वाढत्या वयातही दिसा तरूण

* अनुराधा गुप्ता

आपल्या वयापेक्षा कमी वयाचं दिसायला कोणाला नाही आवडत? महिलांबाबत बोलायचं झालं तर त्या आपलं वय लपवण्यासाठी काहीही ट्राय करायला मागेपुढे पाहात नाहीत.

म्हणूनच कॉस्मेटीक इंडस्ट्रीने वाढत्या वयावर नियंत्रण ठेवणारी बरीच उत्पादनं बाजारात आणली आहेत. यामुळे चेहऱ्यावरच्या वयाच्या खुणा लपवण्यासाठी महिलांना मदत होते. पण ही उत्पादनं वापरण्यापूर्वी त्याविषयी संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे, नाहीतर या उत्पादनांचा चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

कॉस्मेटोलॉजिस्ट अवलीन खोखर म्हणतात, ‘‘सौंदर्य प्रसाधनं सौंदर्य वाढवण्यासाठी असतात. यांच्या वापराने चेहऱ्यावरची कमतरता भरून काढली जाऊ शकते. पण ती कमतरता आणि त्यासाठी असलेलं योग्य उत्पादन यांचं योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे, नाहीतर वय कमी दिसण्यापेक्षा जास्त दिसू लागेल.’’

त्वचेला मेकअपसाठी करा तयार

अवलीनच्या म्हणण्यानुसार त्वचेवर कोणतंही सौंदर्य प्रसाधन लावण्यापूर्वी त्याचा प्रकार जाणून घ्या. कारण त्वचेला अनुरूप निवड केल्यास योग्य लुक मिळतो. बाजारात ड्राय, ऑयली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी वेगवेगळी उत्पादनं उपलब्ध आहेत. योग्य निवडीसह त्वचेला मेकअपसाठी तयार करणंही महत्त्वाचं आहे. त्वचा स्वच्छ केली नाही तर धुलीकण त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकून राहतात आणि मेकअपच्या थरामुळे छिद्र बंद होतात. यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मेकअपच्या आधी त्वचेचं क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग नक्की करा. यामुळे मेकअपमध्ये स्मूदनेस येतो.

कंसीलरचा वापर टाळा

कंसीलरचा उपयोग काळे डाग लपवण्यासाठी केला जातो. चेहऱ्यावर काळे डाग असणाऱ्या भागातच कंसीलर लावलं जातं. पण काही महिला हे पूर्ण चेहऱ्यावर लावतात. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ठळक होतात. अवलीनच्या म्हणण्यानुसार कंसीलर जाडसर असतं आणि थोडं लावल्यानंतरही परिणाम दिसू लागतो. जास्त लावल्यामुळे चेहऱ्यावर ओरखडे दिसतात. काही महिला काळी वर्तुळं लपवण्यासाठी कंसीलरचा वापर करता. पण हे चुकीचं आहे. डोळ्यांखाली कंसीलर फक्त इनर कॉर्नरवरच लावावं. अधिक प्रमाणात कंसीलर लावल्यास डोळे चमकदार दिसतात जेणेकरून कळून येतं की डोळ्यांवर कंसीलर लावलं आहे.

जास्त फाउंडेशन लावू नका

फाउंडेशनची निवड आपल्या स्किन टाइपप्रमाणे करा. उदाहरणार्थ : नॉर्मल त्वचा असणाऱ्या महिला मिनरल बेस्ड किंवा मॉइश्चराइजरयुक्त फाउंडेशन वापरू शकतात. तर कोरड्या त्वचेसाठी हायडे्रटिंग फाउंडेशन योग्य ठरेल. सेम स्किन टोनचं फाउंडेशनच घ्या. नाहीतर त्वचा ग्रे दिसू लागेल. ऑयली त्वचेसाठी पावडर डबल फाउंडेशन वापरा. हे त्वचेला मेटीफाय करतं.

फाउंडेशनच्या योग्य निवडीसह त्याचा योग्य वापरही आवश्यक आहे. काही महिला संपूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन लावतात. हे चुकीचं आहे. फाउंडेशन चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत म्हणजे थोडंसं फाउंडेशन बोटावर घेऊन डॅब करत योग्यप्रकारे चेहऱ्यावर लावावं. यामुळे वयानुसार त्वचेमध्ये झालेलं डिस्कलरेशन निघून जातं.

कॉम्पॅक्टने द्या फिनिशिंग

बऱ्याच महिला फाऊंडेशननंतर कॉम्पॅक्ट पावडर लावत नाहीत. अवलीन याला मेकअप ब्लंडर म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की कॉम्पॅक्ट पावडर मेकअपला फिनिशिंग देतं. पण याचाही अतिवापर करू नये. त्यामुळे ओरखडे उठतात.

