– डॉ. रेखा व्यास
रूपा तिचे पाय फाकवून चालत होती. असं चालताना तिला खूपच संकोच वाटत होता. आणि त्यातच समोरच्याने हसतहसतच विचारलं की काय झालंय तर मग विचारूच नका. बिचारी काहीच बोलू शकत नसे.
शेफाली चालताचालता एकांत मिळताच मांड्यांमध्ये साडी व पेटीकोट दाबून धरते. असं करुन थोडा वेळ तिला बरं वाटतं परंतु प्रत्येक वेळी तिला हे करता येत नाही, त्यामुळे तिला फार बेचैन वाटतं. तिने याबाबत सांगितलं की कोणतंही काम करताना अनेकदा घासल्या गेलेल्या मांड्याकडेच लक्ष जातं. यामुळे याचा माझ्या कामावरदेखील परिणाम होऊ लागलाय. मूडदेखील अनेकदा बिघडलेला असतो.
सुभाष बाथरूममध्ये जाऊन मांड्यांमध्ये पावडर लावतो. त्याच्यापूर्वी मांड्या सुती कापडाने पुसून घेतो. त्याचं म्हणणं आहे की, यामुळे अनेकदा माझीच मला घृणा वाटू लागते.
अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या व आपल्या आजूबाजूच्या लोकांबाबत घडताना प्रामुख्याने दिसून येतात. त्यांच्या मांड्या घासल्या जातात तेव्हा त्यांचं तन आणि मन दोहोंवरही असा काही परिणाम होतो की जणू काही आजारपण आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. मांड्यांच्या या घासण्याकडे दुर्लक्ष केल्यास कधीकधी मोठ्या जखमादेखील होतात. परिस्थिती अधिक गंभीर झाली तर मात्र प्रत्येकाचा यापासून मुक्त होण्याकडे कल दिसून येतो.
कोणती कारणं
स्किन स्पेशालिस्ट डॉ. प्रमिला यांचं म्हणणं आहे की हे लठ्ठपणामुळे होतं. मांड्यावरदेखील चरबी जमा होते. फ्रिक्शन म्हणजेच आपापसांत मांड्या घासल्यामुळे ही स्थिती होते. यासाठी यावर कायमचा उपाय करायला हवा आणि तो म्हणजे अति लठ्ठपणा टाळावा. वजन कमी करायला हवं यासाठी योग्य आहार आणि व्यायाम याचा मेळ महत्त्वाचा असतो.
सावित्री मात्र तेवढी लठ्ठदेखील नाहीए आणि तिच्या मांड्यादेखील फारशा घासल्या जात नाहीत तरी तिला या समस्येला का तोंड द्यावं लागतं? या प्रश्नावर डॉ. प्रमिलाने सांगितलं की, कधीकधी चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळेदेखील असं होऊ शकतं. शरीराचं वजन जिथे पडायला हवं तिथे न पडता नितंबावरून मांड्यांवर पडतं. मांड्या नरम आणि चरबीयुक्त असल्यामुळे त्या घासू लागतात. तुमचा पोस्चर योग्य प्रकारे ठेवूनदेखील तुम्ही या समस्येपासून मार्ग काढू शकता.
डॉ. पूनम बाली यांनी सांगितलं की, मांड्यांमध्ये फॅट अधिक जमा होत असतं. त्या एकमेकांशी घासल्यामुळे त्वचेचं प्रोटेक्टिव्ह फंक्शन नष्ट होतं. यामुळे रॅशेज येतात तसंच त्वचा काळी पडते. हे सर्व दिसायला वा चांगलं वाटत नाही म्हणून नाही तर यामुळे वेदनादेखील होत असतात. अनेकदा तर लोकांना रडूदेखील कोसळतं. अनेक जण चिंता व तणावग्रस्त होतात. अंघोळीनंतर त्वचा व्यवस्थित कोरडी करून अॅण्टीसेप्टिक पावडर लावल्याने या समस्येपासून सुटका मिळवू शकता. परंतु यावरचा सर्वात योग्य उपाय म्हणजे मांड्यांचं वजन कमी करणं हाच आहे.
जे तरुण आपल्या लुकबाबत साशंक आहेत वा त्यांचा जोडीदार त्यांच्या घासलेल्या मांड्या पाहून काय विचार करेल असा विचार करत असतील तर ते यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने स्किन लाइट करण्याचं लोशनदेखील वापरू शकतात. स्किन टाइटनिंग क्रीमदेखील खूपच उपयोगी ठरते. परंतु हे सर्व एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय करू नका अन्यथा त्रास कमी होण्याऐवजी वाढू शकेल. म्हणजेच एलर्जी होऊ शकते व इन्फेक्शन अधिक वाढू शकतं.
इंद्रप्रस्थ अपोलो इस्पितळाचे सीनियर कन्सल्टट व डर्मेटॉलॉजिस्ट डॉ. देवेंद्र मोहन सांगतात की, मांड्यांच्या आजूबाजूचा भाग खूपच इन्फेक्शन प्रोन भाग आहे. याच्या आजूबाजूला यौनांग, मूत्राशय, मलद्वारे इत्यादी असल्यामुळे इथे संसर्ग सर्वाधिक व लवकर होते. मांड्या घासण्याची समस्या उन्हाळा व पावसाळ्यात सर्वाधिक होते. अशावेळी स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावं. हा भाग कोरडा ठेवावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने अण्टीफंगलचा वापर करावा.
याबाबत रूचिकाने सांगितलं की, मांड्याचे खास व्यायाम करून ती दीड महिन्यातच या समस्येपासून मुक्त झाली.
तर मोहनने सांगितलं की, त्याने पायांचा व्यायाम करून सुरूवातीपासूनच या समस्येवर मात केली. यानंतर व्यायाम सुरू ठेवून मांड्यांबरोबरच शरीराचं वजनदेखील कमी झालं.
घरगुती उपाय
काही घरगुती उपायांचा वापर करूनदेखील या समस्येपासून मुक्ती मिळवता येते.
* रात्री झोपण्यापूर्वी या भागात राईचं तेल वा हळद लावू शकता.
* लिंबामध्ये पाणी मिसळून लावल्यानेदेखील आराम मिळतो. संत्र्याचा रसदेखील वापरू शकता.
* फळांची क्रीमदेखील लावू शकता.
* एलोव्हेराचा रसदेखील रामबाण उपाय आहे.
* नायलॉन वा इतर दुसरे इनरवियर वापरू नका; कारण हे ओलावा शोषून घेत नाही.
डॉ. देवेंद्र मोहन यांनी या समस्येचं अजून एक कारण सांगितलं ते म्हणजे कधीकधी डायबिटीजमुळेदेखील ही समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत हा एक त्वचेचा रोग आहे असं समजू नका. शरीराची आतील तपासणीदेखील करून घ्या. वेळेवरच कोणत्याही आजारापासून मुक्तता मिळविता येते.
जाड मांड्यांमुळे समस्या निर्माण होतात हे लक्षात घेऊन त्या कमी करण्याकडे लक्ष द्या. वेगाने चालून वा याची सवय नाही त्यांनी हळूहळू चालायला सुरुवात करून या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.