स्वस्ती

कथा * शकुंतला साठे

‘‘सुकेतु, स्वाती ताई अन् नकुल भावजी येताहेत उद्या. तू त्यांना एअरपोर्टवरून घरी आणशील का? माझ्या ऑफिसात बाहेरून एक डेलीगेशन येतंय, मला उद्या रजा घेता येणार नाही,’’ स्वस्तीनं नवऱ्याला म्हटलं.

‘‘मला नाही जमणार. तू फोन कर त्यांना, टॅक्सी करून येतील ते.’’ सुकेतु लॅपटॉपवरची नजर न हटवता म्हणाला.

‘‘आपल्या लग्नानंतर प्रथमच येताहेत ते दोघं. त्यांना काय वाटेल? तुझी बहीण आली होती, तेव्हा तू आठवडाभर घरून काम केलं होतंस, आता एक दिवसही जमणार नाही?’’

‘‘माझी बहीण आपला सुखी संसार बघायला आली होती. आपण किती सुखी दिसलो कुणास ठाऊक, पण ती मात्र फारच नर्व्हस अन् उदास झाली होती. तेव्हाच मी ठरवलं होतं की आपला पैसा वेगळा, आपले मित्र वेगळे, तू तुझं, मी माझं काम करतो तसेच नातेवाईकही वेगळेच ठेवायचे. काय?’’ सुकेतुनं असं म्हटल्यावर स्वस्तीचा जळफळाट झाला.

सहा वर्षं त्यांचं प्रेमप्रकरण चाललं होतं, त्यानंतर दोघांचं लग्न झालं. अजून लग्नाला वर्षही झालं नव्हतं, पण त्यांच्यातलं प्रेम पार आटलं होतं. अगदी कोरडं ठाक पडलं होतं. दोघंही एकमेकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसत. लग्नानंतर ती दोघं मधुचंद्राला गेली त्याच रात्री त्यांचं इतकं कडाक्याचं भांडण झालं की त्या पंचतारांकित हॉटेलच्या मॅनेजरनं त्यांना अत्यंत नम्रपणे, शालीनपणे हॉटेल सोडून जायला सांगितलं.

‘‘आम्ही आठवडाभराचे सर्व पैसे आगाऊ भरले आहेत,’’ स्वस्ती संतापून किंचाळली. सुकेतु मात्र शांत होता.

‘‘मॅडम, तुम्ही बरोबर म्हणताय, पण आम्ही आमच्या इतर कस्टमरला नाराज नाही करू शकत. एडव्हान्स भरलाय, पण तुम्ही आमच्या कपप्लेट्स, चादरी, उशा अन् फर्निचरची जी अवस्था केली आहे, त्याचा भुर्दंड द्यावाच लागेल. जे काही उरेल ते आम्ही परत करू.’’ अत्यंत नम्रपणे मॅनेजरनं सांगितलं.

मुकाट्यानं दोघंही आपल्या सूटमध्ये गेले. आता पुढे काय करायचं यावर संवाद व्हायला हवा होता. पण दोघांमध्ये अबोला होता, मग बोलणार कसं?

सुकेतु सोफ्यावरच आडवा झाला. मऊ गुबगुबीत किंगसाइज डबलबेडवर स्वस्ती रात्रभर कूस बदलत तळमळत होती. दोघांमध्ये एका शब्दाचंही संभाषण नव्हतं.

दुसऱ्या दिवशी नव्या जोडप्याची ख्याली खुशाली जाणून घेण्यासाठी दोघांच्या घरून फोन आले तेव्हा आपसूकच बोलणं सुरू झालं. कसा बसा तो काळ दोघांनी काढला. कारण परतीचं रिझर्वेशन होतं, त्या आधी घरी जाणं शक्यच नव्हतं.

सुकेतुच्या घरी काही औपचरीकतांसाठी त्यांना थांबावं लागलं. दोघांचे उतरलेले चेहरे बघून सुकेतुच्या आईला काहीतरी शंका आली.

‘‘काय झालंय? तुम्ही दोघंही ताणांत दिसताय. सुखी, आनंदी वाटत नाही आहात…’’ मुलाला खोलीत एकट्याला बघून आईनं विचारलंच.

