* निधि निगम
व्हॉट्सअपवर या विवाहविषयक विनोदाची खूपच चर्चा झाली, ‘‘जे लोक घाईघाईत कुठलाही विचार न करता विवाह करण्याचा निर्णय घेतात, ते आपल्या आयुष्याचा सर्वनाश करून घेतात. पण जे लोक खूप विचारपूर्वक निर्णय घेऊन विवाह करतात ते काय करून घेतात?’’
खरं आहे, गमतीगमतीमध्ये या विनोदाने विवाहसंबंधीचे सत्य उघड केले आहे. विवाह एक जुगारच तर आहे. तुमची निवड योग्य असेल तरी किंवा नसेल तरी. त्यामुळे विवाहाच्या बेडीत अडकण्याचा विचार करत असाल, ७ वचने देणार असाल तर जरा या गोष्टींकडेही लक्ष द्या. ज्या विवाहानंतर होणाऱ्या बदलांसंबंधी आहेत आणि तुमचे आईवडिल, मित्रमंडळी, शुभचिंतक कोणीच याबद्दल तुम्हाला सांगणार नाहीत आणि जरी विवाहाच्या लाडूची चव तुम्ही चाखून मोकळे झाला असाल असेल तरीही हे वाचा म्हणजे तुमच्या नात्यात काय चुकीचं आहे. दोघांमधील कोण चुकतं म्हणून सतत वादविवाद होतात याप्रकारचे विचार करणे तुम्ही बंद कराल.
शांत व्हा, हे सर्व स्वाभाविक आहे.विवाहानंतरची अपरिहार्य व आदर्श पायरी आहे ही :
विवाह प्रत्येक समस्येचे समाधान नाही
भारतीय समाजात विवाहाबद्दल असे काही समज पसरवलेले आहेत की आपला विश्वासच बसतो की विवाह हा प्रत्येक समस्येवरील रामबाण उपाय आहे. विवाहानंतर सर्व काही आपोआप व्यवस्थित होईल. मग फार विचार करण्याची गरजच नाही. नववधू असणारी मुलगी ही खात्री बाळगून असते की विवाहानंतर तिचे आयुष्य स्वर्ग बनणार आहे. चांदीसारखे दिवस व सोन्यासारख्या रात्री असतील. तिच्या स्वप्नातील राजकुमार तिला राणीसारखी वागणूक देईल. नि:संशय काही प्रमाणात असे होतेसुद्धा. आयुष्य आनंदी होते, बदलते. पण विवाह म्हणजे अशी अपेक्षा बाळगू नका की तुमच्या जीवनातील प्रत्येक कमतरता यामुळे भरून निघेल, कारण विवाहानंतर तुम्हाला फक्त एक पती मिळतो, अल्लाऊद्दीनचा दिवा नाही.
शरीर दोन प्राण एक
हे बोलणे, ऐकणे, सांगणे, गुणगुणणे खूपच रोमॅन्टीक, सुंदर आणि खरे वाटते. पण वास्तविक एक यशस्वी विवाह तो असतो जिथे दोन वेगवेगळी व्यक्तिमत्त्व आपलं नातं जीवंत व यशस्वी बनवण्यासाठी एकत्रित, सातत्याने समान तऱ्हेने प्रयत्न करत असतात. एकमेकांच्या अवतीभवती घुटमळत राहाणं आणि विवाहानंतर आपलं आयुष्य हे म्हणत घालवणे की ‘तेरे नाम पे शुरू तेरे नाम पर खत्म’ हा एक कंटाळवाणा व जुनाट प्रकार आहे, वैवाहिक जीवन जगण्याचा.
कायम आकर्षक भासणार नाही जोडीदार
विवाहानंतर एक वेळ अशी पण येते, जेव्हा तुम्ही मानसिक, भावनिक दृष्ट्या एकमेकांशी जोडलेले असाल, एकमेकांप्रति प्रामाणिक असाल, पण असे होऊ शकते की इतके असूनही तुम्हा दोघांमध्ये शारीरिक आकर्षणच उरणार नाही. म्हणजे आधी जो पति तुम्हाला हृतिक रोशनसारखा डॅशिंग वाटायचा, ज्याच्या शरीरावरून तुमची नजर हटत नसे, पण आता तोच तुमच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला नाही. याची दोन कारणे असू शकतात. पहिले शारीरिक बदल जसे की वजन वाढणे, कारण तुम्हीही मान्य कराल की पतीच्या हृदयाचा रस्ता त्यांच्या पोटातून जातो आणि तुम्ही हाच रस्ता पकडून त्यांना फुगा बनवून ठेवले आहे आणि दुसरे म्हणजे मानसिक बदल. म्हणतात ना, ‘घर की मुर्गी दाल बराबर’ म्हणून रोजच त्यांना पाहून काही विशेष जाणीव आता होत नाही. असो, कारण काही असो, पण असे झाल्यास घाबरू नका, तुम्हाला जोडीदाराविषयी आकर्षण वाटत नाही याचा अर्थ असा नाही की तुमचे प्रेम संपले आहे. लग्नानंतर ओघाने येणारी ही तात्पुरती फेज आहे, जी निघून जाते.
प्रेमात हरवून राहण्याच्या पायरीची समाप्ती
हनिमून फेज म्हणजेच हॅप्पीली एवरआफ्टर किंवा लव फॉरेव्हर. पण या भावना कायमस्वरूपी नसतात आणि कित्येकदा तर विवाहानंतर अशीही वेळ येते की जेव्हा प्रेम जाणवणं तर दूरच पण आपण चक्क विचार करतो की या माणसाशी का विवाह केला मी, याच्यात काय विशेष पाहिलं मी?
तुमच्याही सोबत असं होऊ शकतं. पण शांत व्हा. प्रत्येक विवाहित दाम्पत्य कधी ना कधी या चक्रातून जातंय. तुम्हीही जाल. पण मग जसजसा काळ सरेल, एकमेकांना व्यवस्थित ओळखल्यानंतर तुमच्या वैवाहिक आयुष्यात सुंदर कागदी फुलांच्या जागी वास्तवातील ओबडधोबड जमिनीवर खऱ्या प्रेमाची फुले फुलतील, ज्याचा सुवास तुमचे आयुष्य सुगंधित करेल.
कधी कधी जोडीदाराची चिड येणे, तिरस्कार वाटू लागणे
इथे आपण तिरस्कार हा शब्द शब्दश: वापरत नाही आहोत. पण हो, अशी एक वेळ येते की आपण त्या गोष्टींवरूनच आपल्या जोडीदारावर चिडू लागतो, ज्यांच्या एकेकाळी प्रेमात पडून आपण जोडीदाराची निवड केलेली असते किंवा असे म्हणू शकतो की त्यांचे गुणच तुम्हाला नंतर अवगुण वाटू लागतात. जसं की त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर, त्यांचा हजरजबाबीपणा किंवा सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असणं किंवा किक्रेट, फुटबॉल याची प्रचंड आवड.
मात्र तुम्ही त्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा जोडीदार जसा आहे तसंच त्याला आपलंसं करा. शेवटी ही तीच व्यक्ती आहे, जिच्यावर तुम्ही मनापासून प्रेम केले आहे.
तुमच्या जोडीदाराशी कसे वागाल?
तुम्ही तुमच्या पतीकडून अशी अपेक्षा करता की त्यांनी तुमच्याशी रोमँटिक हिरोप्रमाणे वागावं, जसं की कधीही फक्त प्रेमानेच बोलावं, लाल गुलाबाची फुलं द्यावी किंवा रात्री उशिरा सरप्राइज प्लान करावं.
पण एक सत्य हे ही आहे की नातेसंबंधांतील प्रेम तुम्ही टिकवू इच्छित असाल तर तुमच्या पतिला अशी वागणूक द्या, जी तुम्हाला अपेक्षित आहे. त्यांच्यासाठी कॅन्डल लाईट डिनर अॅरेंज करा, जो तुम्हालाही आवडतो. रोज गुडमॉर्निंग किस करा, जो तुम्हाला अपेक्षित आहे. एकदा त्यांना याची सवय होऊ द्या. मग पहा, नंतर आपोआपच तुम्हाला तशी वागणूक मिळू लागेल.
विवाह नेहमीच आनंदाने ओतप्रोत नसतात
हे समजून, उमजून घेणे व स्विकारणे आवश्यक आहे आणि हेसुद्धा की जसजसा काळ सरेल कायम नवनवीन मुद्दा तुमच्यासमोर येऊन उभा ठाकेल, ज्यावर तुमचं एकमत होणार नाही. पण हे सारे सावरून घ्यायला तुम्ही शिकलं पाहिजे. असं अनेकदा होईल की जोडीदाराचं वागणं, बोलणं तुम्हाला खटकेल. आपलीच मर्जी चालवण्याच्या त्यांच्या सवयीचा तुम्हाला राग येऊ लागेल. पण काही झाले तरी तुम्ही धीराने वागलं पाहिजे. थोडा अवधी घ्या आणि त्यांनाही द्या. आपला इगो मधे येऊन देऊ नका. समस्या कशीही असो, सुटेल.
मोडणारा संसार एक मुल वाचवू शकत नाही
खरं तर हे आहे की एका अवघड काळातून वाट काढणाऱ्या दाम्पत्यामध्ये एका लहानग्याची उपस्थिती तणाव अजून वाढवते. जर तुम्हाला आपल्या थोरामोठ्यांकडून अनुभवांच्या जोरावर असा सोनेरी सल्ला मिळत असेल की एखादे मुल होऊ दे आणि मग बघ कसे सगळे सुरळीत होईल तर असा सल्ला अजिबात ऐकू नका. कारण हा समस्येवरील उपाय नाही. उलट समस्या निर्माण करण्यासाठी उचललेले पाऊल म्हणता येईल. एक मूल या जगात आणणं ही खूप मोठी जबाबदारी असते. हा निर्णय तेव्हाच घेतला गेला पाहिजे, जेव्हा तुम्ही दोघेही त्याचे संगोपन करण्यास पूर्णपणे तयार असाल.
सत्य हेच आहे की विवाह कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. उलट हे स्वत:च एक कोडं आहे आणि ते तेव्हाच सुटते जेव्हा दोघेही आपापल्या अहंकाराचा व स्वार्थाचा त्याग करून एकरूप होतात.