* डॉ. पी. के मल्होत्रा
पावसाळयाच्या दिवसांत थोडे जरी बेफिकीर राहिलात, तरी तुम्ही अॅलर्जी आणि इन्फेक्शनचे शिकार होऊ शकता. पावसाळा सुरू होताच, अनेक आजार आपल्यावर हल्ला करतात. त्याचबरोबर, त्वचा आणि डोळयांसंबंधी विकार डोके वर काढतात.
स्किन इन्फेक्शन
पाऊस सुरू होताच सर्वप्रथम त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होतो. या काळात वातावरणात आर्द्रता अर्थात ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे बॅक्टेरिया, वायरस, फंगस वेगाने वाढू लागतात आणि हे त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेला इन्फेक्शन होतं. अर्थात, या दिवसांत त्वचेला सर्वाधिक संक्रमणाची भीती कोणापासून असेल, तर ते आहे फंगस. पावसाळयाच्या दिवसांत सर्वात जास्त फंगस म्हणजेच शेवाळामुळे त्वचेला आजाराचं संक्रमण होते. अशा वेळी अनेक प्रकारचे स्किन डिसीझ होण्याची शक्यता असते.
रेड पॅच किंवा लाल चट्टे
फंगल इन्फेक्शनमुळे त्वचेला खासकरून काख, पोट आणि जांघांचे सांधे, तसेच स्तनांखाली गोल, लाल रंगाचे पपडी निघणारे चट्टे दिसू लागतात. त्यांना खूप खाज येते.
या समस्येपासून वाचण्यासाठी काख, ग्रोइन व शरीराच्या ज्या भागांमध्ये सांध्यांचा जोड आहे, तिथे अँटिफंगल पावडर लावा, जेणेकरून घाम आणि ओलावा एकत्र होणार नाही. वाटल्यास, मेडिकेटेड पावडरचा वापर करा.
हीट रॅशेज
या मोसमात जास्त घाम येतो, त्यामुळे त्वचेची रोमछिद्रं म्हणजेच स्किन पोर्स बंद होतात. त्यामुळे त्वचेवर लाल फोडया म्हणजेच घामोळं येतं. त्याला खूप खाज तर येते व जळजळही होते.
अशा वेळी प्रिकली हीट पावडर लावा, सैल आणि सुती कपडे वापरा. त्वचेच्या स्वच्छतेबाबत पूर्णपणे काळजी घ्या. घामोळे आलं असेल, तर कॅलामाइन लोशनचा वापर करा. त्यामुळे खाजेपासून आराम मिळेल.
पायांचे इन्फेक्शन
फंगल इन्फेक्शनमुळे पायांच्या बोटांमधील पेरांना संक्रमण होतं. खरं तर या मोसमात उघडया पायांनी ओल्या फरशीवर चालल्यास किंवा जास्त काळ पाण्याच्या संपर्कात राहिल्यास, त्यात असलेले फंगस बोटांना संक्रमित करतात. या संक्रमणामुळे बोटे लाल होऊन सुजतात आणि त्यांना खाज येऊ लागते. या संक्रमणामुळे रुग्णाला चालणंही कठीण होतं. या संक्रमणामुळे अनेकदा अंगठयांची नखं म्हणजेच टो नेल्स आणि इतर बोटांची नखंही संक्रमित होतात. या संक्रमणामुळे नखं खराब तर दिसतातच, शिवाय ती कमजोर होतात.