- डॉ. रेखा व्यास
रूपा तिचे पाय फाकवून चालत होती. असं चालताना तिला खूपच संकोच वाटत होता. आणि त्यातच समोरच्याने हसतहसतच विचारलं की काय झालंय तर मग विचारूच नका. बिचारी काहीच बोलू शकत नसे.
शेफाली चालताचालता एकांत मिळताच मांड्यांमध्ये साडी व पेटीकोट दाबून धरते. असं करुन थोडा वेळ तिला बरं वाटतं परंतु प्रत्येक वेळी तिला हे करता येत नाही, त्यामुळे तिला फार बेचैन वाटतं. तिने याबाबत सांगितलं की कोणतंही काम करताना अनेकदा घासल्या गेलेल्या मांड्याकडेच लक्ष जातं. यामुळे याचा माझ्या कामावरदेखील परिणाम होऊ लागलाय. मूडदेखील अनेकदा बिघडलेला असतो.
सुभाष बाथरूममध्ये जाऊन मांड्यांमध्ये पावडर लावतो. त्याच्यापूर्वी मांड्या सुती कापडाने पुसून घेतो. त्याचं म्हणणं आहे की, यामुळे अनेकदा माझीच मला घृणा वाटू लागते.
अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या व आपल्या आजूबाजूच्या लोकांबाबत घडताना प्रामुख्याने दिसून येतात. त्यांच्या मांड्या घासल्या जातात तेव्हा त्यांचं तन आणि मन दोहोंवरही असा काही परिणाम होतो की जणू काही आजारपण आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. मांड्यांच्या या घासण्याकडे दुर्लक्ष केल्यास कधीकधी मोठ्या जखमादेखील होतात. परिस्थिती अधिक गंभीर झाली तर मात्र प्रत्येकाचा यापासून मुक्त होण्याकडे कल दिसून येतो.
कोणती कारणं
स्किन स्पेशालिस्ट डॉ. प्रमिला यांचं म्हणणं आहे की हे लठ्ठपणामुळे होतं. मांड्यावरदेखील चरबी जमा होते. फ्रिक्शन म्हणजेच आपापसांत मांड्या घासल्यामुळे ही स्थिती होते. यासाठी यावर कायमचा उपाय करायला हवा आणि तो म्हणजे अति लठ्ठपणा टाळावा. वजन कमी करायला हवं यासाठी योग्य आहार आणि व्यायाम याचा मेळ महत्त्वाचा असतो.
सावित्री मात्र तेवढी लठ्ठदेखील नाहीए आणि तिच्या मांड्यादेखील फारशा घासल्या जात नाहीत तरी तिला या समस्येला का तोंड द्यावं लागतं? या प्रश्नावर डॉ. प्रमिलाने सांगितलं की, कधीकधी चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळेदेखील असं होऊ शकतं. शरीराचं वजन जिथे पडायला हवं तिथे न पडता नितंबावरून मांड्यांवर पडतं. मांड्या नरम आणि चरबीयुक्त असल्यामुळे त्या घासू लागतात. तुमचा पोस्चर योग्य प्रकारे ठेवूनदेखील तुम्ही या समस्येपासून मार्ग काढू शकता.