* प्रतिभा अग्निहोत्री
एखाद्या कापडावर सुई आणि रंगीबेरंगी, रेशमी धागा वापरुन वेगवेगळया डिझाइन कोरण्याच्या कलेला भरतकाम म्हणतात. आरसे, मोती आणि मणी इत्यादींचा वापर डिझाइन अधिक आकर्षक करण्यासाठी केला जातो. आज जरी युग पुढे सरसावले असले तरी हाताने केलेल्या भरतकामाची बाब वेगळीच असते. शरारा, गरारा, स्कर्ट यासारख्या पोशाखांच्या वाढत्या फॅशनबरोबरच तरुण मुलींमध्ये भरतकामाची आवड निर्माण झाली आहे.
पूर्वी फक्त हातांनी भरतकाम करण्याची प्रथा होती, आता या कामासाठी मशीन्सही आल्या आहेत. तसे तर काश्मिरी, सिंधी, चिकनकारी आणि गोटेपत्तीसारख्या अनेक भरतकाम कला प्रचलित आहेत, पण आम्ही तुम्हाला तीन मुख्य भरतकामाबद्दल सांगत आहोत.
कांथा वर्क : हे भरतकाम बंगालमधील सर्वात प्राचीन लोक भरतकामांपैकी एक आहे. कांथा म्हणजे जुने कापड. पूर्वी वेगवेगळया रंगांचे जुने कपडे पुन्हा वापर करण्यायोग्य बनवण्यासाठी एकावर एक ठेऊन त्यांना धावत्या टाकेच्या माध्यमातून नवीन चादर, ओढनी किंवा गोधडीचे रूप दिले जात असे आणि म्हणूनच या भरतकाम कलेला कांथा वर्क असे नाव देण्यात आले. यापासून प्रेरित होऊन यास नवीन साडया, कुर्ते आणि चादरी इत्यादींवरही बनवून त्यांना आकर्षक लूक देण्यात येऊ लागले. आता तर हे भरतकाम प्रत्येक प्रकारचे कपडे जसे खादी, सुती, रेशीम इत्यादीवरही केले जात आहे. हे बनवण्यासाठी रनिंग टाके किंवा रफू टाक्याचा उपयोग केला जातो. यात रंगीत धाग्यांच्या मदतीने फॅब्रिकवर फुलांची पाने, प्राणी आणि सामान्य जीवनातील दृश्ये कोरली जातात. कोणतेही प्लेन शर्ट, साडी, चादर किंवा ब्लाउजला या भरतकामाद्वारे आकर्षक लूक देता येऊ शकतो.
ही स्टिच स्टाइल ट्रेंडमध्ये आहे
रनिंग स्टिच : हाताने कपडे शिवण्यासाठी धावते टाकेच वापरले जातात. रंगीत धाग्यासह कोणतेही प्लेन फॅब्रिक धावत्या टाक्यांनी खूप आकर्षक बनवता येते. याला कच्चा टाकादेखील म्हणतात. कांथा वर्कमध्ये याच टाक्याचा वापर केला जातो.
स्टेम स्टिच : नावावरूनच स्पष्ट होते की हा टाका फुले आणि पानांचे पृष्ठभाग व त्यावरील सरळ रेषा तयार करण्यासाठी वापरला जातो.
चेन स्टिच : भरतकामाचे मूलभूत टाके म्हणजे साखळी टाके. हा टाका काश्मिरी भरतकामामध्ये वापरला जातो. साखळीसारखे दिसण्यामुळे याला साखळी टाका म्हणतात.
साटन स्टिच : साटन टाके फुलांच्या पानासारखे कोणतेही नमुने भरण्यासाठी वापरले जातात. हे टाके नमुन्याला एक रॉयल लुक देतात.
लेझ डेझ : छोटया-छोटया फुलांना धाग्याच्या विळख्याच्या माध्यमातून कपडयावर विणले जाणारे भरतकाम आहे हे. हे भरतकाम पाकळयासारखे दिसते.
फ्रेंच नॉट : लहानशा गाठीसारखा दिसणारा हा टाका खूप सोपा आणि सुंदर टाका आहे. हा सुईवरती दोरा गुंडाळून बनविला जातो. हा लहान-लहान फुले तयार करण्यासाठीच वापरला जातो.
डिझाईन कसे छापावे
यासाठी प्रत्यक्ष नमुन्यावर बटर पेपर ठेवून पेन्सिलने स्केच करा. आता जाड सुईने डिझाइनच्या कडांना छिद्र करा. आपण नमुना ३ प्रकारे छापू शकता :
* जुने सेल तोडून त्यातील काळया सामग्रीत रॉकेल मिसळा व जेल बनवा आणि छापल्या जाणाऱ्या फॅब्रिकवर बटर पेपर लावा आणि तयार केलेल्या जेलमध्ये सूतीचा एक छोटा कपडा भिजवा आणि नमुन्याच्या छिद्रांवर २-३ वेळा फिरवा. नमुना कपडयावर छापला जाईल.
