* श्रीमती प्रतिभा अग्निहोत्री
उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या जवळ असलेल्या ५२ कुंडांत वर्षातून दोनदा सोमवती अमावस्या आणि शनिचरी अमावस्या यादिवशी खूप गर्दी असते. इथे अशी अंधश्रद्धा आहे की इथे स्नान केल्याने भूतप्रेत, हडळ, पिशाच या बाधांचा नाश होतो.
१७ मार्च, २०१८ रोजी शनिचरी अमावस्येची मी प्रत्यक्षदर्शी होते. मी इथे फार विचित्र घटना घडताना पाहिल्या. सादर आहे त्यावरचा हा रिपोर्ट.
दृश्य १
एका २५ वर्षीय नवयुवतीला तिचे कुटुंबीय जबरदस्तीने पाण्यात बुडी घ्यायला भाग पाडत होते. त्यांच्यासोबत असलेला तांत्रिक त्यांना मार्गदर्शन करत होता पण ती युवती जोरजोरात ओरडत होती, ‘‘मला सोडा, मी या पाण्यात स्नान करणार नाही. किती घाणेरडा वास येतोय पहा या पाण्यातून. मला काहीही झालेले नाही. मी आजारी आहे… काही भूतप्रेत वगैरे नाही… प्लीज मला सोडा.’’
त्या नवयुवतीचे बोल ऐकून त्यांच्यासोबत आलेला पंडित म्हणाला, ‘‘फारच जबरदस्त आणि वयस्कर हडळीचा हिच्यावर प्रभाव आहे, जराही कमजोर पडू नका. स्नान करायला लावा. त्यानंतर मी सर्वकाही ठीक करीन.’’
पंडिताच्या सांगण्यावरून घरातील मंडळी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बुडी मारायला भाग पाडण्यात व्यस्त झाले आणि तांत्रिक आपल्या तंत्रमंत्राच्या पूजेत व्यस्त झाला. घरातील मंडळी दानदक्षिणा तयार करू लागले.
दृश्य २
एका ३० वर्षीय महिलेला तिच्या घरातले लोक महागडया गाडीतून घेऊन येतात. हसतमुख, सर्वसामान्य दिसणाऱ्या त्या महिलेकडे पाहून कोणाला वाटणारही नाही की तिला काही त्रास असेल. परंतु जशी तिने कुंडात बुडी घेतली आणि पाण्यातून बाहेर आली, तेव्हा तिचे संपूर्ण केस मोकळे होते आणि मग ती जोरजोरात ओरडायला लागली.
तिच्याबरोबर आलेला तांत्रिक मोठमोठया मोत्यांच्या माळा परिधान केलेल्या त्या महिलेच्या तोंडावर काळा कपडा टाकून मंत्र म्हणत त्या महिलेचे केस पकडून मोठया आवाजात तिला विचारतो,
‘‘बोल, कोण आहेस तू? का त्रास देत आहेस?’’
‘‘मी याची शेजारीण आहे, जिचा मृत्यू २ वर्षांपूर्वी झाला होता,’’ महिलेच्या आतील भूत उत्तर देते.
‘‘बोल तू का त्रास देत आहेस?’’
‘‘आता त्रास देणार नाही पण मला वचन हवे.’’
‘‘बोल काय?’’
‘‘सासरची माणसे मला चक्की चालवायला लावणार नाहीत, मला शेतावर पिकाची कापणी करायला पाठवणार नाहीत, नवरा माझ्यावर हात उगारणार नाही.’’
‘‘होहो, आम्हाला सर्व गोष्टी मंजूर आहेत. तू फक्त हिचा पिच्छा सोड,’’ सासरची माणसे हात जोडून घाबरलेल्या स्वरात उत्तर देतात.
‘‘बस, यापुढे मी त्रास देणार नाही.’’
यानंतर काही वेळातच ती महिला एका सर्वसामान्य महिलेसारखी वागूबोलू लागते. तांत्रिक आपली तगडी फी वसूल करून तिथून निघून जातो.
दृश्य ३
एका ३५ वर्षीय युवकाला घेऊन काही पुरुष आलेले असतात. त्याला पकडून जबरदस्ती कुंडात बुडी घ्यायला लावत असतात. जसा तो युवक कुंडातून बाहेर येतो जोरजोरात आरडाओरडा आणि विचित्र आवाज काढायला लागतो. तांत्रिक जवळच शेणी जाळून मंत्रोच्चार करत काही गोष्टी आगीत टाकत असतो. युवक तांत्रिकावरच हमला करण्यास सज्ज झालेला असतो. तेव्हा तांत्रिक त्याच्या पाठीवर दांडयाने ३-४ वेळा प्रहार करतो आणि मानगूट पकडून म्हणतो, ‘‘बोल, आता याला त्रास देशील?’’
‘‘मला सोडा. मी आता काहीही करणार नाही.’’
तांत्रिक त्याला सोडून देतो आणि तो युवक हार मानून बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो.
तांत्रिक युवकाच्या कुटुंबीयांना सांगतो, ‘‘तुम्ही एकदम निश्चिंत होऊन घरी जा.’’
हिंदू पाखंडयांचा खुला खेळ
ही तिन्ही दृश्ये सर्वसामान्य जनतेत पसरलेल्या अंधश्रद्धेची साक्षात उदाहरणे आहेत. कशाप्रकारे आम्ही भारतीय काल्पनिक,अविश्वसनीय समजुती आणि कल्पनांवर विश्वास ठेवतो. तांत्रिक आणि भोंदूबाबांद्वारे कशाप्रकारे भोळयाभाबड्या जनतेला आपल्या सापळयात ओढले जाते याचेही साक्षात उदाहरण आहे.
अशा प्रकारच्या तांत्रिकांच्या फसवणुकीचे बळी झालेले माझे एक परिचित आपल्या सोबत घडलेली घटना अशी सांगतात :
‘‘माझी १४ वर्षीय लहान बहीण एकेदिवशी अचानक बेशुद्ध पडली. तिचे हातपाय थरथर कापत होते आणि तिच्या तोंडातून फेस येत होता. तोंडातून आवाजही येत होते. काही वेळाने तिच्या तोंडावर पाण्याचे हबकारे मारल्यावर ती ठीकही झाली. पण हे पुन्हा पुन्हा होऊ लागले. एकदा माझ्या गावी राहणाऱ्या मावशीसोबतही असेच झाले होते. मावशीने हा प्रेतात्म्याचा प्रभाव आहे असे सांगितले आणि माझ्या आईवडिलांना अनेकदा तांत्रिकाकडे जायला लावले.
तांत्रिक प्रत्येक वेळी आपली तगडी दक्षिणा घेत असे आणि पुढच्या वेळेस पूर्ण बरी होईल असे आश्वासन देत असे. पण सतत २ वर्षे जाऊनही काहीच परिणाम होत नव्हता. माझ्या बहिणीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होऊ लागली होती. एक दिवस आमच्या लांबच्या नात्यातील एक डॉक्टर आमच्या घरी आली असता ती बहिणीला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेली.
‘‘डॉक्टरांनी आकडी येण्याचा आजार आहे असे निदान केले आणि पुढे बरेच दीर्घ उपचार करून माझी बहीण पूर्णपणे ठीक झाली.’’
वरती सांगितलेल्या दृश्य २ प्रमाणे ग्रामीण महिलांचे जिथे अत्याधिक शोषण केले जाते, त्या या भूताप्रेताचा आपल्या काम न करण्याचे शस्त्र म्हणूनही वापर करतात, कारण सर्वसाधारणपणे त्यांचे सासरच्या मंडळींसमोर काही चालत नाही, पण भूतप्रेतांमुळे त्यांची प्रत्येक गोष्ट सहज स्वीकारली जाते.
तांत्रिक नाही डॉक्टरची गरज
मानसशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ समुपदेशक राकेश डांगी यांच्या मते, ‘‘वास्तविक हे भूतप्रेत नाही, पण माणसाच्या मेंदूत खोलवर रुतून बसलेला हा एक भ्रम आहे. त्यांच्या याच भ्रमाला कुटुंबीयांकडून भूतप्रेत आणि पिशाच अशाप्रकारे प्रस्तुत केले जाते तेव्हा त्या व्यक्तिच्या मनातही मग हीच धारणा निर्माण होते.
‘‘जेव्हा यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते अज्ञानापायी तांत्रिक आणि पंडितपुजाऱ्यांकडे जातात, तेव्हा ते आपल्या कमाईसाठी भूतप्रेत बाधा झाली आहे याचे समर्थनच करतात. ज्यामुळे हा समज अधिकच पक्का होतो. खरंतर या प्रकारच्या सर्व व्यक्ती या मानसिक आजारांच्या शिकार असतात. आणि त्यांना कुठल्याही तांत्रिकाची नव्हे तर मनोचिकित्सकाची गरज असते.’’
अमावस्येच्या दिवशी अशाप्रकारची भयानक दृश्ये पाहून माझ्या अंगावर तर काटाच उभा राहिला. सर्वसामान्य जनतेचे अज्ञान आणि अंधश्रद्धा याचा फायदा घेण्यासाठी तांत्रिकांद्वारे रचला गेलेला हा एक असा सापळा आहे, ज्यातून बाहेर पडण्यासाठी माणसाला भ्रमासारखी भावना आपल्या मनातून बाहेर करता आली पाहिजे. आपल्या तर्क शक्तीचा विकास करून स्वस्थ मानसिकता विकसित करावी लागेल नाहीतर अशा प्रकारच्या अमावस्या वर्षानुवर्षे आपला प्रभाव दाखवत राहतील.
जोपर्यंत हिंदू धर्माच्या रक्षणाच्या नावावर त्यातील साऱ्या चुकीच्या धारणांचे विज्ञान संमत प्रयत्न सुरू राहतील, यापासून सुटका मिळणे अशक्य आहे. सध्या मात्र जनतेचा पैसा जोरजबरदस्तीने या अंधश्रद्धेच्या प्रचारावर वाया जात आहे आणि देशाच्या तार्किक विचारसरणीला चिरडले जात आहे.