– सुधा गुप्ते
बरेच दिवसात निमाशी माझ्या फोनवर संभाषण झालं नव्हतं. अनेकदा फोन करायचं ठरवलं अन् दुसऱ्याच कुठल्यातरी कामात गुंतल्यानं फोन करणं राहून गेलं. निमा माझी लाडकी धाकटी बहीण आहे.
‘‘मावशीची काळजी करू नकोस, अगं ती चांगलीच असेल ना? म्हणून तर तिचं रडगाणं गाणारा फोन आला नाहीए…काही प्रॉब्लेम असता तर तिचा नक्कीच फोन आला असता. रडत भेकत तिनं तुला आपली अडचण सांगितलीच असती.’’ मानवनं माझ्या मुलानं हसत हसत मला टोमणा दिला. धाकट्या मानसीनं हसून त्याला अनुमोदन दिलं. तिनं त्याला हसत हसत दोन्ही हातांचे अंगठे उंचावून ‘बकअप’ केल्याचं मी बघितलं.
हल्लीची मुलं खरोखरंच हुषार अन् जागरूक आहेत. त्यांच्या वयात आम्हाला एवढी समजूत नव्हती हे मान्य करावंच लागेल. नातलगांविषयी एवढं ज्ञान आम्हाला नव्हतं. त्यांनी काहीही म्हटलं तरी आम्हाला ते खरं वाटायचं, पटायचं. शिवाय एकत्र कुटुंबात मुलांचा संबंध फक्त मुलांशीच यायचा. घरातल्या मोठ्या माणसांचे आपापसातले हेवेदावे, रागलोभ किंवा प्रेम, आदर, त्याग वगैरे आमच्यापर्यंत पोहोचत नसे. आता चार माणसांच्या कुटुंबात कुणी कपाळावर किती आठ्या घातल्या, कुणी कुणावर डोळे वटारले हे सगळ्यांच्या लक्षात येतंच.
‘‘अगं आई, काल मी मावशीला मॉलमध्ये बघितलं. कदाचित बँकेतून लवकर बाहेर पडली असेल. केवढी ढीगभर खरेदी केलेली होती? दोन्ही हातात पिशव्या मावत नव्हत्या. तिच्या दोन कलिग्जपण होत्या सोबत.’’
‘‘तुझ्याशी बोलली का?’’
‘‘नाही गं! मी थर्डफ्लोअरला होतो अन् मावशी सेकंड फ्लोअरला होती.’’
‘‘पण ती मावशीच होती कशावरून? दुसरी कुणी असू शकते. तू वरून खाली कसं बघितलंस?’’
‘‘म्हणजे काय? मी काय आंधळा आहे का? अन् वरून खालचं व्यवस्थित दिसतं. चांगली हसत खिदळत होती. तुला फोन करते तेव्हा मात्र सतत रडत असते. मला असं होतंय, माझे पैसे संपले. मला पैशांची अडचण आहे. आनंदाचे क्षण शेयर करताना तिला तुझी आठवण येत नाही अन् थोडाही प्रॉब्लेम आला की रडत तुझ्याकडे येते. अशा माणसांची काळजी कशाला करायची, सोड तिची काळजी करणं. तिचा फोन नाही आला याचाच अर्थ सगळं काही ठीकठाक चाललंय…’’
मुलाचं सडेतोड पण, खरं बोलणं मला आवडलं नाही. मी त्याला रागावून पिटाळून लावलं. विषय तिथंच संपला. पण त्यानं त्याच्या मावशीचं किती सूक्ष्म निरीक्षण केलंय याचं मला कौतुकही वाटलं. तो बोलला ते खरंच होतं. अगदी फुसक्या गोष्टींसाठी रडून भेकून गहजब करणं अन् समोरच्याला पेचात आणणं तिला छान जमतं. पण मोठ्यातला मोठा आनंद ती कधीही बोलून दाखवत नाही. म्हणते, आनंद कधी दाखवू नये. दृष्ट लागते. कुणाची दृष्ट लागते, आमची? माझी? मी तिची मोठी बहीण, आईसारखी तिची काळजी घेते. सतत तिच्या अडचणी सोडवते. आमची कशी दृष्ट लागेल? काहीतरी अंधश्रद्धा. असा कसा स्वभाव हिचा?
आता मागच्या आठवड्यातच तर सांगत होती, पैशांची फारच अडचण आहे. मार्च एंडिंग म्हटलं की पैशांची ओढाताण असतेच. थोडे पैसे देशील का? मी काटकसरीनं राहून काही पैसा शिल्लक ठेवत असते. त्यामुळे मला अशी अडचण कधी जाणवत नाही. हे पैसे मी कुणाच्याही नकळत साठवत असते. ऐनवेळी काही अडचण आलीच तर कामी यावेत हाच माझा उद्देश्य असतो. त्यातून काही पैसे तिला द्यावेत असं मी मनोमन ठरवलंही होतं. तिला दिलेले पैसे परत कधीच मिळत नाहीत हे मलाही ठाऊक आहे. चुकून माकून आलेच तर थोडे थोडे करत अन् तिच्या सोयीनं येतील. आईबाबांनी मरताना मला सांगितलं होतं की धाकट्या बहिणीला आईच्या मायेनं सांभाळ. तिला कधी अंतर देऊ नकोस. निमा माझ्याहून दहा वर्षांनी धाकटी आहे. मी तिची मोठी बहिण आहे, तरीही तिच्या अनंत चुका, मी आईच्या मायेनं पोटात घालते. तिचे अपराध माझ्या नवऱ्यापासून, मुलांपासून, जगापासून लपवून ठेवते. अनेकदा माझा नवरा मला समजावतो, ‘‘शुभा, तू फार भाबडी आहेस. बहिणीवर प्रेम कर. पण तिला स्वार्थी होऊ देऊ नकोस. ती फार आत्मकेंद्रिय आहे. तुझा विचार ती करत नाही. आईवडिलांनीच मुलांना शिकवायला हवं. चुका केल्या तर त्या दाखवून द्यायला हव्यात. गरज पडली तर कान उपटायला हवेत. तू तिला प्रत्येक वेळी पाठीशी का घालतेस? तिला समजव…रागव…’’
‘‘मी काय रागावणार? ती स्वत: शिकलेली आहे, नोकरी करतेय. लहान मुलगी थोडीच आहे ती रागवायला? प्रत्येकाचा आपापला स्वभाव असतो…’’
‘‘प्रत्येकाचा आपापला स्वभाव असतो तर तिला राहू दे आपल्या स्वभावासोबत. चूक झाली तर जबाबदारीही घेऊ दे स्वत:वर. तू तिला प्रोत्साहन देतेस, जबाबदारी घेऊ देत नाहीस हे मला खटकतं.’’
उमेश म्हणाले ते अगदी बरोबरच होतं. पण काय करू? मनाच्या एका कोपऱ्यात तिच्याकरता वेगळाच जिव्हाळा आहे. मी म्हणते ती लहान नाहीए, पण मी तिला लहान समजून तिच्या चुकांवर पांघरूण घालत असते. मी खरं तर तिला १०-२० हजार रुपये द्यायचे असं ठरवलं होतं. ती म्हणाली होती की या महिन्याचा सगळा पगार इन्कम टॅक्स भरण्यात संपला म्हणून. आता घरखर्च कसा चालणार? पण खरं तर मार्च महिन्यात इन्कम टॅक्स भरायचा असतो हे का तिला माहीत नाही. लोक आधीपासून त्यासाठी तयारी करतात. अरे, पावसाळ्याची बेगमी तर पशूपक्षीही करूनच ठेवतात ना? पावसाळ्यासाठी आपली छत्री आपणच घ्यावी लागते. लोक थोडीच तुमच्यासाठी छत्री घेऊन ठेवतील? आपलं डोकं, आपलं शरीर जर ओलं होऊ द्यायचं नाही तर आपणच प्रयत्न केला पाहिजे. उपाय शोधला पाहिजे. मला नवल वाटलं. निमाकडे पैसे नसताना तिनं मॉलमधून पिशव्या भरभरून खरेदी कशी काय केली? शॉपिंगसाठी पैसे कुठून आले?
उमेशचं म्हणणं योग्यच आहे. मीच तिला बिघडवते आहे. खरं तर मी तिचे कान उपटून तिला योग्य मार्गावर आणायला हवं. काही नाती अशी असतात की ती तोडता येत नाहीत. पण त्यांचा उपद्रव मात्र फारच होतो. आपण नातं निभवायला बघतो, पण त्याचं रूप अक्राळ विक्राळ होतं, आपल्यालाच गिळू बघतं. आता चाळीशीला आलीय निमा. कधी तिच्या सवयी बदलणार? कदाचित कधीच ती तिच्या या चुकीच्या सवयी बदलणार नाही. तिच्यामुळे अनेकदा माझ्या संसारात कुरबुरी होतात, माझी घडी विस्कटते. कुणा दुसऱ्याच्या पाय पसरण्यामुळे माझी चादर, माझं अंथरूण मला पुरत नसेल तर त्यात माझाच दोष आहे. आपल्या अंथरूणात किंवा पांघरूणात मी कुणाला कशाला शिरू द्यावं? आईवडिलांना मुलांचा कान धरून समजावण्याचा, त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा अधिकार असतोच. अर्थात् एका ठराविक वयानंतर मुलं आईबाबांना जुमानत नाहीत अन् आईवडीलही त्यांना काही सांगू धजत नाहीत हा भाग वेगळा. तरीही चूक होत असेल तर सावध करण्याचा हक्क आईबापाला असतोच.
दुपार माझा विचार करण्यात गेली अन् सायंकाळी मी सरळ निमाच्या घराच्या दिशेनं चालू लागले. मानव कोचिंगक्लासला निघाला होता. त्याला त्याच वाटेनं जायचं होतं. मी त्याला वाटेत मला निमाकडे सोडायला सांगितलं. मुद्दामच मी तिला आधी फोन केला नाही. मला दारात बघून निमा एकदम स्तब्ध झाली.
‘‘ताई…तू?’’
निमानं आश्चर्यानं विचारलं.
‘‘ताई, अगं फोन न करता कशी आलीस?’’
‘‘म्हटलं तुला आश्चर्याचा धक्का द्यावा. आत तरी येऊ देशील की नाही? दार अडवूनच उभी आहेस?’’
तिला हातानं बाजूला सारत मी आत शिरलेच. समोर कुणीतरी पुरूष बसलेला होता. बहुधा तिच्या ऑफिसमधला सहकारी असावा. टेबलावर खाण्यापिण्याच्या वस्तूंची रेलचेल दिसत होती. हॉटेलातून मागवलेलं असावं. ज्या डब्यांमधून आलेलं होतं, त्यातूनच खाणंही सुरू असावं. ही निमाची फार जुनी अन् घाणेरडी सवय आहे. अन्न व्यवस्थित भांड्यांमधून काढून ठेवत नाही. सामोसे, वडे, भजी वगैरे तर सरळ बांधून आणलेल्या कागदी पाकिटातूनच खायला लागते. आम्हालाही तसंच देते. वर म्हणते, ‘‘शेवटी जाणार तर पोटातच ना? मग उगीच भांड्याचा पसारा कशाला? धुवायचं काम वाढतं.’’
मला बघून तो पुरूषही दचकला. भांबावला. त्याला नक्कीच वाटलं असेल की निमाची बहीण अगदीच गावंढळ आहे. बेधडक घरात शिरलीय.
मी ही पक्केपणानं म्हटलं, ‘‘अगं, हे हक्काचं घर आहे माझं. फोन करून येण्याची फॉर्मेलिटी कशाला हवी होती? एकदम मनात आलं, तुला भेटावं म्हणून, तर आले झालं…का गं, तुला कुठं बाहेर वगैरे जायचं नव्हतं ना?’’
मी मानभावीपणे म्हटलं, ‘‘मध्यंतरी तू म्हणाली होतीस, तुला बरं नाहीए…म्हणून तुझ्या तब्येतीची काळजी वाटून मी आले.’’
‘‘हो…हो ना, हे माझे सहकारी विजय हेदेखील माझ्या तब्येतीची चौकशी करायला आले आहेत.’’
माझ्या प्रश्नानं तिलाही दिलासा दिला. मी तब्येतीचा विषय काढताच तिला विजयच्या तिथं उपस्थित असण्याचं कारण सांगता आलं. एरवी ती दोघंही गोंधळली होती.
माझी बहीण आहे निमा. तिचे सगळे रंगढंग, तिच्या सवयी, तिचे रागलोभ मी चांगले ओळखते. लहानपणापासूनच तिचा चेहरा बघून ती काय करणार आहे, तिच्या मनात काय आहे, तिनं काय केलंय, हे सगळं मी ओळखतेय. माझ्याहून ती दहा वर्षांनी लहान आहे अन् माझी फार फार लाडकी आहे. माझ्या वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत मी घरातली एकुलती एक लेक होते. आईवडिल एका मुलीवरच संतुष्ट होते. पण मला मात्र एकटेपणा सहन होत नव्हता. नातलगांना, अवतीभोवती सर्वांना दोन दोन मुलं होती. प्रत्येकाला एक भावंड होतं. मीच एकटी होते. मोठ्यांमध्ये जाऊन बसलं की ते हाकलायचे, ‘‘जा आत. इथं कशाला बसतेस? आत खेळत बैस.’’ आता एकटी मी काय खेळू? कुणाशी खेळू? निर्जीव खेळणी अन् निर्जीव पुस्तक…मला कुणी तरी सजीव खेळणं हवं होतं. शेवटी मला भावंड आणायचा निर्णय आईबाबांना घ्यावा लागला.
भावंड येणार म्हटल्यावर आईबाबांनी मला समजवायला सुरूवात केली की येणाऱ्या बाळाची सर्व जबाबदारी माझ्यावर असणार आहे. मी स्वत:ला विसरून निमाचं सगळं बघायला लागले. तिच्यापुढे मला आपली सुखदु:ख, आपल्या इच्छा, अपेक्षा कशाचीही तमा वाटत नव्हती. दहाव्या वर्षीच मी एकदम जबाबदार, गंभीर अन् मोठी मुलगी झाले.
निमा केवळ माझ्यासाठी या जगात आली आहे किंबहुना माझ्यासाठीच तिला आणण्यात आलंय ही गोष्ट माझ्या मनावर इतकी खोल कोरली गेली होती की मी तिची आई होऊनच तिला सांभाळू लागले. आम्ही जेवत असताना तिनं कपडे ओले केले तर मी जेवण सोडून आधी तिचे कपडे बदलत असे. त्यावेळी आई उठत नसे. आता वाटतं, आईनं तरी माझ्यावर इतकी जबाबदारी का टाकली? तिचंही ते कर्तव्यच होतं ना की त्यांनी एक बहीण मला देऊन माझ्यावर उपकार केले होते? इतकं मोठं कर्ज माझ्यावर झालं की चाळीस वर्षं मी फेडतेय, फेडता, फेडता मी दमलेय तरी ते कर्ज फिटत नाहीए.
‘‘ताई ये, बैस ना,’’ अगदी अनिच्छेनंच निमा म्हणाली.
माझं लक्ष सोफ्यावर विखुरलेल्या पॉलिथिनच्या पिशव्यांकडे गेलं. त्यावर त्याच मॉलचं नाव होतं, ज्याचा उल्लेख मानवनं केला होता. काही घालून काढून टाकलेले नवे डेसेसही तिथंच सोफ्यावर होते. बहुतेक त्यांची ट्रायल निमानं घेतली असावी किंवा ते घालून त्या तिच्या सहकाऱ्याला दाखवले असावेत.
माझ्या मेंदूनं दखल घेतली…हा माणूस कोण आहे? त्याचे अन् निमाचे संबंध कसे, कुठल्या प्रकारचे आहेत? त्यालाच हे कपडे घालून ती दाखवत होती का?
‘‘तुला ताप आला होता का? सध्या वायरलचीच साथ आहे. हवा बदलाचा परिणाम होतोच,’’ मी सगळे कपडे अन् पिशव्या बाजूला ढकलून स्वत:ला बसण्यापुरती जागा करून घेत विचारलं.
तेवढ्यात तो पुरुष उठला, ‘‘बराय, मी निघतो,’’ त्यानं म्हटलं.
‘‘अहो बसा ना, निदान तुमचं खाणं तरी पूर्ण करा. निमा तूही बैस ना,’’ मी म्हटलं. तसं दचकून दोघांनी माझ्याकडे बघितलं.
‘‘तब्येतीची काळजी घ्या. येतो मी,’’ म्हणत तो निघून गेला. निमाही अस्वस्थपणे बसली होती.
‘‘अगं, आजारी होतीस तर हे असलं हॉटेलचं खाणं, त्यातूनही नूडल्स अन् मंचूरियन कशाला खातेस?’’ मी टेबलवरच्या डब्यांकडे बघत म्हटलं. डब्यात एकच चमचा होता म्हणजे दोघं एकाच चमच्यानं खात होती का?
‘‘हे बघ निमा, थोडं काम होतं तुझ्याकडे. म्हणून मी आलेय. फोनवर बोलणं मला प्रशस्त वाटेना. मला पैसे हवेत. मानसीच्या कोचिंगक्लाससाठी. तुझ्याकडून माझे एकूण चाळीस हजार रुपये येणं आहे. तू निदान पंधरा वीस हजार दिलेस तर माझी सध्याची गरज भागेल…’’
निमानं माझ्याकडे विचित्र नजरेनं बघितलं. जणू ती प्रथमच मला बघत होती…इतके दिवस मी पैसे कधीच परत मागितले नव्हते, त्यामुळेच ते परत करणं तिलाही गरजेचं वाटलं नव्हतं. मी तिच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होते. एक तर तिची छानशी संध्याकाळ बिघडवून टाकली होती अन् शिवाय ती विवाहबाह्य संबंधात अडकल्याचंही माझ्या लक्षात आलं होतं.
फार फार वाईट वाटतंय मला. आम्ही दोघी एकाच आईबापाच्या पोरी जन्माला येऊनही आम्हा दोघींमध्ये इतका फरक असावा? एकाच घरात वाढलो, एकच अन्न आम्ही खाल्लं, तरीही आमच्या अंगात वाहणाऱ्या रक्तानं असे वेगवेगळे परिणाम दाखवावेत?
‘‘अगं पण ताई, माझ्याकडे पैसे कुठाय?’’ निमा चाचरत म्हणाली.
‘‘का गं? इथं एकटीच राहतेस, घरभाडं बँक भरतेय. नवरा अन् मुलगा तुझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहतात. त्यांचा काडीचा खर्च नाही तुझ्यावर, तर मग सगळा पैसा जातो कुठे?’’
निमा अवाक् होती, सतत तिची बाजू घेणारी, तिला सतत चुचकारून घेणारी तिची ताई आज अशी कशी वागतेय? इतकं कसं बोलतेय? खरं तर निमाच्या वागणुकीमुळे तिचं कुटुंब अन् माझंही कुटुंब नाराजच असायचं. मीच तिच्यासाठी बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशी होते, कारण मनातून मला उगीचच आशा होती की अजूनही वेळ गेली नाहीए, निमा सावरेल, स्वत:ला बदलेल.
‘‘निमा, मला तुझ्यासारखी नोकरी नाही. नवरा देतो त्या पैशातून घर चालवून मी पैसे शिल्लक टाकते म्हणून पैसा जमतो. अक्षरश: एक एक रूपया करत पैसे जमवले आहेत मी. दोन्ही मुलांचे कोचिंग क्लास गरजेचे आहेत. तिथं भरपूर पैसे भरावे लागतात. तुझे पैसे नको देऊस, फक्त माझे पैसे परत केलेस तरी माझी गरज भागेल,’’ एवढं बोलून मी उठून उभी राहिले.
निमा पुतळ्यासारखी बसून होती. मी कधी अशी वागेन असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या आजच्या रंगीत सोनेरी संध्याकाळचा शेवट असा होईल अशी तर तिला कल्पनाही नसेल.
काय बोलणार होती ती? तिच्यासाठी मी भक्कम आधार होते. माझ्या आडोशाला येऊन ती अजयलाही गप्प बसवायची.
बिचारा अजय खरं तर पत्नीपीडित नवऱ्यांच्या संघटनेचा अध्यक्ष शोभला असता. मला ते कळत होतं, पण बहिणीवरचं प्रेम मला ते वळू देत नव्हतं. मीच कमी पडले. निमाला आधीच ऐकवलं असतं तर बरं झालं असतं. ती चुकतेय हे मी का सांगू शकले नाही? मला वाईट वाटतंय, स्वत:चाच राग येतोय.
मला त्या घरात बसवेना. जीव गुदमरत होता. नकारात्मक लहरी सतत अंगावर आदळताहेत असं वाटत होतं. आज प्रथमच मला तिच्यापासून लांब लांब जावं असं वाटू लागलं. तिच्यात एरवी मला आईबाबाच दिसायचे…पण आज नाही दिसले.
‘‘निमा, येते मी…एवढंच काम होतं.’’
मी ताडकन् बोलून चालू लागले. रिक्षावाला समोरच भेटला. त्याला घराचा पत्ता सांगितला. गळा दाटून आला होता. डोकं गरगरत होतं. डोळेही भरून आले होते. डोळे पुसून मी मागे वळून बघितलं…निमा बाहेर आली नव्हती. मला बरंच वाटलं. आता ती पैसे परत करेल न करेल, पुन्हा मागणार नाही. माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरलं. मी दोन तीनदा दीर्घ श्वास घेतला. हलकं वाटलं. मनातून एक सकारात्मक विचार उमटला…आता नक्कीच निमा बदलेल. ती माझ्यासारखी होण्याचा प्रयत्न करेल.