याची निवडही काळजीपूर्वक करावी. मुख्य म्हणजे स्किनकलर टोनप्रमाणेच शेड निवडा. आपल्या स्किन टाइपचाही विचार करा. उदारणार्थ, ऑयली त्वचेसाठी ऑइल कंट्रोल मॅट फिनिशिंग कॉम्पॅक्ट पावडर तर कोरड्या त्वचेसाठी क्रिमी कॉम्पॅक्ट घ्या. यामुळे त्वचा निरोगी दिसते. सेन्सिटिव्ह स्किनसाठी इमोलिएंट ऑइल आणि वॅक्सयुक्त कॉम्पॅक्ट सर्वात चांगला पर्याय आहे.

आय मेकअप काळजीपूर्वक करा

तरूण दिसण्यासाठी आय मेकअप योग्यप्रकारे करणं आवश्यक आहे. बऱ्याच महिलांचा गैरसमज असतो की डोळ्यांना गडद मेकअप केल्याने तरूण दिसता येतं. पण अवलीनचं म्हणणं आहे की एशियन स्कीन आणि रस्ट कलरमुळे वय कमी दिसतं. आयशेड्समध्ये हेच रंग वापरावेत. क्रिमी ऑयशेड्समुळे निवडू नका. यामुळे डोळ्यांच्या चुण्या लपल्या जात नाहीत. आयशेड्सह आयलायनरही ब्राउन निवडा.

काजळ आणि मस्काराशिवाय डोळ्यांचा मेकअप अपूर्ण असतो. काजळामुळे डोळे   उठून दिसतात. सध्या स्मजप्रूफ काजळ फॅशनमध्ये आहे. त्यामुळे आपल्यासाठी हेच काजळ निवडा. मस्कारा निवडतानाही काळजी घ्या. वाढत्या वयानुसार पापण्यांचे केस गळू लागतात. चुकीचा मस्कारा लावल्याने गळती वाढू शकते. पण हायडे्रटिंग मस्कारामुळे पापण्यांचे केस मजबूत होतात. मस्काराची योग्य निवड आणि योग्य वापर केल्यानेच तरूण दिसता येते. म्हणून मस्कारा नेहमी अपर आणि लोअर लॅशेजवर लावा. यामुळे डोळ्यांना छान लुक मिळतो.

लिपस्टिकच्या ब्राइट शेड निवडा

शास्त्रीयदृष्ट्या ब्राइट शेडमुळे कोणतीही गोष्ट छोटी दिसते. पण ओठांच्या बाबतीत उलट परिणाम दिसतो. डार्क शेड्समुळे ओठ मोठे दिसतात. आपल्या वयापेक्षा तरूण दिसायचं असेल तर न्यूड आणि ग्लॉसी लिपस्टिक निवडा. लिपलायनवर लिपस्टिकच्या शेडशी मॅच होईल याची काळजी घ्या. फाटलेल्या ओठांवर लिपस्टिक लावू नका. ओठ फाटले असतील तर पेट्रोलिअम जेली लावून स्मूद करा.

अशाप्रकारे मेकअपचे बारकावे माहीत असतील तर तुम्ही वाढत्या वयातही तरूण दिसू शकता.

जेव्हा कराल सौंदर्यप्रसाधनांचा वापर

* डॉ. सोनल अग्रवा

स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी अनेक काळापासून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत आल्या आहेत. मात्र, पूर्वी ही सौंदर्यप्रसाधने हळद, लिंबू, मेंदी, चंदन, फुले यांपासून तयार केली जात असत. त्यांच्या वापराने कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम न होता, सौंदर्यवर्धनच होत होते. मात्र, आज बहुतेक सौंदर्यप्रसाधनांत अनेक रसायनांचा वापर होतो, ज्यांचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो.

याबरोबरच, आज प्रसिद्ध कंपन्यांच्या प्रसाधनांप्रमाणे दिसणारी स्वस्त, नकली प्रसाधने बाजारात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे, काही महिला स्वस्तच्या नादात ब्रँडेड सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्याऐवजी, नकली व सामान्य प्रसाधने खरेदी करून स्वत:वर संकट ओढवून घेतात. या डुप्लिकेट सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमध्ये खालच्या दर्जाचा आणि हानिकारक रसायनांचा वापर केला जातो.

या, जाणून घेऊ की सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी :

सौंदर्यप्रसाधनांचे संभावित दुष्परिणाम

सौंदर्यप्रसाधनांमध्ये असलेल्या वेगवेगळया रसायनांच्या प्रभावामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना श्वसन तंत्राची अॅलर्जी होऊ शकते. त्वचेमध्ये लालसरपणा, खाज, फोडया, चकत्या इ. होऊ शकतात. मग अॅलर्जीमुळे सर्दी, डोळयांची जळजळ, लालसरपणा, पाणी येणे, एवढेच नव्हे, तर दमाही होऊ शकतो.

अनेक सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमध्ये कोलतारचा वापर केला जातो, ज्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. त्याचबरोबर, हा कॅन्सरलाही कारणीभूत ठरू शकतो. याच्या दुष्परिणामाने मूत्राशयाचा कॅन्सर, नॉनहॉजकिन लिंफोमा इ.चीही शक्यता वाढते.

