* गरिमा पंकज

व्यवसाय लहान असो किंवा मोठा, जर ऑफलाइन ग्राहकांबरोबरच ऑनलाइन ग्राहकांना लक्षात घेऊन व्यवसायाची रणनीती ठरवली तरच जास्तीत जास्त नफा मिळवता येतो, कारण आज प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये अमर्यादित डेटा आहे. आता बहुतांश कामे ऑनलाइन होत आहेत. त्यामुळेच क्लाउड किचन व्यवसाय हा भारत आणि जगभरातील सर्वात ट्रेंडिंग व्यवसायांपैकी एक आहे.

क्लाउड किचन, ज्याला बऱ्याचदा ‘घोस्ट किचन’ किंवा ‘व्हर्च्युअल किचन’ म्हणून ओळखले जाते, हे एक प्रकारचे रेस्टॉरंट आहे जिथे फक्त अन्नपदार्थांची ऑर्डर स्वीकारता येते. क्लाउड किचन हा ऑनलाइन फूड ऑर्डरिंग सिस्टीमद्वारे ग्राहकांना अन्न पुरवण्यासाठी सुरू केलेला व्यवसाय आहे. झोमॅटो आणि स्विगीसारख्या फूड डिलिव्हरी अॅप्लिकेशन्सने त्याच्याशी टाय-अप अर्थात करार केला आहे.

२०१९ मध्ये भारतात जवळपास ५,००० क्लाउड किचन होते. ऑनलाइन फूड ऑर्डरिंग अॅप्स आणि वेबसाइट्सच्या सहकार्यामुळे क्लाउड किचनला मोठा आधार मिळाला आहे. आज भारतात ३०,००० पेक्षा जास्त क्लाउड किचन आहेत.

योग्य नियोजन करा

हे काम तुम्ही फक्त ५ ते ६ लाख रुपयांमध्ये चांगल्या पातळीवर सुरू करू शकता. महिलाही या व्यवसायात सक्रिय सहभाग घेत आहेत. अशाच एका क्लाउड किचन ‘द छौंक’च्या सहसंस्थापक मंजरी सिंह आणि हिरण्यमी शिवानी यांच्याशी आम्ही बोललो. कोविड-१९ दरम्यान, जेव्हा लोक त्यांच्या घरात बंदिस्त होते तेव्हा हिरण्यमी शिवानीही त्यांच्या मूळच्या घरी जाऊ शकल्या नव्हत्या. त्यादरम्यान त्यांना क्लाउड किचन सुरू करण्याची कल्पना सुचली. त्या बिहारच्या आहेत. लोकांना घरच्या जेवणाची चव देण्याच्या उद्देशाने, विशेषत: स्वादिष्ट बिहारी खाद्यपदार्थ देण्याच्या उद्देशाने, त्यांनी जुलै २०२१ मध्ये गुरुग्राममध्ये बिहारी खाद्यपदार्थांचे ‘द छौंक’ सुरू केले. त्यांची सून मंजरी सिंग यांनीही त्यांना या कामात साथ दिली आणि दोघींनी मिळून या व्यवसायात पदार्पण केले.

वाढले आहे काम

मंजरी सिंह सांगतात की, सुरुवातीला त्यांनी घरूनच व्यवसाय सुरू केला. ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपद्वारे त्या घरीच जेवण बनवून लोकांपर्यंत पोहोचवत. आज त्यांची दिल्ली/एनसीआरमध्ये ५ आउटलेट आहेत. बहुतेक प्रणाली स्वयंचलित आणि ऑनलाइन आहे. त्यांनी स्विगी, झोमॅटोसोबत करार केला आहे.

वार्षिक उलाढाल सुमारे २ कोटी रुपये करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. यावर्षी त्यांना १५-१६ टक्के नफा अपेक्षित आहे. सध्या त्यांच्याकडे २८ कर्मचारी असून त्यापैकी ६ कार्यालयात तर उर्वरित किचनमध्ये आहेत.

काम खूप वाढले आहे. महिला असण्याची एकच समस्या आहे की, त्या सोर्सिंग म्हणजे बाहेरून सामान आणण्यासाठी फारसा पुढाकार घेऊ शकत नाहीत. भाजीपाला, मसाले, धान्य इत्यादी कच्चा माल मिळवावा लागतो. बाजारात काही नवीन असेल तर ते पाहायला जावे लागते. बहुतेक बाजार खूप गजबजलेले आणि आतील भागात आहेत, जिथे महिला वारंवार जाऊ शकत नाहीत.

दोघीही गृहिणी आहेत आणि त्यांना मुलांचीही काळजी घ्यावी लागते. या समस्येचा सामना करण्यासाठी, त्यांनी सोर्सिंग व्यवस्थापक आणि अनेक कर्मचारी नियुक्त केले आहेत जे त्यांना कामात बरीच मदत करतात. याशिवाय त्यांना इतर कोणतीही अडचण आलेली नाही.

जीएसटी आणि आर्थिक समस्या

रेस्टॉरंट आणि क्लाउड किचन व्यवसायाला ५ टक्के जीएसटी लागू आहे. ऑर्डर झोमॅटो आणि स्विगीद्वारे आल्यास जीएसटीचा परतावा ते मिळून भरतात. वेबसाइटद्वारे ऑर्डर आल्यास क्लाउड किचनला ५ टक्के जीएसटी भरावा लागतो. याशिवाय कुठलाही अप्रत्यक्ष कर नाही. त्यामुळेच क्लाउड किचनला उद्योगात कर नियमन गुंतागुंतीचा सामना करावा लागत नाही.

कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात?

* एग्रीगेटरच्या उच्च कमिशनमुळे (सुमारे ३० टक्के), हा अतिशय कमी मार्जिन असलेला व्यवसाय आहे. त्यामुळे मिळणाऱ्या परताव्यापेक्षा तांत्रिक खर्च खूप जास्त आहे. ग्राहकांशी थेट संपर्काचा अभाव आहे. अभिप्राय आणि पुनरावलोकनासाठी ग्राहकांशी थेट संवाद साधता येत नाही. एग्रीगेटर ग्राहकांशी थेट संपर्क साधू देत नाहीत.

* या क्षेत्रात अनेक ब्रँड आणि कॅटेगरीज आल्या आहेत, त्यामुळे स्पर्धा मोठी आहे. क्लाउड किचन ६ ते ७ किलोमीटर परिसरापुरतेच मर्यादित असते. या अंतरावर सुमारे २-३ हजार रेस्टॉरंट, १००० + ब्रँड आहेत. त्यामुळे ग्राहकाला अनेक पर्याय मिळतात. साहजिकच मार्केटिंगवर खूप खर्च करावा लागतो, जेणेकरून तुम्ही केंद्रस्थानी दिसाल. अनेक ऑफर्स द्याव्या लागतात. त्यामुळे नफ्यातील मोठा हिस्सा वाया जातो.

* बहुतेक ब्रँड्स संघटित नाहीत. शेफ/कर्मचारी जास्त पगारासाठी नोकऱ्या बदलत राहतात, ज्यामुळे चव टिकवणे कठीण होते. नवीन कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण द्यावे लागते. अनुभवी झाल्यानंतर ते दुसरीकडे कुठेतरी जातात आणि त्यामुळे नुकसान होते. ग्राहक एकसारखे नसतात. मोठया संख्येने असलेल्या ब्रँड्समुळे ते बदलत राहतात. त्यामुळे जाहिरातीवर होणारा खर्च खूप जास्त आहे.

* क्लाउड किचनसाठी कोणतेही वेगळे सरकारी धोरण नाही, शिवाय ते खूप वेगळे असले तरीही ते रेस्टॉरंट म्हणून ग्राह्य धरले जाते. रेस्टॉरंटचे कमिशन कमी जाते. त्यांचा नफा मार्जिन जास्त असल्यामुळे पॉलिसी त्यांच्या बाजूने जाते.

या समस्या सामान्य स्वरूपाच्या असून, प्रत्येक व्यवसायात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतात. प्रत्येक व्यवसायाचे स्वत:चे फायदे आणि तोटे असतात. क्लाउड किचनबद्दल बोलायचे झाल्यास त्याचे बरेच फायदे आहेत :

यात कमी गुंतवणुकीत जास्त नफ्याची अपेक्षा केली जाऊ शकते. हे काम करणेही सोपे आहे आणि ते तुम्ही घर सांभाळूनही करू शकता. इतर पारंपरिक रेस्टॉरंट आणि जेवणाच्या तुलनेत, क्लाउड किचनमध्ये मटेरियल मॅनेजमेंट कॉस्ट, ओव्हरहेड कॉस्ट, लेबर कॉस्ट खूप कमी आहे. येथे फक्त अन्न तयार करून पॅक केले जाते आणि वितरित केले जाते, त्यामुळे अधिक कर्मचारी ठेवण्याची गरज नसते, शिवाय साफसफाईसाठी कमी मेहनत घ्यावी लागते.

छंदाचे करा व्यवसायात रुपांतर

क्लाउड किचनला कमी जागा लागते. ते शहराच्या कोणत्याही भागात सुरू केले जाऊ शकते. महिलाही घरातूनच याची सुरुवात करू शकतात. तुमचं घर व्यावसायिक परिसरात असायला हवं, एवढंच लक्षात ठेवायचं. नंतर, जसा व्यवसाय वाढतो तशी वेगळी जागा घेता येते.

दीर्घकालीन नफा

तुम्ही ऑफलाइन व्यवसायही करू शकता. जसे की रेस्टॉरंटमध्ये नियमित पुरवठा करणे, वसतिगृहे आणि कॉर्पोरेट कार्यालयांची टिफिनची दैनंदिन गरज भागवणे, पार्टीसाठी कॅटरिंग ऑर्डर घेणे इ. त्याचबरोबर सण-उत्सवांच्या काळात विशिष्ट प्रकारच्या पदार्थांची ऑर्डर घेता येते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...