दिर्घ कथा * राकेश भ्रमर
एखाद्याला विसरायला दहा वर्षांचा काळ तसा कमी नसतो. पण आठवणीत कडवटपणाचं विष भिनलेलं असेल तर मात्र विसरणं तेवढंसं सोपं नसतं. गेली दहा वर्षं डॉ. आशीष हे विष पित होता. आता कुठं तोंडाचा कटवटपणा जरा कमी झाला होता, तेवढ्यात विषाचं प्रमाण दुप्पट झालं.
दुपारी दीडचा सुमार. यावेळी डॉक्टर क्लिनीक बंद करतात. पण अजून एक पेशंट उरला होता. त्यांनी त्या पेशंटला आत पाठवायला सांगितलं अन् शेजारच्या स्टुलावरचा पेपर बघायला सुरूवात केली.
पेशंट दार उघडून आत आल्यावरही त्यांची नजर पेपरवरच होती. त्यांनी एका हातानं पेशंटला बसायची खूण केली अन् पेपर बाजूला करून पेशंटकडे बघितलं अन् ते एकदम दचकले.
डोळ्यापुढे काजवे चमकल्याचा भास झाला. चेतना लुप्त झाल्यासारखी वाटली. चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्य...ते पापणी न हलवता समोर बसलेल्या स्त्रीकडे बघत होते. मग भानावर येत त्यांनी म्हटलं, ‘‘तू...? म्हणजे तुम्ही?’’
स्थिर आवाजात ती म्हणाली, ‘‘होय, मीच.’’ तेवढं बोलून ती गप्प बसली अन् टक लावून डॉक्टरांकडे बघत राहिली. दोघंही एकमेकांकडे बघत होती. डॉक्टर आशीषला पुढे काय बोलावं ते सुचेना.
थोडा वेळ असाच गेल्यावर डॉक्टरांनी आपल्या डोक्यातील निरर्थक विचार परतवून लावत स्वत:ला संयत केलं अन् मग व्यावसायिक डॉक्टरप्रमाणे प्रश्न केला, ‘‘बोला, काय त्रास होतोय तुम्हाला?’’
आशीषच्या या प्रश्नावर ती स्त्री जरा बावरली. किंचित कापऱ्या आवाजात म्हणाली, ‘‘मला काही आजार नाहीए, मी फक्त तुम्हाला भेटायला आले आहे. एरवी तुमची भेट होणं शक्य नव्हतं. म्हणून पेशंट होऊन आले. माझं काही म्हणणं आहे, ते ऐकून घेण्यासाठी थोडा वेळ काढला का?’’ तिच्या स्वरात याचना होती.
डॉक्टर अत्यंत सज्जन व सहृदयी होते. क्वचित कधी चिडले असतील. चुकीच्या गोष्टींचा संताप आला तरी ते तो राग दाखवत नसत. टोकाच्या प्रतिक्रिया कधी देत नसतं. आजही त्या स्त्रीला बघून ते अस्वस्थ झाले. जुन्या आठवणी, कडू जहर विषासारख्या त्रास देऊ लागल्या. पण त्या स्त्रीचा त्यांना राग आला नाही. खरं तर याच स्त्रीनं दहा वर्षांपूर्वी त्यांचं आयुष्य विषाक्त करून सोडलं होतं. अजूनही ते विष ते घोट घोट पचवताहेत.