* मोनिका अग्रवाल
मुलांना मोठं होत असताना पाहून त्यांचे आईवडिल त्यांच्या लग्नाची स्वप्नं पाहू लागतात. मग कोणाच्या तरी मुलीला आपल्या घराण्याची शोभा बनवून आपल्या कुटुंबात घेऊन येतात. याचप्रमाणे मुलीला मोठी होताना पाहून तिच्या केवळ विवाहाच्या कल्पनेनं आईवडिल भावुक होतात. इतकेच नाही, स्वत: मुलगीसुद्धा तिच्या लग्नाच्या कल्पनेने, वेगवेगळ्या भावतरंगामध्ये गुंतलेली असते. ती फक्त पत्नीच नव्हे तर तरी सून, वहिनी, काकू, ताई, जाऊ अशी अनेक नाती निभावत असते.
लग्नाच्या काही काळानंतर न जाणे काय बदल घडतात, पण सासरच्यांना सुनेत दोषच दोष दिसून येतात. दुसरीकडे मुलगीही सासरच्या माणसांविषयी स्वत:चे विचार व वागणूक बदलते. काही कुटुंबांमध्ये तर ३६चा आकडाच निर्माण होतो. मुलीच्या सासरचे तर कुटुंबांतील प्रत्येक समस्येचे मूळ सुनेला आणि तिच्या कुटुंबाला समजू लागतात.
एकमेकांना समजून घ्या
एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज असते. जेव्हा आपण एखाद्याची मुलगी आपल्या कुटुंबात घेऊन येतो, तेव्हा तिला तिच्या वडिलांच्या (जिथे ती लहानाची मोठी झाली) घरापेक्षा एकदम वेगळे वातावरण मिळते. मग ते राहण्यावागण्याबाबतीत असो किंवा खाण्यापिण्याच्या किंवा स्वभावाच्या बाबतीत. सर्वच दृष्टीने खूप बदल झालेला असतो.
याशिवाय पतिपत्नीचे आपापसातील संबंध समजून घ्यायलाही तिला थोडा अवधी लागतो. अशावेळी कुटुंबातील लोकांनी अपेक्षा थोड्या कमी ठेऊन सुनेला आपले मानून समजुतीने घ्यावे तर बहुधा समस्या निर्माण होणार नाहीत.
सुन घरी येण्याआधी सासू खूप अपेक्षा बाळगते जसे की सुन येईल आणि कामाचा ताण कमी होईल. ती सर्वांची सेवा करेल वगैरे.
सुनेचे घरातील कामात परिपूर्ण नसणे किंवा कमी काम करणे हा खूप मोठा दोष समजला जातो. प्रत्येक सासू हे विसरून जाते की सुरूवातीला सासरी आल्यावर जसा तिला पतिचा सहवास आवडत असे तसाच सुनेलाही हवाहवासा वाटणार.
मान देऊन मान मिळवा.
सासूसुनेचे संबंध मधुर बनून राहावेत यासाठी सासूच्या वागण्यात उदारता, धैर्य आणि त्यागाचे भाव असणे आवश्यक आहे. आपल्या प्रियजनांना सोडून आलेल्या सुनेसोबत मायेची वर्तणूकच तिला नव्या परिवारासोबत जोडू शकेल, तिला आपलेपणा वाटू शकेल आणि तिच्या मनात सन्मान आणि सहकार्याची भावना निर्माण करू शकेल. सुनेला फक्त काम करणारी मशीन न समजता कुटुंबाचे सदस्य मानले जावे.
सुनेच्या विचारांना व भावनांना महत्त्व दिले जावे. कुटुंबातील प्रत्येक निर्णयात तिचेही मत विचारात घ्यावे, जेणेकरून कुटुंबात सुखशांती व समृद्धी टिकून राहिल.
सासूने घरातील सर्व कामे सुनेला न सोपवता स्वत:सुद्धा काही काम केले तर सासूचे आरोग्य सुदृढ राहीलच, कुटुंबातील वातावरणही चांगले राहील.
तसेच लग्नानंतर मुलीचीही काही कर्तव्य आहेत, जी तिने पार पाडली पाहिजेत. मुलीला हे कळत नाही की कुठल्याही सदस्याकडून समजावले जाणे ही ढवळाढवळ नाही. घरातील थोडेसे कामसुद्धा तिला ओझे वाटू लागते. तिला असे वाटते की पतिवर तिचाच हक्क आहे. त्याने जर इतर कोणाला वेळ दिला तर तिला ती स्वत:ची उपेक्षा वाटते. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हटले तर सासरी अधिकार काय हे तर तिला माहित असते, पण कर्तव्यपालन करणे तिला ओझ्यागत भासते.
