून घोषित करूनही भिकाऱ्यांची संख्या कमी होत नाही. ज्या मुलांच्या हाती पुस्तके असावीत, त्यांच्या हाती वाडगे दिले जाते. दु:खाची गोष्ट म्हणजे स्वत: पालकच आपल्या मुलास या दलदलीत पाडत आहेत. ही माणसे किती निर्दयी आहेत, जी स्वत:च्या मुलांना अपंग बनवतात यासाठी की ते त्यांच्याकडून भीक मागवू शकतील.
उत्तर प्रदेशात एक गाव असे आहे, जिथे सर्व पुरुष भिक मागतात आणि जर कोणी पुरुष भीक मागण्याचे काम करत नसेल तर हा समाज त्याचे लग्न होऊ देत नाही. या समुदायाचे लोक अनेक शतकांपासून भीक मागत आहेत आणि त्यांनी कधीही त्यांची परिस्थिती बदलण्याविषयी विचार केला नाही.
कशी संपुष्टात येईल ही कुप्रथा
कायद्याचे तज्ञ भीक माफियांसाठी कठोर कायदे करण्याच्या बाजूने आहेत, परंतु समाजशास्त्रज्ञ असे मानतात की मुलांना केंद्रस्थानी ठेवून कायदे करावे लागतील. ते हेदेखील मानतात की भीक मागणे हा एक सन्माननीय व्यवसाय नाही, केवळ गुन्हेगारी टोळया किंवा काही रिकामटेकडे राहूनही पैसे कमविण्यास इच्छुक असलेले लोक हा व्यवसाय स्वेच्छेने स्वीकारतात.
देशातील शिक्षणतज्ज्ञ म्हणतात की शिक्षण आणि रोजगार यांच्यामध्ये योग्य समन्वय नसल्याने अशी समस्या उद्भवते. त्यांनी शंका व्यक्त केली की सुशिक्षित भिकाऱ्यांची वास्तविक संख्या अजून जास्त असू शकते. ते म्हणाले की समाजात भीक मागणे चांगले मानले जात नाही, म्हणून उच्चशिक्षित भिकारी सव्हेच्या वेळी त्यांच्या शैक्षणिक स्थितीबद्दल खोटे बोलतात. हे पाहिले गेले आहे की आधी हे लोक नाईलाजास्तव भीक मागतात, परंतु नंतर ती त्यांची सवय बनते. भिकाऱ्यांना रोजगाराभिमुख कामांशी जोडणे काही अवघड काम नाही, असेही ते म्हणाले. परंतु जोपर्यंत शैक्षणिक धोरणात परिवर्तन होत नाही तोपर्यंत ‘कौशल्यप्रधान भारत’ किंवा भिकारीमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करणे खूप अवघड आहे.
तसे महाराष्ट्र सरकारने राज्याला भिकारीमुक्त करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. पोलिस भिकाऱ्यांना पकडतात आणि त्यांना कोर्टात नेतात जेथे त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठविले जाते. पण अधिकतर भिकारी जामीन देऊन पुन्हा भीक मागण्यास प्राधान्य देत आहेत. हेच कारण आहे की सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पुनर्वसन केंद्रांमध्ये भिकाऱ्यांची संख्या ४ वर्षात ३८ टक्यांनी कमी झाली आहे.
‘इझि मनी’ चा हा ट्रेंड असा आहे की पकडले गेल्यावर भिकारी न्यायालयात वकीलांना हजर करतात. ते ३ हजार ते ५ हजार पर्यंत जामीनही भरत आहेत. मागील वर्षी पुण्यातच ६० हून अधिक भिकारी आणि राज्यांत २००हून अधिक भिकाऱ्यांना जामीन मिळाला होता. ते न्यायाधीशांसमोर सांगतात की ते भीक मागणार नाहीत, परंतु त्यांची सुटका झाली की पुन्हा त्याच व्यवसायात अडकतात.
गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे म्हणतात की भिकाऱ्यांना ‘इझि मनी’ची सवय झाली आहे. रोख रक्कम जमा करून, दंडाची पावती फाडून किंवा जामिनाची रक्कम त्वरित भरून ते बाहेर पडतात. अशा प्रकारे पुनर्वसन केंद्रांमधील या लोकांची संख्या कमी होत आहे, परंतु रस्त्यावर भीक मागणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.
बॉम्बे प्रिव्हेंशन अॅक्टमध्ये पुरेशी तरतूद असल्याचे केंद्र सरकारने कोर्टाला सांगितले होते. या कायद्यांतर्गत भीक मागणे हा गुन्हा असल्याचे सांगितले गेले आहे. हे गरिबीमुळे केले गेले असेल तर भीक मागणे हा गुन्हा होऊ नये असेही केंद्राने म्हटले आहे. दिल्लीतही भीक मागणे हा गुन्हा आहे. प्रथमच भीक मागताना पकडले गेल्यास ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
भीक मागण्याबाबत असा कायदा करण्याची गरज आहे, जो त्यास बेकायदेशीर मानण्याऐवजी या लोकांच्या पुनर्वसन व सुधारणेवर भर देईल. नाईलाजास्तव भीक मागणाऱ्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जावे, यासाठी सरकारांना आरंभ करावा लागेल.