* एका छोटया वाटीत कपडयांना लावण्यात येणारी लिक्विड नीळ घ्या. आता बटर पेपर कपडयावर ठेवा आणि वरील प्रक्रिया पुन्हा करा. नमुना छापला जाईल.
* आपण छिद्र न करता बटर पेपर आणि कपडयाच्या मध्यभागी कार्बन पेपर ठेवून आपली डिझाइन छापू शकता.
* आपल्या फॅब्रिकवर संपूर्ण नमुना एकाच वेळी मुद्रित करा जेणेकरुन भरतकाम करताना आपल्या सातत्यात कोणताही अडथळा येणार नाही.
* भौमितीय डिझाइन तयार करणे खूप सोपे असते. आपण केवळ पेन्सिलच्या मदतीने हे तयार करू शकता.
भरतकाम का करावे
हल्ली एकसारख्या डिझाईन्स आणि फॅब्रिक्सचे कपडे घातलेले लोक मॉल कल्चरमध्ये दिसून येतात. अशा परिस्थितीत हलक्या-फुलक्या भरतकामासह आपला पोशाख आपणास गर्दीपासून वेगळेपण देतो. याशिवाय बऱ्याच वेळा बाजारात पार्टीवेअर पोशाख आपल्या बजेटच्या बाहेर असतो. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रिंटेड किंवा प्लेन ड्रेसवर हाताने भरतकाम करून आपण त्याला सहजपणे पार्टीवेअर ड्रेस बनवू शकता. सध्या हाताचे भरतकाम फॅशनमध्ये आहे आणि मशीनी भरतकामापेक्षा हाताने भरतकाम केलेला कपडयांचा ड्रेस खूप महाग आहे.
* प्लेन फॅब्रिकवर वेगवेगळया रंगाच्या धाग्यांनी रनिंग स्टिचमध्ये सरळ रेषा बनवून आपण त्याला सहजच एक आकर्षक लुक देऊ शकता.
* छापील कुर्ते आणि साडीच्या छपाईवरदेखील डिझाइननुसार रेशीम धागा वापरल्याने त्याचे सौंदर्य वाढेल.
* प्लेन कुर्ते, दुपट्टे किंवा ब्लाउजचा गळा आणि बाह्यांना मिरर वर्क व फ्रेंच नॉटने सजवा.
* कोणत्याही प्लेन कपडयावर पेन्सिलने ८ इंच लांबीची आणि ६ इंचाच्या रुंदीची चौकट बनवा आणि नंतर त्यामध्ये भरतकाम करून गळ्याभोवती कॉलर बनवा आणि नंतर कॉन्ट्रास्ट कलरच्या कुर्त्यावर हे लावा, अप्रतिम कुर्ता तयार होईल.
* प्लेन चादरला कॉन्ट्रास्ट रंगाचे पॅच वर्क किंवा लोकर वर्कने बनवून तयार करा.
थोडी खबरदारी घ्या
* भरतकामासाठी नेहमीच फक्त दर्जेदार आणि पक्क्या रंगाचेच कपडे निवडा, जेणेकरुन आपल्या भरतकामावरील मेहनत फळास येईल.
* प्लास्टिकऐवजी लाकडी चौकट वापरा. कपडयांवर लाकडी चौकट लावल्याने घट्टपणा प्रकट होतो.
* भरतकामासाठी अँकरचे धागे वापरा. ते पक्क्या रंगाचे असतात.
* प्रत्येक सुताच्या गुंडीवर एक लेबल असते, ज्यावर धाग्याचा शेडदेखील लिहिलेला असतो. हे लेबल काळजीपूर्वक ठेवा, जेणेकरून जेव्हा आपल्याला पुन्हा धागा घ्यायचा असेल तेव्हा शेडविषयी आपल्या मनात कोणताही गोंधळ होणार नाही.
* प्रत्येक रंगाच्या धाग्याचा साठा ठेवा, जेणेकरून आपल्याला पुन्हा-पुन्हा बाजारात जाण्याची गरज भासणार नाही.
* प्रथमच भरतकाम करताना रनिंग आणि चेन स्टिचिंगपासून सुरूवात करा.
* पॅचच्या कामासाठी शुद्ध सूती कपडयांचा वापर करा, कारण रेशीम कपडयाने बनविलेल्या पॅचच्या काठावरुन धागे लवकर निघू लागतात.
* भरतकामानंतर धागे उलटया बाजूने कापून घ्या आणि आपल्या फॅब्रिकला अंतिम टच द्या.
* नमुना छापण्यासाठी केवळ कार्बन पेपर, रॉकेल आणि नीळचाच वापर करा, कारण हे कपडयांवर काही परिणाम करत नाहीत.
* भरतकाम सुरू करण्यापूर्वी पंचाच्या मदतीने कपडयाच्या वरती चौकट व्यवस्थित घट्ट करा. जेव्हा फ्रेम सैल होते, तेव्हा स्टिचचे टाके सैल राहतात आणि कपडयामध्ये फुगवटा येतो.