* गरिमा पंकज
अरे वा, या गुलाबी मिडीमध्ये आपली अमिता राजकन्येसारखी गोंडस दिसते,’’ आईशी बोलताना वडिलांनी सांगितले आणि नमिता उदास झाली.
त्याच डिझाईनची पिवळी मिडी तिने न घालता हातातच ठेवली. तिला माहीत होते की, असे कपडे तिला शोभत नाहीत, याउलट कुठलाही पेहेराव तिच्या बहिणीला चांगला दिसतो. आपल्या मोठया बहिणीची स्तुती ऐकून तिला वाईट वाटत नसे, पण या गोष्टीचे दु:ख व्हायचे की, तिचे आईवडील नेहमीच फक्त अमिताचे कौतुक करायचे.
नमिता आणि अमिता दोघी बहिणी होत्या. थोरली अमिता खूप सुंदर होती आणि हेच कारण होते की, ज्यामुळे नमिताला अनेकदा स्वत:मध्ये काहीतरी कमतरता असल्याची, न्यूनगंडाची भावना सतावायची. ती सावळी होती. आईवडील सतत मोठया मुलीचे कौतुक करायचे.
अमिता सुंदर असल्यामुळे तिचे व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसायचे. तिचा आत्मविश्वासही वाढला होता. ती लहानपणापासून बडबडी होती. घरची कामेही पटापट करायची, याउलट नमिता सर्वांशी फार कमी बोलायची.
त्या दोघींमधील स्पर्धा कमी करण्याऐवजी आईवडिलांनी नकळत अमिता खूप सुंदर आहे, असे सतत बोलून ही स्पर्धा अधिकच वाढवली. अमिता सर्व नीटनेटकेपणे करते, तर नमिताला काहीच कळत नाही, असे ते म्हणायचे. याचा परिणाम असा झाला की, हळूहळू अमिताचा अहंकार बळावला आणि ती नमिताला हीन लेखू लागली.
घरातील अशा वागण्यामुळे नमिता तिच्याच विश्वात राहू लागली. तिला अभ्यास करून मोठया पदावर काम करायचे होते. आपण आपल्या बहिणीपेक्षा कमी नाही, हे सर्वांना दाखवून द्यायचे होते. त्यानंतर एक दिवस असा आला की, नमिता तिच्या मेहनतीच्या जोरावर खूप मोठी अधिकारी बनली आणि लोकांना तिच्या बोटावर नाचायला लावू लागली.
नमिताने दोघी बहिणींमधील स्पर्धेकडे सकारात्मकपणे पाहिले. त्यामुळेच ती जीवनात यशस्वी होऊ शकली, पण अनेकदा असेही होते की, याच स्पर्धेमुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व आयुष्यभरासाठी गोठून जाते. लहानपणी गमावलेला आत्मविश्वास परत मिळवता येत नाही आणि माणूस या स्पर्धेत हरवून जातो.
बऱ्याचदा २ सख्ख्या बहिणींमध्येही एकमेकींविरोधात स्पर्धेची परिस्थिती निर्माण होते. विशेषत: हे अशा परिस्थितीत घडते जेव्हा पालक त्यांच्या मुलींचे संगोपन करताना जाणूनबुजून किंवा नकळतपणे त्यांच्याशी भेदभावपूर्वक वागतात. त्यांची एकमेकींशी तुलना करतात. यामागे अनेक कारणे असू शकतात.
कुठल्यातरी एका मुलीबद्दल विशेष ओढ असणे : बऱ्याचदा आईवडिलांसाठी ती मुलगी जास्त प्रिय ठरते जिच्या जन्मानंतर घरात काहीतरी चांगले घडते. जसे की, मुलीच्या पाठीवर मुलगा होणे, नोकरीत बढती किंवा एखाद्या मोठया संकटातून सुटका होणे. त्यांना वाटते की, मुलीमुळेच आपल्याला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नकळत ते त्या मुलीवर जास्त प्रेम करू लागतात.
कुठल्यातरी एका मुलीच्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रभावित होणे : असे होऊ शकते की, एक मुलगी जास्त गुणी, जास्त सुंदर, जास्त हुशार असू शकते किंवा ती आकर्षक व्यक्तिमत्त्वाची असू शकते. याउलट दुसरी मुलगी दिसायला सर्वसाधारण आणि सामान्य व्यक्तिमत्त्वाची असू शकते. अशा वेळी आईवडील प्रत्येक बाबतीत गुणवान आणि सुंदर मुलीचे कौतुक करू लागतात.
