* सोमा घोष

मराठी अभिनेत्री अंजली तुषार नान्नजकर, महाराष्ट्रातील सोलापूरमधील अक्कलकोट या गावातील रहिवासी आहे. तिने नेहमीच आपल्या कुटुंबासह काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. यात पती तुषार नान्नजकर यांनीही तिला साथ दिली. गाव सोडून मुंबईला येऊन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणे तिच्यासाठी सोपे नव्हते, पण तिने धीर धरला आणि प्रयत्न करत राहिली. तिने छोटया भूमिकांपासून सुरुवात केली आणि नंतर तिला मुख्य भूमिका मिळाली. आता अंजली पुढील मराठी चित्रपट आणि अल्बममध्ये व्यस्त आहे. तिने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितले. ती काय म्हणाली, हे तिच्याच शब्दात जाणून घेऊया.

तुझ्याबद्दल काय सांगशील?

मी अनेक अल्बम केले आहेत आणि आता मराठी चित्रपटात काम करत आहे. मी अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. माझे वडील सरकारी नोकरी करतात. आई सरपंच आहे. दोघांनी नेहमीच लोककल्याणाची कामे केली. त्यामुळेच मलाही कुणाला तरी मदत करावी असे सतत वाटायचे. सोबतच काही वेगळे आणि आव्हानात्मक काम करायचे होते. मी रंगभूमीवर काम करण्यासाठी मुंबईत आले, कारण माझ्या कुटुंबातील बरेच लोक मराठी इंडस्ट्रीत काम करतात. त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली. मी सोलापूरच्या अक्कलकोट गावची आहे. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण सोलापूरमध्येच झाले. त्यानंतर मी मुंबईत फॅशन डिझाइनचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आले आणि येथेच राहिले. रंगभूमीवर काम केले आणि माझे हिंदी सुधारून घेतले. सुरुवातीला मी हिंदीतून अभिनय करायला सुरुवात केली. त्यानंतर मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीसोबत मिळून प्रोडक्शन हाऊस सुरू केले, ज्यामध्ये मी अनेक अल्बम बनवले आहेत आणि पुढे एक मराठी चित्रपटही करत आहे.

तुला कुटुंबाचा किती पाठिंबा मिळाला?

सुरुवातीला कुटुंबाने मला अभिनय करण्यास नकार दिला. फिल्म इंडस्ट्रीबद्दल सर्वांच्याच मनात भीती असते आणि इथे काम मिळणे सोपे नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, पण माझी मेहनत आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती त्यांनी पाहिली. याशिवाय माझ्या गावातील एक व्यक्ती अभिनेता आहे. तिला पाहूनच मी अभिनय करू लागले, पण माझ्या आईवडिलांना मी अभिनय करावा असे वाटत नव्हते. मी अॅथलीट किंवा सरकारी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती, पण मला रंगभूमीवर काम मिळाले आणि त्यानंतर त्यांनी विरोध केला नाही. टीव्हीवरचे माझे काम पाहून लोक माझ्या आईवडिलांकडे माझी स्तुती करू लागले, त्यामुळे त्यांनाही आनंद झाला. आईवडिलांनी मला खूप मानसिक सहकार्य केले. कधीच हार मानू नकोस, असा सल्ला ते नेहमी देतात. त्यामुळेच तर मी इथपर्यंत पोहोचू शकले.

तू या क्षेत्रात पुढे कशी आलीस?

फॅशन डिझायनर असल्यामुळे हळूहळू मालिकांमधील कपडे डिझाईन करण्याचे काम मी करू लागले. त्यानंतर मी ‘ट्रूकल्चर’ हा माझा ब्रँड सुरू केला, ज्यामध्ये गरीब आणि अपंग स्त्रियांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू विकून मी त्यांना रोजगार उपलब्ध करून देते. दूरदर्शनवरील ‘कहीं देर ना हो जाए’ ही माझी पहिली मालिका होती. त्यानंतर मी मराठी चित्रपट आणि हिंदी मालिका केल्या. ‘फुलवा’, ‘माता की चौकी’, ‘अगले जनम मोहे बिटिया ना किजो’ इत्यादी अनेक मालिकांमध्ये मी बहीण आणि पत्नीची भूमिका साकारली आहे.

तुला ओळखीमुळे काम मिळणे सोपे झाले का?

हो, थोडे सोपे झाले, कारण मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली. यामुळे माझ्यावरही चांगले काम करण्याचा दबाव असतो आणि ही माझ्या कारकिर्दीसाठी चांगली गोष्ट ठरली.

तुला किती संघर्ष करावा लागला?

सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला, कारण इंडस्ट्रीबद्दल प्रत्येकाचा चुकीचा समज आहे. ही इंडस्ट्री चांगली आहे, हे आईवडिलांना मला समजावून सांगावे लागले. मी खूप ऑडिशन दिले. बरेच लोक म्हणायचे की, मी अभिनय करू शकत नाही. मला तेवढी समज नाही, असे सांगून ते मला ही इंडस्ट्री सोडून जायला सांगायचे किंवा मराठी मुलगी असल्यामुळे तुझे हिंदीचे उच्चार चांगले नाहीत इत्यादी अनेक गोष्टी मला ऐकायला मिळायच्या. काही जण मला माझ्यातील उणिवा सुधारण्याचा सल्ला द्यायचे. गावातील लोकही माझ्या आईवडिलांना सांगत की, त्यांनी मला चुकीच्या ठिकाणी पाठवले. मुलगी आहे, तिला नोकरीला पाठवा, तिचे लग्न करा इत्यादी अनेक सल्ले ऐकत मी इथपर्यंत पोहोचले. ३ वर्षे प्रचंड संघर्ष केला. मुलींसोबत रूम शेअर करायचे, दिवसातून एकदाच खायचे. या सगळया गोष्टी मी माझ्या आईवडिलांना कधीच सांगितल्या नाहीत किंवा मी त्यांच्याकडून पैसेही मागितले नाहीत, कारण यामुळे त्यांना माझी काळजी वाटली असती. अनेकदा मला सोलापूरला परत जावेसे वाटायचे, पण नेमके तेव्हाच कामही मिळत होते.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

पहिला ब्रेक मिळताच मला खूप आनंद झाला, कारण मला काम मिळाले होते. कॅमेऱ्यासमोर काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले होते. मला अभिनेत्री नव्हे तर एक उत्तम कलाकार बनायचे होते. कॅमेऱ्यासमोर गेल्यावर मी खूप घाबरले, कारण माझ्यासमोर प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्र्रन होत्या. पहिली मालिका आणि माझे ते पहिलेच दृश्य होते. त्यांना समजले होते की, मी घाबरले आहे. त्यांनी मला खूप छान प्रकारे समजावले आणि कॅमेऱ्याला मित्र मानण्याचा सल्ला दिला. त्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांनी मला अभिनय नव्हे तर सहजपणे कसे बोलायचे ते सांगितले. यामुळे अभिनय करणे माझ्यासाठी सोपे झाले. लॉकडाऊनच्या काळात लोक काम करायला घाबरत होते, पण त्या काळात मला एका मराठी मालिकेमध्ये मोठे काम करण्याची संधी मिळाली आणि मी घराघरात नावारूपास आले. मी नेहमी अशीच भूमिका निवडली जी छोटी असूनही परिणामकारक ठरेल. नवीन कलाकारांमधील गुण ओळखूनच मी प्रोडक्शन हाऊस सुरू केले, जेणेकरून मी त्यांना संधी देऊ शकेन.

तुला हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मला हिंदी मालिकांपेक्षा वेब सीरिज बघायला आवडतात आणि त्यात काम करण्याची माझी इच्छा आहे, पण मी अंतर्गत दृश्य करायला तयार नाही. आजकाल कौटुंबिक मालिकाही खूप आवडीने बघितल्या जातात आणि मला त्यात काम करायचे आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यासोबत काम करण्याची तसेच रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनय करण्याची इच्छा आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मी इंडस्ट्री आणि ट्रेंड पाहूनच फॅशन करते. मला विशेष करून जुनी अर्थात रेट्रो फॅशन आवडते. मी शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करते, पण घरी बनवलेलेच पदार्थ खायला मला जास्त आवडतात. प्रवासादरम्यान मी त्या ठिकाणचे पदार्थ नक्की खाऊन बघते.

महाशक्ती मिळाल्यास तुला देशात कोणते बदल घडवून आणायचे आहेत?

स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपले मत सांगण्याचे आणि ते सर्वांसमोर मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, ही गोष्ट पुढेही कायम ठेवू इच्छिते.

आवडता रंग – लाल.

आवडता पोशाख – साडी.

आवडते पुस्तक – द सिक्रेट.

आवडते परफ्यूम – डिओर.

आवडते पर्यटन स्थळ – दुबई, माझे गाव अक्कलकोट.

वेळ मिळाल्यास – गरीब आणि अपंग स्त्रियांना रोजगार मिळवून देणे.

जीवनातील आदर्श – गरजूंना मदत करणे.

जीवन जगण्याचा मंत्र – इतरांना आनंद देणे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...