महिला का होतात डिप्रेस ?

* पुष्पा भाटिया

रीना आणि नरेश यांच्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत. पतिपत्नी दोघेही नोकरी करणारे आहेत. ऑफिसमधून कामासाठी दोघांनाही शहराच्या बाहेरही जावं लागतं. आतापर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू होते, पण गेल्या काही महिन्यांपासून रीनाला थकवा, बेचैनी आणि झोप न लागणे असे त्रास होऊ लागले.

डॉक्टरांना दाखवल्यावर समजले की रीना तणावाखाली जगत आहे. नोकरीमुळे पती पत्नी बराच वेळ वेगळे राहत असत. जोपर्यंत तिचा पती सोबत असे, सर्व काही ठीक असे. पण जेव्हा ती घरात एकटी असायची, तेव्हा तिला घरातली कामे आणि नोकरी यांच्यातील ताळमेळ बसवणे मुश्किल होऊन जायचे. तसेही रीनाला आता असेच वाटत होते की तिने आता आपले घर सांभाळावे, कुटुंब वाढवावे, पण तिच्या पतिला आणखी काही वेळ थांबायचे होते आणि याच कारणामुळे रीना तणावाखाली होती.

तणावाची कारणे

* हल्लीची दिवसरात्र होणारी धावपळ, ऑफिसला येण्याजाण्याची चिंता, मुलांचे संगोपन, त्यांच्या अभ्यासाची चिंता, कुटुंबाचे खर्च इ. काही अशी कारणे आहेत, जी पुरुषांपेक्षा महिलांना अधिक त्रास देतात. याशिवाय हार्मोन्स बॅलन्स बिघडणे(मासिक पाळीच्या आधी आणि मेनोपॉजच्या दरम्यान) ऋतू बदल हेसुद्धा एखाद्या महिलेच्या औदासीन्याचे कारण ठरू शकते.

* गर्भधारणेपासूनच महिलांच्या डोक्यात मुलगा होणार की मुलगी ही चिंता भेडसावू लागते. कुटुंबातील लोक सतत मुलगा व्हावाचा धोशा तिच्यामागे लावतात. त्यामुळे तिचा तणाव अधिकच वाढतो. खरंतर हे वैज्ञानिक सत्य आहे की मूल मुलगा असणार की मुलगी यासाठी महिलेला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. पण तरीदेखील आपल्या समाजात अशिक्षितच नाही तर सुशिक्षित लोकही मुलगी झाल्यास आईला दोषी ठरवतात.

* खरं सांगायचं तर तणावाची सुरुवात ही मुलीच्या जन्मापासूनच होते आणि तिच्या वयानुसार ती वाढतच जाते.

* चांगले शिक्षण असूनही मनासारखी नोकरी न मिळणे, नोकरी मिळाल्यास वेळेवर बढती न मिळणे, घरातील बाहेरील कामांचा ताळमेळ जमवण्यात अपयश आल्याने शिकलेल्या मुलीही तणावाखाली राहू लागल्या आहेत.

* मनोवैज्ञानिक संशोधनात असे समोर आले आहे की एखाद्या स्पर्धेत अपयश आल्यास महिला निराश होऊन फार लवकर तणावग्रस्त होतात.

* चिंता, त्रास आणि दबाव यामुळेही तणाव उत्पन्न होतो. हा काही रोग नाही. परिस्थितीबरोबर जुळवून न घेता येणे, कुटुंब, मित्र परिवार यांच्याकडून गरजेच्या वेळी मदत न मिळणे, मेनोपॉजच्या वेळी हार्मोन बॅलन्स बिघडणे यांपैकी काहीही महिलांच्या जीवनात तणावाचे कारण बनू शकते. दारू किंवा इतर काही व्यसन, आपल्या एखाद्या आजारावर योग्य उपचार न घेणे हीसुद्धा तणाव निर्माण होण्याची कारणे आहेत. अनेकदा रिटायरमेंट नंतरही महिलांमध्ये अशी परिस्थिती उद्भवते.

लक्षणे

स्मरणशक्ती कमी होणे, मळमळल्यासारखे वाटणे, श्वास घेताना त्रास होणे, भूक मंदावणे, शारीरिक क्षमता कमी होणे, कामात लक्ष न लागणे, डोकेदुखी, खूप घाम येणे, घसा कोरडा पडणे, सारखे लघवीस जाणे या लक्षणांच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्ती स्वत:ला आपले कुटुंब आणि समाज यांच्यावरील ओझे समजू लागतात. ते प्रयत्न करूनही समस्येच्या मुळाशी जाऊ शकत नाहीत आणि मग ते आपला विश्वास गमावतात आणि अधिकाधिक निराशेच्या गर्तेत ओढले जातात.

तणाव कसा दूर कराल

* आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला निराशेसोबत संघर्ष करावा लागतो. जीवनाचे सार यातच आहे की आपण आपल्या समोर आलेल्या समस्यांशी दोन हात करून आपले लक्ष्य गाठण्यासाठी उत्साहाने पुढे जात राहिले पाहिजे. काम अशाप्रकारे करावे की थकण्याच्या आधीच तुम्हाला विश्रांती मिळेल. उदास किंवा थकलेले दिसणे एखाद्या व्यक्तित तणाव किंवा अपराधीपणाची भावना निर्माण करते.

* चांगली झोप न मिळाल्याने फार नुकसान होते. गाढ झोपेसाठी संगीत ऐकणे फायेदशीर ठरते. झोपण्याआधी वाचन करणे हीसुद्धा एक चांगली सवय आहे.

* अति प्रमाणात निराशाच्या हीनभावनेस कारणीभूत ठरते. आपले विचार सकारात्मक ठेवा. जे तुमच्याकडे नाही किंवा जी गोष्ट तुमच्या हातात नाही त्यासाठी चिंता करत बसू नका. जे तुमच्यापाशी आहे त्यात सुखी रहा.

* आपल्या आहाराविहारावर लक्ष देणेही फार महत्त्वाचे आहे. फळ आणि भाज्या यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मेनोपॉजच्या काळात महिलांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ लागते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आपल्या आहारात समाविष्ट करायला विसरू नका. दररोज व्यायाम करण्याची सवय करून घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें