* शकुंतला सिन्हा
तुम्ही चित्रपटांतून हिरोला हिरोइनसोबत गाताना पाहिले असेल, ‘ये काली काली आँखे, ये गोरे गोरे गाल’ किंवा ‘गोरे गोरे मुखडे पे काला काला तिल’ किंवा अशाच प्रकारची काही गाणी ज्यात नायिकेचे गोरे असणे दाखवले जाते किंवा एखाद्या उपवर मुलाच्या विवाहासाठी दिलेली जाहिरात पाहिल्यास ‘वधू पाहिजे, गोरी, स्लिम, सुंदर’ आणि हे तिच्या शैक्षणिक आणि इतर योग्यतांच्या व्यतिरिक्त असते.
स्वत: रंगाने काळ्या असलेल्या वरालाही गोरी वधूच हवी असते. मॉडेलिंग, टीवी सीरियल्स किंवा फिल्म्समध्ये नायिका आणि सेलिब्रिटीजचे काही अपवाद सोडल्यास गोरे आणि सुंदर असणे अनिवार्य असते. एकाच कुटुंबात गोरी आणि काळी अशा मुली असतील तर काळया किंवा सावळया कांतीच्या मुलीच्या मनात हीनभावना निर्माण होते. बऱ्याच मुलींना त्यांच्या लग्नात डार्क कलरमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
काळया किंवा डार्क कलरमुळे फक्त मुलीच नाही तर मुलांनाही त्रास होतो. त्यांच्यातही काही प्रमाणात हीनभावना निर्माण होते.
कालिदासने आपल्या काव्यात नायिकांच्या सावळया रंगाला महत्त्व दिले आहे. जुन्या जमान्यातही महिला शृंगार करत असत, पण नैसर्गिक साधने दूध, साय, चंदन इ. चा वापर हा गोरे दिसण्यासाठी नसून स्किनला ग्लो आणण्यासाठी होत असे. मग हा गोरेपणाचा हव्यास आपल्या डोक्यात आला कधी?
इतिहासात डोकावून पाहिले असता आपल्या लक्षात येते की आर्यांनंतरच बहुदा गोरेपणाला सौंदर्यासोबत जोडून पाहिले. यानंतरही मंगोल, पर्शियन, ब्रिटिश जे जे राज्यकर्ते आले, ते गोऱ्या त्वचेचेच होते. इथूनच आपली मानसिकता बदलू लागली आणि गोऱ्या रंगाला आपण सुंदर समजू लागलो.
लग्न हा मुलींच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा माइलस्टोन आहे. त्यामुळे सुंदर दिसण्याच्या नादात त्या तऱ्हेतऱ्हेच्या पावडर, फाउंडेशन, फेअरनेस क्रीम वापरू लागल्या आहेत. फिल्म्स, टीवी सीरियल्स आणि जाहिरातीत गोऱ्या आणि सुंदर मुलींना उत्कृष्ट समजले जाते. समाजातील गोरेपणाचे महत्त्व आणि आपला हा कमकुवत दुवा लक्षात घेत फेअरनेस क्रीम बनवणाऱ्या कंपन्यांनी बाजारात आपले पाय घट्ट रोवले आहेत. आता तर फक्त महिलांसाठी नव्हे तर पुरुषांसाठीही फेअरनेस क्रीम बाजारात उपलब्ध आहे. अशी क्रीम्स आणि कॉस्मेटिक्स यांची वार्षिक उलाढाल जवळपास ३ हजार कोटी रुपये आहे. जी एका अनुमानानुसार पुढच्या ५ वर्षांत ५ हजार कोटी रुपये एवढी होऊ शकते.
काही वर्षांपूर्वीच ‘डार्क इज ब्युटीफुल’ हे अभियान सुरू झाले होते. आनंदाची गोष्ट ही आहे की काही वर्षांतच सावळया आणि डार्क कलरपासून लोकांचा दृष्टीकोन थोडाफार बदलू लागला. सुशिक्षित मुलगे फक्त त्वचेच्या रंगालाच संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा मापदंड मानत नाहीत. काही प्रसिद्ध कलाकार हे ‘डार्क इज ब्युटीफुल’ या अभियानासोबत जोडले गेले आहेत तर काही प्रसिद्ध कलाकार हे फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीत दिसून येतात. त्यामुळे असे दिसून येते की मुलीसुद्धा अजूनही फेअरनेसच्या मायाजालातून बाहेर पडू शकले नाहीत.
आता हळूहळू सत्य समोर येऊ लागले आहे की कोणतेही फेअरनेस हे सौंदर्याचा पर्याय ठरू शकत नाही.