‘‘आई, काय बोलू तेच कळत नाहीए. खरं तर मला काहीच समजत नाहीए. स्वस्तीशी लग्न करून मी आयुष्यातली फार मोठी चूक केली आहे असं मला वाटतंय. आम्ही दोघं एकत्र राहू शकणार नाही.’’

‘‘अरे, भलंतच काय बोलतोस? गेली सहा वर्षं तू तिच्या प्रेमात आहेस. आम्ही तर तुला म्हणत होतो की धाकट्या बहिणीचं लग्न आधी होऊन जाऊ दे, मग तुम्ही लग्न करा, पण तू मुळीच ऐकायला तयार नव्हतास…’’

‘‘खरंय आई, त्या वेळी मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. पण तिचं पितळ आता उघडं पडलंय. आता तर वाटतंय की असा वेडेपणा मी कसा काय केला? कधी काळी आम्ही प्रेमात होतो हेच खरं वाटत नाहीए.’’ थकलेल्या आवाजातलं दु:ख लपवता येत नव्हतं सुकेतुला.

‘‘हे तर फारच विचित्र होऊन बसलंय…आम्हाला वाटलं होतं, या लग्नामुळे तू खूप आनंदात राहशील. तुझ्या आनंदातच आमचाही आनंद होता. इथं तर तुलाच सुख नाहीए. मला वाईट एवढंच वाटतंय की सहा वर्षांच्या सहवासातूनही तुला स्वस्तीची ओळख पटली नाही…’’

‘‘सोड गं तो विषय…उगीच काळजी करू नकोस. थोडे दिवस वाट बघतो…नाहीच जुळणार वाटलं तर सरळ घटस्फोट घेऊन वेगळा होईन…’’

‘‘छे रे, भलंतच काय बोलतोस? अरे, आपल्या घराण्यात असं कधी घडलेलं नाहीए. आता कुठं लग्नाला चार दिवस होताहेत. नव्या नवरीला रूळायलाही थोडा वेळ लागतोच! लगेच घटस्फोटाच्या गोष्टी कशाला?’’ आई अगदी रडकुंडीलाच आली होती.

‘‘अगं, मी तरी कुठं उद्याच वेगळा होतोय? सहा वर्षं जुनं प्रेम आहे. लग्न निदान सहा महिने तरी चाललं पाहिजे. अन् कोणत्याही कुटुंबात एखादी घटना पहिल्यांदा घडतेच! अन् लग्न म्हणजे आयुष्यभर सक्तमजुरीची शिक्षा थोडीच आहे…मरेपर्यंत भोगायची असं काही नाहीए…’’ सुकेतु उदासपणे बोलला. पण आईचं दु:ख त्याला फारच बोचत राहिलं. पलिकडच्या खोलीत स्वस्तीनं सगळं ऐकलं होतं.

आज स्वस्तीशी भांडण झाल्यावर त्याला आईची प्रकर्षानं आठवण आली. त्यानं आईला फोन लावला.

‘‘काय झालं रे सुकेतु? आज एकदम माझी आठवण कशी काय आली?’’

‘‘असं का म्हणतेस आई? अगं ज्याला विसरतो त्याची आठवण काढावी लागते. तू तर सतत मनातच असतेस ना?’’

‘‘अरे व्वा! बरं वाटलं ऐकून. कसा आहेस तू?’’

‘‘अगं, उद्या स्वस्तीची ताई आणि भावजी येताहेत. त्यामुळे ती खूपच खुषीत आहे. मला म्हणाली, ‘‘त्यांना एअरपोर्टवरून घरी आणशील का? तिला उद्या खूपच महत्त्वाची मिटिंग आहे ऑफिसमध्ये.’’

‘‘मग?’’

‘‘मग काय? मी म्हटलं मला ही खूप कामं आहेत. तू अन् तुझी ताई काय ते बघून घ्या.’’ सुकेतु हसत म्हणाला.

‘‘सुकेतु, अरे काय हे? तू असा वागलास? तू तर अगदी अनोळखी माणसांसाठीसुद्धा मदतीला धावून जाणारा मुलगा अन् बायकोच्या बहिणीसाठी असं म्हणालास? अरे पाहुणे म्हणजे अतिथी…ते माझे तुझे नसतात. सगळ्यांचे असतात. आपले असतात.’’ आईनं समजावून सांगितलं.

‘‘आई, सोनमदीदी अन् भावजी आले होते ना, तेव्हा स्वस्तीसुद्धा त्यांच्याशी अगदी परकेपणानं, दुराव्यानंच वागली होती. ती गोष्ट मी कशी विसरेन?’’

‘‘संसारात असं वागायचं नसतं, कुणी ढेकूळ घेऊन मारलं म्हणून आपण दगड मारायचा का? तुम्ही नवराबायको आहात, सगळं आयुष्य एकत्र काढायचं, अशावेळी थोडा समजूतदारपणा दाखवला, मैत्रीचा, मदतीचा हात पुढे केला तर गोष्टी खूपच सोप्या होतात.’’

‘‘आई, तुला नेहमी माझीच चूक का दिसते? स्वस्तीच्या वागणुकीला तसंच उत्तर नाही दिलं तर त्याचा अर्थ मी पराजय स्वीकारला असा होईल अन् हरणं, पराजय मला मान्य नाही हे तुलाही ठाऊक आहे.’’

‘‘खरं सांगू बाळा, हरणं, जिकणं, जय पराजय असा विचार मी केला नाही, करत नाही. संसार म्हणजे रणक्षेत्र नाही…मला वाटतं, तू उद्या स्वातीला आणायला जा…बरं, ते जाऊ दे…बाकी कसं काय?’’

‘‘तसं बरं चाललंय, तू अन् बाबा इथं या ना, काही दिवस…आलात तर मला बरं वाटेल.’’

‘‘बघूयात…नंदिताचं लग्न ठरतंय, बहुधा तुम्हालाच इकडं यायला लागेल.’’

पॅरेलल लाइनवरून स्वस्ती हे सगळं संभाषण ऐकत होती. तिला तिची आई आठवली. आईनं तिच्या मनावर हे बिंबवलं होतं की लग्नानंतर सासरच्या घरात आपली वागणूक अशी हवी की सगळ्यांनी घाबरूनच रहायला हवं. नाही तर सासू, नणंदा धारेवरंच धरतील. कमी जास्त कुणी बोललं तर पोलिसांत जाईन अशी धमकीही द्यायची. आईनं तिला स्वत:चं उदाहरण दिलं होतं, ‘‘अगं, तुझे बाबा अन् त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला. मीच म्हणून टिकून राहिले. अन् आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. खूप सोसलंय मी. तुम्हा दोघींना मोठं करताना किती त्रास झाला माझं मलाच ठाऊक!’’

स्वस्तीसाठी आईचं प्रत्येक वाक्य काळ्या दगडावरची रेघ असायची. आईच्या परवानगीनंतरच तिनं सुकेतुशी प्रेमसंबंध वाढवले होते.

स्वस्तीला आठवलं, हनीमूनच्या भांडणानंतर जेव्हा ती सुकेतुच्या घरी गेली होती, तेव्हाही तिच्या सासूनं सुकेतुलाच समजावलं होतं. स्वस्तीला एका अक्षरानंही दोष दिला नव्हता… स्वस्ती विचार करत होती. पण स्वत:ची चूक कबूल करता येत नव्हती. अहंकार आडवा येत होता. मनात एक आशा निर्माण झाली होती की आईनं म्हटलंय तर कदाचित सुकेतु एअरपोर्टवर जाईलही. पण सुकेतु मख्खच होता. त्यानं काहीच म्हटलं नाही. शेवटी रात्री तिनं स्वातीला फोन केला की आम्ही एअरपोर्टवर रिसीव्ह करायला येऊ शकत नाहीए. तेव्हा प्लीज तुम्ही टॅक्सी करून घरी पोहोचा. स्वस्तीनं मोलकरणीलाही सगळ्या सूचना देऊन ठेवल्या होत्या की आलेल्या पाहुण्यांची सरबराई नीट व्हायला हवी.

तिची एकुलती एक बहीण प्रथमच नवऱ्याबरोबर स्वस्तीकडे येत होती. स्वस्ती जेव्हा मुंबईला शिकत होती. तेव्हा दर रविवारी ती अगदी हक्कानं स्वातीताईच्या घरी जायची. स्वाती आणि नकुल तिचं किती कौतुक करायचे. स्वातीला स्वयंपाकाची आवड होती. तिच्या हाताला उत्तम चव होती.

स्वस्तीला मात्र स्वयंपाकाचा आणि एकूणच घर कामाचा प्रचंड तिटकारा अन् कंटाळा होता. पण नकुलला बाहेरचं जेवण आवडत नाही म्हणून तिनं फ्रीजमध्ये भरपूर भाज्या, फळं वगैरे आणून ठेवली होती.

ऑफिसमधून स्वस्ती घरी परतली तेव्हा ड्रॉइंगरूममधून हसण्याखिदळण्याचे आवाज ऐकू येत होते. अभावितपणे तिचाही चेहरा हसरा झाला. स्वाती जिथं असेल तिथलं वातावरण नेहमीच आल्हाददायक असतं.

‘‘काय झालं? तुम्ही सगळे इतके का खिदळताय? मलाही कळू दे ना? भावजी, ताई, मला क्षमा करा. मी खूप प्रयत्न करूनही सुट्टी नाही घेऊ शकले. मला माझ्या बॉसचा इतका राग आला होता ना? खडूस आहे अगदी. ताई, मला सांग, आपण नोकरी कशासाठी करतो? आपल्याला अन् आपल्या माणसांना चांगलं आयुष्य जगायला यावं म्हणूनच ना?’’ स्वस्तीनं अपराधी आवाजात विचारलं.

‘‘स्वस्ती, अगं इतकी दु:खी होऊ नकोस. आमची क्षमा कसली मागतेस? आम्ही परके का आहोत? आणि बरं का, सुकेतुनं आमचं स्वागत, सत्कार, सरबराई इतकी छान केलीय की आम्हाला तुझी आठवणही आली नाही.’’ नकुलनं हसत हसत म्हटलं.

‘‘नकुल, नको चिडवूस तिला. बिचारी दमून भागून घरी आली आहे.’’ स्वातीनं म्हटलं.

‘‘हे बघा आता! मी तुझ्या लाडक्या बहिणीला कशाला चिडवू? मी तर केवळ हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की आमच्यासाठी स्वस्तीनं अपराधी वाटून घेण्याची गरज नाहीए. आम्ही एकदम मज्जेत आहोत.’’

‘‘ठाऊक आहे मला. मी नसताना सगळे मज्जेतच असतात. मला वाटतं माझा चेहराच असा आहे. माझा चेहरा बघितला की लोकांना त्रासच व्हायला लागतो.’’ स्वस्ती रडवेली होत म्हणाली.

‘‘आता हे तर सुकेतुच सांगू शकेल. आम्ही आजच आलोय अन् तुझा चेहरा आताच बघतोय,’’ थट्टेखोर न कुलला स्वस्तीला चिडवायला मजा वाटत होती.

‘‘बाय दे वे, तू नसताना आम्ही आनंदात राहू असं तुला का वाटलं? काय रे सुकेतु?’’

‘‘मी अशा प्रश्नांची उत्तरं देणं कधीच बंद केलंय?’’ सुकेतु शांतपणे म्हणाला. ‘‘एका कानानं ऐकायचं, दुसरीकडून काढून टाकायचं.’’

‘‘अरे व्वा! फारच लवकर ही कला आत्मसात केलीस की? मला अजून नाही जमलं?’’ नकुल खिदळत म्हणाला.

‘‘ऐकलंस ना ताई! जो माणूस माझं बोलणं एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं बाहेर टाकतो, त्याच्याशी संवाद कसा साधायचा?’’ स्वस्ती रागावून जरा कर्कश्शपणे म्हणाली.

‘‘स्वस्ती, तू तर एकदम रागावलीस, अगं ही सगळी गंमत चाललीय. ती अशा गोष्टी गंभीरपणे घेऊ नकोस.’’ स्वातीनं तिला समजावलं.

‘‘ताई, मी तर कधीचंच बोलणं बंद केलंय. मला मॉमनं आधीच सावध केलं होतं की आपल्या आणि सुकेतुच्या कुटुंबात कल्चरलचा फरक मोठा आहे. पण मी लक्ष दिलं नव्हतं.’’

‘‘असं आहे तर! म्हणजे सध्या तू मॉमच्या सल्ल्यानं चालते आहेस.’’ स्वातीनं हसून म्हटलं.

‘‘त्यात आश्चर्य कसलं? आईपेक्षा जास्त माझ्या आयुष्याची काळजी कोण करणार? खरं सांगायचं तर ती माझी मॉम आहेच, माझा मित्रही आहे, मार्गदर्शकही आहे.’’

‘‘अरे व्वा! ऐकून बरं वाटलं. आपल्याला भाऊ नाही म्हणून तू श्रावण बाळ व्हायचं ठरवलं आहेस का?’’ स्वातीनं हसून म्हटलं.

मोलकरीण सायंकाळचा स्वयंपाक करून गेली होती. गप्पा टप्पा करत जेवणं झाली. दोन्ही पुरूष हॉलमध्ये गप्पा मारत टीव्ही बघत होते अन् दोघी बहिणी पुन्हा गेस्टरूममधल्या पलंगावर बसून गोष्टी करू लागल्या.

‘‘ताई, मॉमबद्दल माझ्या मनांत खूपच सन्मान आणि आदर आहे. तिच्यासाठी मी काहीही करू शकते. पण आता प्रश्न तो नाहीए. सध्या ती माझं लग्न वाचवण्याच्या प्रयत्नांत आहे. ताई, तुला खोटं वाटेल, पण लग्नानंतर सुकेतु खूपच बदलला आहे. माझं काहीही ऐकून घेत नाही. प्रत्येक गोष्ट त्याच्याच इच्छेनं व्हायला हवी. मॉमने सांगितलंय मला, आतापासून वेसण घट्ट धरून ठेवली नाहीस, तर तो आयुष्यभर तुला पायताणासारखीच वागवेल. आताच सावध हो, सावधानी हटी दुर्घटना घट्टी.’’ स्वस्ती म्हणाली.

‘‘काय सांगतेस? हे सगळं तुला मॉमनं शिकवलंय? माझा विश्वास बसत नाहीए…पण तुला सुकेतुच्या तक्रारी आईकडे करायची काय गरज होती?’’

‘‘मी तक्रार नव्हती केली गं! पण तिनंच अगदी खोदून खोदून विचारलं. अन् शेवटी आईला आपल्या मुलीची काळजी वाटतेच ना?’’

‘‘स्वस्ती, मी आईला नावं नाही ठेवत, तिची तुझ्याविषयीची काळजी बरोबरच आहे, पण नवराबायकोचं नातं खूप नाजूक असतं. त्यात कुणा तिसऱ्याचा हस्तक्षेप फारच घातक ठरू शकतो…आणि आता तूही कुक्कुलं बाळ नाहीस, स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिक.’’

‘‘सोड गं ते, मला सांग, घरी कशी पोचलीस? घरी काही त्रास तर नाही ना झाला?’’

‘‘छे गं! काहीही त्रास झाला नाही. सुकेतु आम्हाला घ्यायला एअरपोर्टवर आलाच होता. घरी आल्यावरही आमचं खूप छान आतिथ्य केलं. स्वयंपाक बाई करून गेली होती, पण व्यवस्थित सर्व अन्न गरम करून वाढलं. दिवस अगदी मजेत गेला आमचा. फक्त तुझी उणीव भासत होती. सुकेतुच्या जोडीला तूही असतीस तर अजून मजा आली असती…’’

‘‘ताई, फक्त आजचा दिवसच फार महत्त्वाचा होता. उद्यापासून मी पाच दिवस रजा घेतलीय. खूप भटकूयात. खूप छान छान रेस्टॉरंट्स बघून ठेवलीत मी. छान छान पदार्थ मिळतात तिथे.’’

‘‘ए…, रेस्टॉरंट्स नकोत हं! नकुलला तर बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही. मलाही छान छान पदार्थ घरीच करायला आवडतात. आमचं या बाबतीत खूपच छान जमतं.’’

‘‘हाच तर प्रॉब्लेम आहे ना? बहुतेक पुरूषांना वाटतं, बायकोनं अख्खा दिवस स्वयंपाकघरात काढावा. मला तर मॉमनं आधीच सावध केलं होतं. तिला तुझं सतत स्वयंपाकघरात असणं मुळीच आवडत नाही…मीही तसंच करू नये म्हणून तिनं मला बजावलं होतं. आम्ही दोघं आपापलं जेवण, ब्रेकफास्ट स्वत:चा स्वत:च बनवतो.’’

‘‘सुकेतुलाही स्वयंपाकाची आवड आहे वाटतं?’’

‘‘खूप! खूपच आवडतं त्याला, पण मीच प्रोत्साहन देत नाही. कारण अगं, एक तर सतत सामान आणावं लागतं. स्वयंपाकघर खराब होतं मग गॅसची शेगडी, ओटा सगळं धुवा, स्वच्छ करा. म्हणूनच मॉमनं सांगितलं होतं… नवऱ्याची सवय बिघडवू नकोस, सर्व आयुष्य पश्चात्ताप करण्यातच संपेल. ताई, तुला एक गंमत सांगू?’’

‘‘बोल.’’

‘‘अगं, गेल्या वर्षांपासून आमचा गॅससिलेंडर संपलाच नाहीए. गॅस एजन्सीवाल्यांना वाटलं, आम्ही इथं राहतच नाही, म्हणून त्यांनी आमचं कनेक्शन काढून टाकलं होतं.’’ दोघी बहिणी खळखळून हसल्या.

‘‘हे पण मॉमनंच शिकवलं होतं का?’’

‘‘तसंही समज. लग्नानंतरचं आयुष्य कसं असतं याची मला कल्पनाच नव्हती. सासरी कसं वागायचं हे ही मॉमनंच शिकवलं. ती तर असंही म्हणते, नवऱ्याचं वजन आटोक्यात ठेवायचं असेल तर बायकोनं किचनमध्ये जाऊच नये. नवऱ्यालाही जाऊ देऊ नाही. खूप खाऊन उगीचच जाड, बेढब होतात नवरे.’’

‘‘म्हणूनच मॉमनं बाबांना घरातून अन् आयुष्यातून हाकलून लावलं.’’ स्वातीचा स्वर एकाएकी कडू जहर आणि तिरस्कारानं आतप्रोत होता. स्वस्ती दचकलीच!

‘‘काय सांगतेस ताई, माझा तर विश्वास बसत नाहीए.’’

‘‘नाही, काही नाही,’’ स्वत:ला सावरत स्वातीनं म्हटलं.

‘‘माझ्या तोंडून अवचित शब्द निघून गेले…’’

‘‘नाही ताई तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस…तुला सांगावंच लागेल…काय लपवते आहेस?’’

‘‘अगं, त्यात लपवण्यासारखं काहीच नाहीए. मॉमनं जसं तुला वागायला शिकवलंय ना, ती स्वत: तशीच वागली, तिच्या आयुष्यात. तू खूप लहान होतीस, पण मला सगळं आठवतंय. पप्पांना भरपूर पगार होता. घरात स्वयंपाकी होता, पण आई स्वत: स्वयंपाक करत नसे, त्यालाही करू देत नसे. विचित्र हेकटपणा करायची. शेवटी बाबांनी त्याला काढून टाकलं. माझं बालपण तर केक, ब्रेड, पिझ्झा, बाहेरून मागवलेले खाद्यपदार्थ खातच सरलं. कधी कधी पप्पा स्वत: स्वयंपाक करायचे. मीही त्यांना मदत करायचे…कदाचित तेव्हापासूनच मला स्वयंपाक करणं आवडायला लागलं असावं…’’

‘‘मला तर बाबांचा चेहराही नीटसा आठवत नाहीए.’’ स्वस्ती विचारात गढली होती.

‘‘तुला नाही आठवणार…खूप लहान होतीस तू. आईबाबा वेगळे झाले, तेव्हा मीच दहा वर्षांची होते. मी कितीतरी दिवस रडत होते. पण मॉमला माझी दया आली नाही. मला खरं तर पप्पांजवळ राहायचं होतं. पण मॉमने परवानगी दिली नाही. काही दिवस पप्पा मला शाळेत भेटायला यायचे. कधी मला पैसे देऊन जायचे, कधी खाऊ, कधी खेळणी घेऊन यायचे. आईला हे कळलं तर तिनं शाळेत येऊन बाबांनी मला भेटू नये असं मुख्याध्यापकांना बजावलं. तिला भीती वाटत होती बाबा मला पळवून नेऊन त्यांच्याजवळ ठेवतील, तेव्हापासून माझ्या मनात आईविषयी राग आहे. मी तिच्यावर प्रेम करू शकले नाही. हे आईलाही कळत होतं. म्हणून तिनं मला होस्टेलला ठेवलं अन् आपलं कर्तव्य पूर्ण केलं.’’

