* गरिमा पंकज
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात पसरत चालला आहे. कोरोनाबाधित आणि मृतांच्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडयांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑफीस बंद होत आहेत. शाळा, महाविद्यालयेही बंद झाली आहेत. संपूर्ण कुटुंब घरात कैद झाले आहे. अशावेळी महिलांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना कुटुंबाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे लागत आहे.
मुलांची काळजी कशी घ्यावी?
मुलांना विश्वास द्या : मुले अनेकदा वस्तूंना हात लावतात. खाण्याचे पदार्थ इतरांशी शेअर करतात. म्हणजे ते संसर्ग पसरवण्याचे मोठे माध्यम आहेत. अशावेळी कोरोना म्हणजे काय आणि त्यापासून दूर राहणे किती गरजेचे आहे, हे तुम्हाला मुलांना सांगावे लागेल. मुलांसोबत या विषयावर मनमोकळेपणाने बोला. त्यांना आवश्यक ती काळजी घ्यायला सांगा.
कोरोना संसर्गासारख्या महामारीबाबत मुलांशी कशाप्रकारे बोलावे, हे त्या मुलांच्या वयानुसार ठरवावे. लहान मुले म्हणजे सर्वसाधारणपणे ६-७ वर्षांच्या मुलांना या विषयावर बोलायला आवडत नाही. याबाबत सांगितलेले ती लक्षपूर्वक ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रेमाने जवळ बसवून या आजाराबाबत प्राथमिक माहिती द्या. कोरेना संसर्गाबाबत सावध करा. मोठया मुलांनाही हात धुणे आणि मास्क लावण्याचे महत्त्व समजावून सांगा. त्यांना सांगा की, काही जणांना कोरोना झाला असेल, पण खबररदारी बाळगल्यास काहीच होणार नाही. असे काय करायला हवे ज्यामुळे कोरोना संसर्ग होणार नाही, याचीही माहिती मुलांना द्या. सोबत कोरोना संसर्गापासून वाचणे आपल्याच हाती आहे, याची जाणीव त्यांना करुन द्या.
तुमच्याकडून मुले शिकतात : लहान मुलांवर आईवडिलांचा मोठा प्रभाव असतो. त्यांच्याकडूनच ती शिकतात. त्यांच्यासारखेच वागायचा प्रयत्न करतात. तुम्ही बाहेर पडताना मास्क घातलात, वेळोवेळी हात धुतले आणि सॅनिटायजरचा वापर केल्यास मुलेही तुमचेच अनुकरण करतील. युवा अवस्थेतील मुलांचे विश्व वेगळे असते. ते जगभरातील माहिती जाणून घेण्यासाठी आईवडिलांवर फारशी अवलंबून नसतात. त्यांना याबाबतची माहिती जास्त करुन मित्रांकडून मिळते. त्यामुळेच सर्वकाही ठीक आहे, असे एखाद्या १४ वर्षांच्या मुलाला सांगितले तर त्याचा त्यावर विश्वास बसणार नाही. कारण तुम्ही जेव्हा असे सांगाल त्यावेळी तुम्हाला काहीच माहिती नाही, असे उत्तर तो तुम्हाला देईल. तुम्ही मुलाशी इतके मनमोकळेपणे वागायला हवे की, मनातील प्रत्येक गोष्ट तो तुमच्याशी शेअर करेल.
सर्वाधिक धोका कोणाला? : पुरुषांच्या तुलनेत महिला आणि मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे पहायला मिळते. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा आकडा कमी आहे. पण म्हणून खबरदारी घेणे गरजेचे नाही, असा याचा अर्थ होत नाही.
वयाचा विचार केल्यास कोरोना संसर्गामुळे ०.२ टक्के लहान मुले आणि युवकांचा, तर ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या १५ टक्के लोकांना जीवास मुकावे लागले आहे. वाढत्या वयासोबत आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते कारण, त्यांच्यातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. वय झालेल्या, आधीपासूनच रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या तसेच दम्यासारखे गंभीर आजार असलेल्यांमध्ये कोरोनाचा जास्त संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच वृद्ध आणि आजारी व्यक्तींची जास्त काळजी घ्या. त्यांना घराबाहेर पाठवू नका.