सासरीसुद्धा मुलीसारखे अधिकार मिळावेत असे वाटणे गैर नाही, पण कोणी काही हटकले की ती हे विसरून जाते की माहेरीसुद्धा असेच होते. हे खरं आहे की सासरी कुणाशीही (तिच्या मुलांशिवाय) तिचे रक्ताचे नाते नाही पण माणुसकी आणि प्रेमाचे नाते तर आहेच.
तिनेही हे सत्य मनापासून स्विकारायला हवे की थोड्या मेहनतीने सर्वांचे मन जिंकून ती सर्वांना आपलेसे बनवू शकते. नोकरदार मुलींना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ अधिक व्यतित करायला वेळ मिळत नाही. पण वेळ काढला जाऊ शकतो आणि कुटुंबाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनण्यासाठी काही कर्तव्य तिचीही असतात. कुटुंबीयांना आदर आणि प्रेम देऊन ती आपल्या पतीचे मन जिंकू शकते.
विवादापासून दूर राहा
खरंतर वर्चस्वाची लढाईच सासूसुनेमध्ये तेढ निर्माण करते. कुठल्याही संयुक्त कुटुंबात सासू आणि सुन बहुतांशी वेळ एकमेकींसोबत घालवतात. त्यांच्यावरच कामाची जबाबदारी असते. अशात घरात अशांततेचे मुख्य कारणही सासू आणि सुनेचे कटु संबंध हेच असते.
आज टीव्हीवर अनेक मालिका सासूसुनेच्या नात्यावरच आधारित असतात. दोघांपैकी कोणीतरी एक चाल खेळत असते. कधी नात्यांना उपहासात्मक विडंबन पद्धतीने सादर केले जाते. निरनिराळ्या सर्वेक्षण व शोधांमधून हे समोर आले आहे की संयुक्त कुटुंबामध्ये तणावाचे कारण ६० टक्के सासूसुनेतील नाते हेच असते.
ज्या घरांमध्ये मोठ्या चवीने या मालिका पाहिल्या जातात तिथेच वादविवाद जास्त होतात. ते तासन्तास त्यावर चर्चासुद्धा करतात की सासू किती चुकीचे वागत आहे. किंवा त्या कुटुंबातील सुन कशी चलाख आहे. तेव्हाच या सासूसुनेच्या मनातही हेच ठसते की मालिकेतील पात्रांप्रमाणेच वागायला पाहिजे आणि टीव्हीवर पाहिलेले सर्व आयुष्यातही उतरू लागते व स्वत:वर तशी वेळ आल्यास आपणही तसेच वागतो.
आपण सर्वच कुठल्या न कुठल्या चित्रपट किंवा मालिकेतील पात्रांशी स्वत:ला जोडून पाहतो व तसे बनण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला कशी सासू बनायला आवडेल? ‘कुछ रंग प्यार के’ सिरीअल मधल्या ईश्वरीदेवीसारखी की ‘बालिका वधू’मधल्या दादीसारखी?
सुनेचे कुठले पात्र तुम्हाला सूट करते? तुम्ही सासूसुनेच्या कुठल्याही पात्राप्रमाणे वागा, पण एक प्रश्न स्वत:ला नक्की विचारा की घरातल्या कुठल्याही सदस्याला त्रास देऊन तुम्ही खूश राहू शकता का? कुटुंबातील सदस्यांचा आत्मसन्मान दुखावून तुम्ही स्वस्थ बसू शकता का? कुटुंब एका माळेसारखे आहे आणि यातील सदस्य मोती आहेत. मग ही नाती तोडून तुम्ही खुश राहू शकाल का?
सुनांनी शक्यतो कधी ज्येष्ठांशी वाद घालू नये. विवादस्पद परिस्थिती उद्भवू देऊ नये. आपले म्हणणे शांतपणे त्यांच्यासमोर मांडा. मुलाने समंजस्यपणे ही स्थिती हातळावी. एक गुणी मुलगा, पती आणि जावयाच्या रूपात हा समजूतदारपणा असावा.
मुंबई येथे राहणाऱ्या वाणीचे म्हणणे आहे, ‘‘मी तमिळ कुटुंबातील आहे आणि माझे लग्न एका पंजाबी कुटुंबात झाले. मला सासूची खूप भीती होती. माझ्या मैत्रिणींनी आणि नातेवाईंकांनी मला सासूविषयी खूपच घाबरवून सोडले होते. आमचं लग्न वेगळ्या धर्मात झाले होते. राहणेखाणे, वागणेबोलणे सर्व वेगळे होते. पण मी जितके घाबरत होते त्याच्या उलटच झाले.’’
‘‘माझ्या सासूने मला प्रेमाने सर्व करायला शिकवले. हिंदी बोलायला शिकवले. त्या मला सासू कमी आणि मैत्रीण जास्त वाटल्या.’’
दिल्लीची मधू सांगते, ‘‘मी अवघी १६ वर्षांची असताना आनंदाने माझ्या सासरी गेले. माझ्या मनात कुठलाही पूर्वग्रह आणि भीती नव्हती. मी ठरवले होते की कोणालाही उलट उत्तर देणार नाही. मग माझ्यावर कोणी का नाराज होईल?
‘‘सासूबाई तसे तर खूप प्रेमाने बोलत. मनातल्या मनात का कोणास ठाऊक मुलगा बदलेल अशी भीती त्यांना वाटत असे. त्यामुळे त्या माझ्या कामात काही ना काही चुक काढत असत. मी कुठलाही वादविवाद करत नसे, तरी गोष्टी हळूहळू चिघळू लागल्या.
‘‘सासूबाई आता बाहेरच्या लोकांसमोरही माझा पाणउतारा करू लागल्या. त्या प्रत्येक वेळेस माझ्याबद्दल वाईट बोलत असत. माझीही सहनशक्ती संपत होती. मी त्यांना उलट ऐकवायला लागले होते. यामुळे घरातील वातावरण बिघडू लागले होते. पती सतत तणावग्रस्त राहू लागले. ते ना आईला समजावून सांगू शकत होते ना मला.
‘‘यादरम्यान त्या आजारी पडल्या, पण जेव्हा मी त्यांची खूप सेवा केली तेव्हा त्यांचे मनपरिवर्तन झाले. माझ्या सेवेमुळे त्या माझ्यावर प्रेम करू लागल्या. त्यांचे मन परिवर्तन माझ्या सेवेमुळे झाले की माझ्या समजूतदारपणामुळे हे माहीत नाही, पण महत्त्वाचे हे आहे की आज घरातील वातावरण एकदम शांत आहे.’’
या दोन्ही प्रकरणांपेक्षा वेगळे प्रकरण आहे मोहिनीचे. ती सांगते, ‘‘माझे लग्न झाले आणि समस्यांचे सत्रच सुरू झाले. पूर्ण घरात सासूचे आणि नणंदेचे वर्चस्व होते. नुसते म्हणण्यापुरतेच नणंद विवाहित होती, पण प्रत्येकवेळी मला त्रास देत असे. मी सासूसासरे आणि नणंद या त्रिकोणात अडकून गेले होते.
‘‘पती नेहमी शांत असत. त्या दोघांच्या कुटिलपणामुळे आमच्यावर वेगळे होण्याची वेळ आली होती. पण अचानक परिस्थिती अशी बदलली की पतीच्याही लक्षात आले की कमतरता कुठे आहे.
‘‘नणंद आपल्या निढीवलेल्या वर्तनामुळे माहेरीच आहे. सासूबाईंनाही आता माझं महत्त्व पटलं आहे. मुलगी आणि सून यामध्ये एक पुसटशी रेषा असते. गरज असते ती फक्त रेषा पुसून टाकण्याची. मागे वळून पाहताना खूप दु:ख होते कारण महत्त्वाचा सोनेरी काळ लोटला होता. पण तरी समाधानाची बाब ही की उशिरा का होईना त्यांना त्यांची चूक समजली आहे.’’
परकी नाही स्वत:ची मुलगी समजावे
काही घरात सासूसुनेचे नाते माय लेकींसारखे असते तर काही घरात परिस्थिती खूपच वाईट असते. कमतरता ना सासूमध्ये असते ना सुनेत, कमतरता तर त्यांच्या समंजसपणात आणि त्यांच्या प्रेमात असते.
प्रश्न हा आहे की शेवटी सासूसुनेला परके का समजते? घरातली गोष्ट आहे असे असेल तर आपल्याला हेच ऐकायला आवडेल की घर तिचे आहे, पण घरांसोबत जबाबदाऱ्याही येतात.
दुसरीकडे काही सुना अशा असतात की त्यांना फक्त त्यांच्या नवऱ्याची आणि मुलांचीच जबाबदारी घ्यायची असते, सासूसासऱ्यांची नाही. याला घर सांभाळणे म्हणता येणार नाही.
वस्तूत: घर सर्व कुटुंबाचे असते. प्रत्येक सदस्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायला हव्यात. घर फक्त सासूचे आहे म्हणणे किंवा मुलगा आणि त्याच्या पत्नीचे आहे असे म्हणणे चुक ठरेल. कारण घरात इतर लोकसुद्धा राहतात. कोणा एका व्यक्तीमुळे घर बनत नाही. घर पूर्ण कुटुंबामुळेच बनते.
लहान लहान बाबी लक्षात ठेवल्या तर कुटुंबाचे वातावरण सहज, सुखद आणि शांततापूर्ण राहू शकेल.