* नितिन शर्मा, ‘सबरंगी

दृष्टीकोन बदलला की बरंच काही बदलतं. उदास वाटणाऱ्या आयुष्यातही उत्साह संचारतो. यासाठी संयम, विवेक आणि योग्य संतुलन आवश्यक आहे. जे असं करू शकत नाहीत ते निराशेच्या गर्तेत ढकलले जातात. जेव्हा तुम्ही जिंकण्याच्या निर्धाराने पुढे जात राहाता तेव्हा तुम्ही प्रतिकूल परिस्थितिलाही अनुकूल बनवता. पण जो वेळेआधीच हरतो तो स्वत: तणावाखाली राहातो आणि आपल्या कुटुंबालाही न विसरू शकणारं दु:खं देतो. समाजातही चुकीचा संदेश जातो. लोक त्याला भित्रा म्हणू लागतात. त्याच्या जिंवतपणी किंवा पश्चात ‘भित्रा’ अशी त्याची ओळख बनली तर ती त्याच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकते.

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात राहाणारी ४६ वर्षीय नीता गुलाटी सरकारी शाळेत शिक्षिका होती. ती इतकी सुंदर होती  की सगळे तिची स्तुती करत. तिचा नवराही सरकारी कर्मचारी होता. तिचा एक मुलगा आणि मुलगी उच्चशिक्षण घेत होते. कुटुंबात आनंद नांदत होता. वरवर दिसताना सगळं ठिक दिसत होतं. पतिपत्नीमध्ये कोणताही वाद नव्हता किंवा घरात कशाचीही कमतरता नव्हती. या सगळ्यापासून लांब नीता एका वेगळ्याच दुनियेत जगत होती, ती डिप्रेशनमध्ये होती आणि याची जाणीव तिच्या नवऱ्यालाही नव्हती.

एके दिवशी संध्याकाळी नीता घरात एकटी होती. नवरा घरी आला तेव्हा त्याला तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. आपल्या अर्धांगिनीची ती अवस्था पाहून तो बेभान झाला. नीताने गळ्याभोवती फास आवळून आपल्या श्वासांची मालिका रोखून भ्याडपणा दाखवून दिला होता. आजूबाजूची माणसं गोळा झाली.  आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि आनंदी कुटुंबातल्या नीताने हे पाऊल उचललं यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता.

आत्महत्येचं कारण

नीताने आपल्या आत्महत्येचं कारण एका चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. ‘‘सॉरी, पण काय करु? माझ्या आजारपणाने हैराण झाले आहे.’’

खरंतर नीता सनबर्नला कंटाळली होती आणि यामुळे डिप्रेशनमध्ये होती. ३ वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारांनी आजार बरा होऊ शकत होता. पण तरीही नीता डिप्रेशनमध्ये होती.

सूर्याच्या अल्ट्राव्हायोलट किरणांमुळे त्वचा जळजळते, त्याला सनबर्न म्हणतात. पाणी पिऊन त्वचा झाकून ठेवून, उन्हापासून लांब राहून आणि सनस्क्रीन लावून हा आजार सहज बरा होऊ शकतो. पण नीताला नकारात्मकतेने ग्रासलं होतं. हळूहळू ती डिप्रेशनमध्ये इतकी शिरत गेली की तिने कुटुंबाचा आणि स्वत:चा विचार न करता चुकीचा मार्ग निवडला.

नीताच्या जवळच्या माणसांचा विश्वासच बसत नव्हता की इतक्या क्षुल्लक कारणासाठी कोणी आत्महत्या करू शकतं. पण संशय येण्यासारखं काहीच नव्हतं. नीता तिच्या कुटुंबासाठी आता फक्त आठवणीतच राहिली. सकारात्मक दृष्टीकोन आणि विचारानं ती स्वत:लाही सावरू शकत होती.

धावपळीच्या आयुष्यात विविध कारणांमुळे डिप्रेशन येणे ही मोठी गोष्ट नाही. प्रत्येकजण थोड्याफार प्रमाणात याचा बळी ठरतोच. पण वेळीच या तणावावर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचं रूपांतर विविध आजारांमध्ये होऊन तुमचं आयुष्य तुम्हाला वाईट दिसू लागतं. हे ते भयंकर क्षण असतात जे तुम्हाला मृत्यूच्याजवळ नेऊन ठेवतात.

आयुष्य ओझं वाटत असेल तर जगण्याची पद्धत बदला. नाजूक क्षणी विचारीपणाने निर्णय घेतले तर भविष्यातील अडचणी टाळता येतात. जे वेळीच सावरत नाहीत, त्यांना अनपेक्षित घटनांना सामोरं जावं लागतं.

तुम्हाला तुमच्या जवळपास असे काही लोक भेटतील जे तुमच्यापेक्षा जास्त त्रासात आहेत. कोणी अंध आहेत तर कोणी अपंग. पण आपल्या हिंमतीच्या जोरावर वेळ निभावून नेतात आणि इतरांसाठी आदर्श बनतात. लक्षात ठेवा, या जगात करोडो लोक आहेत जे तुमच्यासारखं आयुष्य जगायला आसुरतात. कोणाकडे खायला अन्न नाही, कोणाकडे कपडे नाहीत, डोक्यावर छत नसतं, उपचारासाठी पैसे नाहीत, पण तरीही ते आनंदाने जगत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची चमक पाहण्यासारखी असते. लहानसहान गोष्टींमुळे विचलित होऊन लोक आयुष्यात हार मानू लागले तर त्यांची यादी रोज मोठी असेल. आयुष्यातली ध्येयं कायम ठेवा आणि प्रत्येक स्थितीत जगण्याची कला शिका, कोणत्याही वाईट विचारांना आणि त्रासाला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. यामुळे अडचणी कमी होण्यापेक्षा वाढतील. प्रतिकूल स्थिती कधीच कायम राहात नाही, आपलं संपूर्ण लक्ष समस्येतून मार्ग काढण्याकडे असलं पाहिजं.

अशीही माणसं आहेत जी आपला दृष्टीकोन बदलून आपल्या हाताने आयुष्य सावरतात, अगदी तेव्हाही जेव्हा मनात काही वाईट विचार येतात आणि आयुष्य डोंगराएवढं वाटू लागतं.

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये राहाणाऱ्या अनिता शर्मा उर्फ भैरवी यांच्या कानाखाली एक गाठ आली. गाठीने कॅन्सरचं रूप घेतलं. यामुळे अनिताची झोपच उडाली आणि ती चिंताग्रस्त झाली. आता जगण्यात काहीच अर्थ नाही असं वाटू लागलं.  पण त्यांनी आपला दृष्टीकोन बदलला. तेव्हा त्यांना कळलं की सकारात्मक बनून आजाराबरोबरच अनेक नकारात्मक गोष्टींशी लढता येतं. आता त्या चांगलं आयुष्य जगत आहेत. निराशेमुळे त्रास आणखी वाढतो याची जाणीव झाली. अनीताने आयुष्य जगण्याची पद्धत बदलली. त्या आपला जास्तीत  जास्त वेळ झाडंझुडपं, प्राणी-पक्षी यांच्यासह घालवू लागल्या. यामुळे त्यांना जणू काही जगण्याचं कारण मिळालं. अनिताचं महागडं ऑपरेशन होणार आहे. इतके पैसे त्यांच्याकडे आता नाहीत की तात्काळ उपचार होतील. पण यामुळे त्या अस्वस्थ नाहीत. त्या आपलं संतुलन राखून आनंदी जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. परिस्थिसमोर हरणं म्हणजे आयुष्य नाही.

पोलिस विभागात वायरलेस ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मी सिंह पुंडीरनेही दृष्टीकोन बदलून स्वत:ला आणि कुटुंबाला सावरण्याचं काम केलं. २ वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं. आजारपणाच्या विचारानेच त्या कोसळल्या. ऑपरेशन आणि केमोथेरेपीने प्रकृती अधिकच बिघडली.

आजारपणावर लाखो रुपये खर्च झाले आणि कुटुंब आर्थिक संकटात सापडलं. अशा परिस्थितीशी झगडताना अशा आयुष्यापासून सुटका करून घ्यावी असं वाटायचं. पण अशावेळी त्या आपल्या ३ मुलांचा विचार करत. त्यांच्यासह स्वप्नं रंगवत. डिप्रेशन बरात काळ राहिलं. पण त्या आपल्या सकारात्मक विचारांनी निराशेवर मात करत. परिणामी बऱ्याच उपचारांनंतर त्यांचा आजार बऱ्याचअंशी नियंत्रणात आला.

‘‘जेव्हा तुमच्यासोबत काही नकारात्मक घडतं तेव्हा एक गोष्ट सकारात्मक घडते की तुम्ही तुमची आशा कधीच सोडत नाही. ठाम विश्वास मनात असला पाहिजे. असाच विचार करा की मला जगायचंय. मग एक दिवस सगळं ठीक होतं.

माझ्या शरीरात कॅन्सर मोठ्या प्रमाणात पसरला होता. फोर्थ स्टेजला होता. मी असाच विचार केला की मला जगायचंय आणि माझ्या आजाराला हरावं लागलं.’’ असं लक्ष्मी सांगतात.

डिप्रेशनला बळी पडू नका

डिप्रेशन म्हणजे तणाव एक गंभीर मानसिक आजार आहे. बऱ्याच संशोधनात   असं लक्षात आलं आहे की पुरुषांच्या तुलनेत या आजाराचं प्रमाण महिलांमध्ये    जास्त आढळतं. बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. डिप्रेशन भावना, आकलन, वर्तणूक आणि विचारांवर वाईट परिणाम करते. हळूहळू ते माणसाला अशा अवस्थेत नेतं की त्याचं जग उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटू लागतं. जगण्यासारखं काही उरलेलंच नाही असं वाटू लागतं. यामुळे माणूस आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकतो. याची बरीच कारणं असू शकतात. मेंदूमध्ये संदेश प्रसारीत करणाऱ्या रासायनिक संदेशवाहक न्यूरोट्रांसमीटरच्या असामान्य स्तराची डिप्रेशनमध्ये महत्त्वाची भूमिका असते. मानसिक रोग,   कमकुवत व्यक्तिमत्त्व, निराशाजनक दृष्टीकोन ही कारणं त्यामागे असतात. याच्या लक्षणांत उदासिनता, निराशा, निद्रानाश, भूक कमी लागणे, थकवा, न्यूनगंड, एकटेपणा, आनंदी क्षणांपासून अलिप्त राहाणं, अस्वस्थता, चिडचिड, सतत डोकेदुखी यांचा समावेश असतो.

डिप्रेशनचा उपाय आपल्या स्वत:च्या हातात असतो. तुम्ही त्यातून कशाप्रकारे     बाहेर पडू इच्छिता हे तुमच्यावर अवलंबून असतं.

मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सकारात्मक दृष्टीकोन बाळगल्याने तुम्ही डिप्रेशनमधून पूर्णपणे बाहेर पडू शकता. स्वत:ची काळजी घेण्यासाठी पुरेसा          वेळ काढा. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा, कारण व्यसन डिप्रेशनला पूरक असतं. आपले छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. अशी नाती जोडा जिथे तुम्हाला         मनमोकळं बोलता येईल. माणसांमध्ये मिळून मिसळून राहा. तरीही डिप्रेशन कमी झालं नाही तर एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडे जा. त्यांनी दिलेल्या औषधांचे नियमित सेवन करा आणि त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा फक्त औषध हाच यावरचा उपाय नाही. याच तुमची इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टीकोनही तितकाच महत्त्वाचा आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...