* सोमा घोषलहानपणापासून अभिनयाची आवड असलेली मराठी अभिनेत्री गौरी नलावडे मुंबईची आहे. तिला नेहमीच वेगळया आणि चांगल्या कथांवर भूमिका साकारायला आवडते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती अभिनयाकडे वळली आणि एकामागून एक चित्रपट करत आहे. तिची पहिली मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’मधील तिच्या कामाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले आणि तिच्या कारकीर्दीची यशस्वी वाटचाल सुरू झाली. गौरीच्या या प्रवासात तिची आई अरुणा नलावडे यांनी तिला मोलाची मदत केली. कारण, लहान वयातच तिच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. तिच्या मुख्याध्यापक आईने तिचे पालनपोषण केले. तिचा मराठी चित्रपट ‘गोदावरी’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नम्रपणे वागणाऱ्या आणि परखड बोलणाऱ्या गौरीशी तिच्या प्रवासाबाबत गप्पा मारता आल्या. याच गप्पांमधील हा काही खास भाग :

सध्या तू काय करत आहेस? कोविडदरम्यान काय काय केलेस?

जे चित्रपट बाकी होते ते पूर्ण केले आणि जे पूर्ण झाले आहेत, त्यांच्या प्रदर्शनाची वाट बघत आहे. ३० एप्रिलला मराठी चित्रपट ‘गोदावरी’ प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. सर्व ठीक झाल्यावर लवकरच तो चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. एक चित्रपट ‘द डिसाईपल’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात मी चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. याशिवाय अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्यांचे एडिटिंग सुरू आहे. कोविड महामारीमुळे खूप कमी चित्रपटांची निर्मिती होत आहे. जाहिराती आणि शूटिंगमध्ये उरलेली कामे केली जात आहेत. सध्या चित्रपटांची शूटिंग बंद आहे. या काळात घरात राहून पुस्तके वाचणे, घरातल्यांसोबत वेळ घालवणे, जेवण बनवणे, वर्कआऊट, झोप पूर्ण करुन घेणे इत्यादी कामे करत आहे. कोविडदरम्यान मी एक शॉर्ट फिल्म शूट केली होती, ज्यात माझ्यासोबत अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी काम केले आहे. कोविडच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन खबरदारी घेऊनच आम्ही शूटिंग पूर्ण केले.

अभिनयाची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

जेव्ही मी टीव्ही सुरू करायचे तेव्हा माधुरी दीक्षित, श्रीदेवी अशा सर्व अभिनेत्रींचा डान्स बघत असे. मला हे माध्यम खूपच प्रभावी वाटायचे, ज्याद्वारे व्यक्ती आपल्या सर्व भावना व्यक्त करू शकतो. मला तासन्तास टीव्हीसमोर बसून रहायला आवडत असे. शाळेतही अभ्यासाव्यतिरिक्तच्या इतर सर्व कार्यक्रमात मी सक्रिय सहभागी होत असे. मला कलेची आवड आहे, हे घरच्यांना माहीत होते. अभिनयाची इच्छा मी आईकडे बोलून दाखवली, कारण मला नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करायचा होता. आईने शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला, कारण या क्षेत्रात काम मिळेलच अशी खात्री नसते. सोबतच मला कोणीही गॉडफादर नाही, म्हणूनच मला माझ्या मेहनतीवर यश मिळवावे लागेल.

तुला कुटुंबाचे कितपत सहकार्य मिळाले?

कुटुंबाने नेहमीच सहकार्य केले. आईने माझ्या कामाचे भरभरुन कौतुक केले. फार्मसीची पदवी घेतल्यानंतर मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. अगदी अल्पावधीतच मला पहिली मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मिळाली आणि वैदेहीच्या रुपात मी घराघरात लोकप्रिय झाले. माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मी चित्रपटात काम करू लागले. या मालिकेने मला ओळख मिळवून दिली.

तू तुझ्या प्रवासाकडे कशी बघतेस? हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे का?

