* गरिमा पंकज
नवीन वर्ष, नवी पहाट, नवीन इच्छा आणि सर्वात सुंदर दिसण्याची इच्छा. भलेही सोहळा कोणताही असो आणि पार्टी कुठेही असो, सर्वांत सुंदर दिसावे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. काही मुलींना निसर्गानेच अतुलनीय सौंदर्य दिलेले असते तर काहींना त्यांच्या शारीरिक कमतरतांशी तडजोड करावी लागते. या उणीवा दूर करण्याच्या किंवा त्याहूनही सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात अनेकदा त्यांना मोठा फटका बसतो.
तुम्हीही या नवीन वर्षात स्वत:ला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न जरूर करा, पण अतिशयोक्ती नकोच. याचा अर्थ असा की, आपल्या नैसर्गिक सौंदर्याशी अशा प्रकारे छेडछाड करू नका की, त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होईल.
अशा अनेक नोकऱ्या किंवा काम असते जिथे महिलांना नीटनेटके दिसणे गरजेचे असते आणि याच नादात त्यांना त्यांच्या आरोग्याशी तडजोड करावी लागते. उदाहरणार्थ, हवाई सुंदरींना अनेकदा १२ तासांपेक्षा जास्त काळ उंच टाचांच्या चपला घालाव्या लागतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळेच नुकताच एक निर्णय घेण्यात आला, त्यानुसार, युक्रेनच्या स्काय अप एअरलाइन्सच्या महिला क्रु मेंबर्स आता पेन्सिल स्कर्ट, हाय हिल्स आणि ब्लेझरऐवजी आरामदायी ड्रेस पँट, सूट आणि स्नीकर्समध्ये दिसतील.
अशाच प्रकारे अभिनेत्रींना तासन्तास पूर्ण मेकअपमध्ये राहावे लागते, त्यामुळे त्यांचा चेहरा खराब होतो. करीना कपूरचाच चेहरा घ्या, अलीकडच्या काळात तिचे असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये तिचा चेहरा मेकअपशिवाय खूपच खराब दिसत आहे. इतर अनेक अभिनेत्रींसोबतही असेच घडले आहे. वास्तविक, वर्षानुवर्षे सतत मेकअप केल्यामुळे त्वचेचे नुकसान होते.
अशाच प्रकारे ब्रेस्ट इम्प्लांटसारख्या कृत्रिम सौंदर्यामुळेही अनेकदा महिलांचे आरोग्य बिघडते. कधी महिला जाणूनबुजून तर कधी वर्क कल्चरमुळे पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्वत:ला अधिक सुंदर, आकर्षक आणि कामुक बनवतात. सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी मुली काहीही करायला तयार असतात.
काही शस्त्रक्रियांवर करोडो रुपये खर्च करतात तर काही अनेक प्रकारच्या क्रीम्स आणि औषधे खरेदी करतात. स्वस्तच्या नादात अनेक मुली स्वत:चे खूप नुकसान करून घेतात. अनेकदा आधीच सुंदर असलेल्या अनेक मुली अधिक सुंदर दिसण्याच्या नादात आपला चेहरा आणि आयुष्य उद्धवस्त करून घेतात.