कथा * सुधा गुप्ते
‘‘आयुष्य किती सोपं झालंय. एक बटन दाबा अन् हवं ते मिळवा. ही छोटीशी डबी खरोखर आश्चर्यच आहे. कुठंही कुणाशीही बोला,’ मोनूदादा एकदम खुशीत होता.
कालच १० हजारांचा मोबाइल घेऊन आलाय मोनूदादा. खरंतर त्याची आधीची डबी म्हणजे मोबाइलसुद्धा चांगलाच होता. पण बाजारात नवा ब्रॅन्ड आल्यावर जुनाच ब्रॅन्ड आपण वापरणं म्हणजे स्टॅन्डर्डला शोभत नाही ना? या डबीला तर इंटरनेट आहे म्हणजे सगळं जग आपल्या मुठीतच आलंय ना?
त्या दिवशी किती वेळ वाद चालला होता मोनूदादा अन् बाबांमध्ये. बाबांना आता एवढे पैसे मोबाइलवर खर्च करण्याची इच्छा नव्हती. आईचा खांदा हल्ली फार दुखतोय. तिच्यासाठी चांगलं वॉशिंगमशीन घ्यायची त्यांची इच्छा होती. पण मोनूदादानं असं काही तारांगण घातलं की आईनं, ‘‘दुखू देत खांदा, मी धुवीन कपडे, पण त्याला मोबाइल घेऊन द्या,’’ असं बाबांना सांगितलं. ‘अभावात जगा पण शांतता राखा’ असा आईचा स्वभाव आहे.
‘‘तू मागितला असतास तर नसता दिला पण मोनूला नाही म्हणता आलं नाही. तो आईविना मुलगा आहे. त्याची आई व्हायचंय मला,’’ आई म्हणाली.
मनांत आलं की तिला सांगावं, ‘‘बिना आईचा तर मी आहे. त्याला आई आहे. ज्या दिवसापासून मी अन् आई मोनूदादा अन् बाबांच्याबरोबर राहायला आलो आहोत, त्या दिवसापासून जणू मी अनाथ झालो आहे. वडील आधीच गेलेले अन् आता आईही माझ्या वाट्याला फारच कमी येते. मोनूला आई नाहीए. ती त्याला अन् बाबांना सोडून पळून गेली आहे. त्याची शिक्षा नकळत का होईना मला भोगावी लागते आहे.
माझी आई तर माझीच आहे. माझंच जे आहे ते माझ्यापासून कोण हिसकावून घेणार? पण मला दु:ख हेच आहे की आई माझी असून माझी नाहीए. तिलाही कदाचित असंच वाटत असेल की सावत्र शब्द मधे आला की त्या सावत्रपणाच्या छायेतून बाहेर पडायला फार श्रम घ्यावे लागतात. फार चिकाटी ठेवावी लागते. जो आपला नाही, त्याला आपला करायचाय…जो आपलाच आहे, त्याला, आपलाच आहे हे सिद्ध करायला प्रयत्न करण्याची गरजच काय?
बरेचदा असं होतं. नको असलेल्या नात्यात माणूस अडकतो. माझ्या आजोबांची फार इच्छा होती की त्यांच्या सुनेनं दुसरं लग्न करावं. त्यांच्या एका मित्राचा मुलगा, त्याची बायको घरातून पळून गेल्यामुळे कसंबसं आयुष्य रेटत होता. दोघा मित्रांनी आपापल्या अपूर्ण मुलांना पूर्णत्त्व यावं यासाठी त्यांचं लग्नं करून दिलं. दोघांनाही आपली जबाबदारी पूर्ण झाल्याच्या भावनेनं कृतकृत्य वाटलं, कदाचित माझी आई आणि मोनूचे बाबाही सुखावले असतील.
मी वडिलांना कधीच बघितलं नव्हतं. त्यामुळे मी कुणालाच बाबा म्हणत नव्हतो. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात आलेले पुरूष काका, मामा, आजोबा किंवा दादाच असायचे. गेली सतरा वर्षं आईच माझी आई अन् बाबा होती. मी माझ्या आजोबांनाच बाबा म्हणत होतो. आईच्या लग्नाची बातमी ऐकल्यावर रात्रभर मी बेचैन होतो. मला झोप लागली नाही. पण आजोबांनीच मला समाजावलं की आईच्या चांगल्या, सुखमय भविष्यकाळासाठी मी तिच्या लग्नाला विरोध करू नये.