बहिणींमधील ही स्पर्धा अनेकदा लहानपणापासूनच जन्माला येते. लहानपणी कधी दिसण्यावरून, कधी आईला कोण जास्त आवडते तर कधी कोणाचे कपडे, खेळणी जास्त चांगली आहेत, यासारख्या गोष्टी स्पर्धेचे कारण बनतात. मोठे झाल्यावर सासरचे लोक चांगले आहेत की वाईट, आर्थिक सुबत्ता, जोडीदार कसा आहे, अशा गोष्टींवरुनही मत्सर किंवा स्पर्धा निर्माण होते.
पालकांनी भेदभाव करू नये
पालकांकडून नकळत होत असलेल्या भेदभावामुळे बहिणी आपापसात स्पर्धा करू लागतात. एकमेकांबद्दल मत्सर आणि वैर वाढू लागतो. हा द्वेष स्पर्धेच्या रूपात येतो आणि स्वत:ला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याची एकही संधी सोडत नाही.
याउलट सर्व मुलांना समान वागणूक दिली आणि कोणीही कोणापेक्षा कमी नाही हे लहानपणापासूनच त्यांच्या मनात बिंबवले तर त्यांच्यात अशी स्पर्धा निर्माण होत नाही. दोघींनाही सुरुवातीपासून समान संधी आणि समान प्रेम दिले तर स्पर्धा करण्याऐवजी त्या नेहमीच स्वत:पेक्षा बहिणीच्या आनंदाला अधिक महत्त्व देतील.
४० वर्षीय कमला सांगतात की, त्यांना २ मुली आहेत. मुलींचे वय अनुक्रमे ७ आणि ५ वर्षे आहे. छोटया-छोटया गोष्टींवरून त्या अनेकदा एकमेकींशी भांडतात. त्यांची नेहमी एकच तक्रार असते की, आई माझ्या बहिणीवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते.
वास्तविक, दोन्ही मुलींमध्ये फक्त २ वर्षांचे अंतर आहे. साहजिकच लहान मुलगी जन्माला आली की, आई तिची काळजी घेण्यात व्यस्त असायची. यामुळे मोठया मुलीला आईचे लक्ष आणि प्रेम मिळू शकले नाही, जे तिच्यासाठी खूप महत्त्वाचे होते.
दोन मुलींमध्ये वयाचे अंतर एवढे कमी असताना दोघींकडे समान लक्ष देणे कठीण होते.
दररोज आपल्या मांडीवर बसून आपल्या मोठया मुलाशी प्रेमाने बोलण्यास विसरू नका. त्यामुळे त्याला एकाकी वाटणार नाही.
स्पर्धेकडे सकारात्मक पद्धतीने पाहा
बहिणी, भावंडांची आपापसात स्पर्धा असणे चुकीचे नाही. अनेकदा माणसाची प्रगती किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा स्पर्धेच्या भावनेमुळे होतो. एक बहीण अभ्यास, खेळ, स्वयंपाक किंवा इतर कोणत्याही बाबतीत पुढे असेल किंवा जास्त चपळ असेल तर दुसरी बहीण कुठेतरी न्यूनगंडाची शिकार होते.
नंतर प्रयत्न केल्यावर, ती करिअरसाठी दुसरे कोणते तरी क्षेत्र निवडते, पण ती नक्कीच पुढे जाऊन दाखवते. साहाजिकच तिच्या आयुष्याला योग्य दिशा लाभते. त्यामुळे स्पर्धेकडे नेहमी सकारात्मक पद्धतीने पाहाणे गरजेचे असते.
नात्याला झळ बसू देऊ नका
दोघी बहिणींमध्ये स्पर्धा असेल तर तुम्ही ती कशी हाताळता हे महत्त्वाचे ठरते. तुमचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे, हे पाहा. स्पर्धा सकारात्मक पद्धतीने घ्या आणि तुमच्यातील नाते कधीही बिघडू देऊ नका. लक्षात ठेवा २ बहिणींचे नाते खूप खास असते.
जर तुमच्या बहिणीशी असलेले तूमचे नाते बिघडले असेल तर तुमच्या मनात राहणारी पोकळी कधीच भरून निघणार नाही, कारण बहिणीची जागा कधीच मित्र किंवा नातेवाईक घेऊ शकत नाही. बहीण ही बहीण असते. त्यामुळे नात्यात निर्माण होणाऱ्या या स्पर्धेला इतके महत्त्व कधीच देऊ नका की, त्यामुळे नाते दुखावले जाईल.