फ्लर्टमुळे येते जीवनात मजा

* सुधा कसे

‘‘कशी आहेस निधी? तुझी तब्येत कशी आहे? लवकर बरी हो… मी तुझ्या आवडीची भाजी आणली आहे. तुला पडवळ आवडते ना?’’ निधीची शेजारी चित्रा घरात येत म्हणाली.

‘‘अगं, किती दिवस तू माझ्या आवडीचे पदार्थ बनवून आणत राहशील. आता मी बरी आहे, मी स्वयंपाक करेन. आता माझी काळजी करू नकोस,’’ निधी पलंगावरून उठत हसत म्हणाली.

‘‘चित्रा, मी तुझ्या मैत्रिणीच्या हातचे बेचव खाऊन कंटाळलो आहे. काहीही कर, पण निधीला अजून २ दिवस आराम करू दे, म्हणजे मी तुझ्या हातचे चविष्ट पदार्थ खाऊ शकेन,’’ निधीचा नवरा निर्मल चित्राला बसण्याचा इशारा करत म्हणाला.

‘‘भावोजी, हे काय बोलताय? सकाळपासून कोणी भेटले नाही का? मी निधीच्या हातचे कधी खाल्ले नाही का…? तिच्या हातचे खाल्ल्यानंतर किटी पार्टीत सर्वजणी बोटे चाटत राहतात.’’

हे ऐकून निर्मल मोठयाने हसला, पण निधीच्या चेहऱ्यावरचा राग चित्राने पहिला. निर्मल जेव्हा कधी चित्रासोबत अशी थट्टा-मस्करी करायचा तेव्हा निधीच्या चेहऱ्यावरचे हावभाव असेच व्हायचे, निर्मलच्या अशा वागण्यामुळे तिला असुरक्षित वाटायचे, हे चित्राला गेल्या १० दिवसांत जाणवले होते.

थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, त्यानंतर चित्रा तिच्या घरी गेली. निधीच्या चेहऱ्यावरचे तणावपूर्ण भाव पाहून तिला वाईट वाटले. निधी आता बरी झाली आहे आणि स्वत: जेवण बनवू शकते. निधीलाही तेच हवे आहे, त्यामुळे तिला जेवण न देणेच बरे, असे चित्राने ठरवले.

ती निघून जाताच निधी पतीवर रागावत म्हणाली, ‘‘माझ्या आजाराचा फायदा घेऊन तू चित्रासोबत फ्लर्ट का करतोस? प्रत्येकाला दुसऱ्याची पत्नी आवडते, पण वेळेला माझेच बेचव जेवण उपयोगी पडेल, तिचे चविष्ट जेवण नाही,’’ तिने एका दमात तिचा सगळा राग काढला.

‘‘अगं, तू उगाच मनाला लावून घेतेस. मी फक्त यासाठी बोललो, जेणेकरून ती जेवण देत राहील आणि तुला आणखी २ दिवस विश्रांती मिळेल, तू किती संकुचित विचार करतेस? तुमच्या बायकांच्या ईर्षेला काय म्हणायचे…?’’ निर्मलने निधीला प्रत्युत्तर देत तिलाच दोषी ठरवले. नेहमीप्रमाणे निधीच्या अशा संशयी वागण्याचा त्याला राग आला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा चित्रा निधीच्या घरी जेवण घेऊन आली नाही तेव्हा निधीला हायसे वाटले, पण निधीच्या वागण्याने चित्राला नक्कीच वाईट वाटले असावे, असे निर्मलला वाटले. तो निधीला काहीच बोलला नाही, कारण तिच्याबद्दल काही विचारल्यास निधी खोचकपणे बोलून त्याचे मन दुखावणार, हे त्याला माहीत होते.

सकारात्मक विचार करणे गरजेचे?

निधी आणि चित्रा दोघींच्या लग्नाला अवघी २ वर्षे झाली होती. लग्न होताच दोन्ही कुटुंबे बंगळुरूला स्थायिक झाली होती. शेजारी राहात असल्याने आणि तत्सम परिस्थितीमुळे दोघीही खूप लवकर मैत्रिणी झाल्या, पण त्यांचे पती एकमेकांना खूप कमी भेटायचे, कारण निधीचा पती खूप बोलका होता, तर चित्राचा पती अंतर्मुख होता.

पती कामाला गेल्यावरच त्या भेटायच्या. अनेकदा त्या बाजारात किंवा इतर ठिकाणी एकत्र जात. अलीकडे निधीच्या आजारपणामुळे चित्रा निधीच्या घरी कधीही येऊ लागली होती. निधीला डेंग्यूचा ताप होता, त्यामुळे तिला पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी ती सकाळ-संध्याकाळ येऊन जेवण देत होती. कामावर सुट्टी घेऊन निर्मल घरीच राहिल्याने आणि त्यांचा स्वभाव सारखाच असल्याने चित्रा आणि तो एकमेकांशी चांगले बोलू लागले होते. यावरून निधी आणि निर्मलमध्ये अनेकदा वाद व्हायचे.

निधीच्या अगदी उलट असलेला चित्राचा मनमोकळा स्वभाव निर्मलला आवडायचा. छोटया-छोटया गोष्टींवर मनमोकळेपणाने हसणे आणि तिचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन यामुळे ती येताच वातावरण प्रसन्न होऊन जायचे. निधीला डेंग्यूचा त्रास झाल्यानंतर घरात भकास शांतता पसरली होती. त्यावेळी चित्राने त्यांना खूप मदत केली. ती रोज येऊ लागली होती, तिच्याशी गप्पा मारल्याने थोडा वेळ का होईना, पण आजाराचा, तनावाचा विसर पडायचा.

असुरक्षिततेची भावना कशासाठी?

हे सर्व निधीला आवडत नव्हते. निर्मलच्या फ्लर्ट करण्याच्या सवयीची तिला नेहमीच भीती वाटायची. त्याचा स्वभावच तसा मदमस्त होता. कोणी त्याचे कौतुक केले की, निधीला असुरक्षित वाटायचे, याउलट तो निधीवर खूप प्रेम करायचा. एका चांगल्या पतीप्रमाणे तिची काळजी घ्यायचा.

निधीचा संशयी स्वभाव त्याला अनेकदा खटकत असे. तिने या संकुचित मानसिकतेतून बाहेर पडावे, असे त्याने अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्नही केला, पण निधीवर त्याच्या काहीही परिणाम झाला नाही. निर्मललाही विनाकारण आपला स्वभाव बदलावा, असे वाटत नव्हते. त्यामुळेच त्यांच्यात खटके उडायचे.

उदासीन वागणूक

१५ दिवस झाले. चित्रा त्यांच्या घरी आली नव्हती. निर्मलही त्याच्या कामात व्यस्त होता. निधीची तब्येत बरी झाली होती, पण तिला अशक्तपणा जाणवत होता. घरी एकटीच असल्याने दिवसभर पलंगावर पडून तिला कंटाळा येऊ लागला होता, त्यामुळे तिला चित्राची खूप आठवण येऊ लागली होती.

ती येत नसल्याने निधीला याची जाणीव झाली की, तिच्यासोबत वेळ कधी निघून जायचा हे समजत नव्हते. तिच्या उदासीन वागण्यामुळेच चित्राने तिच्या घरी येणे बंद केले, हेही निधीच्या लक्षात आले. तिच्या संकुचित वृत्तीमुळे ती एकटी पडेल, हे निर्मलचे बोलणे बरोबर होते, याचा विचार ती करू लागली.

आपल्या संशयी स्वभावामुळे एक चांगली मैत्रीण गमावल्याचा तिला पश्चाताप होऊ लागला. एके दिवशी निर्मल कामाला जाताच तिने चित्राच्या घरी जायचे ठरवले. निधीला अचानक घराबाहेर पाहून चित्राला आश्चर्य वाटले.

चित्रा तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाली, ‘‘तुझ्यासारख्या मैत्रिणीवर मी कशी रागवेन? तुला माझ्यापासून दूर राहून जेवढे वाईट वाटले, तेवढेच मलाही वाटले. फक्त तूच आहेस, जिच्यामुळेच मी या अनोळखी शहरात आनंदाने राहू शकले. चिंतन नेहमी त्याच्या कामात व्यस्त असतो. तो वरचेवर बाहेरगावी जातो. घरी असला तरी लॅपटॉपला चिकटून राहतो, पण हे नक्की की, मी तुमच्या घरी मुद्दामहून येत नव्हते. माझ्यामुळे तुम्हा पतीपत्नीत वाद व्हावा किंवा तुझ्या घरी येणे बंद करून तुला माझे महत्त्व पटवून द्यावे, अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. मला तुमच्या आयुष्यात एवढी घुसखोरी करण्याचा अधिकार नाही की, मी तुला समजावून सांगू शकेन की, कोणतेही नाते विशेषत: पतीपत्नीमधील नाते हे विश्वासाच्या पायावर उभे असते.

