* पूजा भारद्वाज
ऑनलाइन शॉपिंग म्हणजे ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड खूप वेगाने वाढला आहे, कारण संपूर्ण बाजारपेठ तुम्हाला फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या सर्वकाही खरेदी करणं सोपं झालं आहे. राधिकालादेखील ऑनलाइन शॉपिंग करायला खूप आवडायचे. जेव्हा कधी मोबाईल हातात असायचा तेव्हा तिचे डोळे ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर चिकटलेले असायचे. दररोज ती नवीन उत्पादने पाहात असे आणि गरज नसतानाही काहीतरी ऑर्डर करत असे. एके दिवशी तिला ‘फक्त आजसाठी’ उपलब्ध असलेली ७० टक्के सवलतीची एक उत्तम ऑफर दिसली. तिला नवीन काहीही नको होते, पण ती इतक्या मोठ्या सवलतीकडे दुर्लक्ष करू शकली नाही. त्यामुळेच तिने लगेच एक नवीन ड्रेस, काही बूट आणि एक बॅग मागवली.
दुसऱ्या दिवशी पॅकेज आले. जेव्हा तिने वस्तू पाहिल्या तेव्हा तिच्या लक्षात आले की, ड्रेसचा रंग चित्रात दाखवल्याप्रमाणे नव्हता, बुटांचा आकारही बरोबर नव्हता आणि तिच्याकडे आधीच बॅग होती. तेव्हा राधिकाच्या लक्षात आले की, ती निरुपयोगी गोष्टींवर पैसे वाया घालवत आहे. तिचे कपाट आधीच कपडे आणि अॅक्सेसरीजने भरलेले होते, त्यापैकी बरेच तिने फक्त एकदा किंवा दोनदा वापरले होते.
काही आठवड्यांनंतर, तिने तिचे बँक खाते तपासले तेव्हा तिच्या लक्षात आले की, तिच्या ऑनलाइन खरेदीमुळे तिला खूप पैसे खर्च करावे लागले आहेत. तिला हे देखील जाणवले की, ती वारंवार अशा गोष्टी खरेदी करत होती ज्याची तिला अजिबात गरज नव्हती.
ही व्यथा फक्त राधिकाची नाही तर आपल्यापैकी अनेकांसोबत असे घडते. ऑनलाइन शॉपिंग करणं सोपं आणि आकर्षक आहे, पण जर व्यवस्थित लक्ष दिले नाही तर ती सवय बनू शकते ज्यामुळे आपण अनावश्यक खर्च करू शकतो. म्हणून, ऑनलाइन शॉपिंग नेहमीच विचारपूर्वक केले पाहिजे.
गरज आणि इच्छा यातील फरक समजून घ्या
ऑनलाइन शॉपिंग करताना, आपण अनेकदा आपल्या गरजा आणि इच्छा यातील फरक विसरतो. एखादी नवीन गोष्ट पाहिल्यावर आपले मन लगेच ती खरेदी करण्यास आतुर होते, पण ती गोष्ट खरोखर आपल्यासाठी आवश्यक असतेच असे नाही. खरेदी करण्यापूर्वी, स्वत:ला हा प्रश्न विचारा की, हे खरोखर माझ्यासाठी आवश्यक आहे का? जर उत्तर ‘नाही’ असेल, तर ती वस्तू खरेदी करणे टाळा.
बजेट ठरवा
तुमच्या ऑनलाइन खरेदीवर नियंत्रण ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काटेकोर बजेट तयार करणे. महिन्याच्या सुरुवातीलाच किती खर्च करायचा आहे, हे ठरवा आणि त्यानुसार खरेदी करा. बजेटचे पालन करून तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकाल आणि पैसे वाचवू शकाल.
झटपट ऑफर्स आणि डील्स टाळा
ई-कॉमर्स वेबसाइट्सवर नेहमीच काही ना काही ‘फ्लॅश सेल’, ‘एक्सक्लुझिव्ह डील’ किंवा ‘मर्यादित काळासाठी ऑफर’ चालू असतात. हे सर्व फक्त तुम्हाला भुरळ घालण्यासाठी असतात, जेणेकरून तुम्ही निरुपयोगी वस्तू खरेदी कराल. या ऑफर्समध्ये अडकू नका. लक्षात ठेवा, फक्त स्वस्त आहे म्हणून ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे असे नाही. फक्त काहीतरी स्वस्त मिळविण्यासाठी गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका.
स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची सवय लावा
ऑनलाइन शॉपिंगपासून दूर राहाण्यासाठी आत्म-नियंत्रण खूप महत्वाचे आहे. जेव्हा कधी तुम्हाला शॉपिंग साइट्स ब्राउझ करायच्या असतील तेव्हा स्वत:ला व्यस्त ठेवा. अभ्यास, काम किंवा छंद यासारख्या इतर क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करा. याशिवाय जर तुम्हाला अनावश्यक खरेदीची सवय झाली असेल तर तुमच्या मोबाइलमधून शॉपिंग अॅप्स अनइंस्टॉल करा किंवा नोटिफिकेशन अलर्ट म्हणजे आगाऊ सूचना बंद करा.
उत्पादन पुनरावलोकन आणि किंमतीची तुलना करा
अनेकदा आपण एखादे उत्पादन पाहून प्रभावित होतो आणि ते लगेच खरेदी करतो, परंतु उत्पादनाबद्दलच्या पूर्ण माहितीशिवाय खरेदी करणे चुकीचे ठरू शकते. खरेदी करण्यापूर्वी, वेगवेगळ्या वेबसाइटवरील त्याच्या किंमतीची तुलना करा आणि त्याचे रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन वाचा. ते तुम्हाला हे ठरवण्यास मदत करतील की, उत्पादन तुमच्या गरजांसाठी योग्य आहे की नाही.
ईमेल आणि नोटिफिकेशन अलर्ट बंद करा
बहुतेक ई-कॉमर्स साइट्स आणि शॉपिंग अॅप्स सतत नवीन ऑफर आणि विक्रीबद्दल ईमेल आणि नोटिफिकेशन अलर्ट म्हणजेच आगाऊ सूचना पाठवतात. ते तुम्हाला पुन्हा पुन्हा खरेदी करण्यास प्रवृत्त करते. तुम्ही तुमच्या ईमेलवरून या प्रमोशनल सबस्क्रिप्शनमधून सदस्यता रद्द करू शकता आणि अॅप्सवरील नोटिफिकेशन बंद करू शकता. यामुळे तुम्हाला या ऑफरची वारंवार आठवण करून दिली जाणार नाही.
इतरांप्रमाणे वागणे टाळा
कधीकधी आपले मित्र, सहकारी किंवा सोशल मीडिया आपल्याला ते खरेदी करत असलेल्या वस्तू खरेदी करण्यास भाग पाडतात, परंतु प्रत्येकाच्या गरजा आणि बजेट वेगळे असते. म्हणूनच इतरांकडे पाहून खरेदी करू नका. जर तुम्ही फक्त सामाजिक प्रतिष्ठेसाठी किंवा दाखवण्यासाठी खरेदी करत असाल तर हा छंद तुमचा खिसा रिकामा करू शकतो.





