* मिनी सिंग
सयुक्त अरब अमिरातीमध्ये एका महिलेला लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या महिलेवर आरोप आहे की तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वत:ला अपयशी ठरलेल्या लग्नाचा बळी म्हणून संबोधले आणि आपल्या मुलांच्या संगोपनासाठी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आणि १७ दिवसांत ५० हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ३५ लाख गोळा केले. या महिलेने ऑनलाइन खाते तयार केले आणि आपल्या मुलांच्या छायाचित्रांद्वारे त्यांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत मागितली. परंतु जेव्हा या महिलेच्या पूर्वीच्या पतीस हे समजले की ती मुलांची छायाचित्रे दाखवून लोकांकडे भीक मागत आहे, तेव्हा त्याला धक्का बसला. मग त्याने दुबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला फोन करून सूचना दिली आणि त्यांची मुले त्याच्याबरोबर राहत असल्याचे सिद्ध केले. केवळ पैशासाठी या महिलेने सोशल मीडियावर आपल्या मुलांना बदनाम करुन १७ दिवसांत ३५ लाखांची कमाई केली.
७ वर्षांचा तेजा आपल्या वडिलांसोबत इंदूर येथे राहतो. तेजाला ब्रेन पोलिओचा त्रास आहे, परंतु त्याच्या वडिलांसाठी तर जणू पैसे कमवणारे मशीन. भीक मागविणाऱ्या टोळीकडे वडिल त्याला काही काळ भाडयाने देतात. मग टोळीकडून मिळालेल्या पैशातून वडील नशा करतात.
याचप्रमाणे आणखी एक प्रकरण आहे. एक मूल स्वत:ला गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे भासवत विकलांगाच्या गेटअपमध्ये व्हीलचेअरवर बसून भीक मागत होता. जेव्हा तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीला संशय आला आणि चौकशी केली गेली तेव्हा त्या प्रकरणाचे बिंग फुटले. पोलिसांच्या विचारपूसवर त्या मुलाने सांगितले की त्याला भीक मागण्यासाठी सहारनपूरहून जयपूर येथे आणले गेले. मुलाने सांगितले की सर्व मुले दररोज रुपये १,००० ते रुपये १,५०० पर्यंत भिक मागून मास्टरमाइंडला देतात. भिक्षेचा २० टक्के भाग मास्टरमाइंड मुलांच्या कुटुंबांना पाठवतो.
अतिरिक्त डीसीपी धर्मेंद्र्र सागर यांनी सांगितले की मुलाकडून रुपये १०,५९० ची चिल्लर, एक व्हीलचेअर, बॅटऱ्या, अँप्लिफायर, स्पीकर इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.