डार्क कलरला मुळीच घाबरू नका. जर तो तुमच्या त्वचेचा नैसर्गिक रंग असेल तर तुमच्या सोबत राहील. तुम्ही जर आतून मजबूत असाल तर कोणीही तुमचे काही बिघडू शकत नाही. तुम्ही तुमचे लक्ष हे इतर प्रॉडक्टिव्ह आणि कंस्ट्रक्टिव्ह कामांवर केंद्रित करा. पुढील काही गोष्टींमुळे तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास नक्कीच वाढू शकतो.
आपले बलस्थान ओळखा : तुमचा रंग हा काही तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची ओळख नसतो. हे निश्चित आहे की तुमच्यात इतर काही विशेषता असतील, ज्यांपुढे तुमचा रंग गौण ठरेल. तुमची हीच बलस्थाने ओळखा आणि ती बळकट करा. जसे एखादा विशेष खेळ, अभ्यास, संगीत यात रुची असल्यास त्यात प्रावीण्य मिळवा. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मनात सकारात्मक विचार उत्पन्न करू शकता.
आपल्या त्वचेच्या रंगावर प्रेम करा : जरी हे फार सोपे नसले तरी फार कठीणही नाही. तुम्ही हा विचार करा की तुमच्या शरीरावर सोन्याचे दागिने किती सुंदर चमकताना दिसतात. इतरांच्या तुलनेत त्वचेच्या कमतरता ठळकपणे दिसणार नाहीत आणि त्वचेचे स्वास्थ्यही चांगले राहील. सौंदर्य हे फक्त गोरेपणात नसते.
त्वचेच्या रंगाव्यतिरिक्त नाकीडोळी नीटस आणि शरीराची ठेवणही खूप महत्त्वाची असते आणि याबाबतीत नेहमीच सावळया आणि डार्क कलरच्या मुली बाजी मारतात.
आपल्या त्वचेच्या रंगाशी मेळ साधणारा मेकअप करा : तुम्ही वेगवेगळया वेळी वेगळया मेकअपमध्ये स्वत:चे फोटो पहा. तुम्हाला स्वत:लाच समजून येईल की कोणता मेकअप किंवा फाउंडेशन तुम्हाला सूट करतो. यासाठी कोणत्याही सेल्स गर्लचा सल्ला घेण्याची आवश्यकता नाही. ती तर प्रॉडक्ट विकण्यासाठीच तिथे बसलेली असते. हीच गोष्ट तुमच्या ड्रेसलाही लागू होते. ज्या रंगाचे कपडे तुम्हाला शोभून दिसतात पार्टी किंवा ऑफिसमध्ये तेच घाला.
दुसऱ्यांशी तुलना करू नका : ज्यांच्यात मनोबल आणि आत्मविश्वासाचा अभाव असतो, त्या लगेच इतरांशी तुलना करण्याची चूक करतात. प्रचार आणि सोशल मिडियावर तुम्ही जे पाहता आणि जेव्हा वास्तव तुमच्यासमोर येते, तेव्हा तुम्हाला स्वत:लाच समजते की मेकअपच्या थरांखाली काही औरच कहाण्या दडलेल्या असतात. प्रत्येकाची समस्या आणि दृष्टिकोन वेगळा असतो. हल्ली बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत डार्क कलरच्या मुली यशस्वी होत आहेत. विश्वसुंदरी किंवा ऑलिम्पिक स्पर्धेत डार्क कलरच्या मुली सफल होत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घ्या.
मायाजाळात अडकू नका : मिडियात फेअरनेस क्रीम किंवा इतर वस्तूंचा फार जोरात प्रचार केला जातो. ते तुमच्या मनातील डार्क कलरची भीती आणि हीनभावना याचा फायदा घेतात. त्यांचे काम हे त्यांचे प्रॉडक्ट विकणे असते. त्याआधारावर तुम्ही तुमच्या योग्यतेबाबत निर्णय घेऊ नका. उद्या जर सावळेपणा स्वीकारला गेला तर ते ही उजळवण्यासाठी क्रीम उपलब्ध होतील.
निंदा सहन करा आणि तिचा सामना करा : त्वचेच्या रंगामुळे तुमची निंदा होऊ शकते किंवा तुमच्यावर शेरेबाजी होऊ शकते. तुमची निंदा करणाऱ्यात मिडिया, किंवा तुमच्या जवळील व्यक्ती अथवा कोणी अनोळखी व्यक्तीही असू शकते. तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांच्यामुळे विचलित होण्याची चूक करू नका. आपल्या आंतरिक शक्तिला साद घाला आणि ती सिद्ध करून निंदा करणाऱ्यांना सणसणीत चपराक द्या.