* सोमा घोष
आज महिला सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत, पण त्या शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट उघडपणे सांगू शकत नाहीत, अगदी पतीलाही नाही. अंतर्गत भागातील काही आजारांबद्दल त्या कोणालाच सांगू शकत नाहीत, याचे उदाहरण एका महिला डॉक्टरांकडे पाहायला मिळाले. ३५ वर्षीय महिलेला डॉक्टरांशी बोलायलाही लाज वाटत होती आणि डॉक्टर तिला खडसावत होत्या, कारण तिला एक मोठा अंतर्गत संसर्ग झाला होता, ज्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे होते.
याबाबत नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गायत्री देशपांडे सांगतात की, आजही छोटया शहरातील महिलांची तपासणी पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञांकडून होत नाही, त्या त्यांच्याकडे प्रसूतीसाठी जात नाहीत.
खरंतर, अंतर्गत स्वच्छता आणि काळजी यांचा महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. जागरुकतेचा अभाव तसेच वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे व्हल्व्होव्हॅजाइनल संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत, विशेषत: उन्हाळयाच्या हंगामात, अंतरंग स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. घाम आणि उष्णतेमुळे अंतर्गत संवेदनशील भागांत बुरशीजन्य संसर्ग फार लवकर होतो. त्यामुळे महिलांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, अंतर्गत स्वच्छता ही केवळ स्वच्छता नसून ती त्यांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण बाब आहे.
धार्मिक आणि सामाजिक अडथळयांपासून दूर राहा
महिलांनी सर्व सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक अडथळयांना स्वत:पासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांना या विषयावर उघडपणे बोलण्यापासून तसेच अंतर्गत, संवेदनशील भागाची काळजी घेण्यासाठी उत्तम साधने वापरण्यापासून रोखले जाते. त्याऐवजी काही घरगुती उपाय केले जातात, त्यामुळे रोग वाढतात. अनेकदा हा संसर्ग इतका वाढतो की, त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. त्या महिलेचा मृत्यूही होऊ शकतो.
अंतर्गत स्वच्छता म्हणजे काय?
डॉ. गायत्री सांगतात की, गर्भाशय ग्रीवाच्या बाहेरील पृष्ठभागापासून योनीमार्ग उघडण्यापर्यंतच्या थराला योनी म्यूकोसा म्हणतात, जो नैसर्गिकरित्या बाहेर पडणाऱ्या द्रव्यांच्या मदतीने स्वत:ला स्वच्छ करण्यास सक्षम असतो. स्वत:ला स्वच्छ करण्याची क्षमता असण्यासोबतच योनीमार्गात अनेक निरोगी जीवाणू असतात, जे संक्रमण रोखून सूक्ष्मजीवांचेही संतुलन राखतात. अनेक प्रकारच्या बाह्य किंवा अंतर्गत असंतुलनामुळे किंवा सवयींमुळे निरोगी सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे योनी किंवा मूत्रमार्गात संसर्ग होण्याची भीती असते.
याशिवाय योनीमार्ग दररोज धुणे, शौचास गेल्यावर टिश्यू पेपर किंवा वाईप्सचा उपयोग करणे, अंघोळ करून सदर भाग नीट स्वच्छ, कोरडा करणे, अंतर्वस्त्रे स्वच्छ करणे, मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संभोग करण्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता राखणे यासारख्या चांगल्या सवयी योनी आणि त्याच्याशी संबंधित सर्व संवेदनशील भागांचे संरक्षण करण्यासाठी खूप मदत करतात. याकडे लक्ष दिल्यास बऱ्याच समस्या टाळता येतात.
स्वच्छता राखा
प्रत्येक वेळी लघवी केल्यानंतर, योनीमार्ग समोरून मागेपर्यंत साध्या पाण्याने धुणे आवश्यक आहे. महिलांनी हे समजून घेतले पाहिजे की, योनिमार्गाचा भागही त्यांच्या सामान्य त्वचेप्रमाणेच आहे, त्यामुळे अंघोळ करताना तोही शरीराच्या इतर भागांप्रमाणे साध्या साबणाने किंवा बॉडी वॉशने धुणे गरजेचे असते. जिवाणू किंवा विषाणू मागील भागात (गुदा) असू शकतात, ज्याच्या संपर्कामुळे योनिमार्गाचा संसर्ग होऊ शकतो.
योग्य कपडा निवडा
महिलांनी सुती पॅन्टीज घालणे चांगले असते. त्या ओलावा शोषून घेण्यास आणि अंतर्गत, संवेदनशील भाग कोरडा ठेवण्यास मदत करतात. अतिशय घट्ट, गडद रंगाचे किंवा ओलसर कपडे टाळावेत. कपडे घालण्यापूर्वी ते स्वच्छ ठिकाणी उन्हात वाळवावेत, कारण अंतर्गत भागाभोवती ओलावा असणे हेही संसर्गाचे प्रमुख कारण ठरू शकते.
सार्वजनिक शौचालयांचा वापर
इंकोलाय, स्ट्रेप्टोकोकी यासारखे सक्रिय जीवाणू सार्वजनिक शौचालयांमध्ये असतात, जे महिलांच्या मूत्रमार्गातील संसर्गाचे सर्वात सामान्य कारण आहे. ही स्वच्छतागृहे स्वच्छ असूनही बसण्याची जागा, फ्लश, पाण्याचे नळ किंवा दरवाजाच्या कडीसारख्या ठिकाणी जंतू आणि विषाणू असू शकतात.
हे टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, बसण्यापूर्वी टिश्यू पेपर, सॅनिटायझर किंवा साबण वापरून कपडे किंवा शरीराला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. बाहेरील शौचालय वापरल्यानंतर लॅक्टिक अॅसिड आधारित योनी वॉश वापरणे योनीच्या काळजीसाठी खूप महत्त्वाचे आहे.
लैंगिक संबंधापूर्वी स्वत:ला ठेवा स्वच्छ
संभोगावेळी जोडीदाराने स्वच्छता न ठेवल्याने महिलांनाही योनिमार्गात संसर्ग होऊ शकतो. संभोगानंतर नेहमी लघवी करण्याचा प्रयत्न करा आणि योनीमार्ग समोरून मागे स्वच्छ करा. कंडोम आणि गर्भनिरोधक पद्धती वापरणे लैंगिक संक्रमणास प्रतिबंध करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. एकापेक्षा जास्त जोडीदाराशी लैंगिक संबंध टाळा आणि तुमच्या जोडीदारालाही त्याच्या अंतर्गत भागाची स्वच्छता राखण्याची विनंती करा.
फिकट स्रावापासून सावधान
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये फिकट रंगाचा स्राव जाणे अगदी सामान्य आहे. संप्रेरक बदलांमुळे, अशा स्त्रावात योनी आणि गर्भाशय ग्रीवाच्या त्वचेच्या पेशी असतात, पण अशा स्त्रावातील सातत्य, गंध आणि वेळ लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण तो मासिक पाळीच्या दरम्यान शरीरात होणारे बदल प्रतिबिंबित करतो. प्री-ओव्ह्युलेटरी डिस्चार्ज (ओव्हुलेशनपूर्वी डिस्चार्ज) तुलनेने जाड, तुटपुंजे आणि गोलाकार असते, तर पोस्ट-ओव्हुलेटरी योनी स्राव (मासिक पाळीच्या १ आठवडा आधी) मुबलक, अतिशय पातळ आणि चिकट असतो. महिलांना हे समजले पाहिजे की, अशा प्रकारचा स्त्राव अतिशय सामान्य आहे आणि तो निरोगी ओव्हुलेशन प्रक्रिया दर्शवतो.
जर स्त्राव खूप जाड असेल आणि लालसरपणा, खाज सुटणे किंवा जळजळ होत असेल तर आणि जर तुमच्या मासिक पाळीच्या दिवसांव्यतिरिक्त असे घडत असेल तर, या समस्येकडे त्वरित लक्ष देणे आणि स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे.
अंतर्गत केसांचे वॅक्सिंग किंवा ट्रिमिंग
अंतर्गत भागातील केसही योनीमार्गाच्या छिद्राचे रक्षण करतात, जे अनेक सूक्ष्मजीवांसाठी अडथळा बनून काम करतात. वॅक्सिंगमुळे योनीमार्ग सूक्ष्म जीवांच्या संपर्कात येण्याची शक्यता वाढते, शिवाय वॅक्सिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या अयोग्य साधनांमुळे योनीभोवती जळजळ किंवा संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच पुरळ आणि संसर्ग टाळण्यासाठी अंतर्गत भाग स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
उपचारापेक्षा नियंत्रण चांगले
समस्या निर्माण झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा नियंत्रण किंवा प्रतिबंध करण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी वर्षातून एकदा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानुसार गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी वेळोवेळी पीएपी स्मिअर टेस्ट करून त्यांनी दिलेल्या औषधांचा वापर करावा, सोबतच अंतर्गत स्वच्छतेबाबत जास्तीत जास्त माहिती करून घ्यावी.