कथा * माधव गवाणकर
श्वेता सासरी गेल्यावर तिच्या मम्मी आणि पप्पांना घर खायला उठलं होतं. बडबडी, बोलकी, मनमोकळी अशी ती मुलगी. मम्मीला फक्त एकच गोष्ट खटकायची की श्वेता देवधर्म, कर्मकांड वगैरे मानत नव्हती. कर्मकांडाला तिचा नकार असायचा. ‘गोडधोड कधीही करावं, सण उत्सव कशाला हवा? दिवाळीचा फराळ तर आता वर्षभर मिळतो. आपली ऐपत आहे. मग काय प्रॉब्लेम आहे.’ अशी श्वेताची वेगळी विचारसरणी होती. तिला त्यात काही प्रॉब्लेम नसला तरी सासरच्या लोकांना तिचा प्रॉब्लेम होऊ लागला. श्वेताचा नवरा आकाश बराचसा सुपरस्टारसारखा दिसायचा. ‘सेम रोशन वाटतो गं’ अनेक बायका त्याच्याकडे वळून वळून बघत. श्वेताचा मैत्रिणी हेवा करत. जिमला जाणारा असा देखणा पती मिळाल्यामुळे श्वेताचं वैवाहिक जीवन छान बहरू लागलं होतं. प्रणयाला एक वेगळीच धुंदी चढायची, पण एके दिवशी आकाश तिला म्हणाला, ‘‘केवळ माझ्या आईबाबांसाठी तू रोज पूजा करत जा…प्लीज. प्रसाद म्हणून खोबरं वाटायला तुला काय प्रॉब्लेम आहे. फक्त आठवड्यातून एकदा उपवास कर. आईला समाधान मिळेल की सून सुधारली.’’
श्वेता थोडी रागावून म्हणाली, ‘‘सुधारली म्हणजे? नास्तिक बाई बिघडलेली, उनाड असते का? भक्ती ही सक्ती असता कामा नये. मला नाही पटत तर जबरी कशाला? मी कधीच माहेरी उपवास केलेले नाहीत. मला पित्ताचा त्रास आहे. तो वाढेल. शिवाय मी मुळात कमी जेवते. दोन फुलके आणि जरासा भात. मग उपवास कशाला?’’ श्वेता सत्यच बोलत होती. पण आकाश नाराज झाला. त्याने हळूहळू श्वेताशी अबोला धरला. लैंगिक असहकार करून पाहिला. श्वेताला मूड यायचा तेव्हा ‘आज दमलोय, नको’ म्हणत आकाश प्रणयाला नकार द्यायचा. असं वारंवार होऊ लागलं.
‘‘तुमचा माझ्यातला इंटरेस्ट कसा काय संपला? व्हॉट इज युवर प्रॉब्लेम?’’ असं श्वेताने आकाशला एके दिवशी विचारलं. त्याचं उघडं, पीळदार शरीर रात्री बेडरूममध्ये पाहिल्यावर तिच्या मनात स्वाभाविकच शरीरसुखाची इच्छा प्रबळ झाली. आकाश स्पष्टपणे म्हणाला, ‘‘तू देव मानायला लाग. आईला खूश कर. नंतरच आपण आपल्या सुखाचं बघू…
‘‘माझा देवावर विश्वास नाही, हे लग्नाआधी मी तुला स्पष्ट सांगितलं होतं. गोरेगावच्या बागेत आपण फिरायला गेलो होतो. आठवतंय का तुला?’’
‘‘मला वाटलं तू बदलशील…’’
‘‘अशी कशी बदलेन? मी काही रागाने, भावनेच्या भरात नास्तिक झालेले नाही. अभ्यास आहे माझा…’’ हे बोलताना श्वेता वालावलकर सरांचं ‘श्रद्धा विसर्जन’ नावाचं पुस्तक चाळत होती.
हळूहळू श्वेताचे आणि सासूचे वादही वाढू लागले. खटके उडायचे. श्वेता सासूच्या सोबतीला देवळापर्यंत जायची खरी, पण बाहेरच थांबायची. त्यावरुन भांडण झालं. सासू म्हणाली, ‘‘बाहेर चपला सांभाळायला थांबतेस का? आत आलीस तर काय झिजशील?’’ श्वेता पटकन बोलून गेली, ‘‘मला शहाणपणा शिकवू नका. तुमचं काय ते तुमच्यापुरतं ठेवा.’’ सासू घरी आल्यावर रडू लागली. ‘‘मला उभ्या जन्मात असं कुणी बोललं नव्हतं. देव बघून घेईल तुला,’’ असं बोलत सासूने सुशिक्षित सुनेला जणू शत्रूच ठरवलं.
संध्याकाळी आकाश आल्यावर श्वेता म्हणाली, ‘‘मी माहेरी जातेय. मला बोलवायला येऊ नका. मला वाटलं तर मी येईन. पण नक्की नाही. माहेरीच जातेय मी विरारला. कुठे पळून जात नाही, नाहीतर उठवाल काहीतरी खोटी आवई.’’
आकाश तिच्याकडे बघतच राहिला. तिच्या या करारीपणाची त्याला थोडी भीतिच वाटली. श्वेता आपल्या श्रीमंत वडिलांकडे जाऊन राहिली. तिच्या मम्मीला ते खटकलं. पण श्वेता म्हणाली, ‘‘थांब गं तू. आकाशला माझ्याशिवाय करमायचं नाही.’’ तसंच झालं. पंधरावीस दिवस उलटल्यावर त्याचा फोन येऊ लागला.
श्वेता नवऱ्याचा फोन कट करायची. मग त्याने एसएमएस केला, ‘तुझ्याशी बोलायचं आहे. विरारला येऊ का?’ श्वेताच्या मनातही तेच होतं. तिने होकार दिला.
आकाशनं नमतं घेतलं. श्वेता म्हणाली. ‘‘तुम्हाला देव मानण्यापासून मी कधी रोखलं का? तुम्ही जरूर पूजा, प्रार्थना काय ते करा. पण माझ्या विचारस्वातंत्र्यावर गदा आणू नका. तुमच्या आईला समजावणं तुमचं काम आहे. तुम्ही म्हणता म्हणून मी येतेय. पण परत अपमान झाला तर कायमची सोडेन सासर…’’ नास्तिकतेचं स्वातंत्र्य श्वेताने असं मिळवलं.
आता घरातली बाकीची मंडळी रुढी, कर्मकांड सारं सांभाळतात. पण श्वेता मात्र, ‘निरीश्वरवाद’ जपते. त्यांना झालेलं बाळ मोठेपणी श्वेताच्या वळणावर जाणार की आकाशच्या ते आता कशाला बोला, हे तर येणारा काळ ठरवेल…हो ना?