– गीता शिंदे
मला आजपर्यंत समजू शकला नाहीस’ ‘तुला समजून घेणं खूप अवघड आहे, तू मला कधी समजून घ्यायचा प्रयत्नच नाही केलास,’ ‘मी तुला कधीही समजू शकणार नाही. ‘तू मला समजून घेऊ शकली असतीस तर किती बरं झालं असतं.’
अशा प्रकारचे संवाद अनेक दाम्पत्यांमध्ये वेळोवेळी होत असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकमेकांसोबत आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवल्यानंतरही दाम्पत्यांची एकमेकांबद्दल तक्रार असते की अजूनही ते एकमेकांना समजून घेऊ शकले नाहीत. रोजच्या आयुष्यातही ते वारंवार एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून दोष देताना दिसून येतात. कधीकधी तक्रारींच्या रूपात मनातला क्षोभ बाहेर पडतो. तर कधी ओल्या लाकडाप्रमाणे आयुष्यभर दोघेही मनातल्या मनात धुमसत राहतात.
‘अ’ यांना असं वाटत की त्यांची पत्नी गमतीने बोललेली एखादी गोष्टही गंभीरपणे घेते, खरी मानते आणि मग रुसून बसते. ‘‘आम्ही दोघं आता वयस्कार होऊ लागलो तरी अजूनपर्यंत ती मला समजू शकलेली नाही. मी गमतीने बोललेल्या गोष्टीही ती उगाचच गंभीरपणे घेऊन मनाला लावून घेते.’’
‘ब’ यांना वाटतं की त्यांचे पती त्यांची निष्ठा आणि समर्पण आजपर्यंत समजूच शकलेले नाहीत. ‘‘कोणत्याही पुरुषाबरोबर मग भले तो नात्याने माझा भाऊ का असेना, बोलणं, भेटणं ते सहन करू शकत नाहीत. शेवटी मी दोन मुलांची आई आहे. आणि संपूर्ण प्रामाणिकपणे मी त्यांना समर्पित केलं आहे तरीही हा माणूस मला समजून घेऊ शकत नाही.’’
‘क’ यांची तक्रार आहे की, माहेरची श्रीमंत असणारी त्याची पत्नी माहेरच्यांसमोर तोरा मिरवण्यासाठी माझं संपूर्ण बजेट खलास करते. ते म्हणतात, ‘‘माणसाने नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावेत हे तिला समजत का नाही? मोठ्या लोकांशी स्पर्धा करण्यासाठी देखावा करणं योग्य नाही. मी माझ्या आयुष्यात कसाबसा जमाखर्चाचा मेळ घालतोय आणि हिला मात्र आपल्या देखाव्यापुढे मुलांच्या भविष्याचीही चिंता नाही.’’
‘डी’ यांना आपल्या पत्नीबद्दल सेक्ससंबंधी खूप तक्रारी आहेत. ‘‘सेक्ससारख्या नाजूक, सुंदर आणि आयुष्यातला सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला ती एक कर्तव्य समजते आणि एखादं काम उरकून टाकल्याप्रमाणे वागते. आज आम्हाला मुलं झाल्यानंतरही ते परमोच्च सुख मात्र मला मिळालं नाही जे कुणाही पुरुषाला हवंहवसं वाटतं. ती माझ्या शारीरिक गरजा कधी गंभीरपणे समजूनच घेत नाही.’’
‘‘ई’ हिला वाटतं की, तिचा पती अन्य पतींप्रमाणे सर्वांसमोर आपलं प्रेम प्रकट का करत नाही?’’ मी जेव्हा एखाद्या पार्टी किंवा समारंभात इतर पुरुषांना आपापल्या पत्नीचे नखरे सांभाळताना पाहते तेव्हा मलाही वाटतं की, त्यांनीही माझ्यासोबत अशा दिलखेचक ढंगात वागावं. पण ते माझी ही रोमॅण्टिक इच्छा कधी समजूनच घेत नाहीत. ते नेहमीच सभ्यपणे आणि गंभीरपणे वागतात.
दोघंही एकेक पाऊल पुढे टाका
लग्नानंतर वर्षभराने कोणत्या तरी समारंभात दिव्याने जेव्हा आपल्या धाकट्या जावेला पाहिलं तेव्हा ती तिच्याकडे पाहतच राहिली. घट्ट जीन्सवर अगदी नाममात्र स्तिव्हलेस टॉप, रंगवलेले रूक्ष केस, अनावश्यक मेकअपचे थर दिलेला चेहरा. कुठे तिचे सभ्य, सौम्य आणि गंभीर स्वभावाचे प्राध्यापक दीर आणि कुठे ही चटक चांदणी. विवेकना तर केवळ साडी नेसणारी, लांब केसांची भारतीय पारंपरिक स्त्री आवडत होती. मग हा कायापालट कसा? इथेही तोच हताश स्वर, ‘‘काय सांगू, मी तर तिला समजावून थकलो. आपण ज्या समाजात राहतो तशीच वागणूक, कपडे हवेत ना?
जोडीदार स्वत:विषयी काही सांगू पाहतो आणि दुसरा मात्र त्याच्याबद्दल सर्व काही जाणत असूनही अज्ञानीपणाचा बुरखा पांघरून आपल्या जोडीदाराची उपेक्षा करतो, तेव्हाच अशी परिस्थिती निर्माण होते. खरं तर अशा प्रकारची अवहेलना कोणत्याही संवेदनशील माणसाला आतून उद्ध्वस्त करते. पतिपत्नी दोघं आपापल्या आवडीनिवडीनुसार दोन वेगवेगळ्या बाबींवर अडून राहतात तेव्हा नातं तुटायला वेळ लागत नाही. मात्र, दोघांनी आपले विचार आणि आवडीनिवडींमध्ये थोडी तडजोड केली आणि दोन दोघंही २-२ पावलं मागे सरकले तर नातं तुटण्यापासून वाचू शकतं.
जोडीदाराचे विचार जाणून घ्या
अत्यंत लाडात वाढलेली आईवडिलांची एकुलती एक मुलगी श्वेता काहीशी लाजरीबुजरी होती. तिचा पती विकास प्रत्येक छोट्याटोट्या गरजांकडे व्यवस्थित लक्ष द्यायचा. तरीही विकासला आपली पर्वाच नाही असं श्वेताला वाटायचं. तो आईबाबांसारखी आपली ‘काळजी’ घेत नाही वगैरे. मात्र, दुसरीकडे विकासला वाटायचं की तो श्तेवावर इतकं प्रेम करतो, तिची इतकी काळजी घेतो, पण श्वेताकडून मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. वरून फटकळ असणारी श्वेता सतत तक्रारी करून त्याचं भावुक मन दुखावते.
पत्नीच्या सततच्या अवहेलना आणि दोष देण्याच्या स्वभावामुळे विकास आतून कोलमडून गेला आणि त्याला हृदयरोग जडला. आज लग्नाला १५ वर्षं झाल्यानंतरही त्याला सतत गुदमरतच जगावं लागत आहे. ‘यू एस रिव्ह्यू ऑफ द हार्ट असोसिएशन’ने संशोधनाअंती असा निष्कर्ष काढला आहे की, वैवाहिक आयुष्यात एकमेकांना समजून न घेतल्याने होणारी गुदमरलेपणाची भावना बहुदा हृदयासंबंधीच्या समस्यांना जन्म देते. खरं तर जी व्यक्ती दुसऱ्यांच्या भावनांची कदर करते ती इतरांकडूनही तशीच अपेक्षा ठेवते. पतिपत्नीचं नातं तर पूर्णपणे देवाणघेवाणीवर आधारलेलं असतं. कारण टाळी कधीच एका हाताने वाजत नाही.
पतिपत्नींनी एकमेकांच्या वागणुकीपेक्षा एकमेकांचे विचार समजून घेणं अतिशय आवश्यक असतं. कधीकधी आपण प्रत्यक्षात आपल्या जोडीदाराची इच्छा पूर्ण करू शकत नाही. पण आपले प्रयत्न तर प्रामाणिक असतात. म्हणूनच जोडीदाराने दुसऱ्याची अगतिकता आणि मर्यादा समजून घ्यायला हव्यात.
भावनांचा आदर करायला शिका
लग्नाच्या २५व्या वाढदिवशी जेव्हा सुनंदाच्या मुलीने तिला सतार भेट दिली तेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. पतीने नाही, पण मुलीने तरी आपल्या भावना जाणल्या. लग्नापूर्वी सुनंदा एक उत्तम कलावती होती. सतार वाजवणं हा केवळ तिचा छंद नसून तिच्या आनंदाचा एक भाग होता. पण लग्नानंतर तिचा हा ‘मानसिक खुराक’ बनलेला छंद नजरेआड झाला. सतारीचं तुणतुणं वाजवून काय उपयोग? व्यवसाय म्हणूनही याचा वापर केलास तरी काही फायदा नाही. काही करायचंच असेल तर एखादी चांगली नोकरी कर. तेवढाच कुटुंबाला हातभार..’’ पतीने तिला सांगितलं.
मग काय, सुनंदाने आपल्या छंदाला तिथेच गाडून टाकलं. मुलांच्या चांगल्या पालनपोषणासाठी पतीसोबत स्वत: चांगली नोकरी स्वीकारली आणि आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत राहिली. पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात तिची ही सुंदर इच्छा कुठेतरी जागृत होती.
केवळ शरीराचं नाही, मनोमीलनही आवश्यक
जर थोडंसं समजूतदारपणे वागलं तर पतिपत्नींनी एकमेकांना समजून न घेण्याचं दु:ख बऱ्याच अंशी कमी होईल. लग्नानंतर पतिपत्नीचं शारीरिक मीलन तर होतं, पण बऱ्याच वेळा समजूतदारपणाच्या अभावामुळे त्यांचं मनोमीलन होऊ शकत नाही. मग इथूनच अनेक समस्या सुरू होतात. माणसाचं सर्वात संवेदनशील अंग, जे माणसाचं मन अस्पर्शितच राहतं. म्हणूनच लग्नानंतर सर्वात आधी आपल्या जोडीदाराचं मन, त्याचा स्वभाव, आवडीनिवडी आणि सवयी जाणून घ्यायचा प्रयत्न करावा.
एकदुसऱ्यांना समजून घेतल्यानंतर त्यांच्या आवडीनिवडी आणि सवयी यांच्यासोबतच त्यांच्यातील कमतरतेबाबतही तडजोड करणं आवश्यक आहे. कारण निसर्गात परिपूर्ण असं काहीच नसतं. म्हणूनच पतिपत्नीनी एकमेकांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करू नये.
एकमेकांच्या मर्यादा आणि विवशता समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे समजुतीने आणि मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या जोडीदाराला योग्य प्रकारे समजून घेऊन आपण एक निरोगी आणि यशस्वी वैवाहिक आयुष्य जगू शकता.