‘‘हे बघ बाळा, तू समजूतदार आहेस. आता तू अठरा वर्षांचा आहेस. आणखी ८-१० वर्षांत तू नोकरीला लागशील. तुझं लग्न, तुझा संसार यात गुंतलास की तुझी आई खूपच एकटी पडेल. तिला कुणाची सोबत, कुणाचा आधार लागेलच ना? इतक्या वर्षांत तिच्या दुसऱ्या लग्नाचा योग आला नव्हता, तो आता आलाय…तर हे लग्न होऊन जाऊ दे…तुला जिथं वाटेल तिथं तू राहा. हे घर तुझंच आहे. तेही घर तुझंच आहे. आम्ही तुझेच आहोत अन् तू आमचा आहेस.’’
वडील नसले की मुलं लवकरच समजूतदार होतात. मीही आईकडे आता वडिलांच्या दृष्टीतून बघू लागलो. कोर्टात दोघांनी सह्या केल्या. एकमेकांना हार घातले अन् दोन अपूरी, अर्धीमुर्धी कुटुंब मिळून एक संपूर्ण कुंटुंब झालं. मी आईला प्रथमच असं नटलेलं बघितलं. कपाळावर कुंकु, गळ्यात मंगळसूत्र, हातात सोन्याच्या, काचेच्या बांगड्या अन् जरीची राणी रंगाची साडी…आई इतकी सुंदर दिसत होती…एक संपूर्ण अनोळखी कुटुंब आईचं होत गेलं अन् मी मात्र आईपासून दूर होत होत बहुतेक घरातून बाहेरच होईन असं वाटतंय.
‘‘काय झालंय तुला? असा गप्प का आहेस विजय?’’ मीरा, माझी क्लासमेट आहे. पण खूपच समजूतदार आहे. माझी समजूत घालण्याचं काम तिचंच असतं.
‘‘आज आईकडे नाही जाणार? आजोबांच्या घरी जातो आहेस का? काही प्रॉब्लेम आहे का?’’
मी काय सांगू? कसं सांगू? माझी आईच माझ्यापासून दूर दूर जाते आहे…म्हणजे मला असुरक्षित वाटतंय असं नाहीए. आईच्या हृदयातला एक कोपरा मी आनंदानं मोनूदादासाठी दिला असता पण तो त्या लायकीचा नाहीए…आई इतकी त्याच्या मागेपुढे फिरते. त्याचं कौतुक करते पण तो मात्र आईचा मान अजिबात ठेवत नाही…उलट अपमानच करतो. हे सगळं मला सहन होत नाही.
माझ्याहून मोठा आहे मोनूदादा, वीस एकवीसचा सहज असेल. त्याला इतकंही कळू नये? आई बिचारी त्याला ‘आपला’ म्हणत असते. सतत त्याच्यासाठी झटत असते. पण त्याच्या मनात काय पूर्वग्रह आहे कुणास ठाऊक…पण जसं त्याच्या वडिलांना माझेही वडील म्हणून मी स्वीकारलं आहे, तसा तो माझ्या आईला त्याची आई म्हणून स्वीकारतच नाहीए…’’
मीरानं माझ्या हातावर थोपटून मला शांत केले. ‘‘वेळ लागतो विजय…आत्तापर्यंत त्या घरात त्याचं एकछत्र साम्राज्य होतं. आता तुम्ही दोन नवीन माणसं त्याच्या अधिकारावर अतिक्रमण करताय…’’
तिला पुरतं बोलू न देता मी म्हटलं, ‘‘अधिकारावर अतिक्रमण कसं म्हणतेस तू? अन् आई एकटीच त्यांच्या घरात गेलीय. मी तर बहुतेक वेळ आजीआजोबांकडेच राहतो. फार क्वचित मी तिथं जातो.’’
‘‘फार क्वचित जातो म्हणजे?’’ मीरानं आश्चर्यानं विचारलं. ‘‘कधीतरीच तिथं जाशील तर त्या घरात रमशील कसा? ते घर तुझं वाटेल कसं तुला?’’
