महिला बनत आहेत थायरॉईडच्या शिकार

* प्रतिनिधी

अचानक वजन वाढणे, केस गरजेपेक्षा जास्त गळू लागणे इत्यादी लक्षणे सांगतात की, थायरॉईडची समस्या वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लाखो लोक या समस्येने त्रस्त आहेत, तरुण मुलींपासून ते महिलांपर्यंत सर्वच वेगाने याच्या शिकार ठरत आहेत. एका संशोधनानुसार, ८ पैकी १ महिला या समस्येने त्रस्त आहे.

थायरॉईडची ग्रंथी ही गळयासमोर फुलपाखराच्या आकाराएवढी ग्रंथी असते जी हार्मोन्स तयार करते आणि हे हार्मोन्स शरीराच्या वेगवेगळया अवयवांना त्यांचे काम योग्य प्रकारे करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. ते शरीराच्या मेटाबॉलिक म्हणजे चयापचय प्रक्रियेसह हृदय तसेच पचन संबंधी यंत्रणा सुरळीत ठेवतात. मेंदूचा विकास, मांसपेशींवर नियंत्रण आणि हाडे मजबूत राखणेही त्यांच्यामुळेच शक्य होते. थायरॉइडमधील बिघाडामुळे थायरॉइडच्या ग्रंथीच्या कामावर दुष्परिणाम होतो. यामुळे चयापचय प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स तयार करण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो.

महिलांनाच याचा जास्त त्रास का?

थायरॉईडमध्ये होणारा बिघाड ही जास्त करून आपोआपच बरी होणारी प्रक्रिया असते. यात रुग्णाची प्रति सुरक्षा प्रणाली हल्ला करून थायरॉइडच्या ग्रंथी नष्ट करते. विविध संशोधनांनुसार ऑटो इम्युन डिसिस जसे की, सिलिएक डिसिस, डायबिटीस मेलिटस टाइप, इम्प्लिमेंटरी बोवेल डिजिज, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि संधीवाताचा त्रास महिलांना सर्वसामान्यपणे होतोच.

हे आजार शोधून त्यावर उपचार करण्यासाठी यामुळे उशीर होतो कारण, याची वेगवेगळी लक्षणे शोधणे कठीण असते. ऑटो इम्युन आजार आयोडिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. गर्भावस्थेत आयोडिनची जास्त कमतरता भासते. याच्या कमतरतेमुळे थायरॉईड हार्मोन्सची पातळी खालावते.

थायरॉईडमधील बिघाडाचे किस्से

हायपोथायरॉडिज्म, हायपरथायरॉडिज्म, थायरॉईटिस, थायराईड कॅन्सरसारखे आजार पुरुष आणि महिला दोघांनाही त्रासदायक ठरतात. यातील हायपोथायरॉडिज्म, हायपरथायरॉडिज्म हे आजार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १० पट अधिक होतात.

हायपोथायरॉडिज्म हा एक प्रकारचा थायरॉईडचा आजार आहे. हा आजार तेव्हा होतो जेव्हा थायरॉईड ग्रंथीची सक्रियता कमी होते आणि सर्वसाधारण हार्मोन्सच्या तुलनेत कमी हार्मोन्स तयार होतात. यामुळे शरीरातील हार्मोन्स आणि चयापचय प्रक्रियेचे संतुलन बिघडते. महिलांमधील हायपोथायरॉडिज्म होण्यामागील एक सर्वसामान्य कारण म्हणजे ऑटो इम्युन डिसिस. याला हॅशिमोटोज डिसिस असे म्हणतात. यात अँटीबॉडीज हळूहळू थायरॉइडला लक्ष्य करते आणि थायरॉईड हार्मोन्स बनवण्याची क्षमता नष्ट करते.

हायपरथायरॉडिज्म हा एक प्रकारचा थायरॉइडचा बिघाड आहे. हा बिघाड तेव्हा होतो जेव्हा थायरॉईड ग्रंथी जास्त सक्त्रिय होतात आणि गरजेपेक्षा जास्त हार्मोन्सची निर्मिती करतात. हार्मोन्स शरीरातील चयापचय प्रक्त्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

प्राथमिक लक्षणे

बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात थायरॉईडमधील बिघाड लक्षात येत नाही, कारण याची लक्षणे स्पष्ट नसतात. यामुळे त्याला वांझपणा, लिपिड डिसऑर्डर, अॅनिमिया किंवा मानसिक तणाव समजण्याची चूक केली जाते. लक्षणे उशिराने लक्षात येतात. तोपर्यंत झालेल्या नुकसानाची भरपाई करणे अशक्य होते.

हायपोथायरॉडिज्मच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश असतो : थकवा, कोरडी त्वचा, मांसपेशी आखडणे, कफ, थंडी सहन न होणे, सुजलेल्या पापण्या, वजन नियंत्रणाबाहेर वाढणे, मासिक पाळीतील अनियमितता.

हायपरथायरॉडिज्मच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश असतो : भीती वाटणे, झोप न लागणे, वजन कमी होणे, हातांना घाम येणे, हृदयाची वेगवान आणि अनियमित धडधड, डोळे जड होणे, डोळयांच्या पापण्या न मिटता एकटक पाहाणे, दृष्टिदोष, भरपूर भूख लागणे, पोट बिघडणे, गरमी सहन न होणे.

थायरॉईडच्या बिघाडासाठी जबाबदार घटक : थायरॉईडचा आनुवांशिक आजार, ऑटोइम्युन स्थिती, गळयात रेडिएशन असणे, थायरॉइडची शस्त्रक्रिया, थायरॉईड वाढणे.

निर्बंध

थायरॉइडमधील बिघाड हा जीवनशैलीमुळे झालेला बिघाड नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात आयोडिनचे सेवन करण्याव्यतिरिक्त इतर काहीही करण्याची गरज नसते. भारत सरकारने युनिव्हर्सल सॉल्ट आयोडिनेशनला मान्यता दिल्यामुळे आता आयोडाईज्ड मिठात पुरेशा प्रमाणात आयोडिन असते.

थायरॉइडचा बिघाड वेळेवर लक्षात आल्यास आणि योग्य उपचार केल्यास गंभीर परिणाम रोखणे शक्य होते. महिलांनी वर्षातून एकदा थायरॉईड ग्रंथींची तपासणी करून घ्यायला हवी, जेणेकरून आजार लवकर लक्षात येईल आणि वेळीच उपचार करता येईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें