* किरण बाला
कोणत्याही मुलीच्या आयुष्यात सर्वात मोठा आनंदी क्षण म्हणजे तिचं लग्न…लग्नामुळे तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते. जर एखाद्या मुलाशी लग्न करण्यापूर्वी सर्व बाबींचा गंभीरपणे आणि शांतपणे विचार केला नाही तर लग्नानंतर मात्र पश्तात्ताप करण्याची वेळ येते. अशात एक तर तिला आयुष्यभर कुढतकुढत जगावं लागतं किंवा मग तिच्यावर घटस्फोटाची तरी वेळ येते. या दोन्ही परिस्थिती तिच्या बाजूने नसतात. अशात जर कोणत्याही नात्याला होकार देण्यापूर्वी स्वत: मुलीनेच काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिलं, तर तिला लग्नानंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही आणि तिचं आयुष्यही आनंदी व सुखी ठरेल.
काही विशेष मुद्दयांवर लग्नापूर्वी चर्चा करून घेणं तुमच्या हिताचंच ठरेल. कारण दाम्पत्याचा पाया हा याच मुद्दयांवर टिकून असतो आणि वादविवाद व घटस्फोटदेखील याच गोष्टींवरून होतात.
* लग्न हे लहान मुलांचा किंवा बाहुल्यांचा खेळ नव्हे. म्हणून लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या नवऱ्याची भेट घेणं फार जरुरी आहे, जेणेकरून दोघांनाही एकमेकांचे विचार कळतील. तुम्हाला जर असं वाटत असेल की समोरच्या माणसामध्ये ती वैशिष्ट्य किंवा गुण नाहीत जे तुम्हाला हवे आहेत, तर नंतर पस्तावण्यापेक्षा तुम्ही त्याच्याशी लग्न न करणंच चांगलं ठरेल. कारण लग्नापूर्वीच जर तुम्ही वेगळे झालात तर निदान तुमच्यावर घटस्फोटित असण्याचा ठपका तरी लागणार नाही.
* लग्नापूर्वी तुम्ही मुलाकडून त्याच्या भविष्याच्या योजनांबद्दलही जाणून घ्या. तसंच त्याला हेदेखील सांगा की तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे. जर समोरची व्यक्ती तुम्हाला हवी तशी असेल, तरच लग्न करा.
* बऱ्याचदा असं दिसून येतं की मुलगी आणि तिचे कुटुंबीय कोणीच तिच्या करिअर प्लॅनिंगबद्दल सांगत नाहीत, की ती लग्नानंतर नोकरी करणार की नाही. तिला जर आपलं करिअर सोडायचं नसेल किंवा नोकरी करायची असेल, तर ही गोष्ट तिने मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना सांगायला पाहिजे. म्हणजे लग्नानंतर ते तिला नोकरी करण्यास अडवणार नाहीत. त्याचबरोबर जर ती वर्तमानकाळात नोकरी करत असेल आणि लग्नानंतर तिला नोकरी करायची नसेल, तरीदेखील तिने तिची इच्छा लग्नाआधीच व्यक्त करावी. नाहीतर लग्नानंतर ते नोकरी करण्यासाठी जोरही देऊ शकतात. नोकरी करणं किंवा न करणं याबाबत लग्नानंतर कसला वाद होऊ नये, म्हणून आपल्या करिअरचं प्लॅनिंग आधीच सांगणं फार गरजेचं आहे.
* तुम्ही जर कोणा नोकरदार मुलाशी लग्न करत असाल तर हे जाणून घ्या की त्याची नोकरी तर बदलणार नाही. जर बदली होत असेल तर त्याचं क्षेत्र कुठे आहे. नाहीतर तुम्ही हा विचार करून लग्नासाठी हो म्हणाल की त्याची बदली चंदीगड, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पुणे, बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये होणार आहे. पण जर लग्नानंतर त्याची बदली एखाद्या लहानशा शहरात झाली, जिथे तुम्हाला जायचं नसेल, तर मग अशा परिस्थितीत तुमच्यात नक्कीच वाद होतील. त्यामुळे लग्नापूर्वीच तुम्ही हा विचार करून घ्या की तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थैर्य हवंय की संपूर्ण भारतभर पतींच्या बदलींबरोबर भटकणं हवंय. तुम्ही जर नोकरी करत असाल तर हे जरुरी नाही की जिथे तुमच्या पतींची बदली होईल, तिथेच तुमचीही होईल. अनेक वेळा हे शक्य नसतं. अशावेळी एक तर तुम्हाला नोकरी सोडावी लागते किंवा आपल्या पतींपासून वेगळं तरी राहावं लागतं.
* तुम्हाला जर एकत्र कुटुंबात लग्न करायची इच्छा नसेल तर असं नातं आधीच नाकारणं बरं. तुम्ही जर त्यांना होकार देऊन लग्न केलं आणि नंतर पतींवर आईवडिलांपासून वेगळं होण्यासाठी जोर दिला तर ही गोष्ट मात्र अयोग्य ठरेल. त्याने कुटुंबात क्लेश निर्माण होईल आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं. तुम्हाला जर कोणाचं बंधन नको असेल तर मग अशाच मुलाबरोबर लग्न करा जो लग्नाच्या आधीपासूनच आईवडिलांपासून वेगळा राहात असेल आणि लग्नानंतरही त्याची वेगळंच राहाण्याची इच्छा असेल.
* ज्या कुटुंबात तुम्ही लग्न करत आहात तिथलं वातावरण, रीतीभाती, संस्कार, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी गोष्टी तुम्ही आधीपासूनच जाणून घ्या. शिवाय हेदेखील पाहा की तुम्ही अशा वातावरणात जुळवून घेऊ शकता की नाही. जर तुम्हाला तिथे जमणार नसेल तर तिथे लग्न करू नका. पण तरीदेखील तुम्ही जर तिथे लग्न केलं तर तुम्हाला तिथे ताळमेळ बसवावा लागेल. म्हणजे स्वत:ला त्यांच्यानुसार तुम्हाला घडवावं लागले. नाहीतर तुमचं कायमस्वरुपी माहेरी येणं ठरलंच समजा.
* लग्नापूर्वी मुलाबरोबर होणाऱ्या भेटीगाठींमध्ये त्याच्या आवडीनिवडी आणि सवयींबद्दलही जाणून घ्या. कदाचित त्याची एखादी आवड किंवा सवय तुम्हाला आवडत नसेल, ज्यामुळे लग्नानंतर तुमच्यात भांडण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंतही पोहोचू शकतं. तुम्ही जर शुद्ध शाकाहारी असाल तर त्याला हे विचारून घ्या की तो आणि त्याचे कुटुंबीय शाकाहारी आहेत की नाही? लग्नानंतर जर तुम्हाला कळलं की तो मांसाहारी आहे तर तुमच्यावरही मांसाहारी बनवण्यासाठी जोर दिला जाईल आणि कदाचित तुम्ही ते करू शकणार नाही. त्याचबरोबर जर त्याला मद्यपान करण्याचं व्यसन असेल आणि तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही अशा माणसासोबत जवळिकी कशी वाढवणार? स्पष्टच आहे की त्याची ही सवय तुमच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण करेल आणि शेवटी तुम्हाला पश्चात्तापच करावा लागेल.
* लग्नाआधी जर तुमचा कुणी प्रियकर असेल किंवा कोणाबरोबर तुमचे संबंध राहिले असतील, तर ही गोष्ट आधीच सांगणं फायदेशीर ठरेल. शिवाय ती गोष्टही जरा थोडक्यात सांगितली गेली पाहिजे, जेणेकरून ते प्रकरण जास्त गंभीर नव्हतं, असं वाटेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं जर कोणावर प्रेम असेल तर ही गोष्ट तुमच्या सर्कलमध्ये कित्येक जणांना माहीतच असेल. म्हणून त्याबद्दल जराशी माहिती देणं भविष्यासाठी योग्य ठरेल. कारण जर लग्नानंतर त्याला याबाबत बाहेरून कळलं तर तो तुमच्याकडे संशयाने बघेल आणि त्याला तुम्ही चारित्र्यहीन असल्याचं वाटेल. अविश्वासावरही दाम्पत्य जीवनाचा पाया जास्त दिवस टिकत नाही. पण हो, जर सगळं काही माहीत असूनही तो लग्नासाठी होकार देत असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे.
* तुम्हाला जर दोन-चार भेटीनंतरही हे कळत नसेल की तो तुमच्यासाठी फिट आहे की नाही, तर तुम्ही कोणा काउन्सलरचाही सल्ला घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल.