* प्रतिनिधी

पक्षाघात म्हणजेच ब्रेन स्ट्रोक हा मेंदूच्या आघात किंवा मेंदूच्या कोणत्याही भागात रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होतो. मेंदूत ऑक्सिजन आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्यांदरम्यान रक्त जमते आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, ज्यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात व मेंदू स्वत:चे नियंत्रण गमावतो. याला स्ट्रोक किंवा पक्षाघात म्हणतात. यावर वेळेवर उपचार न केल्यास मेंदू कायमचा खराब होतो. त्या व्यक्तिचा मृत्यूही होऊ शकतो.

आज जगातील सुमारे ८० दशलक्ष लोकांना स्ट्रोकचा त्रास आहे, ५० दशलक्षाहूनही अधिक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मते, ब्रेन स्ट्रोकचे २५ टक्के रुग्ण ४० वर्षांचे आहेत. हे लक्षात घेऊन ‘वर्ल्ड स्ट्रोक डे’ दरवर्षी २९ ऑक्टोबरला साजरा केला जातो, ज्याचा उद्देश स्ट्रोक प्रतिबंध, उपचार आणि सहकार्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे.

मुंबईतील अपॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ मेंदू रोग तज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. मोहिनीश भटजीवाले सांगतात की ब्रेन स्ट्रोक हे जगभरात मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण मानले जाते. एकटया भारतातच दर मिनिटाला ६ लोकांचा यामुळे मृत्यू होत आहे, कारण ब्रेन स्ट्रोकसारख्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितित त्याची लक्षणे, कारणे, प्रतिबंध आणि त्वरित उपाययोजनांबाबत जनजागृतीचा मोठा अभाव आहे. प्रत्यक्षात ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळाल्यास ते बरे होण्याची शक्यता ५० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढते.

प्रमुख कारण

डॉ. भटजीवाले यांच्या म्हणण्यानुसार आजच्या धकाधकीच्या युगात मानसिक तणाव, जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी ब्रेन स्ट्रोकसाठी कारणीभूत आहे. याशिवाय आरामदायक आणि सतत काम करण्याची पद्धतही मेंदू आणि हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देत आहे. याच कारणांमुळे तरुणांमध्ये हा आजार झपाटयाने पसरत आहे.

या सर्व कारणांशिवाय ८० टक्के लोकांना माहिती नसलेले कारण म्हणजे वातावरण आणि हवामानातील असामान्य बदल, जे आपली त्वचा आणि मेंदूवर विपरीत परिणाम करतात. याचे परिणाम आगामी काळात घातक ठरू शकतात. यास प्रामुख्याने वृक्षतोड जबाबदार आहे.’’

मीरा रोडच्या वोकार्ड हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिद्धार्थ खारकर यांच्या मते, ‘‘सर्वसामान्यपणे ब्रेन स्ट्रोककडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्यक्षात प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ति जीवनात कधी ना कधी याच्या विळख्यात अडकते. हिवाळयात याचा धोका अधिक वाढतो. हार्ट अटॅक, कॅन्सर आणि डायबिटीससारख्या आजारांकडे जितके गांभीर्याने पाहिले जाते, तितक्या गांभीर्याने ब्रेन स्ट्रोककडे पाहिले जात नाही. टाईप २ डायबिटीसच्या रुग्णांसाठी याचा धोका अधिक असतो. हाय ब्लडप्रेशर आणि हायपरटेंशनचे रुग्णही याच्या विळख्यात लवकर अडकतात. गर्भ निरोधक गोळयांचे सेवन आणि कोलेस्ट्रॉलचा वाढलेला स्तरही ब्रेन स्ट्रोकला निमंत्रण देतो.

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे

मेंदूचे कार्य संपूर्ण शरीरात फार महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत जर शरीराच्या इतर आजारांकडे दुर्लक्ष केले तर ते आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम करतात. तोंड, हात व पाय दुखणे, चक्कर येणे, डोकेदुखी, दृष्टी अंधुक होणे, बोलताना व चालताना समस्या, पाठदुखी इत्यादी ब्रेन स्ट्रोकची मुख्य लक्षणे आहेत. स्ट्रोक नॉन ब्लीडिंग आणि ब्लीडिंग अशा दोन्ही प्रकारचा असतो. ज्यात मेंदूत मज्जातंतू फुगतात किंवा रक्तवाहिन्या फुटतात.

स्ट्रोकच्या प्रकारानुसार उपचार

डॉ. भटजीवाले यांच्या म्हणण्यानुसार ब्रेन स्ट्रोकवर त्वरित उपचार करणे फार महत्त्वाचे आहे. उपचार स्ट्रोक सुरू होण्याच्या ३-४ तासांच्या आत केला गेला तर मेंदूचे नुकसान आणि संभाव्य त्रास कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, ३ तासांच्या आत क्लॉट बस्टिंग औषध देणे आवश्यक असते. यानंतर, डॉक्टरांकडून संपूर्ण तपासणी जसे की, सिटीस्कॅन, एमआरआय इत्यादी केल्यानंतर स्ट्रोकसाठी उपचार सुरू केले जातात, ज्याचा हेतू मेंदूचे नुकसान टाळणे हा असतो.

जर स्ट्रोक मेंदूत रक्त पुरवठयात अडथळा निर्माण झाल्यामुळे आला असेल तर त्याचे उपचार खालीलप्रमाणे आहेत :

* नॉन ब्लीडिंग ब्रेन स्ट्रोक झाल्याच्या तीन तासांच्या आत क्लॉट बस्टिंग औषधाचे इंजेक्शन देणे फार महत्वाचे आहे. सोबतच रक्त गोठू नये म्हणून ते पातळ करण्याचे औषधही दिले जाते. याशिवाय शस्त्रक्रियादेखील केली जाते, ज्यामध्ये मानेच्या अरूंद रक्तवाहिन्या उघडल्या जातात.

* ब्लीडिंगमुळे ब्रेन स्ट्रोक असल्यास, असे औषध दिले जाते जे सामान्यपणे ब्लड कोटिंग कायम ठेवण्यास मदत करते. मेंदूमधून रक्त काढून टाकण्यासाठी किंवा दबाव कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. खराब झालेल्या रक्तवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. ब्लीडिंग रोखण्यासाठी कॉईल म्हणजेच तार वापरली जाते. मेंदूतील सूज रोखण्यासाठी किंवा टाळण्यासाठी औषध दिले जाते. याव्यतिरिक्त, मेंदूच्या रिक्त भागात ट्यूब घालून दाब कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

अफेसिया होण्याचा धोका

स्ट्रोकनंतर रुग्णाला शारीरिक आणि मानसिक अपंगत्व येण्याची अधिक शक्यता असते, जी स्ट्रोकमुळे प्रभावित झालेल्या भागावर आणि आकारावर अवलंबून असते. नॅशनल अफेसिया असोसिएशनच्या अहवालानुसार, ब्रेन स्ट्रोकच्या २५ ते ४०टक्के रुग्णांना अफेसिया होण्याची शक्यता असते. ही अशी स्थिती आहे जी रूग्णांच्या बोलण्याची, लिहिण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता प्रभावित करते, ज्याला ‘भाषा डिसऑर्डर’ देखील म्हटले जाते. हा आजार ब्रेन ट्यूमर, ब्रेन इन्फेक्शन, अल्झायमर इत्यादीमुळे होतो. बऱ्याच बाबतीत अफेसियाला अपस्मार आणि इतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची लक्षणं म्हणूनही पाहिले जाते.

पुनर्वसन ठरते उपयुक्त

ब्रेन स्ट्रोकमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन बऱ्याच प्रमाणात मदत करते. जरी काही रुग्ण पूर्णपणे ठीक होऊ शकत नसले तरी रिहॅबिलिटेशनमुळे बऱ्याच रुग्णांचे आरोग्य सुधारते. मृत त्वचेच्या पेशी, मज्जातंतूंच्या पेशी दुरुस्त किंवा बदलल्या जाऊ शकत नाहीत, परंतु मानवी मेंदू लवचिक असतो. यामुळे रुग्ण नुकसान न झालेल्या मेंदूच्या पेशींचा वापर करण्याचा नवा मार्ग शिकू शकतो. योग्य काळजी, सोबत आणि प्रोत्साहन देऊन अशा रुग्णांचे जीवन सार्थकी लावता येऊ शकते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...