* प्राची भारद्वाज

आजकाल फ्जुजन वेअरची बरीच चलती आहे. फ्युजन वेअर म्हणजे दोन भिन्न संस्कृतींचा मेळ घालत तयार केलेला पोशाख. जसे की भारतीय पोशाख आणि विदेशी कपडयांचा सुंदर मिलाफ. म्हणजे असे समजा की विदेशी गाऊनवर भारतीय भरतकाम किंवा काचांचे काम अथवा ट्यूब टॉपसोबत राजस्थानी घागरा. फ्युजन पोशाखाने भारतीय फॅशनच्या दुनियेत नवी खळबळ उडवली आहे. नेहमीच नवे क्रिएटिव्ह पेहराव समोर येत आहेत.

ऐका फॅशनच्या दुनियेतील गुरू काय सांगतात

अमित पांचाळ, श्रीबालाजी एथ्निसिटी रिटेलचे डायरेक्टर सांगतात की महिला पारंपरिक पोशाखांकडून फ्युजन वेअरच्या दिशेने वेगाने जात आहेत. जास्तीतजास्त २२ ते २३ वर्षांपर्यंतच्या तरुणी अशाप्रकारची फॅशन करण्यात पुढे असतात. अशा पोशाखांच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहे तो साडीसोबत ऑफशोल्डर ब्लाऊज, धोती पॅण्टसह क्रॉपटॉप किंवा मग घागरा अथवा साडीसोबत जॅकेट.

‘स्टुडिओ बाई जनक’च्या डायरेक्टर वैंडी मेहरा सांगतात की फ्युजन वेअर हे फॅशन करू इच्छिणाऱ्यांसोबतच आजच्या महिला ज्यांना फॅशनसोबतच आरामदायी पोशाख आवडतो त्यांच्यासाठीही आहे.

आपलीशी करा नवी फॅशन

काही फ्युजन वेअर जे तुम्हीही परिधान करू शकता :

* घागऱ्यावर पारंपरिक चोळी घालण्याऐवजी तुम्ही फॉर्मल शर्ट घालू शकता. याच्यासोबत ऑक्सिडाईज्ड दागिने शोभून दिसतात. घागऱ्यासोबत टँक टॉप किंवा हॉल्टर नेक टॉपही एक चांगला पर्याय आहे. हा आता पारंपरिक घागरा चोळीचा पर्याय ठरत आहे.

* जंपसूटची खूपच फॅशन आहे. या विदेशी पोशाखाला देशी तडका देण्यासाठी तो सुती कपडयात तयार केला जाऊ शकतो. याशिवाय या पोशाखाला एखाद्या पंजाबी ड्रेससारखे परिधान करून सोबत रंगीत दुपट्टा घेऊन तो आणखी खुलवता येईल. याच्यासोबत दागिने असतील तर आणखीनच चांगले.

* कुर्ता ड्रेस हे नवे फ्युजन आहे. लांब कुर्ता मॅक्सीसारखा घाला किंवा अनारकली कुर्ता चुडीदार सलवारशिवाय घाला. ऑप्शन म्हणून पाश्चिमात्य गाऊनवर विविध प्रकारचे भारतीय भरतकामही करता येऊ शकते.

* धोती पँटची स्टाईल ही लैगिंग किंवा मिनी स्कर्टलाही मात देऊ शकते. हा सेक्सी पोशाख तेव्हा जास्तच खुलून दिसतो जेव्हा तो क्रॉप टॉपसोबत परिधान केला जातो.

* फ्युजन साडीने फॅशनच्या दुनियेत खळबळ माजवली आहे. बॉलिवूड सौंदर्यवतींसह सर्वसामान्य महिलाही पारंपरिक साडीसोबत नवे प्रयोग करू लागल्या आहेत. आजकाल रफल साडीचा सर्वत्र बोलबाला आहे.

* ब्लाऊजच्या विविध डिझाईनबाबत तर विचारूच नका. बॅकलेस ही तर कालची गोष्ट झाली. बदलत्या जगात ब्लाऊजचे नवे नवे कट जसे की काही जॅकेटसारखे तर काही कोटस्टाइल, काहींमध्ये पुढून कट तर काही मागून लांब गळयाचे अशा ब्लाऊजची चलती आहे. क्रिएटिव्हिटीची येथे अजिबात कमतरता नाही.

फ्युजनचा प्रभाव केवळ भारतातच पाहायला मिळतो असे नाही तर विदेशातील फॅशन डिझायनरवरही भारतीय पेहराव भूरळ घालत आहेत. ब्रिटन डिझायनर जॉन गॅलियानो सिल्क साडीवर छोटे जॅकेट घालून पाहायला मिळतात तर प्रसिद्ध मॉडेल नाओमी कँपबेल, न्यूयॉर्कमध्ये एमटीव्ही, म्युझिक अवॉर्डवेळी साडी नेसून आली होती.

पारंपरिक पोशाखात ऑफशोल्डर ब्लाऊज, पोंचू स्टाईलचा टॉप किंवा मग एकाच बाजूचा कुर्ता असे फ्युजन वेअरचे काही प्रचलित ट्रेंड आहेत. फ्युजन वेअरवर केवळ महिलांचा अधिकार आहे असे मुळीच नाही. पुरुषही आता जीन्सवर कुर्ता घालू लागले आहेत.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...