मिश्किली * अंजू साने
तुम्ही काय हवं ते करा. फेसबुकवर आपला वाईटातला वाईट फोटो टाका. आपलं स्टेटस कॉम्लिकेटेड ठेवा. चार सहा बॉयफ्रेण्ड्स असल्याचं सांगा किंवा यापेक्षाही अजून काही तरी भन्नाट करा पण, कॉमेडियनशी लग्न करू नका.
आजतागायत मी त्या दुर्देवी क्षणाला शिव्या घालते आहे जेव्हा एका लग्नसमारंभात मी या कॉमेडियनवर भाळले होते. चक्क त्याच्या प्रेमात पडले होते. तो एकामागोमाग एक विनोद, चुटके मजेशीर प्रसंग असे काही रंगवून सांगत होता की हास्यविनोदाचा अखंड धबधबा कोसळत होता. या माणसाशी लग्न केलं तर सौख्याच्या सागरातच डुंबता येईल हा विचार मनात आला, तसा तो आईबापालादेखील सांगितला.
त्यांनी खूप समजावलं. ‘‘तो हसवतो आहे पण अशी मुलं संसार करायला अपात्र असतात. शोरूममधल्या महागड्या काचेच्या वस्तूंसारख्या त्या तिथेच शोभतात. तो तुला रागावणारही नाही कधी, पण विनोदानेच तुझा तासेल…त्याच्याशी लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाक.’’
पण मी त्यांचं म्हणणं साफ धुडकावून लावलं त्याचा आजही मला खूप म्हणजे खूपच पश्तात्ताप होतोय. आता वाटतं किती दुर्देवी, किती अभागी दिवस होता तो…आमचा साखरपुडा झाला होता अन् यांनी सगळ्या उपस्थितांना विनोद सांगून पोट दुखेपर्यंत हसायला लावून दमवलं होतं. मीही गर्वाने पुरीसारखी टम्म फुगले होते.
‘‘किती चांगला नवरा मिळालाय तुला…भाग्यवान आहेस हो…’’ अभिनंदन करताना प्रत्येकाने म्हटलं होतं.
पण लग्न झालं अन् टम्म फुगलेल्या माझ्या पुरीतली हवाच निघून गेली अन् त्याची चपटी पापडी झाली. आमच्या पहिल्या रात्रीलाही ते इतके बोलत होते, इतके विनोद सांगत होते की हसूनहसून माझे गाल अन् पोट दुखायला लागलं.
इथेच विषय थांबला असता तर ठीक होतं. पण त्यांनी माझा मेकअप, माझे दागिने, लग्नात अन् आलेल्या भेटवस्तू सगळ्यांवरच इतके काही विनोद केले की पुन्हा काही मी त्याकडे ढुंकूनही बघितलं नाही.
मी दिसते चांगली. माझ्या हसण्यावर तर अख्खं कॉलेज फिदा होतं. त्या माझ्या हसण्यावर यांनी काय म्हणावं. ‘‘तू हसतेस ना, तेव्हा वाटतं की पॉपर्कानचं मशीन ऑन केलंय, मक्याच्या दाण्यांसारखे तुझे दात तडतडत बाहेर येऊन पडतील ही काय असं वाटतं.’’
खरं सांगते, त्या दिवसानंतर मी हसणंच बंद केलं. बंद कणसासारखं तोंड मिटून घेतलं.
माझ्या गोऱ्यापान रंगाचा मला अन् माझ्या आईवडिलांनाही केवढा अभिमान? पण कमेंट करत ते म्हणाले, ‘‘तू अशी झगमगणाऱ्या ट्यूबलाइटसारखी का फिरतेस? फेअर अॅण्ड लव्हलीतून रिचार्ज करून आली आहेस का?’’ संतापाने मी लालपिवळी झाले.
माझे सुंदर केस, माझी नाजूक पावलं कशाचंही त्यांना कौतुक नाही. काही ना काही जिवाला लागेल असंच ते त्याबद्दल बोलतात.
एकदा संतापून मी म्हटलं, ‘काही तरी काम करा ना? नुसतीच बडबड करताय ती?’
गदगदून हसत नवरा म्हणाला, ‘कामच करतोय. बोलणं हेच माझं काम नाही का?’
एकदा मला सोन्याच्या रिंगा घ्यायच्या होत्या. मी दुकानात त्यांना त्या दाखवल्या. मला म्हणतात, ‘अगं, या काय रिंगा म्हणायच्या? दोन बाळं मजेत घालतील असे झोके आहेत हे. म्हणजे आता आधी आपल्याला जुळं व्हायला हवं. मग आपण हे झोके (झेपाळे) घेऊयात.’
माझा सगळाच उत्साह आता संपलाय. बरं, आता हे सांगू तरी कुणाला?
एकच सांगते, उपवर मुलींनो, कॉमेडियनशी लग्न करू नका…दु:ख हे माझे मला…मी सांगू कुणा अन् कशी…भाळले त्यांच्यावरी अन् चक्क की हो पडले फशी.




 
  
         
    




 
                
                
                
                
                
                
               