* निभा सिन्हा
वसुधाने ऑफिसमधून येताच पती रमेशला विचारले की, अतुल आता कसा आहे? आणि ती अतुलच्या खोलीत निघून गेली. तिने त्याच्या डोक्याला हात लावला, तेव्हा जाणवले की तो तापाने फणफणला आहे.
ती घाबरून ओरडली, ‘‘रमेश, याला तर खूप ताप आहे. डॉक्टरकडे न्यावे लागेल.’’
रमेश खोलीत येईपर्यंत वसुधाची नजर अतुलच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या औषधावर पडली, जे त्याला दुपारी द्यायचे होते.
ताप वाढण्याचे कारण वसुधाच्या लक्षात आले. तिने रमेशला विचारले, ‘‘तू अतुलला वेळेवर औषध दिले होतेस का?’’
‘‘मी वेळेवरच औषध आणले होते, पण तो झोपला होता. मी १-२ वेळा हाका मारल्या, परंतु त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही, तेव्हा मी औषध इथेच ठेवून निघून गेलो. मी विचार केला की तो उठेल, तेव्हा स्वत:हून घेईल. मला काय माहीत, त्याने औषध घेतले नसेल.’’
आधीच वैतागलेली वसुधा चिडून म्हणाली, ‘‘रमेश, औषध घेणे आणि घ्यायला लावणे यात फरक असतो. तुला काय माहीत म्हणा या गोष्टी. कधी मुलांची देखभाल करशील, तेव्हा कळेल ना.’’ मग तिने अतुलला २-३ बिस्किटे खायला घालून औषध दिले आणि त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवू लागली. अर्ध्या तासानंतर त्याचा ताप थोडा कमी झाला, त्यामुळे लगेच डॉक्टरकडे धावाधाव करण्याची गरज पडली नाही.
खरे म्हणजे, वसुधाचा १० वर्षांच्या मुलगा अतुलला ताप होता. तिच्या सुट्टया संपल्या होत्या, त्यामुळे रमेशला मुलाच्या देखभालीसाठी सुट्टी घ्यावी लागली होती. ऑफिसला निघण्यापूर्वी वसुधाने रमेशला पुन्हा-पुन्हा समजाविले होते की, अतुलला वेळेवर औषध दे, पण ज्या गोष्टीची भीती होती, तीच घडली.
७५ वर्षीय विमला गुप्ता हसत म्हणते, ‘‘ही कहाणी तर घराघरांतील आहे. मागच्या आठवडयातच मी माझ्या सुनेबरोबर शॉपिंग करायला गेले होते. तेव्हा दोन वर्षांच्या नातीला सांभाळण्याची जबाबदारी तिच्या आजोबांवर सोपविली होती. नातीला सांभाळण्याच्या नादात आजोबांनी ना वेळ पाहिली आणि ना ही घरातील आवश्यक गोष्टी लक्षात ठेवल्या. ते घराला सरळ कुलूप लावून नातीला सोबत घेऊन पार्कमध्ये निघून गेले. तेवढया वेळात मोलकरीण येऊन माघारी निघून गेली होती. आम्ही घरी परतलो, तेव्हा भरपूर खरकटया भांडयांबरोबरच आवरण्यासाठी किचन आमची वाट पाहत होते. त्यांनी एक काम केले. मात्र दुसरे बिघडवून ठेवले.’’
या गोष्टी वाचताना तुम्ही असा विचार तर करत नाहीए ना की, अरे इथे तर आपलेच रडगाणे सांगितले जातेय. हो, बहुतेक महिलांची ही तक्रार असते की पती किंवा घरातील एखाद्या पुरुष सदस्याला काही काम सांगितल्यास समस्या वाढतात. शेवटी असे का घडते की पुरुषांकडून केली जाणारी घरातील कामे बहुतेक महिलांना आवडत नाहीत. त्यांच्या कामात शिस्त नसते किंवा ते जाणीवपूर्वक ते काम अर्धवट सोडतात?
पुरुषांच्या पद्धती अन् प्रवृत्तीमध्ये भिन्नता
याबाबत अनुभवी असलेल्या विमला गुप्ताचे म्हणणे आहे की खरे तर स्त्री-पुरुषांच्या काम करण्याच्या प्रवृत्ती आणि पद्धतीमध्ये फरक असतो. बहुतेक पुरुषांना लहानपणापासून घरातील कामांपासून दूर ठेवले जाते, तर मुलींना घरातील कामे शिकविण्यावर भर दिला जातो. अशा वेळी पुरुषांना अशी कामे करण्याबाबत आत्मविश्वास नसतो आणि ते ऑफिसप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी कामे उरकण्याचा प्रयत्न करतात. खास करून घरसंसाराच्या कामांबाबत त्यांना जे सांगितले जाते, ते आपली डयुटी समजून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ते त्या कामाबाबत विशेष काळजी घेत नाहीत.
याउलट स्त्रिया स्वभावानेच काम करण्याबाबत अपेक्षेपेक्षा जास्त प्रामाणिक असतात. त्या केवळ कामच करीत नाहीत, तर त्याच्याशी संबंधित इतर अनेक गोष्टींबाबत जास्त जागरूक असतात.
बेफिकीर व आळशी
दूध गॅसवर ठेवून विसरून जाणे, दरवाजा उघडा ठेवणे, टीव्ही पाहता-पाहता झोपी जाणे, पाणी पिऊन फ्रिजमध्ये रिकामी बॉटल ठेवणे, सामान इकडे-तिकडे पसरवून ठेवणे, आणखीही अशा अनेक छोटया-मोठया गोष्टी असतात, त्या पाहून म्हटले जाते की पुरुष स्वभावानेच बेफिकीर, स्वतंत्र आणि निष्काळजी असतात. पण प्रत्यक्षात असे नाहीये की ते घरातील काम योग्य पद्धतीने करू शकत नाहीत.
तज्ज्ञांच्या मतानुसार, वास्तविकता ही आहे की, त्यांनी काही हालचाल न करताच सर्व काही मॅनेज होते. त्यामुळे ते आळशी बनतात आणि घरातील कामे करण्यास टाळाटाळ करू लागतात. एक महत्त्वपूर्ण सत्य हेही आहे की काही पुरुषांना घरातील कामे करणे कमीपणाचे वाटते. ते तासंतास एका जागी बसून टीव्हीवर रटाळ कार्यक्रम पाहू शकतात, पण घरातील कामे करत नाहीत.
दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण
ही गोष्ट अनेक पुरुषांनी मान्यही केलीय की, घर आणि ऑफिस मॅनेज करणे आपल्या आवाक्यातील गोष्ट नाही, पण महिला नोकरदार असो किंवा गृहिणी, आजच्या काळात त्यांचा एक पाय किचनमध्ये तर दुसरा बाहेर असतो. गृहिणी महिलांनाही घरातील कामांबरोबरच बँक, शाळा, वीज-पाण्याचे बिल भरणे, शॉपिंगसारखी बाहेरील कामे स्वत:लाच करावी लागतात. तर याच्या तुलनेत पती क्वचितच घरातील कामांत त्यांना मदत करतात. जर महिला नोकरदार असेल, तर कामाचा भार जरा जास्तच वाढतो. त्यांना आपल्या ऑफिसच्या कामांबरोबरच कौटुंबिक जबाबदाऱ्याही नेटकेपणाने पेलाव्या लागतात. महिलांना आपल्या घरच्या जबाबदाऱ्यांपासून कधीही मुक्त होता येत नाही. दुहेरी जबाबदाऱ्या पेलल्यामुळे नोकरदार असूनही त्या नेहमी घरसंसाराच्या रहाटगाडग्यात गुंतलेल्या असतात.
अनुभव अन् परिपक्वता
मीनल एक उच्च अधिकारी आहे. तिचे स्वत:चे रूटीन खूप व्यस्त असते. तरीही ती सांगते, ‘‘सकाळचा वेळ कसा पळतो हे तर विचारूच नका. तुम्ही कितीही उच्च पदावर कार्यरत असाल, पण घरातील सदस्य आपणाकडून मुलगी, पत्नी, सून आणि आईच्या रूपात अपेक्षा ठेवतातच. याउलट पुरुषांकडून कमी अपेक्षा ठेवल्या जातात. अशा वेळी मग नाइलाज गरज म्हणून म्हणा किंवा महिलांना मल्टिटास्कर बनावेच लागते. अर्थात, एका वेळी अनेक कामे करणे उदा. एका बाजूला दूध उकळतेय, तर दुसऱ्या बाजूला वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतले जात आहेत, मुलांचा होमवर्क घेतला जात आहे, तर त्याच वेळी पतीची चहाची फर्माइश पूर्ण केली जात आहे. ही कामे करुनच महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक अनुभवी आणि परिपक्व होतात.’’
एका संशोधनानुसार, स्त्रियांचा मेंदू पुरुषांपेक्षा जास्त सक्रिय असतो, त्यामुळे त्या एका वेळी अनेक कामे पूर्ण करू शकतात.
जॉर्जिया आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या एका स्टडी रिपोर्टनुसार, महिला जास्त अलर्ट, फ्लेझिबल आणि ऑर्गनाइज्ड असतात. त्या चांगल्या लर्नर असतात. अशा प्रकारचे संदर्भ देऊन ही गोष्ट सिद्ध केली जाऊ शकते की पुरुषांमध्ये घरातील जबाबदाऱ्या निभाविण्याची क्षमता स्त्रियांपेक्षा कमी असते.
आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आधुनिक काळात पत्नी जर नोकरी करून पतीला त्याच्या बरोबरीने आर्थिक मदत करते, तर पुरुषांचीही जबाबदारी बनते की त्यांनीही घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात स्त्रीला तिच्या बरोबरीने स्वत:ला घराप्रती जागरूक व निपुण सिद्ध करावे.