‘‘ते घर मला माझं वाटण्याला काही अर्थ नाहीए…माझ्या बाबांचं, आजोबांचं घर आहे ना माझ्यासाठी. ते माझ्या आईचं घर आहे. तिनं तिथं रूळायला, रमायला हवंय आणि ती रमलीय तिथं. आपला नवा संसार सजवण्यात, ते घर नीट ठेवण्यात, नव्यानं त्याची मांडणी करण्यात ती इतकी गुतंली आहे की आठ आठ दिवस मी तिकडे फिरकत नाही हेही तिच्या लक्षात येत नाही. ‘इतके दिवस आला का नाहीस?’ एवढंही ती मला विचारत नाही. अर्थात आजोबांना अन् मलाही तेच हवं होतं…आईला जोडीदार मिळावा, ती एकटी राहू नये अन् तिनं सुखाचा संसार करावा. तसंच होतंय.’’
‘‘पण या आधी कधी तू बोलला नाहीस? मला तर वाटलं, गेलं वर्षभर तू तुझ्या नव्या घरातच राहतो आहेस.’’
‘‘खरं सांगायचं तर ते घर मला ‘माझं’ वाटत नाही. फारच कमी दिवस मी राहलोय तिथं.’’
‘‘पण तुझं नवे बाबा काही म्हणत नाहीत? तू इथंच थांब म्हणून आग्रह नाही करत?’’
‘‘सुरूवातीला म्हणायचे…मोनूदादाची खोलीही मला दिली होती. मला खोलीचा मोह नाहीए. आजोबांचं अख्खं घर आहे माझ्यासाठी. प्रश्न अधिकाराचाही नाहीए. प्रश्न प्रेम अन् मान राखण्याचा आहे. जागेसाठी मी तिथं राहत नाही. तिथं राहताना मला सतत जाणवतं की मोनू माझ्या आईशी नीट वागत नाही. तिला लागेल असं बोलतो अन् ते मला खटकतं. कदाचित मी आईच्या बाबतीत फार हळवा असेन. मी कदाचित अधिक संकुचित वृत्तीचा असेन. काही गोष्टी पचवणं मला जमत नाहीए. पूर्वी माझी आई फक्त माझी होती, पण आज ती एका अशा पुरुषाबरोबर आनंदात आहे जो माझा पिता नाहीए. मी जर माझ्या आईवरचा अधिकार सोडतोय तर मोनूनं तिचा मान राखायला हवा ना?’’
‘‘त्याचं मन तुझ्याएवढं मोठं नसेल विजय अन् त्याची समजही तुझ्याएवढी परिपक्व नसेल?’’ मीरानं म्हटलं.
‘‘कदाचित त्याला मीरासारखी मैत्रीण भेटली नसेल…’’ मी हसत म्हटलं. मीराही हसली.
पण वरकरणी मी जरी हा विषय संपवला होता तरीही मनातून मी माझ्या आईची काळजी करतच होतो. एखाद्या बापानं आपल्या मुलीची करावी तशी…आईचा पुनर्विवाह तिच्यासाठी काही नवं संकट तर नाही ना उभं करणार?
पण नवे बाबा आईची खूप काळजी घेतात. आईमुळे घराला आलेलं घरपण, उजळलेलं रूप, आईचा कामसूपणा या सगळ्यामुळे ते प्रसन्न दिसतात. त्यांच्या वागण्या बोळण्यातून आईविषयीचा आदर व कृतज्ञता जाणवते.
बस्स, मला फक्त मोनूदादाचं वागणं आवडत नाही. मी आईचा चेहरा वाचू शकतो. तिची सहनशक्ती अफाट आहे. कधीतरी तिचीही सहनशक्ती संपेल त्यानंतर काय होईल? मी तर तिथं राहतच नाही. मुळात आई आणि मोनूदादात माझ्यामुळे दुरावा यायला नकोय मला. आईचं घर, आईचा संसार अभंग राहावा एवढीच माझी इच्छा आहे. आजीआजोबा पण जणू माझ्या पाळतीवर असतात. माझा चेहरा वाचायचा प्रयत्न करतात. मी आईला भेटतो की नाही, कधी भेटलो होतो वगैरे अगदी खोदून खोदून विचारतात. कधी तरी सांगतो मी की भेट झाली नाही, कधी तरी भेटल्याचं सांगतो. कधी खोटं तर कधी खरं. पण मला या सगळ्याचा फार त्रास होतोय. जीव गुदमरतोय माझा.
मीराला माझी मन:स्थिती कळतेय. ‘‘अरे, वार्षिक परीक्षा डोक्यावर आहे. अभ्यासाकडे लक्ष दे. सारखा त्या मोनूचाच विचार करशील तर पास कसा होशील? आई आधीच त्या मोनूच्या वागण्यानं दु:खी आहे, तू आणखी तिच्या दु:खात भर का घालतोस? हे सगळं चालतंच रे, अन् हळूहळू सगळं मार्गीही लागतं. तू अभ्यास पूर्ण कर, नोकरीला लाग त्यामुळेच आईलाही बरं वाटेल ना?’’ मीरानं मला खूपच छान समजावलं.
अन् मीही जोरदार अभ्याला लागलो. मीरानं म्हटलं ते खरच होतं. मी कर्तबगार निघालो तरच मी आईला आधार देईन ना? तिला तेवढंच बरं वाटेल.
आता मी बहुतेक वेळ माझ्या खोलीतच अभ्यास करत बसायचो. आजी माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेत होती. आजोबा कधी सफरचंद तर कधी पपई कापून आणून द्यायचे. कधी आजी अक्रोड, बदाम त्यांच्या हाती पाठवायची तर कधी खसखसशीचा शिरा. दोघंही माझ्यासाठी खूप श्रम घेत होते.
‘‘तू अभ्यास नीट कर. इतर कोणतीही काळजी करू नकोस. आम्ही दोघं आहोत ना तुझ्यासाठी?’’ आजीआजोबा सांगायचे.
कधीतरी आईशी फोनवर बोलून घेत होतो. ती तिथं रमली आहे हेच मला खूप समाधान होतं. माझ्या विझणाऱ्या दिव्याला तेवढं समाधान तेलासारखं होतं.
परीक्षा एकदाची संपली अन् मला ‘हुश्श’ झालं. पेपर फारच छान गेले होते. शेवटचा पेपर देऊन मी घरी आलो तेव्हा आईबाबा येऊन बसलेले दिसले. मला सुखद आश्चर्य वाटलं. शेवटी आईला माझी आठवण झाली म्हणायची. मी आईकडे बघितलं. तिच्या कपाळावर ढीगभर आठ्या होत्या. बाबांनी मला जवळ घेऊन माझ्या खाद्यांवर थोपटलं.
‘‘आम्ही तुला घ्यायला आलोय बाळा, पेपर छान गेले ना? आता आपल्या घरी चल…’’ बाबा म्हणाले.
‘‘नाही…नाही…मी येणार नाही. ते घर माझं नाहीए…मी इथंच बराय. हेच माझं घर आहे.’’ नकळत मी बोलून गेलो.
‘‘अरे, इतके दिवस तुझ्या परीक्षेचा ताण होता तुझ्यावर, म्हणून आम्ही गप्प होतो. पण आता चल त्या घरी.’’
‘‘नाही बाबा, मला नाही जायचंय…प्लीज माझ्यावर बळजबरी करू नका.’’
‘‘मोनूशी भांडण झालंय का तुझं? तो सांगत होता तू त्याच्या आईचं नाव घेऊन त्याची बदनामी केलीस म्हणून?’’ आई रागानं म्हणाली.
बाबा आईला न बोलण्याबद्दल सांगत होते, पण ती मात्र पूर्ण शक्तिनिशी मला दोषी ठरवत होती.
‘‘तू मोनूच्या आईचं नांव घेऊन त्याला हिणवलंस, टोमणे दिलेस, लाज नाही वाटत असं वागायला? काय बोलावं अन् काय बोलू नये हे कळण्याइतका मोठा झाला आहेस तू. लहान नाहीएस.’’
क्षणभर वाटलं सगळे एका बाजूला झाले आहेत अन् मी एकटा एका बाजूला आहे. मी मोनूला कधी त्याच्या आईबद्दल वाईटसाईट बोलले, मी तर त्याला टाळतंच असतो. शक्यतो समोरासमोर येत नाही कारण मुळात त्याचं वागणंच बरोबर नसतं.
‘‘तू असं का केलंस बेटा? तू तर समजूतदार आहेस ना राजा?’’ आजीनंही मलाच विचारलं.
आजोबाही न्यायाधिशाच्या भूमिकेत दिसले. इतके दिवस सगळे गप्प होते कारण माझी परीक्षा होती. आज शेवटचा पेपर झाला अन् सगळ्यांचाच संयमाचा बांध फुटला. माझं वर्षभर गप्प राहाणं, संयमानं स्वत:वर बंधनं घालणं सगळं गेलं आलं…माझ्या आईसाठी माझं मन सतत आक्रोशत होतं ते सगळं बेकारच म्हणायचं. मी जणू अपराधी आहे असंच सगळ्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की या आक्रमणासाठी अजिबातच तयारीत नव्हतो. परीक्षा संपल्याच्या आनंदात घरी आलो होतो. कसं छान हलकं हलकं वाटत होतं. घरी अजून एक परीक्षा वाट बघतेय हे कुठं ठाऊक होतं?
