हे तर तुम्हीही करू शकता

* नसीम अंसारी कोचर

दिल्ली, मुंबई, बंगळुरुसारख्या महानगरांमध्ये स्थायिक झालेल्या मध्यम व उच्च वर्गातील विभक्त कुटुंबांची संख्या सतत वाढत आहे. अशा कुटुंबातील महिलांकडे शिक्षण, वेळ आणि पैशांची कमतरता नाही. नवरा कामावर आणि मुले शाळेत गेल्यावर त्यांच्याकडे खूप मोकळा वेळ असतो. याच मोकळया वेळेचा, शिक्षण आणि स्वत:मधील क्षमतेचा वापर करुन बऱ्याच महिलांनी मोठमोठे व्यवसाय सुरू केले आहेत. अशाप्रकारे, त्यांनी पैसे कमावण्यासाठी पतीची मदत तर केलीच, सोबतच घरी राहून आणि घरातील कुठल्याही कामाकडे दुर्लक्ष न करता, कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून आपल्या मोकळया वेळेचाही सदुपयोग केला.

जेवणाने मिळवून दिला रोजगार

दिल्लीच्या कैलास कॉलनीत राहणाऱ्या सरन कौर ६० वर्षांच्या आहेत. त्यांना ३ मुलगे आहेत. तिघेही आता सेटल झाले आहेत. मुलांचा अभ्यास, नोकरी आणि लग्न लावून देण्यामागे सरन कौर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पंजाबमध्ये लग्न झाल्यानंतर त्या दिल्लीत आल्या. नवऱ्याला नोकरी नव्हती. घरामधील पुढच्या खोलीत त्यांनी किराणा दुकान सुरू केले. त्यावेळी सरन कौर यांच्या कुटुंबात नवरा, सासू, दीर आणि वहिनी असे सर्वजण होते.

पुढे सरन कौर यांना मुले झाली. कुटुंब मोठे होत गेले तसे किराणा दुकानातून मिळणाऱ्या पैशांतून घरखर्च चालवणे कठीण होऊ लागले. तेव्हा सरन कौर यांनी नवऱ्याला घर चालवायला मदत करायचे ठरविले. त्यांना स्वयंपाक करायची आवड होती. पंजाबी खाद्यपदार्थ बनवण्यात तर त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे त्यांनी कैलास कॉलनीच्या पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांची यादी मिळविली. त्यानंतर मुले दुसऱ्या शहरात किंवा परदेशात स्थायिक झाल्यामुळे जे वृद्ध एकाकी पडले होते आणि ज्यांना वयोमानुसार स्वयंपाक करणे शक्य नव्हते, अशा वृद्धांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली.

यातील बरेचसे ज्येष्ठ नागरिक हॉटेलमधून जेवण मागवत होते किंवा नोकरांनी शिजवलेल्या अन्नावर दिवस कंठत होते. सरन कौर यांनी त्यांना अत्यल्प दरात घरुन जेवण पाठवून देईन, असे सांगितले. हळूहळू कॉलनीतील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी सरन कौर आपल्या घरी बनवलेले ताजे आणि गरमागरम जेवण पोहचवू लागल्या. त्यांच्या हातच्या जेवणाचे कौतुक होऊ लागले. त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्याकडे ग्राहकांची संख्या वाढू लागली आणि यातून भरपूर पैसा मिळू लागला.

आज सरन कौर यांच्यकडे एक मोठे स्वयंपाकघर आहे, जिथे १०-१२ नोकर काम करतात, जे दररोज सुमारे ३०० डबे तयार करतात. डिलिव्हरी बॉय आहे, जो वेळेवर ग्राहकांना डबे नेऊन पोहाचवतो. आता सरन कौर यांच्या ग्राहकांमध्ये केवळ वृद्ध लोकच नाहीत, तर इतर शहरांमधून येणारे आणि येथे पेईंगगेस्ट म्हणून राहणारे तसेच ऑफिसमध्ये काम करणारे लोकही आहेत. या ग्राहकांना हॉटेल किंवा खाद्यपदार्थांच्या गाडयांवरचे मसालेदार आणि सोडा मारलेले जेवण जेवण्याऐवजी घरात बनवलेला भातडाळ, भाजी, चपाती, कोशिंबीरी, दही जास्त चविष्ट, पौष्टिक वाटते.

गुड अर्थगुड जॉब

दिल्लीच्या छतरपूर येथील एका फार्म हाऊसमध्ये सुरू झालेल्या ‘गुड अर्थ’ कंपनीचे वर्कशॉप पाहून मी थक्क झाले. या कंपनीने स्वत:ची ओळख स्वत:च तयार केली आहे. येथे तयार होणाऱ्या वस्तू सुंदरता, कलात्मकता आणि महागडया किंमतीमुळे श्रीमंत वर्गांत खूपच लोकप्रिय आहेत.

‘गुड अर्थ’च्या मालक अनिता लाल या अशा मोठया उद्योगपतींपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या छंदालाच आपला व्यवसाय बनवून स्वत:मधील सर्जनशीलतेला नवीन आयाम तर दिलाच, सोबतच शेकडो महिलांसाठी रोजगाराचा मार्गही खुला करुन दिला. त्यांच्यातील आवड, धैर्य, जिद्द आणि काहीतरी नवीन करण्याच्या ध्यासाने तसेच त्यांच्यातील प्रतिभेने ‘गुड अर्थ’सारख्या कंपनीचा पाया रचला.

आज देशभरातील ‘गुड अर्थ’च्या सर्व शोरूममध्ये विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू, कपडे, दागिने इत्यादींची विक्री होते. या वस्तूंवरील लक्षवेधी कलाकृती, कोरीव काम, आकर्षक रंगसंगती, नजाकतीने केलेले नक्षीकाम हे या वस्तू, कपडे, दागिने बनवणाऱ्या महिलांच्या उच्च सर्जनशीलतेची ओळख करुन देतात.

‘गुड अर्थ’च्या वस्तूंवर मुघलकालीन चित्रकला, राजस्थानी लोककला, लखनौ आणि काश्मिरी भरतकामाचा जे अतिशय सुंदर नजारा पहायला मिळतो, त्यामागेच कारण हे अनिता लाल यांना देशातील विविध परंपरागत कलेबाबत असलेली ओढ, प्रेम हेच आहे. भारतातील कलात्मक वारसा जिवंत ठेवून आणि त्याला नव्या रंगात सादर करुन पुढे घेऊन जाणाऱ्या अनिता लाल यांनी २० वर्षांपूर्वी हा व्यवसाय तेव्हा सुरू केला जेव्हा स्वत:च्या मुलांना त्यांनी आयुष्यात सेटल केले होते. मुले आणि कुटुंब यांना त्यांनी आपल्या जीवनात सर्वाधिक प्राधान्य दिले.

सुरुवातीपासूनच त्या स्वतंत्र विचारांच्या होत्या. त्यांची स्वत:ची अशी एक विचारसरणी होती, क्षमता होती आणि कौशल्यही होते. आईवडिलांचा पाठिंबा त्यांना सतत मिळाला. स्वत:चे शिक्षण, क्षमता आणि कौशल्यानुसार जे काही करायचे आहे ते करण्याचे स्वातंत्र्य त्यांना घरातून मिळाले होते.

त्या सांगतात की, ‘‘घरात कोणीही जुनाट विचारांचे नव्हते आणि आम्हा मुलींनाही मुलांप्रमाणे शिक्षण, प्रेम आणि संगोपन मिळाले, त्यामुळे माझ्या कामात कधीच कुठला अडथळा आला नाही. माझ्या कुटुंबाकडून मिळालेले प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज मी एक यशस्वी उद्योजक आहे.’’

अनिता सांगतात, ‘‘आम्ही आमच्या महिला कामगारांसाठी कधीही कोणतेच कठोर नियम केले नाहीत. त्या त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या कामाचे तास स्वत:च ठरवतात. येथे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा आणि स्वातंत्र्य आहे. मला असे वाटते की, स्त्रीची पहिली जबाबदारी तिचे घर आणि मुले आहेत. मीसुद्धा माझी मुले मोठी झाल्यानंतरच माझा स्वत:चा व्यवसाय सुरू केला. म्हणूनच, ‘गुड अर्थ’मध्ये काम करणाऱ्या कोणत्याही महिलेसाठी तिचे घर हेच पहिले प्राधान्य आहे.

‘‘माझा विश्वास आहे की, जीवनही चांगल्या प्रकारे जगता यावे आणि कामही नीट करता यायला हवे. यासाठी महिलांनी मानसिकदृष्टया तणावमुक्त असणे गरजेचे आहे. आपण त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी मिळून प्रयत्न केले तरच त्या तणावमुक्त राहू शकतील.

सरन कौर, अनिता लाल यांच्यासारख्या स्त्रियांकडे पाहिल्यानंतर असे निश्चितच म्हणता येईल की, सशक्त आणि सकारात्मक विचारसरणीच्या स्त्रिया या स्वत: तर सक्षम होतातच, सोबतच इतरांनाही सक्षम बनवत आहेत.

स्त्री सक्षमीकरणामुळे केवळ एक कुटुंबच नाही तर समाज आणि राष्ट्रही सक्षम होते. महानगरांमध्ये विभक्त कुटुंबात राहणाऱ्या अशा कितीतरी स्त्रिया आहेत, ज्यांचाकडे भरपूर मोकळा वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करुन त्या आपले शिक्षण, छंद आणि स्वत:मधील क्षमतेला जगासमोर आणू शकतात आणि त्याद्वारे कुटुंब, समाज आणि देशाला अनमोल असा ठेवा आपल्या कार्यातून देऊ शकतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें