मूल रडतंय का…

* डॉ. परिणीता तिवारी

लहान मूल अनेक कारणांमुळे रडत असतं. त्याच्यामध्ये इतकी क्षमता नसते की ते आपल्याला काय त्रास होतोय हे मोठ्यांना सांगू शकेल. म्हणूनच ‘रडणं’ हाच एकमेव उपाय दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी त्याच्याकडे असतो. सर्व आईवडिलांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा की त्यांचं बाळ का रडत आहे? त्याच्या रडण्याचं कारण काय आहे? त्याला काय सांगायचं आहे, कधीकधी हे समजून घेणं खूपच कठीण होतं. खासकरून जेव्हा प्रथमच कुणी जोडपं आईवडील झालेले असतात.

खरंतर ‘रडणं’ हा मुलाच्या जीवनाचा एक भागच असतो. लहान बाळ तर दिवसाला किमान दोन तास रडतं आणि हे प्रमाण दिवसागणिक वाढत जातं किंवा कमी कमी होत जातं. मूल जन्माला आल्यापासून ते पुढील सहा महिन्यांपर्यंत दिवसाला २-३ तास तरी हमखास ते रडत राहातं, मग तुम्ही त्याची कितीही काळजी घ्या. ६ महिन्यांनंतर मुलाचं रडणं कमी होऊन ते दिवसात फार तर एखादं तासच रडतं. हळूहळू आईला आपल्या बाळाच्या गरजा समजू लागतात तेव्हा ती बाळाच्या गरजा वेळीच पूर्ण करू लागते तेव्हा बाळाचं रडणं आणखीनच कमी होतं.

अनेक कारणं आहेत रडण्याची

भूक लागणे : जेव्हा बाळ रडू लागतं तेव्हा त्याला भूक लागली असावी ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात येते, परंतु हळूहळू आई आपल्या बाळाची लक्षणं ओळखू लागते तेव्हा ती बाळाला रडण्याआधीच खायला देऊ लागते. जेव्हा बाळ भुकेलं असतं तेव्हा ते रडू लागतं, कुणाकडे जायलाही तयार नसतं, सतत तोंडामध्ये हात घालत राहातं.

डायपर खराब होणे : अनेक मुलं रडून हे सांगत असतात की त्यांचं डायपर बदलण्याची गरज आहे, तर काही मुलं अशीही असतात जी अस्वच्छ डायपरमध्येही राहातात. म्हणूनच वेळोवेळी डायपर तपासत राहा.

झोप येणं : नेहमी आपल्याला असं वाटतं की मुलं किती नशीबवान आहेत जी थकल्यावर किंवा झोप आल्यावर जेव्हा हवं तिथे झोपू शकतात. पण तसं नाहीए. मुलालादेखील झोपण्यासाठी आरामदायी आणि शांत जागेची गरज असते. जर असं झालं नाही तर मुलं रडू लागतात, त्रस्त होतात, चिडचिडी होतात आणि खासकरून जेव्हा ते फार थकलेले असतात.

कडेवर उचलून घेणं : लहान मुलाला आईवडिलांनी उचलून घेतलेलं खूप आवडतं. त्याला आई जेव्हा उचलून घेते तेव्हा ते खूपच आनंदित होते. मुलाला उचलून घेतलं की त्यांचं हसणं-खिदळणं ऐकू येतं, त्याच्या हृदयाची धडधड जवळून जाणवते. इतकंच काय, मूल आपल्या आईचा गंधदेखील ओळखू लागतो. लहान बाळांसाठी रडणं हे केवळ उचलून घेण्यासाठीचं कारण असतं.

पोटाचा त्रास : मूल रडण्याचं आणखी एक कारण पोटदुखीही होऊ शकतं. सर्वसाधारणपणे पोटाच्या त्रासामुळे मूल दिवसातून कमीत कमी ३ तास तरी रडतं आणि जर वेळेवर उपचार झाले नाहीत तर त्याचं रडणं अधिकच वाढतं. जर मुलाने खाल्ल्यानंतर त्वरित उलटी केली किंवा अधिकच ते रडू लागलं तर याचा अर्थ असा आहे की मुलाच्या पोटात दुखत आहे. अशावेळी मुलाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जावं.

दुधाचं पचन होण्यासाठी : जर मुलाने दूध प्यायल्यानंतर लगेचच रडायला सुरुवात केली तर याचा अर्थ त्याला व्यवस्थितपणे दुधाचं पचन झालेलं नाही आणि त्याला ढेकर येण्याची गरज आहे. म्हणून मूल दूध प्यायलाबरोबर लगेचच त्याला झोपवू नका; कारण काही मुलं दुधासोबत हवाही पोटात घेतात. यामुळे पोटात दुखू लागतं आणि ती रडू लागतात.

खूप थंडी अथवा गरमी : काही वेळा मूल अधिक थंडी किंवा गरमीच्या त्रासानेही रडू लागतं. जेव्हा आई आपल्या मुलाचं डायपर बदलत असते किंवा स्वच्छ करत असते तेव्हा मुलाच्या रडण्याचं हेच कारण असतं.

एखादी लहानशी गोष्ट : मुलाला एखाद्या लहानशा गोष्टीचाही त्रास होऊ शकतो आणि आपल्याला ते सहजपणे लक्षातही येत नाही. उदा. केस, चकचकीत कपडे, आईने घातलेले दागिने, कपड्यांवर लावलेला स्टीकर किंवा टॅग इत्यादी. काही मुलं अधिक संवेदनशील असतात, त्यांच्या शरीरावर या गोष्टींचा वाईट प्रभाव पडतो.

दात येणं : जेव्हा मुलाला दात यायला सुरुवात होते तेव्हा ते खूप रडू लागतं; कारण त्यावेळेस मुलाला खूप वेदना होत असतात. तेव्हा मूल खूपच चिडचिडंदेखील होतं. जर तुमच्या मुलाला खूपच त्रास होत असेल आणि त्याला नेमकं काय होतंय हे कळत नसेल तर त्याच्या तोंडात हात घालून पाहा, कदाचित त्याचे दात येत असतील. सर्वसाधारणपणे ४ ते ७ महिन्यांच्या दरम्यान बाळाला पहिला दात यायला सुरुवात होते.

एक लहान मूल बऱ्याच गोष्टींनी घेरलेले असतं, जसं की लाइट, आवाज, बरीचशी लोक इत्यादी. लहान मुलाला सर्व काही एकसाथ हे कळत नसतं, म्हणूनही ते रडायला लागतं. त्याला आपल्या रडण्याद्वारे हे सांगायचं असतं की मला हे सर्व त्रासदायक होतंय. काही मुलं रडून इतरांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करू पाहातात. अशा मुलांना गप्प करण्याचा एकच उपाय असतो आणि तो म्हणजे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ हसण्याखेळण्यात घालवावा, त्यांच्यासोबत खेळावं. याव्यतिरिक्त मुलाच्या रडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्याची तब्येत बिघडणं, हेदेखील असू शकतं. मुलाला कोणताही शारीरिक त्रास असेल तर तो स्वत:हून सांगू शकत नाही. उदाहरणच द्यायचं झाल्यास ताप, सर्दी, पोटदुखी याविषयी मुलाला स्वत:हून सांगता येत नाही. तापामुळे जेव्हा मूल रडू लागतं, तेव्हा त्याचं रडणं इतर सर्व कारणांमुळे रडण्यापेक्षा वेगळं असतं.

खरंतर मुलाला रडताना पाहून आईवडिलांनी आपला संयम सोडू नये. मूल का रडतंय, या गोष्टीची चिंता करत बसण्याऐवजी मुलाच्या रडण्याचं, त्याच्या त्रस्त होण्याचं कारण शोधावं. म्हणूनच अशावेळी मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेकदा मुलाच्या रडण्याचं कारण त्यांच्या मनात बसलेली भीतीही असते. आईवडिलांनी या सर्व गोष्टीही विशेष करून लक्षात घ्यायला हव्यात. त्यांनी मुलांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें