* गरिमा
‘‘हाय प्रिया.’’
अनोळखी नंबरवरुन आलेला कॉलवरुन अपरिचित व्यक्तीने आपले नाव घेतल्यामुळे प्रियाला आश्चर्य वाटले, पण नंतर तिने असा विचार केला की, कदाचित तो तिला ओळखत असेल. त्यामुळेच तिने विचारले, ‘‘तुम्ही कोण?’’
‘‘तू ज्याला आवडतेस तोच, आणखी कोण?’’
समोरच्याच्या बोलण्यात खोडसाळपणा होता. बोलायचे नसतानाही प्रियाने उत्सुकतेने विचारले, ‘‘तुमचे काही नाव तर असेल ना?’’
‘‘तुला जे हवे ते नाव ठेव, तुझ्या नरम, गुलाबी ओठांवर कुठलेही नाव सुंदरच वाटेल…’’
मी कुणाही अनोळखी व्यक्तीशी बोलत नाही, असे सांगत प्रियाने त्याच्या उद्धट बोलण्याला पूर्णविराम लावत फोन कट केला.
पण हे काय? अर्ध्या तासाच्या आतच त्याच नंबरवरुन पुन्हा फोन आल्यामुळे प्रिया अस्वस्थ झाली. त्यानंतर फोन घेऊन कठोर शब्दात बोलली की, ‘‘हू इज धिस… डिस्टर्ब का करत आहेस?’’
‘‘मी तर मैत्री करू इच्छितो.’’
‘‘पण मी अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत नाही.’’
‘‘अनोळखी कुठे? थोडया वेळापूर्वीच तर बोलणे झाले होते तुझ्याशी. आता नावाचे विचारत असशील तर लोक मला राज म्हणून ओळखतात. आणि जर ओळखीबाबत बोलायचे तर तुझ्याच एका मित्राकडून तुझा नंबर मला मिळाला.’’
‘‘ठीक आहे, बोल, काय बोलायचे आहे तुला?’’
‘‘हेच की, तुझी नजर एखाद्या खंजीरसारखी काळजात घुसते. खरंच तू जर समोर असली असतीस तर…’’
‘‘तर काय…’’ प्रियाने मध्येच त्याला थांबवत विचारले.
त्यानंतर थोडे लडिवाळ बोलणे, थोडे उलट बोलणे, थोडे रोमँटिक आणि थोडया अश्लील गोष्टी बोलण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला प्रियाला एखाद्या अनोळखी माणसाबरोबर असे बोलण्यात संकोच वाटत होता, पण त्याच्या बिनधास्त वागण्यामुळे हा संकोचही दूर झाला. त्यानंतर प्रियालाही मजा वाटू लागली. तो तरुण हळूहळू प्रियासोबत अश्लील बोलू लागला. एक-दोनदा प्रिया त्याला ओरडली. त्यानंतर बिनधास्त बोलू लागली. पुढे दोघे एकमेकांना भेटू लागले. मग एक दिवस त्याने प्रियाला आपल्या घरी बोलावले आणि मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
अशा घटना बऱ्याचदा मुली आणि महिलांसोबत घडतात. अनेकदा तर विवाहित महिलांनाही अशा अनोळखी व्यक्तीचे कॉल घेऊन त्याच्याशी गप्पा मारण्याची सवय लागते, हीच सवय नंतर त्यांच्यासाठी मोठया समस्येचे कारण ठरते.
याचप्रमाणे, दिल्लीतील ४४ वर्षीय आणि २ मुलांची आई असलेल्या सुधाने हे मान्य केले की, एका फेक कॉल करणाऱ्याच्या जाळयात अडकून तिनेही सुखसमाधान, सोबतच दीड लाख रुपये गमावले.
तिने सांगितले की, एकदा चुकून ती एका राँग नंबरसोबत बोलली आणि त्यानंतर झालेल्या ओळखीतून त्याच्या प्रेमात पडली. या दोघांमध्ये हे नाते खूप दिवस टिकले. एके दिवशी मोबाईलवर अतिशय घाबरलेल्या आवाजात त्या तरुणाने तिला सांगितले की, त्याच्या बहिणीचा अपघात झाला आहे आणि त्वरित ऑपरेशन करायचे आहे. डॉक्टर अडीच लाख रुपये मागत आहेत. पण इतक्या घाईत तो फक्त दीड लाखांची व्यवस्था करू शकला. शक्य झाल्यास १ लाखांची मदत कर. सुधा त्याच्यात इतकी गुंतली होती की, त्याला नाही म्हणूच शकली नाही. तिने तत्काळ १ लाख रुपये त्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. अशाच प्रकारे, अन्य काही कारणे देवून त्याने सुधाकडून आणखी ५० हजार रुपये उकळले. पुढे तो सुधाच्या आयुष्यातून निघून गेला. त्यानंतर सुधाच्या हे लक्षात आले की, तिची चांगलीच फसवणूक झाली आहे.
अशाच प्रकारे काही अनोळखी कधीकधी महिलांना बदनाम करण्याचाही प्रयत्न करतात. एखाद्या मुलीने किंवा महिलेने विरोध केल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली जाते. घडलेल्या या घटनांकडे पहा :
१२ एप्रिल, २०१९
मेहरौली : एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेला पवन (वय २५) हा तरुण सोशल मीडियावर आपल्याच पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांशी मैत्री करुन त्यांना अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवत असे. त्यांच्याशी घाणेरडया गप्पा मारत असे. स्वत:चे अश्लील फोटो त्यांना पाठवत असे. महिलांनी विरोध करताच हातात चाकू असलेला आपला फोटो पाठवून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत असे. त्याला कोणी पकडू नये म्हणून सोशल मीडियावर सतत आपला आयडी बदलत असे.
१० मार्च, २०१८
रांचीमधील एक अभिनेत्री जिने ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात काम केले आहे, तिला बनावट फेसबुक आयडी बनवून एक व्यक्ती अश्लील मेसेज आणि फोटो पाठवत होता. तिने या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली.
बनावट फेसबुक आयडी तयार करणारी ही व्यक्ती महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करत असे. त्यानंतर त्यांना बदनाम करण्याची धमकी देत असे.
१ एप्रिल, २०१९
उज्जैनच्या शिवाजी कॉलनीत राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला एक अनोळखी व्यक्ती सतत अश्लील मेसेज आणि फोटो पाठवत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. तरुणीने त्याचा नंबर ब्लॉक करताच तो दुसऱ्या नंबरवरुन तिला त्रास देऊ लागला. तिने त्याच्या वागण्याला विरोध करताच तिच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
महिला काय करतात?
६२ टक्के महिला त्या अनोळखी कॉलरचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. १६ टक्के महिला सोशल मीडियावर याची वाच्यता करतात. स्क्रीन शॉट्स आणि नंबर शेअर करतात. १ टक्के महिला या आपल्या कुटुंबातील एखादा पुरुष किंवा मित्राला कॉल घ्यायला सांगतात. ११ टक्के महिला स्वत:चा नंबर बदलतात. ३२ टक्के अशा कॉलकडे दुर्लक्ष करतात. तर ९२ टक्के महिला थेट तो नंबरच ब्लॉक करुन टाकतात.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी सुमारे ५० टक्के महिलांना असा अश्लील कॉल आठवडयातून एकदा आला, तर ९ टक्के महिलांनी हे मान्य केले की, त्यांना रोजच अशा कॉल्सना सामोरे जावे लागते.
कोण पाठवतात अशा प्रकारचे मेसेजे?
सर्वेक्षणानुसार, अश्लील कॉल किंवा मेसेज करणारे ७४ टक्के अनोळखी व्यक्ती असतात. २३ टक्के स्टॉकर्स, तर ११ टक्के महिलांच्या ओळखीतलेच असतात. सर्वेक्षणात सहभागी ५३ टक्क्यांहून अधिक महिलांनी हे मान्य केले की, त्यांना बनावट व फसवणूक करणारे कॉल आले.
फोनद्वारे छळ करणाऱ्यांमध्ये दिल्ली आघाडीवर
दिल्लीमध्ये २८ टक्के महिलांना दर आठवडयात लैंगिक छळाशी संबंधित कॉल किंवा मेसेज येतात, जे इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत जास्त आहेत. इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या ‘इंटरनेट इन इंडिया २०१७’ या अहवालानुसार देशात ५० करोड इंटरनेट यूजर्स आहेत, त्यापैकी ३० टक्के महिला आहेत. देशात इंटरनेटचा सर्वाधिक वापर तरुण आणि विद्यार्थी करतात. खेडयांमध्ये १०० इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ३६ महिला आहेत. एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार २०१६ मध्ये देशात महिलांविरोधात सायबर क्राइमची ९३० प्रकरणे नोंदविण्यात आली.
काय करायला हवे?
मैत्री करा विचारपूर्वक : एखाद्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताच ती त्वरित स्वीकारायची, ही प्रवृत्ती सोडून द्या. मैत्री नेहमीच विचारपूर्वक करा.
जाळयात अडकू नका : अश्लील मेसेज आणि बनावट कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या जाळयात कधीच अडकू नका. जर काही कारणास्तव तुम्ही त्याच्याशी मैत्री केलीच असेल तर, कधीही त्याने बोलवताच त्याला भेटायला एकटीने सामसूम ठिकाणी किंवा त्याच्या घरी जाऊ नका. भेटायचेच असेल तर मॉल किंवा मेट्रो स्टेशन अशा खुल्या ठिकाणी भेटा. त्याला तुमच्या वैयक्तिक गोष्टी सांगू नका.
कायद्याचा आधार घ्या : फोनवर कारणाशिवाय मैत्री करायला सांगणे हा गुन्हा आहे. महिलांसोबत अशा प्रकारे छेडछाड केल्यास किंवा विनयभंग केल्यास आरोपीविरोधात कलम ३५४ अन्वये खटला दाखल केला जातो.
महिलांना फोनवर किंवा सोशल माडियाचा आधार घेऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध मैत्री करायला सांगणे हा एकप्रकारचा छळ आहे. अशा प्रकारे, एखाद्याच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणे हा गुन्हा मानला जातो. सतत टेक्स्ट मेसेज पाठविणे, मिस कॉल देणे, फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे, एखाद्या महिलेच्या स्टेटस अपडेटवर नजर ठेवणे आणि सोशल मीडियावर सतत तिच्या मागे लागणे हा आयपीसीच्या कलम ३५४ डी अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.
पोलिसांत तक्रार दाखल करा : महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी आता अशा प्रकरणांमध्ये सायबर क्राइमअंतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी फोनवर मेसेज किंवा अश्लील फोटो पाठविणाऱ्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करत असत, परंतु त्यावर कारवाई करणे अवघड होते, कारण बहुतेक प्रकरणांत मुले बनावट आयडीवर सिमकार्ड घेवून अशाप्रकारचे गैरकृत्य करत असत. त्यामुळेच आता त्यांना धडा शिकवण्यासाठी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन अशा प्रकरणांच्या चौकशीची जबाबदारी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहे, जेणेकरून गुन्हे शाखा पाळत ठेवून आरोपींवर कारवाई करु शकेल.