‘‘पतीवर संशय घेऊन स्वत:च्याच वैवाहिक जीवनात विष कालवण्याचे काम तू करत आहेस. पतीने पत्नीच्या बहिणीची किंवा वहिनीची थट्टा-मस्करी केली तर ते समाजमान्य आहे. या नात्याच्या नावाखाली कितीतरी अनैतिक संबंध प्रस्थापित झाले तरी ज्या महिलेशी त्याचे कोणतेही नाते नाही तिच्याशी त्याने थट्टा-मस्करी केली तर त्याला संशयाच्या नजरेने का पाहिले जाते? उलट तुझा पती अशा मनमोकळया विचारांचा आहे, याचा तुला आनंद व्हायला हवा. नाहीतर एक चिंतन आहे, जो कोणाशी बोलत नाही आणि घरात भकास शांतता असते.

‘‘आणखी एक गोष्ट, ज्या पतींचा हेतू वाईट असतो, ते आपल्या पत्नीसमोर खूप सभ्य असतात आणि त्यांच्या पाठीमागे फ्लर्ट करतात. थोडेसे फ्लर्ट केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो, अन्यथा पतीपत्नी सतत एकमेकांसोबत राहून कंटाळतात आणि आयुष्य नीरस होऊन जाते.’’

चित्रा असे म्हणताच निधी म्हणाली, ‘‘चित्रा तू खरं बोलतेस. घरातले वातावरण किती छान असायचे, जेव्हा निर्मल तुझी थट्टा-मस्करी करायचा. आता घर खायला उठते. तू माझे डोळे उघडलेस.’’

‘‘बघ, विचार कर, असे होऊ देऊ नकोस की, मी तुझ्या पतीला पटवेन आणि तू नुसतीच बघतच राहाशील,’’ चित्रा डोळे विस्फारून असे बोलताच दोघीही जोरात हसल्या आणि वातावरण प्रसन्न झाले.

जेव्हा आईचा मित्र फ्लर्ट करू लागेल

* रितू वर्मा

२० वर्षीय सेजल तिची आई शेफालीचा प्रियकर राजीव मलिक यांच्यावर खूप नाराज आहे, ४५ वर्षीय शेफाली १० वर्षांपासून पती रवीपासून वेगळी राहत आहे. अशा स्थितीत तिच्या आयुष्यात पुरुषांचे येणे-जाणे सतत चालू असते. राजीव मलिक शेफालीचे घर आणि बाहेर दोघी प्रकारचे काम पाहतो आणि त्यामुळे शेफालीच्या आयुष्यात राजीवचा हस्तक्षेप वाढू लागला. हद्द तर तेव्हा संपली जेव्हा राजीवने वयाच्या ४८ व्या वर्षीही सेजलसोबत खुलेआम फ्लर्ट करायला सुरुवात केली.

कधी पाठीवर थाप मारायचा, कधी गालाला प्रेमाने हात लावायचा, कधी सेजलच्या बॉयफ्रेंडविषयी चौकशी करायचा वगैरे. हे सगळं सेजलसोबत घडत होतं, ते ही तिच्याच सख्या आईसमोर, जिने मुर्खासारखा तिच्या प्रियकरावर आंधळा विश्वास ठेवला होता. सेजल एका विचित्र कोंडीतून जात आहे. तिला समजत नव्हते की काय करावे, तिने आपले म्हणणे कोणाशी शेअर करावे?

जेव्हा सेजलने ही गोष्ट तिचा प्रियकर संचितला सांगितली तेव्हा त्याने सेजलला साथ न देत याचा गैरफायदा घेतला. एकीकडे संचित आणि दुसरीकडे राजीव. सेजलचा या दोघांच्या पश्चात पुरुषांवरील विश्वासच उडाला आहे. सेजलने हे प्रकरण तिच्या मावशी किंवा आजीला सांगितले असते तर बरे झाले असते.

तर दुसरीकडे काशवीच्या आईचा मित्र आलोक काका, केव्हा काकांच्या परिघातून बाहेर पडून कधी तिच्या आयुष्यात आला हे खुद्द काशवीलाही कळू शकले नाही. आलोक काकांनी मोकळेपणाने पैसे खर्च करणे, तिच्याशी रात्रंदिवस चॅट करणे काशवीला पसंत होते. दुसरीकडे, काशवीची आई रश्मी आपल्या मुलीला तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक मित्र मिळाला आहे या विचाराने आनंदित होती. आलोकला आणखी काय हवे, एकीकडे रश्मीची मैत्री तर दुसरीकडे काशवीचा निर्बुद्धपणा.

आलोक काशवीशी फ्लर्ट करताना त्याची स्वत:ची मुलगी काश्वीच्या वयाचीच असल्याचेही विसरतो.

पण काही मुली हुशारही असतात. विनायकने त्याची मैत्रिण सुमेधाची मुलगी पलकसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पलकनेही आपले काम करून घेतले आणि जेव्हा विनायकने फ्लर्टिंगच्या नावाखाली सीमा ओलांडण्याचे साहस केले तेव्हा पलकने मोठया हुशारीने तिची आई सुमेधाला पुढे केले. विनायक आणि सुमेधा आजही मित्र आहेत, पण विनायक आता चुकूनही पलकच्या अवतीभोवती फिरकत नाही.

आजच्या आधुनिक युगातील या काही वेगळया प्रकारच्या समस्या आहेत. जेव्हा स्त्री-पुरुष एकत्र काम करतील तेव्हा त्यांच्यात मैत्री ही होईलच आणि हे पुरुष मित्र घरी देखील येतील-जातील.

काकू किंवा मावशीला बनवा रहस्यभेदी

तुमच्या काकू किंवा मावशीला तुमच्यापेक्षा जास्त जीवनाचे अनुभव आहेत. त्यांच्या अनुभवांच्या आधारे त्या तुम्हाला नक्कीच योग्य सल्ला देतील. अशी गोष्ट स्वत: पर्यंतच मर्यादित ठेवा, गप्पा-गोष्टी अवश्य करा

मित्राच्या मुलांशी मैत्री करा

जर आईच्या मित्राने त्याची सीमारेषा विसरण्याचा प्रयत्न केला तर त्याला मर्यादेत ठेवण्यासाठी त्याच्या मुलांशी मैत्री करा. त्याच्या घरी जा, त्याच्या कुटुंबियांना तुमच्या घरी बोलवा.

आपल्या वडिलांनाही सोबत न्यायला विसरू नका. जेव्हा कुटुंबाचा प्रश्न येतो भल्याभल्या बहाद्दूरांना घाम सुटतो. ते तुम्हाला चुकूनही त्रास देणार नाहीत.

चुकीच्या गोष्टीचा विरोध करा

आपल्या मोठयांच्या चुकीच्या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो हे अनेक वेळा पाहायला मिळते. यामागे फक्त त्यांच्या वयाचा मान ठेवणे असते, पण ते तुमचे आई किंवा बाबा नाहीत की तुम्हाला त्यांचा आदर ठेवावा लागेल. त्यांच्या चुकीच्या गोष्टीला कडाडून विरोध करा आणि गरज पडल्यास आईलाही तिच्या मित्राच्या वागणुकीची माहिती द्या.

लक्ष्मण रेखा ओढून ठेवा

आपल्या आईच्या मित्राशी बोलण्यात काही गैर नाही, पण आपले वर्तन मर्यादेत ठेवा. जर तुम्ही स्वत:च फॉर्मल राहिलात तर तुमचे अंकलही कॅज्युअल होऊ शकणार नाहीत. हलक्याफुलक्या विनोदात काही नुकसान नाही, पण या हलक्याफुलक्या क्षणांमध्ये तुमच्या आईचाही सहभाग असावा हे लक्षात ठेवा.

वयाचा आरसा दाखवा

हा सर्वात अचूक आणि प्रभावी उपाय आहे, जो कधीही व्यर्थ जात नाही. आईच्या मित्राने जास्त थट्टा-मस्करी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच्या वयाचा आरसा दाखवायला मागेपुढे पाहू नका, स्वत:ला म्हातारे समजणे कुणालाच आवडत नाही, एकदा का तुम्ही त्याला तुमच्यात आणि त्याच्यात वयाचे अंतर जाणवून दिले, तर चुकूनही तो तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें