कथा * कुसुम आठले
श्रावणाचा महिना. दुपारचे तीन वाजलेले. पाऊस पडत असल्यामुळे हवेत सुखद गारवा होता, पण बाजारात वर्दळ नव्हती. सायबर कॅफेत काम करणारे तीन तरूण चहाचे घुटके घेत गप्पा मारत होते. आतल्या एक दोन केबिनमध्ये मुलं व्हिडिओ गेम खेळण्यात मग्न होती. दोन किशोरवयीन मुलं दुपारच्या निवांतपणाचा फायदा घेत मनाजोगत्या साईट उघडून बसली होती.
तेवढ्यात एका स्त्रीनं तिथं प्रवेश केला. तरूण तिला बघून दचकले, कारण खूपच दिवसांनी दुपारच्या वेळात कुणी स्त्री त्यांच्या कॅफेत आली होती. त्यांनी घाईघाईनं चहा संपवून आपापल्या विभागाकडे धाव घेतली.
स्त्री चांगल्या घराण्यातली दिसत होती. राहणी अन् चालण्यातून सुसंस्कृतपणा जाणवत होता. शिक्षणामुळे येणारा आत्मविश्वास हालचालींमधून कळत होता. तिनं छत्री मिटून तिथल्याच एका बादलीत पाणी निथळण्यासाठी ठेवली. केस नीट केले, मग काउंटरवर बसलेल्या मुलाला म्हणाली, ‘‘मला एक पत्र टाइप करून घ्यायचं आहे…मी केलं असतं, पण मला मराठी टायपिंग येत नाही…’’
‘‘तुम्ही मजकूर सांगाल की…’’
‘‘होय, मी बोलते, तू टाइप कर. शुद्धलेखन चांगलं आहे ना? करू शकशील नं?’’
मुलगा किंचित बावरला, पण म्हणाला, ‘‘करतो की!’’
ती बोलायला लागली, ‘‘प्रिय दादा, माझ्याकडून ही शेवटची राखी तुला पाठवते आहे, कारण यापुढे तुला राखी पाठवणं मला जमणार नाही. तू गैरसमज करून घेऊ नकोस. माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाहीए, कारण तो हक्क तू फार पूर्वीच गमावला आहेस.’’
ती काही क्षण थांबली. तिचा चेहरा लाल झाला होता. ‘‘पाणी मिळेल का प्यायला?’’ तिनं विचारलं.
‘‘हो, देतो,’’ म्हणत त्या तरूणानं तिला पाण्याची बाटली दिली. बाई पुढे काय सांगते आहे याबद्दल त्याला उत्सुकता होती. त्याला यात काही तरी गुढ आहे असं वाटू लागलं होतं.
ती पाणी प्यायली, चेहऱ्यावरून रूमाल फिरवला अन् ती मजकूर सांगू लागली, ‘‘किती सुखी कुटुंब होतं आपलं. आपण पाच बहीणभाऊ, तू सर्वात मोठा अन् सुरूवातीपासून आईचा फारच लाडका. बाबांची साधीशी नोकरी होती, पण तुला शिकायला शहरात पाठवलं. बाबांची अजिबात इच्छा नव्हती. पण बाबांच्या इच्छेविरूद्ध जाऊन आईनं तुझी इच्छा पूर्ण केली. त्यासाठी तिनं दोन दिवस उपोषण केलं होतं हे तू ही विसरला नसशील. तुला मेडिकल कॉलेजात अॅडमिशन मिळाली, तेव्हा मी ओरडून ओरडून मैत्रिणींना बातमी दिली होती. त्यांना माझा हेवा वाटला होता. एकीनं तर मुद्दाम म्हटलं होतं, ‘‘तुलाच मेडिकलला प्रवेश मिळाल्यासारखी नाचते आहेस.’’ मी ही आढ्यतेनं म्हटलं होतं, ‘‘दादा असो की मी, काय फरक पडतोय? आम्ही एकाच आईची मुलं आहोत. आमच्या शरीरात रक्त तेच वाहतंय…’’ दादा मी चुकीचं बोलले होते का?
‘‘तू होस्टेलला राहत होतास, जेव्हा घरी यायचास, मी अन् आई सोनेरी स्वप्नांत दंग होत असू. आई स्वप्नं बघायची, तुझं छानसं क्लिनिक आहे. प्रसन्न चेहऱ्यानं, प्रेमळ हसू चेहऱ्यावर घेऊन तू पेशंट तपासतो आहेस, पेशंटची रांग संपता संपत नाहीए. जाताना प्रत्येक पेशंट आदरानं नमस्कार करतो. पैसे देतो व तुझा ड्रॉवर पैशानं ओसंडून वाहतो…ते सगळे पैसे आणून तू आईच्या पदरात ओततोस…आईचा चेहरा आनंदानं, कृतार्थतेनं डवरून येतो…तू आईशी असंच बोलायचा म्हणून ती स्वप्नं बघायची.
‘‘मी स्वप्नं बघायची की मी नववधूच्या वेषात उभी आहे. देखणा, संपन्न घरातला, भरपूर पगाराची नोकरी असणारा माझा नवरा शेजारी उभा आहे. माझ्या पाठवणीसाठी आणलेल्या कारला तू फुलांनी सजवतो आहेस. मला कारमध्ये बसवताना आपण एकमेकांना मिठी मारून रडतो आहेत…
‘‘बाबा व्यवहारी होते. ते आम्हाला अशा स्वप्नातून जागं करायला बघायचे पण आम्हा मायलेकींची झोपेतून जागं व्हायची इच्छाच नसायची. तुझ्या गोड गोड बोलण्यानं तू आम्हाला झुलवत, भुलवत होतास.
‘‘इतर दोघी बहिणी अन् एक भाऊ अजून शिकत होते. पण आईला तुझ्या लग्नाची स्वप्नं पडू लागली होती. सुंदर, शालीन, नम्र सून तिला घरात वावरताना दिसायची. सासू म्हणून मिरवताना तिचा चेहरा अभिमानांनं फुलून यायचा. सुनेच्या माहेराहून मिळालेल्या भेटवस्तूंनी आमचं कायम अभावानं ग्रस्त घर भरून गेलेलं दिसायचं.
‘‘तू होस्टेलहून घरी यायचास, आई किती किती पदार्थ बनवून तुला खायला घालायची. बरोबर डबेही भरून द्यायची. हे सगळं करताना तिला कुठून, कशी शक्ती मिळायची मला कळत नसे. एरवी ती सदैव डोकेदुखीनं वैतागलेली असायची.
‘‘आमची स्वप्नं पूर्ण होऊ घातली होती. तुला डिग्री मिळाली होती. होस्टेलचं सामान आवरून तू घरी यायला निघाला असतानाच तुला लग्नाचा एक प्रस्ताव आला. तुझी वर्गमैत्रीण…तिच्या वडिलांनी तुला बरोबर हेरला होता. तू आईला ही बातमी सांगितलीस अन् आईला खूप आनंद झाला. डॉक्टर सून घरी येणार म्हणजे घरात दुप्पट पैसा येणार हा तिचा भाबडा समज. आई स्वत:च्या भाग्यावर बेहद्द खुष होती. सगळ्या आळीत घरोघरी जाऊन सांगून आली, ‘‘येणारी सूनही डॉक्टर आहे.’’ मी मात्र उगीचच शंकित होते.
‘‘तुझं लग्नं झालं अन् घरात उरले मी…माझ्या लग्नाची काळजी आईला होती.
आईनं तुला विश्वासात घेऊन सांगितलं, ‘‘हे बघ, छोटीसाठी मी थोडे फार दागिने केले आहेत…काही पैसेही साठवून ठेवले आहेत. तू छोटीसाठी छानसा नवरा शोध…तू इथंच राहतो आहेस म्हटल्यावर बाकीची सोय तू बघशीलच!! भाऊ भावजय डॉक्टर आहेत म्हटल्यावर चांगलं स्थळ मिळेलच.’’
‘‘सगळं बरं चाललंय म्हणतोय तोवर एक दिवस वहिनीनं घरात फर्मान काढलं.
‘‘या गावात क्लिनिक काढून फायदा नाही. क्लिनिकसाठी अद्ययावत यंत्रं लागतात. ती घ्यायला तुमच्याकडे पैसा नाही. त्यापेक्षा नोकरी चांगली. माझ्या वडिलांनी आमच्या दोघांसाठी चांगली नोकरी बघितली आहे…आम्ही तिकडेच जातो.’’
‘‘अन् तुम्ही दोघं निघून गेलात. त्यानंतर जेव्हा जेव्हा तू यायचास तेव्हा तुझ्याबरोबर वहिनीनं केलेल्या मागण्यांची अन् आपल्या घराबद्दलच्या असंख्य तक्रारींची यादी असायची. बाबांकडे तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचं बळ नव्हतं. इतर तीन भावंडांची काळजी होती. त्यांची शिक्षणं, त्यांची लग्नं…वहिनीचा तोरा, तुझा मिंधेपणा, आईची झालेली निराशा हे सगळं बघून त्यांनी आपापली शिक्षणं पटापट आटोपती घेतली. दोघी ताईंनी सामान्य परिस्थितीतल्या बऱ्यापैकी मुलांशी लग्न करून गरीबीचेच संसार थाटले. रमेश भाऊनं एक छोटीशी नोकरी शोधून घरखर्चाला हातभार लावायचा प्रयत्न केला…दादा, त्या काळात तुझ्या चेहऱ्यावर असहायता अन् काळजीचा संगम मी बघत होते. तुझा हसरा आनंदी स्वभाव पार बदलला होता. तू कायम चिडचिडा अन् तणांवात असायचास.
वहिनीच्या मते तिची सासू गावंढळ, बावळट होती, सासरे हुकुमशहा होते अन् धाकटी नणंद म्हणजे मी त्यांच्यावरचं एक ओझं होते. तुला वाटायचं आईनं वहिनीला समजून घ्यावं. आईत तेवढं बळंच नव्हतं. ती पार कोलमडली होती. समजून घेण्याची जबाबदारी खरं तर वहिनीची होती, पण तिच्यात तो गुणच नव्हता. तू ही आम्हाला वहिनीच्या दृष्टीनंच बघायला लागला होतास…काही अंशी तुझा नाइलाज होता, काही अंशी स्वार्थ…एक दिवस तू ही सांगून टाकलंस की मला एकच काहीतरी निवडायला लागेल.
‘‘आईनं इथंही तिचं प्रेम उधळून दिलं. तू तुझ्या संसारात सुखी रहावंस म्हणून तुला आमच्यापासून कायमचं मुक्त केलं.
‘‘त्यानंतर क्वचितच तू घरी यायचास, एखाद्या परक्या माणसासारखा पण हक्कानं पाहुणचार वसूल करून निघून जायचास. बाबांनी माझ्याकरता स्थळ शोधलं, लग्नही करून दिलं. पण मनांतून मला वाटायचं, तू असतास तर नक्कीच माझ्यासाठी याहून चांगलं स्थळ शोधलं असतंस. मी तुझी किती वाट बघत होते. पण तू अगदी शेवटच्या क्षणी आलास. बाबांनी अन् गरीबीत संसार करणाऱ्या माझ्या बहीण भावानं जमलं तसं माझं लग्न करून दिलं.
‘‘मी सासरी गेल्यावर आई अजूनच एकटी झाली. मी कधी माहेरी गेले तर तिच्या भकास डोळ्यात फक्त तूच दिसायचा. ती म्हणायची, ‘‘दादाला फोन कर गं! कसा आहे, ते विचार, घरी का येत नाही ते विचार, एकदा तरी घरी येऊन जा. घरी येणं बंदच केलंय…’’ ती रडायला लागे. बाबा पुरूष होते. त्यांना रडता येत नव्हतं. पण दु:ख त्यांच्याही चेहऱ्यावर दिसायचं. आईकडे सगळं असूनही काहीच नव्हतं, कारण तिचा लाडका मुलगा रागावून निघून गेला होता. ती मलाच विचारायची, ‘‘माझं काय चुकलं गं? दादाला शिकायला बाहेर पाठवलं हे चुकलं की डॉक्टर सून केली, हे चुकलं?’’ खरं तर तिचं काहीच चुकलं नव्हतं.
‘‘वडिलांनी दादाची आशा सोडली होती. पण आईची माया चिवट होती. बाबांना चोरून, लपवून ती दादाला पत्र लिहित असे. शेजारपाजारच्या मुलांकरवी ते पोस्टात पडेल असं बघायची. पाच सात पत्रानंतर वहिनीचं खडसावल्यासारखं पत्र यायचं, ‘‘बंद करा हे सगळं. आम्हाला सुखानं जगू द्या. किती छळणार आहात?’’
‘‘आई शेवटच्या घटका मोजत होती. पण दादा, तू आला नाहीस. तुला भेटायची आस मनी बाळगून, तुझं नाव घेत आईनं प्राण सोडला. तुला कळवल्यावर तू आलास पण तिचं क्रियाकर्म झाल्यावर…कदाचित आईचं क्रियाकर्म करण्याचा हक्क आपण गमावला आहे, हे तुला समजलं होतं.
‘‘आई तुझं नाव जपत मरून गेली. तुझी वाट बघत होती. पण मरतानाही तुझा वाटा माझ्याजवळ देऊन गेली. कारण ती आई होती. मी ही ते नाकारलं नाही, ठेवून घेतलं तुझ्यासाठी, कारण मी बहीण होते. पण दादा, तू मुलगा म्हणून कमी पडलास.
‘‘दादा, स्वार्थ माणसाला इतकं आंधळं करतो की सगळी नातीच विसरून जावीत? तू असा कधीच नव्हतास. सगळा दोष वहिनीला देऊ नकोस, प्रत्येक गोष्ट तिच्या इच्छेनं करताना एखादी तर गोष्ट स्वत:च्या इच्छेनं करण्याचं धाडस तू का दाखवू शकला नाहीस? तुला जर नात्याची किंमतच नाहीए तर माझी राखी न मिळाल्यामुळे तू विचलित का होतोस? मला कुणी तरी तुझा निरोप पोहोचवतो की यंदा तुला राखी मिळाली नाही…
‘‘दादा, राखी पाठवणं अन् ती मिळणं, एवढ्यातच राखीचा सण समावला आहे का? त्यासाठी जबाबदारीसुद्धा घ्यावी लागते. आज पंचवीस वर्षांत तुझी माझी गाठभेट नाही, तू माझ्याकडे आला नाहीस, मला कधी बोलावलं नाहीस, एवढ्या वर्षांत फक्त माझ्याकडून पाठवली जाणारी राखीच एखाद्या नाजूक तंतूसारखी जीव तगवून होती. पण आता तो धागाही तुटणार आहे. कारण राखी पाठवण्याची माझी इच्छाशक्ती आणि राखीवरचा माझा विश्वासही मोडीत निघाला आहे.
‘‘दादा, मला एकच सांग, घरात आम्ही तिघी बहिणी नसतो तर तू आईबाबांना टाकून गेला असतास? बहिणींची जबाबदारी हेच तुझ्या निघून जाण्याचं कारण होतं ना? अरे, पण आमच्या तुझ्याकडून खरोखरंच काही अपेक्षा नव्हत्या रे! तू एकदाच, फक्त एकदाच आमच्याशी बोलून तुझा प्रॉब्लेम, तुझी चिंता, तुझं दु:ख सांगायचं होतंस…काही तरी उपाय शोधता आला असता. ठीक आहे. आता जर तुला जमलंच तर माझी ही राखी माझी शेवटची आठवण म्हणून तुझ्याकडे जपून ठेव. तुझ्या हृदयात नसली तरी तुझ्या भल्या मोठ्या बंगल्यात तिच्यापुरेशी जागा नक्कीच असेल.’’
मजकूर सांगता सांगता ती स्त्री दु:खी आणि भावनाविवश होऊन थरथरंत होती, पण तिच्या डोळ्यातून अश्रू मात्र आले नाहीत. कदाचित तिचे अश्रू आटले असतील, मजकूर लिहून घेणाऱ्याचे डोळे मात्र पाणावले होते.
काम पूर्ण झालं होतं. त्या स्त्रीनं तरूणाला म्हटलं, ‘‘याची एक कॉपी काढून मला दे, ती मी माझ्या दादाला पाठवेन, तुला सांगते, पंचवीस वर्षांनंतर प्रथमच मी हे सर्व लिहिण्याचं धाडस केलंय. इतकी वर्ष मी फक्त सर्वात धाकटी बहीण म्हणूनच जगले.
‘‘एक काम तू आणखी कर. हे माझं पत्र, माझा संदेश, इंटरनेटवरून अशा ब्लॉगवर जाऊ देत ज्यामुळे जास्तीत जास्त लोक तो वाचतील. जगात माझ्या दादासारखे अजूनही काही भाऊ असतील, ज्यांच्याकडून अशी चूक घडली असेल, निदान त्यांना ती चूक सुधारण्याची संधी मिळेल. हा संदेश माझ्या आईला अंतिम श्रद्धांजली म्हणून देते आहे. ती बिचारी मुलाच्या भेटीची आस अन् तो न येण्याचं दु:ख उराशी कवटाळून मरून गेली. तिच्या आत्म्याला निदान यामुळे शांती लाभेल.’’