* रिता कुमारी

जुन्या समजुतीनुसार मुलीचे लग्न झाल्यावर आई-वडील तिच्याबाबतच्या जबाबदारीतून अंग झटकत असत. त्यावेळी मुलीची आई इच्छा असूनही मुलीसाठी काही करू शकत नव्हती. पती-पत्नीमधील तणावाचे कारण मुलाची आई मानली जायची, पण आधुनिक युगात आईवडिलांचा मुलीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. बहुतेक घरांमध्ये पतीवर पत्नीचे वर्चस्व दिसून येते. त्यामुळे मुलीच्या सासरच्या घरात घडणाऱ्या प्रत्येक छोटया-छोटया गोष्टीत तिच्या आईचा हस्तक्षेप वाढू लागला आहे.

आजकालच्या मुलींचे तर काही विचारूच नका. त्या त्यांच्या घरातले सर्व काही त्यांच्या आईला फोनवर सांगतात. लहानसहान भांडणे किंवा दुरावा जो काही वेळाने स्वत:हून सुटतो, त्याबद्दलही त्या आईला सांगतात. त्यांच्या आई-वडिलांना मात्र हे समजताच वाद निर्माण होतो.

सुनेचे कुटुंबीय विशेषत: तिची आई तिला समजून घेण्याऐवजी सासरच्या मंडळींना जाब विचारू लागते, ज्याला मुलाचे घरचे लोक त्यांच्या इज्जतीचा प्रश्न समजतात आणि हे सर्व मुलाच्या कानावर घालून त्याला मध्ये बोलण्यासाठी भाग पाडतात. सासरच्या लोकांकडून संसारात होणारा हस्तक्षेप पतीला आई-वडिलांकडून समजल्यावर तो संतापतो आणि हा आपल्या आई-वडिलांचा अपमान मानून पत्नीशी भांडण करतो. दुसरीकडे, पत्नीही तिच्या आई-वडिलांच्या सांगण्यावरून त्यांच्या सन्मानासाठी पतीसोबत वाद घालते. आई-वडिलांच्या भांडणाच्या राजकारणात पती-पत्नीमध्ये विनाकारण भांडण, तणाव वाढत जातो.

छोटया-छोटया गोष्टींचा बाऊ करणे

प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांचे लग्न करतात तेव्हा त्यांना त्यांचा सुखी संसार बघायचा असतो, तरीही स्वत:मधील दूरदर्शीपणाच्या अभावामुळे ते स्वत:च्याच मुलांचे आयुष्य उद्धवस्त करतात. आजकाल मुलीच्या आईला वाटते की, माझी मुलगी जावयाइतकेच कमावते आहे, मग कोणाचे कशासाठी ऐकायचे? त्यांचा असा विचार करणे योग्य आहे, चुकीच्या गोष्टीला विरोध केला पाहिजे, अत्याचार सहन करता कामा नये, पण अत्याचार किंवा चुकीची गोष्ट घडली असेल तरच असा विचार करणे योग्य ठरते.

अनेकदा लहानसहान गोष्टींचा बाऊ केला जातो. प्रत्येक गोष्टीच्या विरोधातच बोलले पाहिजे असे नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर मोठयांचा अपमान करण्याऐवजी तुम्ही शांतपणे बोला आणि समजून घ्या. मी कोणापेक्षा कमी नाही, मीही तितकेच कमावते, मी जे बोलते तेच योग्य आहे, असे बोलून उगाचच वाद घालणे चुकीचे ठरते.

मुलींमध्ये अशी वाढती मनमानी म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य नव्हे तर त्यांच्यातील अहंकार ठरतो. शांततेच्या मार्गानेही कोणत्याही गोष्टीला विरोध होऊ शकतो. मुलीनेही समजून घेतले पाहिजे की, सासर हेच आता तिचे घर आहे आणि घराच्याही स्वत:च्या अशा काही मर्यादा असतात.

विनाकारण बोलणे

माझ्या शेजारी निवृत्त बँक कर्मचारी राहतात. त्यांचा मुलगा सरकारी कार्यालयात मोठया पदावर कार्यरत आहे. त्यांची सूनही मुलाच्या कार्यालयातच काम करते. नुकताच त्यांना नातू झाला. कोरोनाचा काळ असल्यामुळे त्यांनी फक्त जवळच्या लोकांनाच बारशाला बोलावले.

मुलाची आत्ये मुलगा झाल्याने सुनेचे अभिनंदन करत म्हणाली की, ‘‘बाळ वेळेआधीच जन्माला आल्यामुळे खूपच अशक्त आहे. असे वाटते की, सून कोल्ड्रिंक्स आणि फास्ट फूड जास्त खात असावी, त्यामुळेच बाळ वेळेआधीच जन्माला आले.’’

लगेचच मुलाची आई म्हणाली, ‘‘नाही… असे काहीच नाही ताई… कधी कधी असे घडू शकते.’’

शेजारी बसलेल्या सुनेच्या बहिणीने हे ऐकले. त्यावर लगेच प्रतिक्रिया देत ती म्हणाली, ‘‘ज्याच्या मनात जे येईल ते तो बोलतो ही चांगली गोष्ट आहे. ताई, तू याला विरोध का करत नाहीस, किती दिवस असे कुढत जगत राहाणार?’’

सुदैवाने तोपर्यंत आत्ये शेजारच्या खोलीत निघून गेली होती.

लगेच सुनेची आई म्हणाली, ‘‘कोणाला काही विचारायचेच असेल तर मला विचारा, जावयाला विचारा, पण माझ्या मुलीचा उगाचच असा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ती काही गरीब मुलगी नाही, ती अडाणी नाही. जावयाइतकेच कमावत आहे.’’

हे ऐकून मुलाची आई धावतच तेथे आली, ‘‘काहीही बोलू नका, ती घरात सर्वात मोठी आहे. तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते नंतर माझ्याशी बोला.’’

लगेच सून म्हणाली, ‘‘माझी आई काय चुकीचे बोलली जे तुम्ही तिला गप्प करत आहात?’’

लगेचच बहीणही मध्ये बोलली, ‘‘या सर्वात मोठी चूक भाओजींची आहे. ते त्यांच्या आत्येला का विचारत नाहीत की त्या उगाचच निरर्थक का बोलतात?’’

लगेच मुलाची आई म्हणाली, ‘‘माझ्या मुलाच्या वडिलांची त्यांच्या बहिणीला प्रश्न विचारण्याची हिंमत नाही. मग माझा मुलगा तिला काय विचारणार? आमच्या घरात आम्ही मोठयांशी उद्धटपणे बोलत नाही.’’

चुकीचा सल्ला कधीच नाही

समुपदेशक वंदना श्रीवास्तव यांच्या मते, मुलीच्या सासरच्या छोटया-छोटया गोष्टींमध्ये आई-वडिलांचा हस्तक्षेप आणि मुलाच्या आई-वडिलांचा अवास्तव राग तसेच अतिरेकी हट्टीपणामुळे आज कुटुंबं वेगाने दुभंगत आहेत. वंदना यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे बहुतेक अशीच प्रकरणे येतात, ज्यात आईच्या चुकीच्या सल्ल्यामुळे मुलींचा संसार तुटण्याच्या मार्गावर असतो.

माझ्या शेजारी सिन्हा साहेब राहातात. त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न मोठया थाटामाटात केले. ते सुनेला मुलीप्रमाणे वागवायचे. सूनही खूप आनंदी होती आणि अपेक्षेप्रमाणे सगळयांशी खूप छान वागत होती.

महिनाभरानंतर मुलगा सुनेसोबत दिल्लीला परतला. तो तिथे काम करायचा. सूनही तिथेच नोकरीला होती. ती गरोदर राहिल्यावर मुलाने आईला त्यांच्याकडे राहायला बोलावले, पण सुनेच्या आईला हे पटले नाही. आतापासूनच मुलाकडे राहून काय करणार? वेळ आल्यावर बघून घेऊ, असे सांगून ती मुलाच्या आईला घरी परतण्याचा सल्ला देत राहिली. मुलीच्या सासूने सल्ला न ऐकल्यामुळे अखेर ती मुलीला समजावू लागली की, तुझ्या सासूच्या मनात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे, तिच्या हातचे काही खाऊ नकोस.

मुलाच्या आईला हे समजताच तिने तेथून जाण्याचा निर्णय घेतला, पण मुलाने बरीच विनवणी केल्यामुळे तिला तिथे थांबवेच लागले. मुलगा झाला तेव्हा सुनेची आईही आली. ती आजीला बाळाला हात लावायला देत नसे. आई आल्यानंतर सुनेचे वागणे बदलू लागले. साधीभोळी सासू तिला मूर्ख वाटू लागली. आपल्या आईची साथ देऊन ती सासूशी वाईट वागू लागली. त्यानंतर अचानक आईसोबत माहेरी निघून गेली.

आपल्या मुलीला आनंदी बघायचे असेल तर विशेषत:मुलीच्या आईने तिला चांगला सल्ला दिला पाहिजे, जेणेकरून तिच्या मुलीचे तिच्या सासरच्या लोकांशी नाते घट्ट व्हावे, तिच्या चांगल्या वागण्याने ती सर्वांची मने जिंकू शकेल, सर्वांचे प्रेम आणि आदर मिळवू शकेल. आईचा विजय तेव्हाच होतो जेव्हा मुलीच्या सासरच्यांना तिचा अभिमान वाटतो. असे झाले तरच त्यांची मुलगी स्वत: शांततेने राहील आणि इतरांनाही शांततेत जगू देईल.

मुलाच्या आई-वडिलांनीही मुलीच्या सासरकडील नातेवाईकांच्या बोलण्याला आपल्या आदराचा मुद्दा बनवता कामा नये आणि लहानसहान गोष्टींवरून मुलीचा संसार मोडू नये याची काळजी घ्यायला हवी अन्यथा आई-वडिलांच्या अहंकाराच्या लढाईत विनाकारण मुलांचे घर तुटत राहील.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...