माझ्या प्रवासाबाबत मी खूपच आनंदी आहे, पण कलाकार कधीच आपल्या कामात समाधानी नसतो. त्याची इच्छा वाढतच जाते. चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. जिथे मला नजरेसमोर ठेवून कथानक लिहिलेले असेल. यामुळेच मला योग्य काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, पण कथानक चांगले असायला हवे, जे मला समोर ठेवून लिहिलेले असेल. हिंदी आणि मराठी चित्रपटातील फरक हा केवळ भाषेचा असतो.

तुला कधी नेपोटिमचा सामना करावा लागला आहे का?

चित्रपट निवडताना मला एखाद्या तज्ज्ञाची कमतरता सतत भासते, ज्याचा सल्ला घेऊन मी योग्य निर्णय घेऊ शकेन. मला इंडस्ट्रीत खूप चांगली माणसे भेटली आणि त्यांच्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. नेपोटिझमचा सामना कधीच करावा लागला नाही.

तू नकाराचा सामना कशी करतेस?

सुरुवातीला मला नकार मिळायचा तेव्हा स्वत:वरच संशय यायचा. खूपच वाईट वाटायचे. काळानुरुप लक्षात आले की, काही भूमिकांसाठी विशिष्ट चेहऱ्यांची गरज असते. निवडही सर्वांच्या मतानुसारच होते, कारण हा एक व्यवसाय आहे, ज्यात खूप पैसे लावले जातात. खरंतर माणूस नकारातून खूप काही शिकतो. म्हणूनच प्रत्येक नकारानंतर मी माझ्यातील कमतरतेवर मात करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता मला नकाराची भीती वाटत नाही.

तूला आईच्या हातचे काय खायला आवडते?

माझी आई पुरणपोळी खूपच छान बनवते. आईच्या हातच्या पुरणपोळीची चव खूपच वेगळी असते. मी चिकन चांगले बनवू शकते.

तू पावसाळयात स्वत:ची काळजी कशी घेतेस?

मला पावसाळा खूपच आवडतो. पहिल्या पावसात मी आवर्जून भिजते. पावसात गरम पाणी पिणे, वाफ घेणे, लवंगाचे पाणी पिणे, स्वत:ला स्वच्छ ठेवणे याकडे लक्ष देते. जेवणात तूपाचा वापर अवश्य करते. पावसाचे दिवस आहेत, हे लक्षात ठेवूनच प्रत्येक काम करायला हवे. मान्सूनमध्ये मी जास्त नॉनवेज खात नाही. अशा वातावरणात शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवणे फारच अवघड असते. त्यामुळे जास्त पाणी पिणे, चेहऱ्याला मॉईश्चराईज करणे गरजेचे असते. मला तूप खूप आवडते. जेवणात सकाळ, संध्याकाळ मी प्रत्येकी एक चमचा तूप घेते. तूप एखाद्या पदार्थात टाकून खाल्ल्यास वजन वाढत नाही.

एखादा मेसेज, जो तू देऊ इच्छितेस?

प्रत्येक दिवस सारखा नसतो. जीवनात कोणतीच गोष्ट कायम टिकून राहत नाही. म्हणूनच वर्तमानकाळात जे आनंदाचे क्षण मिळतात ते कुटुंबासोबत साजरे करा. परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि याला सर्वांनाच सामोरे जावे लागते. सध्या योग्य प्रकारे श्वास घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे. प्राणवायू मिळू न शकल्याने लोक मरत आहेत आणि ही खूपच  दु:खद गोष्ट आहे.

आवडता रंग – गुलाबी.

आवडता पेहराव – जीन्स, टी शर्ट.

आवडते पुस्तक – द फोर्टी रुल्स ऑफ लव, लेखक एलिक शफाक.

वेळ मिळाल्यास – चित्रपट पाहणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, चेहऱ्यासाठी वेगवेगळया प्रकारचे मास्क बनवणे, डायरी लिहिणे.

आवडता परफ्यूम – अरमानी.

आवडते पर्यटनस्थळ – देशात हिमाचल प्रदेश, परदेशात अमेरिका.

जीवनातील आदर्श – करुणा, माणुसकी.

सामाजिक कार्य – गरजवंतांना मदत करणे.

स्वप्नातील राजकुमार – जो माझ्या मनासारखा असेल.

स्वप्न – कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्ये काम करणे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...