कोरोना संसर्गापासून कसे करावे रक्षण
भेटीगाठी घेणे टाळा : आजारी लोकांना भेटणे टाळा. स्वत: आजारी असाल तर डॉक्टरांकडे जाण्याव्यतिरिक्त इतर कुठेही जाणे टाळा. सर्दी, खोकला झाल्यास रुमालाचा वापर करा. कुटुंबाच्या संपर्कात येणे टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. दरवाजाचे हँडल, स्वीचबोर्ड आदींना सतत हात लावणे टाळा.
घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्या : घरात ज्या वस्तू दररोज वापरल्या जातात त्या रोज स्वच्छ करा. खुर्ची, जेवणाचे टेबल, विजेची बटणे, दरवाजा इत्यादींचा वापर घरातील सर्वच करतात. म्हणूनच दिवसातून दोनदा त्यांची साफसफाई करा.
हात २० सेकंदांपर्यंत धुवा : पाणी, साबण किंवा हँड वॉशने २० सेकंदांपर्यंत चोळून हात धुवा. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवा. ज्यात ६० टक्के अल्कहोल असेल अशाच सॅनिटायजरचा वापर करा.
मास्कचा वापर : तोंड मास्कने झाकून घ्या. खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपर वापरा व नंतर तो कचऱ्यात फेकून द्या. बाहेर जातानाही मास्कचा वापर करा. जर तुमच्या जवळपास एखादा विषाणू आलाच तरी तोंड आणि नाक झाकलेले असल्यामुळे तो तुम्हाला संक्रमित करू शकणार नाही आणि तुम्ही सुरक्षित रहाल.
डाएट कसा असावा? : कुठलातरी एखादा खाद्यपदार्थ तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकत नाही. पण पौष्टिक आणि समतोल आहार तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकतो. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी तुमचे शरीर मजबूत होईल. आहारात वैविध्य हवे. विविध प्रकारची फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
फळे आणि पालेभाज्या : रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संत्री, मोसंबी, आवळा, लाल किंवा पिवळी शिमला मिरची, किवी, पपई, गाजर, लिंबू इत्यादींपासून तुम्हाला अगदी सहजपणे व्हिटॅमिन सी मिळू शकते.
अंडी आणि डाळी : शरीरात झिंक म्हणजे जस्ताची कमतरता असल्यास तुम्ही सहजपणे आजाराचे शिकार होऊ शकता. गहू, बीन्स, मटार, डाळी इत्यादी झिंकचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत.
आल्याचा चहा : तुम्हाला सर्दी, खोकला असेल तर आहारात आल्याचा नक्की वापर करा. आल्याची चहा पिणे हे सर्वात उत्तम. आल्यात लोह, जस्त, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते.
खोबरेल तेल : घरात जेवण बनवताना सरसोचे तेल किंवा रिफाईंडऐवजी खोबरेल तेलाचा वापर करणे जास्त उपयुक्त ठरेल. यात लॉरिक अॅसिड, आर कॅप्रिलिक अॅसिड असते, जे तुमच्यातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवून तुमचे विषाणूंपासून संरक्षण करते.
व्हिटॅमिन ए : तुमचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन ए खूपच महत्त्वपूर्ण आहे. मासे, अंड्यातील पिवळा बलक, चीज, डाळी आणि मेथी, पालकासारख्या हिरव्या पानांच्या भाज्यांमधून तुम्हाला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळू शकेल.
लसूण : यात एलिसीन असते, ज्याच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दररोज लसणाच्या दोन पाकळया गरम पाण्यासोबत खा किंवा तुम्ही याचे सूप बनवूनही पिऊ शकता. लसूण खाल्लयाने सर्व प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आणि संसर्गापासून स्वत:चे रक्षण करता येते.
व्हिटॅमिन डी : सूर्यकिरणांपासून नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळते. सुरमई, मासे, अंडी, चीज, मशरममधूनही व्हिटॅमिन डी मिळते.
पाणी : पुरेशा प्रमाणात पाणी प्या. कोमट पाणी प्या. स्वत:ला हायड्रंट ठेवा.
आराम आणि व्यायाम : पुरेशी झोप घ्या. सोबतच सकाळच्या वेळेस फेरफटका मारा. व्यायाम अवश्य करा. व्यायामामुळे शरीर आतून मजबूत होते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.