कथा * रवी चांदवडकर
रात्रीचे बारा वाजले तरी स्वातीच्या डोळ्यांत झोप नव्हती. शेजारी झोपलेला नवरा मजेत घोरत होता. दिवसभर दमल्यावरही स्वाती मात्र या कुशीवरून त्या कुशीवर होत झोपेची आराधना करत होती. पुन:पुन्हा तिच्या डोळ्यांपुढे तो दुपारचा प्रसंग येत होता. ज्याला ती सहज, हलकाफुलका खेळ समजत होती तो साक्षात विस्तवाशी खेळ होता, या जाणिवेने ती हवालदिल झाली होती. पुरुषांशी मोकळेपणाने बोलणं, हलकेफुलके विनोद करणं, फ्लर्टिंग ही तिच्या मते फारसं गंभीरपणे घेण्याची बाब नव्हती.
स्वाती मैत्रिणींना, नातलगांना नेहमी सांगायची, ‘‘मार्केटमध्ये माझी इतकी ओळख आहे की कोणतीही वस्तू मला स्पेशल डिस्काउंटवर मिळते.’’
स्वाती आपल्या माहेरीही वहिनींना, बहिणींना सांगायची, ‘‘आज मी वेस्टर्न ड्रेस घेतला. खूप स्वस्त पडला मला. डिझायनर साडी घेतली दीड हजाराची, साडी मला फक्त नऊशेला मिळाली, हिऱ्याची अंगठी मैत्रिणींकडून ऑर्डर देऊन करवून घेतली. दोन लाखाची अंगठी मला दीड लाखात पडली.’’
माहेरच्या लोकांच्या नजरेत स्वातीविषयी हेवा, अभिमान अन् कुतूहल असायचं. तिची हुशारी, बारगेनिंग पॉवर अन् वाक्पटुता सगळ्यांना ठाऊक होती. कुणाला काही घ्यायचं असलं तर ते स्वातीला फोन करायचे अन् स्वाती त्यांना हवी असलेली वस्तू योग्य त्या किमतीत मिळवून द्यायची.
आकर्षक व्यक्तिमत्त्वाची, शिकलेली, चतुर स्वाती लहानपणापासूनच खरेदी करण्यात हुशार होती. तिला खरेदी करायला फार आवडायचं. एखाद्याला वाचन आवडतं, कुणाला इतर काही आवडतं तसं स्वातीला खरेदी करायला आवडायचं. मोठमोठ्या रकमेच्या वस्तूही ती घासाघीस करून कमी किमतीत अन् थोडक्या वेळात खरेदी करायची. सासरी, माहेरी सर्वत्र तिचं कौतुक व्हायचं.
स्वातीचं माहेर तसं मध्यमवर्गीय. त्यातही निम्न मध्यमवर्गीय. पण लग्नं झालं ते मात्र एका व्यावसायिक घराण्यातल्या अत्यंत श्रीमंत कुटुंबातल्या मुलाशी. कोट्यधीशांच्या घरात येऊन इथले रीतिरिवाज तिने शिकून घेतले पण मुळची काटकसरी वृत्ती मात्र सोडली नाही. घरखर्चात काटकसर करून पैसे वाचवणं अन् त्यातून मनसोक्त खरेदी करणं तिला फार आवडायचं. नवरा भरपूर पैसे हातात देत होता. शिवाय त्याच्या पाकिटातून पैसे लांबवणं हाही स्वातीचा लाडका उद्योग होता. शिकलेल्या, संस्कारवान अन् समजूतदार स्वातीला एक गोष्ट चांगलीच लक्षात आली होती…पुरुषांना काय आवडतं, त्यांचा ‘वीक पॉइंट’ काय असतो, त्यांच्याकडून कमी भावात वस्तू कशी खरेदी करायची हे गणित तिला बरोबर जमलं होतं. ज्या दुकानात किंवा शोरूममध्ये पुरुषमालक असेल तिथेच ती खरेदीला जायची. सेल्समन, सेल्सगर्ल्सना ती म्हणायची, ‘‘तुम्ही फक्त सामान दाखवा. मालकांशी बोलून मी किंमत ठरवीन.’’
खरेदी झाल्यावर हिशेब करताना ती शेठच्या डोळ्यांत डोळे घालून लाडिकपणे म्हणायची, ‘‘भाऊ, किंमत बरोबर लावायची हं! आजची नाही, गेली दहा वर्षं तुमची ग्राहक आहे मी. तुमच्या दुकानाची जुनी कस्टमर.’’
‘‘वहिनी, किंमत जास्त लावणार नाही. काळजी करू नका,’’ दुकानमालक म्हणायचा.