‘‘मला आठवतंय, तू फक्त सुट्ट्यांमध्ये घरी यायचीस…किती मज्जा करायचो आपण…खूप छान वाटायचं.’’

‘‘मी फक्त तुझ्यासाठीच येत होते. आईला आपल्याकडे बघायला वेळ कुठं होता?’’

‘‘मला वाटतं, मॉमनं म्हणूनच मलाही होस्टेलला पाठवून दिलं होतं. पण तुझं कॉलेज सुरू झाल्यावर तर मला कुठंच करमत नव्हतं. घरी नाही, होस्टेलला नाही, शाळेतही नाही.’’

‘‘हो गं! खरं तर आपलं लहानपण एकाकीच होतं. अन् मॉमला तरी काय मिळालं? ज्यांना ती मित्र म्हणत होती ते सर्व लोक एक एक करून तिला सोडून गेले…मला तर वाटतं, एक रतन अंकल सोडले तर, कुणीच तिला विचारत नाहीए.’’ उदासपणे स्वाती म्हणाली.

‘‘नाव घेऊ नकोस त्या माणसाचं…त्यानंच आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलंय.’’ स्वस्ती एकदम रागानं म्हणाली.

‘‘आपल्या प्रॉब्लेमसाठी दुसऱ्यांना दोष देणं सोडून दे गं स्वस्ती, याक्षणी फक्त तू तुझा संसार बघ, तुझं घर विस्कटलेलं मला नाही सहन होणार,’’ अत्यंत मायेनं अन् कळकळीनं स्वातीनं म्हटलं.

‘‘तुला काय वाटतं, सगळा दोष माझाच आहे?’’

‘‘तुझी बहीण आहे मी. खोटं बोलणार नाही. दोष कुणाचा आहे असंही सांगणार नाही, पण तुझा संसार, तुझं घर फक्त तूच सांभाळू शकतेस, एवढं मात्र नक्की सांगेन.’’ स्वस्तीला जवळ घेत मायेनं स्वाती बोलली.

दारावर टकटकचा आवाज आला आणि नकुलनं हसत हसत खोलीत प्रवेश केला. ‘‘दोघी बहिणी खूप वर्षांनी भेटताहेत मान्य आहे मला, पण आज काय जागरणाचा बेत आहे का?’’

‘‘तुम्ही तर टीव्हीवर सुकेतुसोबत सिनेमा बघत होता, तुम्हाला आमची आठवण तरी होती का?’’ स्वातीनं हसून टोला मारला.

‘‘सिनेमा कधीच संपला…आता झोप येतेय.’’ नकुलनं म्हटलं.

‘‘खरंच. स्वस्तीही दमलेली आहे. आता झोपायलाच हवं, चलो, गुडनाइट.’’

स्वस्ती आपल्या खोलीत आली…पण डोळ्यात झोप नव्हती. स्वातीचे शब्द मनांत रूतून बसले होते.

ताज्या, गार वाऱ्याची झुळुक यावी तसे नकुल-स्वाती आले होते. चार-पाच दिवस राहून निघून गेले. गप्पा-टप्पा, हसणंखिदळणं यानं दुमदुमणारं घर पुन्हा शांत अबोल झालं.

त्यादिवशी सुकेतु आपल्या लॅपटॉपवर नेहमीप्रमाणे काम करत होता. तेवढ्यात स्वस्तीनं हळूच येऊन त्याच्या गळ्यात हात टाकले. सुकेतुला आश्चर्यच वाटलं. असा प्रेमळ स्पर्श अलिकडे तो विसरलाच होता.

‘‘साडेआठ वाजलेत, आपण जेवून घेऊयात. अन्न गार होतंय.’’

सुंदर मांडलेलं डायनिंग टेबल अन् येणारे खमंग वास यामुळे सुकेतु गडबडलाच!

‘‘कुठुन मागवलंय?’’ त्यानं विचारलं.

‘‘मी स्वत: स्वयंपाक केलाय.’’ स्वस्तीनं हसत म्हटलं.

मंद आवाजातलं वाद्य संगीत, उदबत्तीचा सुंदर वास ‘‘व्वा!’’ अभावितपणे सुकेतु उद्गारला. ‘‘स्वातीताई थोडी आधीच यायला हवी होती नाही का?’’ स्वस्ती फक्त हसली पण स्वातीताई विषयीची कृतज्ञता तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें