* गृहशोभिका टीम

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहर  ‘हार्बर सिटी’, ‘सिटी ऑफ डेस्टिनी’ इत्यादी नावानेही ओळखले जाते. अलीकडेच येथे पहिले आंतरराष्ट्रीय यॉट म्हणजे नौकांच्या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाच्या अप्रतिम अविष्काराची येथे कमतरता नाही. जसे की, समुद्र किनाऱ्यांसोबतच सुंदर पर्वतरांगा, काचेसारखे चमकणारे समुद्राचे पाणी आणि जवळच असलेले हिरवेगार डोंगर.

येथे आल्यावर असे वाटेल की, एखाद्या चित्रकाराने अतिशय सवडीने निसर्गाच्या विशाल पटलावर रंगीबेरंगी चित्रे रेखाटली आहेत. विशाखापट्टणम शहर कोरोमांडल किनारपट्टीवर (दक्षिण-पूर्व किनारपट्टी) वसले आहे. कोरोमंडल किनाऱ्यावरून येथे वेगवेगळया दंतकथा प्रचलित आहेत. असे म्हणतात की, खरा शब्द कोरोमंडल नाही तर चोल-मंडलम होता. येथे चोल राजाचे साम्राज्य होते आणि या मंडलला तमिळ भाषेत चोल-मंडलम म्हणायचे. पण हा शब्द फ्रान्स, पोर्तुगालहून आलेल्या व्यापाऱ्यांसाठी बोलायला कठीण होता, म्हणून ते चोल-मंडलला कोरोमंडल असे म्हणू लागले. तेव्हापासून हा किनारा कोरोमंडल नावानेही ओळखला जाऊ लागला.

स्वच्छतेत अग्रस्थानी

शहराचा संबंध गौतम बुद्धांशीही असल्याचे पाहायला मिळते. येथून १५ मीटर अंतरावर तोटलकोंडा नाव असलेल्या ठिकाणी २५०० वर्षे जुने एका बौद्ध मठाचे अवशेष सापडले आहेत. या मठाचा संबंध बौद्ध धर्माच्या महायान संप्रदायाशी असल्याचे मानले जाते. कधीकाळी हे शहर कोळी बांधवांचे गाव होते असे म्हणतात. आता येथे भारतीय नौदलाच्या ईस्टर्न कमांडचे केंद्र आहे.

मच्छीमारांच्या आदिवासी जीवनातील साधेपणा आणि भारतीय नौदलाचा रुतबा या शहराला वेगळेपण मिळवून देतो. हे एक शांत आणि खूपच स्वच्छ शहर आहे. गेल्या वर्षी एका सर्वेक्षणात या शहरातील रेल्वे स्थानकाला देशातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानक म्हणून गौरवण्यात आले होते. हे देशाच्या इतर शहरांच्या तुलनेत स्वच्छतेच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे.

बंगालच्या खाडी किनाऱ्यावर स्थित विशाखापट्टणम येथे अनेक बीच म्हणजे चौपाट्या असल्यामुळे ते लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. किनाऱ्याला लागूनच बीच रोडही आहे, ज्याच्या पूर्वेला बीच आणि पश्चिमेला सुंदर इमारतींच्या रांगा आहेत. याच इमारतींच्यामध्ये ‘रामकृष्ण मिशन भवन’ आहे.

याच भवनाच्या नावावरून याला रामकृष्ण बीच असे नाव पडले. बीच रोडला येथील महानगरपालिकेने खूपच सुंदर प्रकारे सुसज्ज केले आहे. रस्त्याच्या कडेला तयार केलेली छोटी छोटी उद्याने आणि ठिकठिकाणी लावलेल्या मूर्ती इथला जिवंतपणा अधिकच जागवतात. उल्लेखनीय म्हणजे येथे सकाळी सात वाजण्यापूर्वी वाहतुकीवर निर्बंध आहेत कारण, येथे मोठया संख्येने स्थानिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. पहाटेच्या पहिल्या किरणापासूनच येथे जाग असते. हा देशाचा दक्षिण पूर्व किनारा असल्यामुळे येथून सूर्योदय पाहणे खूपच विलोभनीय असते. येथे समुद्र किनारी सोनेरी वाळूवर पडणारी सूर्याची किरणे खूपच सुंदर दिसतात. त्यामुळे बीच रोड या शहरासाठी एक प्रकारे सुत्रधाराची भूमिका पार पाडतो आणि कितीतरी प्रमुख आकर्षणांना आपल्या सोबत बांधून ठेवतो. याच्या आधारावर चालताना तुम्ही आयएनएस कुरसुरा पाणबुडी, एअरफोर्स संग्रहालय, मत्स्यदर्शिनी, फिशिंग डॉक, आंध्रप्रदेश टुरिझम बोर्डद्वारे संचलित बोटिंग पॉइंट आणि भीमली बीच इत्यादी येथील मुख्य आकर्षण पाहू शकता. हे सर्व एका सुंदर माळेत गुंफल्यासारखे भासतील.

सर्वात अनोखी हार्बर सिटी

विशाखापट्टणम एका छोटया खाडीवर वसलेले असल्यामुळे याला हार्बर सिटी असेही म्हणतात. व्यापाराच्या दृष्टीने हे देशातील चौथे सर्वात मोठे बंदर आहे. एके काळी व्यापाऱ्यांसाठी हार्बर सिटी विशाखापट्टणम ही कोलकाता बंदरापेक्षाही जास्त आकर्षक होती. येथे जहाज बनविण्याचा कारखानाही आहे. विशाखापट्टणम बंदर सर्वात मोठे, नैसर्गिक बंदर आहे. मोक्याचे ठिकाण म्हणूनही हे शहर खूपच महत्त्वपूर्ण आहे. या शहराशी खूप चांगली ओळख असलेले कौशिक मुखर्जी सांगतात, ‘‘दुसऱ्या महायुद्धावेळी या बंदराचे महत्त्व इतके होते की ब्रिटिश आर्मीने याच्या सुरक्षेसाठी येथे पिलबॉक्स बनवले.

पिलबॉक्स ही एक प्रकारची काँक्रीटची संरचना असते ज्याच्या आत मशीनगन ठेवतात. १९३३ मध्ये हे बंदर व्यापारासाठी खुले करण्यात आले. विशाखापट्टणम बंदरात १७० मीटर लांबीची जहाजेही थांबू शकतात. तुम्ही जर समुद्राच्या खळाळत्या लाटांसोबत दोन हात करू इच्छित असाल तर येथील ऋषीकोंडा बीच अॅडव्हेंचर प्रेमींसाठी पर्वणी आहे. हे शहरापासून सुमारे ८ किलोमीटर दूर आहे. येथे कयाकिंग, स्कुबा डायविंगसारख्या वॉटरस्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीजचा आनंद लुटता येतो. प्रोफेशनल ट्रेनरच्या देखरेखीखालीच सर्व अॅक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात. येथे अनेक रेस्टॉरंट आहेत, जिथे तुम्ही तुमचा थकवा दूर करू शकता. ऋषीकोंडा बीच आंध्र प्रदेशातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. पर्यटकांची खूप गर्दी होत नसल्याने अजूनही हे स्वच्छ आहे.’’

पहिला आंतरराष्ट्रीय नौका उत्सव

अनेक महिन्यांची मेहनत आणि नौदलाच्या नियमांच्या अधीन राहून विशाखापट्टणमच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर गेल्या महिन्यात देशातील पहिला आंतरराष्ट्रीय नौका (बोटी) उत्सव साजरा करण्यात आला. याच्या सोबतच येथे पदार्पण झाले ते वॉटर स्पोर्ट्सच्या एका नव्या परंपरेचे. बीच असलेले हे शहर आता नौका पर्यटनासाठीही ओळखले जाऊ लागेल.

नौकांची सफर

सफेद आलिशान नौका जेव्हा विस्तीर्ण समुद्रात हेलकावे घेत पुढे जाऊ लागते तेव्हा पर्यटकांमधील थ्रिलिंग पाहण्यासारखे असते. येथे विविध आकाराच्या बोटी उपलब्ध आहेत. तुम्ही मोठया नौकेत या लक्झरीचा आनंद घेऊ शकता किंवा वैयक्तिक अनुभव घेण्यासाठी छोटया बोटीतूनही जाऊ शकता. छोटया बोटीत एक केबिन असते. येथे तुमच्या प्रत्येक सुविधेकडे लक्ष दिले जाते. तुम्ही या नौकेतून फिशिंगची मजाही लुटू शकता. नौकेत बसताच तुमची डोळयाची पापणी लवते न लवते तोच किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात पुढे जाता आणि मागे राहतो तो विशाखापट्टणमचा सिटीस्केप. सजलेल्या इमारतींच्या रांगा आणि त्यांच्या मागे असलेल्या टेकडया हात हलवून तुमच्याकडे कौतुकाने पाहत असल्याचा भास होतो. सुट्टीच्या काळात नौकेवर लुटलेली ही मजा तुमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरेल.

कुरसुरा पाणबुडी आहे शान

बीच रोडवर मोठया दिमाखात उभी असलेली कुरसुरा पाणबुडी विशाखापट्टणमची शान आणि ओळख आहे. या पाणबुडीला तत्कालीन सोव्हिएत संघातून मागविण्यात आले होते. फणिराजजी ने १५ वर्षे या पाणबुडीवर तैनात होते आणि त्याकाळी या पाणबुडीच्या क्युरेटरची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी सांगितले, ‘‘ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या पाणबुडी शाखेचा पाया होती. ३१ वर्षे केलेल्या गौरवशाली सेवेदरम्यान या पाणबुडीने ७३,५०० समुद्री मैलाचे अंतर पार पाडत नौदलाच्या जवळजवळ सर्वच कार्यात सहभाग घेतला. ‘आयएनएस कुरसुरा’ने १९७१च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली. या पाणबुडीने प्रवासाद्वारे व दुसऱ्या देशात ध्वज दर्शन अभियान राबवून सभ्यता आणि सौहार्दाचा प्रचार केला होता.’’

२७ फेब्रुवारी, २००१ रोजी पाणबुडी डिसमिस करण्यात आली. म्हणजे तिला सेवेतून निवृत्त करण्यात आले. त्यानंतर कुरसुरा पाणबुडीला आर. के. समुद्र किनाऱ्यावर विशाखापट्टणमस्थित एका पाणबुडी संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले. याचे उद्घाटन ९ ऑगस्ट, २००२ रोजी करण्यात आले आणि २४ ऑगस्ट, २००२ रोजी नागरिकांसाठी ते खुले करण्यात आले. पाणबुडीवर ७५ लोकांची ड्युटी असायची. समुद्रातून या पणाबुडीला इथपर्यंत आणण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागला. लोकांना पाणबुडीच्या प्रवासाची माहिती व्हावी यासाठी तिचे मॉडेल म्हणजे प्रतिकृतीद्वारे खोल समुद्रातील तिच्या वास्तविक जीवनाचे दर्शन करून देण्यात आले आहे. आज भलेही भारत पाणबुडी निर्मितीत स्वावलंबी झाला असेल पण पाणबुडीच्या इतिहासात कुरसुराचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले गेले आहे.

एअरक्राफ्ट म्युझियम

कुरसुरा पाणबुडी म्युझियम समोरच एअरक्राफ्ट म्युझियम आहे. विशाखापट्टणम शहर विकास प्राधिकरणाने सुमारे १४ कोटी रुपये खर्च करून हे अनोखे संग्रहालय तयार केले आहे. याचे उद्घाटन गेल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले होते. या संग्रहालयात तुम्ही टी यू १४२ या विमानाच्या आत जाऊनही पाहू शकता. या संग्रहालयात बऱ्याच गॅलरी आहेत, जिथे प्रतिकृतींच्या सहाय्याने भारतीय हवाई दलाचे कार्य अधोरेखित करण्यात आले आहे. नागरिकांना खास करून मुलांना हे म्युझियम आकर्षित करते. याच्या बाहेर अल्फाबेट लावण्यात आले आहेत. ज्याच्यासोबत सेल्फी घेण्याची क्रेझ तरुणाईमध्ये पाहायला मिळते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...