* एनी अंकिता

वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करणे. हल्ली वर्क फ्रॉम होमची संकल्पना फार वेगाने विस्तारत आहे. कंपन्या फ्लेक्सिबल ऑप्शन्स देत आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार काम करू शकता. पण जेव्हा घरून काम करायचे असते, तेव्हा सर्वप्रथम एकच विचार आपल्या डोक्यात येतो की, मनात येईल तेव्हा, मनाप्रमाणे करायचे. मान्य की इथे तुम्हाला कोणाचीही रोकटोक नसते. पण इथेही काम करण्याचे काही शिष्टाचार असतात. जर तुम्ही ते पाळले नाहीत तर तुम्ही ताणमुक्त होऊन योग्य पद्धतीने कामच करू शकणार नाही.

जेव्हाही तुम्ही घरून काम कराल, तेव्हा कामाच्या बाबतीत हे शिष्टाचार जरूर पाळा :

वर्क शेड्युल जरुरी आहे : घरातून काम करताना आपण कोणतीही गोष्ट कुठेही लिहून ठेवतो आणि नंतर ती शोधण्यात नाहक आपला वेळ वाया घालवतो. यासाठी वर्क शेड्युल तयार करा, ज्यामुळे तुम्हाला कल्पना असेल की कोणते काम कधी संपवायचे आहे, कोणते काम तुम्ही पूर्ण केले आहे आणि कोणते काम आता पूर्ण करायचे आहे. असे केल्यामुळे तुम्ही कमी वेळेत अधिक काम करू शकता.

नियमित कामाचे तास : कधीही उठून कामाला सुरुवात केली असे करू नका, यामुळे तुमची तब्येत बिघडेल आणि कामावरही त्याचा परिणाम होईल. यामुळे कामासोबतच तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी कामाची वेळ निश्चित करा आणि त्यानुसार काम करा. असे केल्यामुळे तुम्ही योग्य रीतीने काम करून कुटुंबासोबत मौजही करू शकता.

शिस्तीचे पालन करा : काम करताना चॅटिंग किंवा फोनवर गप्पा मारणे हे टाळा. शिस्तीचे पालन करा, कारण जोपर्यंत तुम्ही शिस्त अंगी बाणवत नाही तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करू शकणार नाही तोवर ही गोष्ट तुमच्या मित्रपरिवार आणि नातलगांनाही सांगून ठेवा जेणेकरून ते तुम्ही फ्री असल्याचे समजून कामाच्या वेळेस येऊन डिस्टर्ब करणार नाहीत.

काम वेळेवर पूर्ण करा : काहीतरी बहाणे करून काम टाळू नका. असे केल्यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. खरतर वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या संपर्कात राहा : तुम्ही घरून काम करता, तुम्हाला ऑफिसला जाण्याची गरज नाही, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांना भेटणे सोडून दिले पाहिजे, उलट तुमच्या क्षेत्रातील लोकांच्या संपर्कात राहा जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळत राहील.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...