काही चेहऱ्यांवर डाग, मुरमे, डाग घालविणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या वापराने संवेदनशील त्वचा असणाऱ्यांमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांप्रती संवेदनशीलता उत्पन्न झाल्याने फोडया, मुरमे नष्ट होण्याऐवजी आणखी वाढू शकतात.

टाल्कम, डस्टिंग पावडर, कॉम्पॅक्ट इ.चा वापर केल्याने त्वचेची रोमछिद्रे बंद होऊ शकतात. त्यामुळे मुरमे, सुरकुत्या, चकत्या होऊ शकतात. दीर्घ काळापर्यंत याचा वापर केल्याने त्वचेची नैसर्गिक कोमलता नष्ट होते. त्याचप्रमाणे, त्वचा शुष्क, निस्तेज व अनाकर्षक होते.

निकृष्ट प्रतिच्या लिपस्टिक दीर्घकाळ लावल्यास ओठांची श्लेष्मा पापुद्रे आकुंचित होतात. ओठ काळे, निस्तेज होऊन फुटतात. लिपस्टिकमध्ये असलेली रसायने थोडयाशा प्रमाणात शरीरात जातात, त्यामुळे हानिकारक परिणाम होऊ शकतो.

नेलपॉलिशचा जास्त वापर केल्याने, नखांची नैसर्गिक चमक कमी होते. ती कमकुवत, खरखरीत होऊन तुटू शकतात. काही तरुणींना अॅलर्जीमुळे नखांच्या पेरांना फोडया किंवा खाज येऊ शकते.

डोळे हा नाजूक अवयव आहे. काजळ, आयलाइनर, आयशॅडो, मस्कारा, आयलॅशेस, आयब्रो पेन्सिल इ.चा वापर डोळयांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केला जातो. यांच्यामुळे अॅलर्जी झाल्यास डोळयांना खाज, डोळयांच्या खाली काळी वर्तुळे, त्वचेचा खरखरीतपणा, पापण्यांचे केस कडक होऊन गळणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.

टिकलीच्या मागे लावलेल्या अॅडहॅसिव्हमुळे टिकली लावलेल्या ठिकाणी खाज, लालसरपणा, संक्रमण व डाग होऊ शकतात.

सिंदूर व पेन्सिलने लावल्या जाणाऱ्या द्रवरूप गंधामुळेही समस्या निर्माण होतात.

हेअरडाय हासुद्धा रसायनांनी बनलेला असल्यामुळे त्याच्यामुळे अॅलर्जी, केस गळणे, केस लवकर सफेद होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

कार्बनिक पदार्थांपासून निर्माण केलेले हेअरडाय दिर्घकाळ वापरल्याने कॅन्सरची शक्यता वाढते. केसांना सेट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रीम्स, जेल, स्प्रे, लोशन, तेल यामध्ये असलेली रसायने, सुगंधसुद्धा केसांच्या मुळांना कमकुवत करू शकतात, तसेच केस लवकर सफेद होऊ शकतात. त्यांच्यातील नैसर्गिक कोमलता व चमक नष्ट होते.

हेअर रिमूव्हिंग क्रीम, लोशन, साबणही पूर्णपणे दुष्प्रभावरहित किंवा सुरक्षित नसतात. त्यांच्या वापरानेसुद्धा अॅलर्जी, काळपटपणा, रूक्षपणा, डाग इ. समस्या उद्भवतात.

सल्ला

सौंदर्यप्रसाधनांचा वापर करताना कृत्रिम प्रसाधनांऐवजी नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांच्या वापरावर भर द्या. कृत्रिम, मिश्र रसायनांपासून निर्माण केलेल्या कॉस्मॅटिक्स उत्पादनांचा वापर कमीत कमी करा. प्रतिष्ठित कंपन्यांद्वारे तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनांचाच वापर करा आणि ती विश्वासनीय दुकानांमधूनच खरेदी करा, जेणेकरून योग्य किमतीला योग्य कॉस्मॅटिक मिळेल. कोलतार मिसळलेली कॉस्मॅटिक्स डोळे व पापण्यांवर लावू नका.

शरीराच्या एका भागासाठी बनविलेल्या कॉस्मॅटिक्सचा वापर दुसऱ्या प्रसाधनांच्या जागी उदा. लिपस्टिकचा ब्लशर म्हणून आणि आयशॅडो ओले करून आयलाइनरप्रमाणे वाप करू नका. अन्यथा अॅलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते.

जर एखाद्या सौंदर्यप्रसाधनाची अॅलर्जी असेल किंवा अन्य काही समस्या असेल तर त्याचा भविष्यात कधीही वापर करू नका. झोपण्यापूर्वी मेकअप स्वच्छ करून झोपा.

लक्षात ठेवा की, चेहऱ्याची त्वचा खूप संवेदनशील असते. म्हणून सौंदर्यप्रसाधने केवळ प्रसिद्ध कंपन्यांची किंवा ब्रँडेडच वापरा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें