माझी आई माझी ताकद

* पारुल भटनागर

‘‘सकाळी ५ वाजताचा अलार्म वाजत नाही तोच आई लगेचच उठून उभी राहते. कामाला लागते. त्यानंतर जेव्हा ती आम्हाला उठवू लागते तेव्हा आम्ही मात्र फक्त पाच मिनिटे आणखी झोपू दे, असे सांगून लोळत राहतो. उठल्याबरोबर आम्हाला ब्रेकफास्ट, लंच सर्व तयार मिळते. स्वत:ची तयारी करतानाही आम्ही कधी तिला चप्पल आणून दे असे सांगते, तर कधी आई प्लीज माझाया ड्रेसला इस्त्री करुन दे, असे म्हणत तिचीच मदत घेते.

‘‘आम्हीच नाही तर वडील आणि घरातील इतर सदस्ययही तिच्याकडे अशाच प्रकारे सतत काही ना काही मागत असतात. तिला कामाला लावतात. आई मात्र चेहऱ्यावरील स्मितहास्य कायम ठेवून आमच्या प्रत्येकाचे काम आनंदाने करते. तिला स्वत:लाही ऑफिसला जायचे असते. पण स्वत:सोबत कुटुंबाच्या सर्व गोष्टी कशा मॅनेज करायच्या, हे तिला चांगल्या प्रकारे माहीत असते.

‘‘घरातल्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर तिला तिच्या ऑफिसला जायचे असते. कधीकधी तर मला आश्चर्य वाटते की, इतक्या चांगल्या प्रकारे ती सर्व कसे काय मॅनेज करते? मलाही तिच्याकडून हे सर्व शिकून तिच्यासारखीच बनायचे आहे. खरेच माझी आई एक परिपूर्ण स्त्री तर आहेच, सोबतच माझी ताकद आहे. प्रत्येक घाव सहन करुन लोखंडासारखे मजबूत बनून जीवन जगण्याची योग्य पद्धत तिच्याकडूनच मी शिकत आहे,’’ असे १७ वर्षीय रियाने सांगितले.

फिटनेससाठी नो कॉम्प्रमाईज

ऑफिसला लवकर जाण्याच्या घाईत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आजारांच्या रुपात अनेक अडचणींचा सामाना करावा लागेल. म्हणूनच सकाळचा फेरफटका मारण्याच्या दिनक्रमाकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. त्यासाठी सकाळी अर्धा तास लवकर उठावे लागले तरी हरकत नाही, असे आईचे म्हणणे असते.

ती हे केवळ स्वत:च करत नाही, तर कुटुंबातील सर्व सदस्यांनाही करायला भाग पाडते. कारण तिला माहीत असते की, फिटनेस फक्त तिच्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच गरजेचा आहे. सकाळच्या ताज्या हवेत फेरफटका मारल्यामुळे आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो, सोबतच दिवसभर प्रसन्न वाटते. आपण उत्साहाने काम करू शकतो, हे ती  घरातील सर्वांना समजावून सांगते.

आई, ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणते की, कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी तिचे स्वत:चे आरोग्यही निरोगी राखणे गरजेचे आहे.

नोकरदार महिला या गोष्टीकडे विशेष करुन लक्ष देतात. त्यांना माहीत असते की, वय वाढू लागल्यानंतर महिलांच्या शरीरात आयर्न, कॅल्शियमची कमतरता जाणवू लागल्याने त्या थकून जातात. आजारी पडू शकतात. म्हणूनच कुटुंबासह त्या स्वत:च्या डाएटकडेही विशेष लक्ष देतात.

कुठलेच काम टाळायचे नसते, हे शिकलो

असे म्हणतात की, आईकडे जादूची छडी असते, जिच्यामुळे ती प्रत्येक कठीण गोष्टही सहज सोपी करते.

कुणालने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, एकाच दिवशी आईची ऑफिसमध्ये मीटिंग होती आणि आमची पार्टी असल्यामुळे मला शाळेत भात तयार करुन न्यायचा होता. आमच्या मोलकरणीनेही नेमकी त्याच दिवशी दांडी मारली. वडिलांनी तर सकाळीच सांगितले होते की, आज त्यांना मटार-बटाटयाची भाजी खायची इच्छा आहे. इतकी सर्व कामे करायची होती. तरीही माझ्या आईने कोणालाच नाराज केले नाही.

घरातले कोणतेच काम अर्धवट ठेवले नाही. इतकेच नाही तर वेळेवर ऑफिसलाही गेली. ती संध्याकाळी घरी आल्यावर आम्हाला हे सर्व समजले. तेव्हा आम्हाला वाटले की, आम्हीही आपल्या लाडक्या आईसाठी काहीतरी करायला हवे. मग काय, मी आणि वडिलांनी तिच्यासाठी डिनर तयार करुन तिला सरप्राईज दिले. माझ्या आईने अशी कितीतरी कामे फक्त एकदाच नव्हे तर अनेकदा केली आहेत. तिला असे करताना पाहून मला प्रेरणा मिळते आणि मलाही तिच्याचसारखे बनायचे आहे.

स्वत:ला नेहमीच ठेवते टापटीप

आईला हे चांगल्या प्रकारे माहिती असते की, तिची मुलगी तिला स्वत:ची ताकद तर समजतेच, पण सोबतच आपला आदर्शही मानते. त्यामुळेच ती स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाकडे, नीटनेटके राहण्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाही.

आपल्या आईबाबत कृती सांगते की, कुणीही साधा एक आवाज दिला तरी आई लगेचच धावत येते. तिचा संपूर्ण दिवस घर आणि ऑफिसच्या कामात निघून जातो. तरीही ती स्वत:ला नेहमीच टापटीप ठेवते. लेटेस्ट आऊटफिट वापरते. बाहेर जाण्यासाठी वेळ नसेल तरीही स्वत:च्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती वस्तूंचा वापर करते, जेणकरुन तिची त्वचा नेहमीच सुंदर आणि तजेलदार दिसेल.

ती आम्हालाही त्वचा नेहमीच तरुण आणि सुंदर रहावी यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देते. फक्त सल्लाच देत नाही तर जबरदस्तीने आम्हाला तसे करायला भाग पाडते, जेणेकरुन हळूहळू आम्हाला पाणी पिण्याची सवय लागेल. मी जेव्हा कधी माझ्या आईसोबत जाते तेव्हा मला सतत तिचा अभिमान वाटत असतो की, ती माझी आई आहे. प्रत्येक जण तिच्या व्यक्तिमत्त्वाचे भरभरुन कौतुक करत असतो.

कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीची घेते काळजी

आई कुटुंबाची ताकद आहे, असे उगाच म्हणत नाहीत, तिला कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आवडीची, नावडती गोष्ट बरोबर माहिती असते. कधी, कोणाला काय हवे असते हे तिला न सांगताही समजते.

आदर्शने आपल्या परीक्षेच्या दिवसांची आठवण काढून सांगितले की, मागच्या आठवडयात माझी परीक्षा होती. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. आईला माहीत होते की, मी घाईगडबडीत सवयीप्रमाणे माझे हॉलतिकीट घेऊन जायला विसरणार. त्यामुळे तिने आधीच ते माझ्या बॅगेत ठेवले होते. परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर मला हॉलतिकीटची आठवण झाली आणि मी घाबरलो. पण माझी आई ग्रेट आहे, याची आठवण होताच मी बॅग तपासली आणि मला तिने ठेवलेले हॉलतिकीट सापडले.

इतकेच नाही तर जेव्हा माझ्या वडिलांना महत्त्वाची कागदपत्रे हवी असतात तेव्हा आईच ती शोधून देते. याचाच अर्थ आम्ही तिच्याशिवाय अपूर्ण आहोत.

मुलांना देते चांगल्या वर्तणुकीची शिकवण

मुलांसमोर वेळ घालवण्यासाठी भलेही आईकडे पुरेसा वेळ नसतो, पण तरीही ती आपल्या मुलांची वर्तणूक चांगली असावी, यासाठी सतत धडपडत असते.

मोठयांसमोर कशाप्रकारे वागायला हवे, घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करावा, कुणी तुमच्याशी वाईट वागत असेल तर प्रेमाने त्याला त्याची चूक कशी समजावून सांगायची, आईवडील, मोठयांना उलट उत्तर का देऊ नये, नेहमी सर्वांच्या मदतीसाठी कसे पुढे रहावे, अशाप्रकारची सर्व शिकवण ती मुलांना देते.

आईपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ही गोष्ट कोण समजू शकेल की, मुलांसाठी त्यांची पहिली शाळा त्यांचे आईवडीलच असतात. त्यांची वागण्या-बोलण्याची पद्धत आणि दैनंदिन व्यवहारावर आईवडिलांचाच ठसा असतो. म्हणूनच घरातील कुठल्याही सदस्याने मुलांसमोर अर्वाच्च भाषेत बोलू नये, गैरर्वतन करु नये याकडे आई सतत लक्ष देत असते.

समजावते अभ्यासाचे महत्त्व

मुलाला क्लासला घातले म्हणून आई निश्चिंत होत नाही तर क्लाससोबतच ती स्वत:ही त्याच्या अभ्यासासाठी वेळ देते, जेणेकरुन तो कोणत्या विषयात तरबेज आहे आणि कोणत्या विषयात कच्चा आहे, हे तिच्या लक्षात येईल. मुलाला चांगले गुण मिळावे म्हणून ती त्याच्याकडून कच्च्या विषयाची एखाद्या शिक्षकाप्रमाणे चांगली तयारी करुन घेण्याचा प्रयत्न करते.

मुलाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया रचण्यासाठी आईची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका कोणीही नाकारू शकणार नाही. तिने मुलावर दरदिवशी घेतलेल्या या मेहनतीचे फळ मुलगा स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहिल्यावरच तिला मिळते.

कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे घालवते वेळ

कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे वेळ घालवण्याला ती नेहमीच प्राधान्य देते. कारण थोडासा जरी वेळ कुटुंबासोबत घालवता आला तरी तो वेळ दिवसातील सर्वोत्तम वेळ ठरेल आणि कुटुंबातील कुठल्याही सदस्याला त्याच्याकडे कुटुंबाचे दुर्लक्ष झाले असे वाटता कमा नये.

आई कुटुंबात धाग्याप्रमाणे असते, जिच्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य या धाग्यात मोती बनून प्रेमाने गुंफला जातो. त्यामुळे दिवसातील काही क्षण का होईना, पण कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित आनंदाने वेळ घालवावा यासाठी ती सतत प्रयत्नशील असते.

कुठलेच कार्यक्रम टाळत नाही

आजकाल व्यस्त दिनक्रमामुळे नातेवाईकांना भेटण्याची संधी कमीच मिळते. येथे आईची जबाबदारी जास्तच वाढते कारण तिने जर वेळ नाही म्हणून असे कार्यक्रम टाळले तर मुलांना आपले नातेवाईक कोण, हे समजणारच नाही.

कौटुंबिक सोहळयात सहकुटुंब सहभागी होऊन कौटुंबिक नाते दृढ करण्याचा तिचा प्रयत्न असतो. याबाबत श्रेया सांगते की, मी थकली आहे किंवा माझी अजून खूप कामे शिल्लक आहेत असे सांगून माझ्या आईने कधीच आमच्या कुटुंबातील लग्नसोहळा किंवा इतर कार्यक्रम टाळले नाहीत. उलट ती प्रत्येक कार्यक्रमाला आपुलकीने जाते.

इतकेच नाही तर घरी येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकाचा ती हसतमुखाने पाहुणचार करते. नाते, कुटुंबांचे महत्त्व समजून घ्या, कारण एकत्र कुटुंबात जी ताकद असते ती वेगळे राहण्यात नाही, असे ती आम्हाला नेहमीच समजावून सांगत असते.

वेळेचे नियोजन करायला शिकवते

वेळेचे योग्य प्रकारे नियोजन कशा प्रकारे करायचे हे तर आईकडूनच शिकायला हवे. आपला अनुभव सांगताना राज म्हणाला की, मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. यामुळे माझे पालक माझ्याकडे जरा जास्तच लक्ष देतात. माझे आईवडील दोघेही कामला जातात. तरीही माझी आई घरही अतिशय व्यवस्थितपणे सांभाळते.

मी एखादी चूक केल्यास ती केवळ नजरेच्या धाकाने मला त्या चुकीची जाणीव करुन देते. यामुळे मी ती चूक दुसऱ्यांदा करण्याची हिंमतच करू शकत नाही. वेळेचे नियोजन कसे करायचे, हे मी माझ्या आईकडूनच शिकलो. मी तर असे म्हणेन की आतापर्यंत मी जे काही यश मिळवले आहे ते केवळ माझ्या आईमुळेच शक्य झाले.

आई बनवते धीट

ज्याप्रमाणे आई परिस्थितीचा सामना धैर्याने करते त्याचप्रमाणे तो धैर्याने करण्यासाठीचा धीटपणा मुलांच्या अंगी बाणवते. अनुभवने सांगितले की, माझ्या आईचे मौजमजा करण्याचे दिवस होते तेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. अशावेळी आईने स्वत:ला या द:खातून तर सावरलेच, पण आम्हालाही कधी वडिलांची कमतरता भासू दिली नाही. नोकरी करुन तिने आमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या.

आम्ही धीट व्हावे यासाठी ती सतत प्रयत्न करत असते. वडिलांच्या जाण्याने ती मनाने हळवी झाली होती, पण आमच्यासमेर तिने कधीच तिच्या डोळयात अश्रू येऊ दिले नाहीत. तिचा संघर्ष आणि मेहनत पाहून माझ्या तोंडून निघणारे कौतुकाचे शब्द थांबूच शकत नाहीत. मी माझ्या आईला फक्त एवढेच सांगेन की, तुला जगातील प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न करेन.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें