* श्रेया कत्याल, आहारतज्ज्ञ

अनेकदा कुणी आपल्या वाढत्या वजनामुळे तर कुणी कृश असल्यामुळे त्रासलेले असतात. कारण आपला आहार कसा असावा हेच त्यांना समजत नसते. जर तुम्हीही यामुळे त्रासले असाल तर काळजी करू नका. यासंदर्भात आहारतज्ज्ञ श्रेया कत्यालशी साधलेला संवाद…

आहार म्हणजे काय?

आहार म्हणजे असे परिपूर्ण खाणे ज्यात सर्व पोषक तत्वे असतात.

चांगले आणि वाईट अन्न म्हणजे काय?

अन्न चांगले किंवा वाईट नसते. आपण कसे, कधी, काय आणि किती खातो यावर ते चांगले की वाईट हे ठरते. म्हणून माणसाने सर्व काही खायला हवे, परंतु कमी प्रमाणात. खाण्यापिण्याची इच्छा मारणे शरीराशी प्रतारणा करण्यासारखे आहे.

योग्य पद्धतीचा अवलंब करून एका महिन्यात किती वजन कमी करता येते?

हे व्यक्तिनुरूप अवलंबून असते. योग्य पद्धतीने एका महिन्यात कमीतकमी सुमारे ३-४ किलोग्रॅमपर्यंत (दर आठवडयाला १ किलोग्रॅम) तर जास्तीत जास्त ८ किलोग्रॅमपर्यंत वजन कमी करता येते. वजन कमी करण्यासोबतच जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते.

पथ्याच्या आहारशैलीत बदल केल्यानंतर वजन पुन्हा वाढते का?

योग्य प्रकारे वजन नियंत्रणात आणल्यानंतर ते आहारात बदल केला तरीही नियंत्रणात राहते. परंतु वजन नियंत्रणात तेव्हाच राहू शकते, जेव्हा जीवनशैलीत बदल करणे हे तुमचे ध्येय असेल. त्यामुळेच एकदा का तुम्ही आहार नियंत्रणासोबत सकारात्मकपणे जीवनशैलीतही परिवर्तन करता, तेव्हा आहारशैलीतील बदलांचे पालन न करताही तुम्ही आहात तसेच राहू शकता.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही विशिष्ट प्रकारचा आहार, औषधे वगैरे घेण्याचा सल्ला देता का?

वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आहार, औषधे किंवा कुठल्याही कृत्रिम पद्धतीवर मी विश्वास ठेवत नाही. कारण भविष्यात याचे दुष्परिणाम समोर येतात.

रक्तगटानुसार आहारशैलीत बदल करणे किती परिणामक ठरते आणि तुम्ही कशाप्रकारची आहार योजना तयार करता?

‘अ’ रक्तगटावर आधारित आहारशैली एका मर्यादेपर्यंतच उपयोगी ठरते. ती १०० टक्के परिणामकारक नसते. ती प्रभावी असून तिचे सकारात्मक परिणामही दिसून येतात, परंतु ती सर्वांसाठीच पूर्णपणे लागू करता येत नाही. लोकांसाठी आहार योजना तयार करताना मी त्यांचा रक्तगट लक्षात ठेवते, पण आहार योजना पूर्णपणे रक्तगटावर आधारित नसते. व्यक्तिची आवडनिवड, प्राथमिकता, दिनक्रम, जीवनशैली इत्यादी आहार योजना तयार करताना महत्वाची भूमिका बजावतात.

सर्वसाधारणपणे असा समज आहे की पथ्याच्या आहारशैलीनंतर त्वचा निस्तेज होते. यात कितपत तथ्य आहे?

आहार योजनेचे पालन केवळ अतिरिक्त कॅलरीजना संपवण्यासाठी केले जात नाही तर तुमचे आरोग्य अधिक चांगले बनविण्यासाठी केले जाते. सुदृढ स्वास्थ्यासाठी पोषक तत्वांचा योग्य आहार घेणे सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण दिवसभरात ५-६ वेळा काय खायचे याची योजना तयार केली जाते जेणेकरून तुमची चयापचय प्रक्रिया सुधारून तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल. त्यासाठी निरुपयोगी घटकांना दूर करून आहारात पौष्टिक घटकद्रव्यांचा समावेश करण्यात येतो.

वजन कमी करण्यासाठी मिठाई खाणे बंद केले पाहिजे का?

ज्यांना मिठाई आवडते अशांसाठी माझे उत्तर नाही असे आहे. एका निश्चित कालावधीसाठी आपण आहार योजनेचे पालन करू शकतो, पण कायमस्वरूपी आपल्या आवडीचे पदार्थ खाणे बंद करू शकत नाही. म्हणूनच तुम्हाला जे आवडते ते खा, परंतु योग्य प्रमाणात व योग्य वेळी खा. एका वेळचे जेवण समजून मिठाई खाऊ नका तर जेवण झाल्यावर ती खा.

रात्रीचे जेवण आठ वाजण्यापूर्वी करायला हवे किंवा मग अळणी जेवण जेवायला हवे का?

तुम्ही जितके वजन कमी केले आहे ते अळणी जेवल्यामुळे कायमचे तसेच राहील असे मुळीच नाही. त्यामुळेच मी रात्रीचे जेवण नेहमीच अळणी असावे, असा सल्ला देणार नाही. शिवाय रात्री आठपूर्वी जेवणे किंवा अळणी जेवण हा नियम कुठलीच व्यक्ती फार काळापर्यंत पाळू शकत नाही. त्यामुळे मी असा कुठलाच सल्ला देत नाही, जो दीर्घकाळ पाळणे शक्य नाही. म्हणूनच रात्रीचे जेवण योग्य वेळी करा, जेणेकरून जेवण व झोपणे यात कमीतकमी २ तासांचे अंतर राहील.

आहार योजनेसोबतच व्यायामही गरजेचा आहे का?

वजन कमी करण्यासाठी ७० टक्के आहार आणि ३० टक्के व्यायाम महत्त्वाचा आहे असे मानले जाते. याशिवाय वजन कमी करण्याच्या प्रयत्नांदरम्यान जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते आणि त्यासाठीच काही बेसिक व्यायाम करणेही आवश्यक आहे, कारण आजकाल बहुतांश लोकांची जीवनशैली श्रमहीन झाली आहे. व्यायाम आपली पचनप्रक्रिया उत्तम राखतो, तसेच वजन कमी करण्याच्या प्रक्रियेलाही गती निर्माण करून देतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...