‘‘नाही हो, तुम्ही चक्क जास्त पैसे लावलेत. तुमच्या दुकानावर मला नेहमीच स्पेशल डिस्काउंट मिळतो.’’ बोलता बोलता स्वाती सहजच केल्यासारखा त्याच्या हाताला स्पर्श करायची. ‘‘भाऊ, हे बघा, तुम्ही माझ्या धाकट्या दिरासारखे आहात. दीरभावजयीच्या नात्यात असे रुपयेपैशांचे हिशेब कशाला आणता?’’
बहुधा दुकानदार स्वातीच्या गोड गोड गोष्टींना भुलायचा अन् १५ टक्के, २० टक्के डिस्काउंट द्यायचे.
एका ज्वेलरशी तर स्वातीने चक्क भावजी मेहुणीचं नातं जोडलं होतं. दागिने हा बहुतेक बायकांचा वीक पॉइंट असतो. स्वातीचाही होता. स्वाती खूपदा त्या ज्वेलरच्या दुकानांत जायची. काय काय नवी डिझाइन्स आली आहेत हे नुसतं बघायला गेली, तरी काहीतरी त्यातलं आवडायचं. मग ‘जिजू अन् साली’च्या नात्यात चेष्टामस्करी सुरू व्हायची.
‘‘भावोजी, मी तुमची मेहुणी आहे. तुम्हाला हिंदीतली ती म्हण ठाऊक आहे ना, ‘साली आधी घरवाली…’ माझा हक्कच आहे तुमच्यावर, मी एवढीच किंमत देणार.’’
स्वातीच्या स्पर्शाने सुखावलेला ज्वेलर मिळालेली किंमत मुकाट घ्यायचा. त्याच्या मनात मात्र हे स्पर्शसुख अधिक मिळवण्याचं प्लॅनिंग सुरू असायचं. अर्थात् स्वाती चतुर होती. ती पैसे दिले की ताबडतोब निघायची. हाती लागणं दूरच होतं.
त्या दिवशी तिच्या वहिनीचा फोन आला. स्वातीला भाचीच्या लग्नासाठी दागिने खरेदी करायचे होते. स्वाती खरेदी करतेय म्हटल्यावर ती ‘स्वस्त आणि मस्त’ असणार हे वहिनी जाणून होती.
स्वातीने घरून निघण्याआधीच ज्वेलरला फोन करून सांगितलं होतं, ‘‘माझ्या भाचीचं लग्न आहे. मी खरेदीसाठी येतेय. तुम्ही चांगली चांगली निवडक डिझाइन्स आधीच बाजूला काढून ठेवा. माझ्याकडे फार वेळ नाहीए.’’
दुकानदार अगदी नाटकीपणाने म्हणाला, ‘‘आपला हुकूम सर आँखों पर, आप आइए तो साली साहिबा. तुमच्यासाठी सगळं तयार ठेवतो.’’
ज्वेलरचं हे दुकान म्हणजे फार मोठी शोरूम नव्हती. पण तो ज्वेलर स्वत: उत्तम कारागीर होता. ऑडर्स घेऊन दागिने तयार करायचा. शहराच्या एका कॉलनीत त्याचं दुकान होतं. काही खास गिऱ्हाइकांसाठी तो ऑर्डर केलेले दागिने तिथे ठेवायचा. तिथूनच खरेदीविक्री चालायची. ऑर्डर केलेला माल घ्यायला, तयार मालातून खरेदी करायला अन् नवी ऑर्डर द्यायला गिऱ्हाइकं येतजात असायची. स्वातीच्या एका मैत्रिणीने या ज्वेलरची अन् स्वातीची ओळख करून दिली होती. पण त्या मैत्रिणीलाही हा ज्वेलर स्वातीला कमी किमतीत दागिने कसे देतो हे कोडंच होतं. मैत्रिणीने त्याच्याकडे कधी न बघितलेली डिझाइन्स स्वातीने त्याच्याकडून डिस्काउंटवर मिळवली होती.
‘‘भावोजी, काही वेगळी डिझाइन्स दाखवा ना? ही तर सगळी गेल्या वेळी दाखवलेलीच आहेत.’’ ज्वेलरच्या डोळ्यांत थेट बघत स्वातीने म्हटलं.
ज्वेलरच्या डोळ्यांत काही तरी वेगळी चमक होती. तो तसा नॉर्मल दिसण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे स्वातीने ज्वेलरच्या हातावर हळूच हात ठेवला. मग त्याच्या दंडाला हळूच स्पर्श केला. त्या स्पर्शाने ज्वेलर बेचैन झाला. तोही अधूनमधून स्वातीच्या बोटांना, मनगटाला, हाताला स्पर्श करू लागला. स्वातीला ते खटकलं. तरीही स्पेशल डिस्काउंट घ्यायचा आहे म्हटल्यावर तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.
आज दुकानात ग्राहक नव्हतेच अन् एरवी असणारी पाचसात हेल्पर मुलंही दिसत नव्हती. फक्त एकच मुलगा होता. ज्वेलरने त्या मुलाला एक यादी दिली अन् हे सामान बाजारातून आणून टाक म्हणून सांगितलं. ‘‘अन् हे बघ, जाण्याआधी फ्रीजमधून कोल्ड्रिंकच्या दोन बाटल्या काढून उघडून आणून दे, मग जा,’’
दुकानदाराच्या ऑर्डरप्रमाणे मुलगा काम करू लागला.
‘‘नवी डिझाइन्स दाखवा ना?’’ स्वातीने लाडिकपणे म्हटलं.
‘‘दाखवतो ना, कालच आलेली आहेत. केवळ तुमच्यासाठीच वेगळी काढून ठेवली आहेत.’’
‘‘अय्या? खरंच?’’ स्वाती आनंदून बोलली.
‘‘एक ऐकता का? तुम्ही आतल्या केबिनमध्ये या. कारण सगळा माल बाहेर काढून ठेवणं जरा जोखिमीचं असतं अन् आता तर तो पोरगा हेल्परही नाहीए मदतीला.’’
मुलगा कोल्ड्रिंक देऊन निघून गेला होता. आता दुकानात फक्त स्वाती अन् दुकानाचा मालक दोघंच होती. एक क्षणभर स्वातीला भीती स्पर्शून गेली. यापूर्वी इतकी एकटी ती कधीच कोणत्याही दुकानात नव्हती. दुकानदार आपला गैरफायदा घेईल का? तिला तसं काही नको होतं. थोडं लाडिक बोलणं, थोडा हाताबोटांवर स्पर्श एवढ्यावरच तिने डिस्काउंट मिळवले होते. आजही तसंच घडायला हवं होतं. पण तिच्या छातीत धडधडू लागलं. लवकर खरेदी करून बाहेर पडायला हवं. आतला आवाज सांगत होता. धाडस करून ती आतल्या केबिनमध्ये शिरली. आपण अगदी नॉर्मल आहोत हे दाखवण्यासाठी म्हणाली, ‘‘जिजाजी, आज काय झालंय? असे उदास का आहात?’’
‘‘छे:छे: तसं काहीच नाहीए.’’
‘‘काही तरी आहे नक्कीच! मला नाही सांगणार?’’
‘‘तुम्ही नेकलेस बघा…बघता बघता बोलता येईल.’’
स्वाती दिसायला सुंदर होती. खास मेकअप अन् दागिने यामुळे रूप अधिकच खुललं होतं. ज्वेलर एव्हाना चांगलाच विचलित झाला होता. त्याने एकदम धाडस दाखवत स्वातीच्या हाताला स्पर्श केला. स्वाती दचकली, पण, ठीक आहे, नुसत्या स्पर्शाने काय होतंय म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.
स्वातीच्या या वागण्याने दुकानदाराचं धाडस वाढलं. तो चेकाळलाच. त्याने तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढली.
स्वाती घाबरली, हात सोडवून घेत जरबेने म्हणाली, ‘‘हे काय करताय?’’
ज्वेलरने काही न बोलता पुन्हा तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. आता मात्र स्वाती घाबरली. त्याचं धाडस बघून चकित झाली. आतापर्यंत ती स्वत:च्या फायद्यासाठी पुरुषांना खेळवत होती. पण हा खेळ चांगलाच महागात पडत होता. तिने क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या हातातल्या पर्सचा दमका त्याच्या तोंडावर मारला. दुकानदार हेलपाटला. त्याच्या हातातून स्वातीचा हात सुटला. आता स्वातीने दोन्ही हातांनी त्याला थोबाडायला सुरूवात केली अन् त्याला धक्का दिला. पटकन् आपली पर्स उचलली. धावतच ती केबिनबाहेर अन् मग दुकानाबाहेर आली. आपल्या गाडीत बसली. संताप अन् अपमानाने चेहरा लाल झाला होता. शरीर थरथरत होतं. पटकन् कार स्टार्ट करून तिथून स्वाती निघाली ती सरळ घरीच आली. मनात विचारांचं थैमान होतं. स्वत:चाच राग येत होता. थोडक्यात अनर्थ टळला होता. काहीही वाईट घडू शकलं असतं.
इतकी वर्षं स्वाती ज्याला हलकाफुलका मजेदार खेळ समजत आली होती तो खेळ विस्तवाशीच होता, हे तिला कळलं होतं.