मी जरा सावरतोय तेवढ्यात आईनं प्रश्न केला, ‘‘तू मोनूना असं विचारलंस की त्याची आई कुणाबरोबर पळून गेली म्हणून? विचारलं होतंस असं?’’
मी चकितच झालो…कुठली गोष्ट कुठं नेऊन ठेवली अन् कशी लोकांसमोर मांडली मोनूनं? स्वत:चं वागणं नाही सांगितलं…मी काही बोलणार तेवढ्यात बाबांनी माझा हात धरून मला माझ्या खोलीत आणलं अन् खोलीचं दार आतून लावून घेतलं. माझ्यासमोर उभं राहून ते बराच वेळ माझ्या चेहऱ्याकडे बघत होते. मग म्हणाले, ‘‘मला कळतंय, तुझा संयम संपला असेल तेव्हाच तू काहीतरी बोलला असशील…काय घडलंय बाळा? तू तुझ्या आईपासून दूरदूर का राहतोस? माझं घर नांदतं व्हावं अन् तू एकटा पडावास असं मलाही नकोय. तू तिथं का येत नाहीस?’’
‘‘मोनू माझ्या आईला मान देत नाही…वाईट वागतो. ते मला बघवत नाही, सहन होत नाही, म्हणून मी तिथं येत नाही.’’
‘‘काय म्हणतो मोनू? मला सांग तर खरं…तूही माझा मुलगा आहे. तुझाही माझ्यावर तेवढाच अधिकार आहे.’’
‘‘मला कुठलाच अधिकार नकोय बाबा. अधिकाराची एवढी हाव असती तर मी आईला तुमच्याकडे पाठवलंच नसतं. आईच्या आनंदासाठी, आईला मी माझ्यापासून दूर केलंय…या घरात तिला काय कमी होतं? खाणं, पिणं, कपडालत्ता, मानसन्मान सगळंच होतं…आजी आजोबा अन् मीही तिच्यावर जिवापाड प्रेम करतो.’’
मोनू कॉलेज कॅन्टीनमध्ये माझी चेष्टा करतो. मित्रांना सांगतो, ‘‘याची आई माझ्या घरी पळून आली आहे… तो असं का म्हणतो? मला माझ्या आईला सांभाळता येत नव्हतं का? माझी आई तर वडिधाऱ्यांच्या सांगण्यावरून अगदी राजरोसपणे लग्न करून तुमच्या घरात आली आहे. पण मोनूचा आई कुठं भटकते आहे हे त्याला ठाऊक आहे का? माझी आई कुठं आहे हे मला ठाऊक आहे? बाबा तुम्हीच सांगा, मी त्याला हे विचारलं यात माझं काय चुकलं? अपमान त्यानं माझा केलाय की मी त्याचा केलाय?’’
बाबा खरोखर अवाक् झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्वत:च्या मुलाच्या वर्तणुकीची लाज स्पष्ट दिसत होती. ते दुखावलेही गेले होते.
‘‘बाबा, तुम्हालाही वाटतं माझ्या आईनं तुमच्याशी लग्न केलं ही वाईट गोष्ट आहे? त्यामुळे माझा अपमान होणं बरोबर आहे का?’’
‘‘नाही रे बाळा, असं बोलू नकोस, माझं तर आयुष्यच आता कुठं सुरू झालंय…तू अन् तुझी आई माझ्या आयुष्यात आलात …तेव्हापासून…अन्… खरं तर आईची माया काय असते ते मोनूलाही तुझ्या आई घरात आल्यावरच समजलंय.’’
‘‘समजलंय तर तो आईशी कृतज्ञतेनं का वागत नाही? तिचा अपमान का करतो? तिचा मान ठेवत असता तर चार फालतू मित्रांमध्ये बसून माझ्या आईबद्दल असं बोलला नसता. तुमच्या अन् आईच्या लग्नानंतर लगेचच काही दिवसात तो असं बोलला. त्या दिवसापासून मी त्याच्याकडे बघतही नाहीए. मला फक्त इतकंच समजतंय की तो माझ्या आईला मान देत नाही. मी त्याला काहीही म्हणालो नाही. फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मी त्याच्या आईचा अपमान का करेन?’’
बाबा गप्प होते. माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. मग मला जवळ घेऊन कुरवाळू लागले. त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शानं मला एकदम रडू आलं.
‘‘पण मग इतके दिवस तू हे सगळं माझ्याजवळ बोलला का नाहीस? इतकं सगळं मनात का ठेवलंस?’’
‘‘मला मोनूची मन:स्थिती समजतेय बाबा, त्याला तुमच्यावरचा अधिकार विभागला गेलेला सहन होत नाहीए. पण ज्याच्या आईचा स्वत:चाच पत्ता ठिकाणा नाहीए, त्यानं दुसऱ्याच्या आईबद्दल अपमानकारक का बोलावं?’’
‘‘मोनूनं असं बोलायला नको होतं. मी विचारेन त्याला?’’
‘‘नका विचारू बाबा, आईला कळलं तर मोनूबद्दल तिच्या मनात किल्मिष येईल. मग ती मोनूना माया देऊ शकणार नाही. ती माझी आई आहे. ती माझीच राहील. दूर किंवा जवळ राहण्यानं ती माझ्यापासून दुरावेल असं नाही. पण मोनूला आईची अधिक गरज आहे. म्हणूनच मी आईच्या प्रेमात वाटेकरी होऊन तिथं राहू इच्छित नाही. मला इथंच राहू देत. तिथं राहिल्याने तर नित्य नवं काहीतरी घडेल. तुम्हाला अन् आईला त्याचा त्रास होईल…ते मला नकोय. ते घर मोनूचं आहे, हे घर माझं आहे. मी खरं काय ते तुम्हाला सांगितलं, मी मोनूला चिडवलं नाही, टोमणा दिला नाही फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. माझं बोलणं त्याला झोंबलं, तर त्याच्या बोलण्याचा मला त्रास नसेल झाला?’’
बाबा शांतपणे ऐकत होते. पुन्हा मला कुशीत घेतलं अन् हसून म्हणाले, ‘‘मी खरोखर भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखा शहाणा, समजूतदार मुलगा मिळाला. मला तुझं म्हणणं समजलंय. आता माझंही म्हणणं ऐकून घे. तू अन् तुझी आई, दोघंही माझ्या आयुष्याचा अभिन्न भाग आहात. आधीपासूनच तुम्हा दोघांविषयी माझ्या मनां असलेला आदर अन् कृतज्ञता आता आणखी वाढली आहे, मला वाटतं, आपण चौघांनी एकत्र राहावं.’’
‘‘बाबा, मी काय किंवा मोनू काय, आता लहान नाही आहोत. किती दिवस तुमच्यापाशी राहू? बाहेर जावंच लागेल…मनात तेढ ठेवून जवळ राहण्यापेक्षा दुरून गोडीनं राहावं, भेटताना मोकळ्या मनानं भेटावं हे चांगलं नाही का?’’
बाबांचे डोळे भरून आले. ते मला जवळ घेऊन काही क्षण स्तब्ध उभे होते. मला प्रथमच जाणवलं की मी माझ्या बाबांच्या कुशीत आहे. मला माझे वडिल भेटले.
मला स्वत:पासून दूर करत ते म्हणाले, ‘‘सुखी रहा बाळा, पण स्वत:ला एकटा समजू नकोस, मी तुझाच आहे. जे लागेल ते हक्कानं माग. आज उद्या कधीही…मी तुझाच आहे. मोनूला थोडा वेळ देऊ या. एकेकाला समज उशीरा येते. काळही बरंच काही शिकवतो. त्यालाही हळूहळू नाती कळायला लागतील.’’
आई बाहेरून खोलीचं दार सारखं वाजवत होती. बहुधा ती घाबरली होती…बाबांसाठी किंवा माझ्यासाठी कदाचित दोघांनी आत काय गोंधळ घातला असेल म्हणून. बाबांनी दार उघडलं. आईच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या होत्या. तिच्या एकूण देहबोलीवरून ती माझ्यावर किती रागावली आहे हे मला कळत होतं. ती तिच्या नव्या संसारात रमली आहे हे मला कळलं होतं. मलाही तेच हवं होतं. आई तिच्या घरात आनंदात राहावी. माझं काय? मी जिथं आहे तिथंच बरा आहे.