– माधुरी गुप्ता

घराच्या स्वच्छतेसाठी आपण बहुतेकदा रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतो, जे महागडे तर असतातच पण कधी कधी हातांना चट्टे, अॅलर्जी हेही उद्भवू शकते. अशात तुम्ही कधी विचार केला आहे की सोडा बायकार्बोनेट किती फायदेशीर आहे? याला खाण्याचा सोडा असेही म्हटले जाते. प्रत्येक घरात हा असतोच आणि याचा वापर केक, इडली, ढोकळा इ. बनवण्यासाठी केला जातो. पण घरातील स्वच्छतेसाठीही सोड्याचा वापर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, मग आम्ही सांगतो कसा ते :

* टाइल्स स्वच्छ करण्यासाठी एक बादली पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा मिसळा. याने फरशी पुसल्याने फरशी चमकू लागेल.

* रसायनयुक्त एअर फ्रेशनरऐवजी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. एका छोट्याशा बाऊलमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात काही थेंब ऐसेंशअल ऑइल घाला व खोलीत ठेवा. रूममध्ये ताजेपणा राहिल. हो, पण दर तीन महिन्यांनी हे बदलणे गरजेचे आहे.

* एखाद्या मऊ कापडावर थोडा बेंकिग सोडा भुरभुरावा व याने मायक्रोवेव्हची स्वच्छता करा. बेकिंग सोड्याने ओव्हनची स्वच्छता करायची असल्यास ओव्हनमध्ये थोडा बेकिंग सोडा घालून पाणी शिंपडावे. रात्रभर ते तसेच राहू द्यावे. सकाळी जरा व्यवस्थित पुसून घ्यावे. मग दुसऱ्या ओल्या फडक्याने पुसावे.

* कपडे धुताना डिटर्जंट पावडरमध्ये अर्धा कप बेकिंग सोडा मिसळावा. यामुळे अपेक्षेपेक्षा कपडे अधिक उजळ व स्वच्छ होतील.

* जर बेसीन किंवा सिंक तुंबले असेल तर रात्री अर्धा कप बेकिंग सोड्यात अर्धा कप व्हिनेगर मिसळून सिंकमध्ये टाकावे. सकाळी थोडे गरम पाणी घालावे.

* कारपेटवर रात्री बेकिंग सोडा शिंपडून ठेवा. सकाळी व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करून घ्या. कारपेटवरची धूळ निघून जाईल.

* किचनमधील स्लॅब, कॅबिनेट, गॅसशेगडी इ. वरून चिकटपणा दूर करण्यासाठी एखाद्या ओल्या कपड्यावर बेकिंग सोडा शिंपडून स्वच्छता करा. सर्व चिकटपणा निघून जाईल.

* हाताला जर कांदा लसणाचा वास येत असेल तर हातावर बेकिंग सोडा रगडा व हात स्वच्छ धुवून घ्या. हाताचा दुर्गंध निघून जाईल.

* समप्रमाणात मीठ आणि बेकिंग सोडा घेऊन मुंग्या लागलेल्या जागी शिंपडावे, मुंग्या निघून जातील.

* फळे व भाज्या ताज्या ठेवण्यासाठी त्यांना बेकिंग पावडर घातलेल्या पाण्यात थोडा वेळ ठेवावे. मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

* फुले ताजी राहण्यासाठी फुलदाणीत १ छोटा चमचा बेकिंग सोडा घाला.

* फ्रीजमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा वास येऊ नये म्हणून एका वाटीत बेंकिग सोडा ठेवावा. यामुळे हरतऱ्हेचा दुर्गंध शोषून घेतला जातो.

* एक मोठा चमचा पाण्यात ३ मोठे चमचे बेकिंग सोडा मिसळून पेस्ट चांदीच्या दागिन्यांवर स्पंजने लावा. मग हलक्या हाताने घासून स्वच्छ करून घ्या. भांडी चमकतील.

* मळलेले कंगवे ब्रश स्वच्छ करण्यासाठी एक कप पाण्यात १ छोटा चमचा बेकिंग सोडा घालून त्यात कंगवे, ब्रश एक तास ठेवावेत. सर्व मळ निघून जाईल. मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.

* खिडकीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्यात पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. मग ती पेस्ट ओल्या कपड्याने काचेवर लावून नंतर कोरड्या फडक्याने धुवून घ्या.

* किचनमधील सिंक चमकवण्यासाठी सोड्यामध्ये पाणी मिसळून पेस्ट करून घ्या. ओल्या कपड्याने ही सिंकमध्ये लावून काही वेळाने पाण्याने स्वच्छ करा. सिंक चमकू लागेल.

* बोनचायना, पोर्सलीन, मेलामाइनचे कप किंवा भांड्यावरील डाग काढण्यासाठी त्यावर सोडा व पाण्याची पेस्ट बनवून लावा. काही वेळ तसेच ठेवा. नंतर हाताने स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. सर्व डाग निघून जातील.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...