मेहंदी लागली माझ्या हातांना

कथा * शकुंतला सिन्हा

लग्नाच्या बऱ्याच दिवसांनंतर मी माहेरी आले होते. पाटणामधील एका जुन्या रस्त्यावरच माझे माहेर होते आणि अजूनही आहे. येथे ६-७ फुटांच्या गल्लीत एकमेकांना लागूनच घरे आहेत. छतांमध्येही ३-४ फुटांचेच अंतर आहे. माझा नवरा संकल्प मला येथे सोडून विदेश दौऱ्यावर गेला होता. त्याचे वर्षातून २-३ दौरे होतातच.

मी आईसोबत छतावर होते. संध्याकाळची वेळ होती. आमच्या छताला लागूनच शेजाऱ्यांचे छत होते. त्या घरात अविनाश राहत होता. माझ्यापेक्षा ४-५ वर्षांनी मोठा होता. माझ्याच शाळेत शिकायचा. मला अचानक त्याची आठवण आली. मी आईला विचारले, ‘‘सध्या अविनाश कुठे असतो?’’

‘‘मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. तुझ्या लग्नाच्या काही दिवस आधीच तो हे घर सोडून निघून गेला. तसेही तो भाडेकरूच होता. येथे शिकायला आला होता.’’

मी स्वयंपाकघरात चहा करण्यासाठी निघून गेले, पण मला माझे जुने दिवस आठवू लागले होते. मन विचलित झाले, कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते. गाळणीने कपात चहा ओतत होते, पण अर्धी आत तर अर्धी बाहेर पडत होती. भूतकाळातील आठवणींनी मनाचा ताबा घेतला होता. चहा बनवून झाल्यावर तो घेऊन मी छतावर आले. तेथे आई शेजारच्या छतावर उभ्या असलेल्या काकूंशी गपा मारत होती. दोघांमध्ये फक्त ३ फुटांचे अंतर होते. माझ्या चहाचा कप काकूंना देत मी म्हणाले, ‘‘तुम्ही दोघी प्या, मी माझ्यासाठी पुन्हा बनवेन.’’ मी त्यांच्यापासून थोडया अंतरावर छताच्या दुसऱ्या कोपऱ्यावर येऊन उभी राहिले. अंधार गडद होत चालला होता. तितक्यात लाईट गेली. त्यामुळे मुले ओरडत बाहेर आली. काही मुले स्वत:च्या छतावर येऊन उभी राहिली. अशाच एखाद्या वेळी मी जेव्हा छतावर यायचे तेव्हा अविनाश माझ्याकडे पाहून हसत असे. कधी हवेत हात उंचावत ओळख दाखवत असे.

एके दिवशी मी छतावर उभी असतानाच लाईट गेली. काळोख झाला होता. अविनाशने जवळ येत मला एक चिठ्ठी दिली. त्यानंतर लगेचच हसत तेथून निघून गेला. मी घाबरले होते. चिठ्ठी कुरत्याच्या आत लपवून ठेवली. बाल्यावस्था आणि तारुण्याच्या दरम्यान येणारे काही क्षण मुलींच्या मनाची घालमेल वाढविणारे असतात. कधी आनंदाने बागडावेसे वाटते तर कधी या किशोरावस्थेची भीती वाटते. कधी कोणाला तरी मिठीत घ्यावेसे वाटते तर कधी आपणच कुणाच्या तरी मिठीत शिरावे, अशी इच्छा होते.

मी काही वेळानंतर ती चिठ्ठी वाचली. लिहिले होते, ‘‘दीपा, तू हसतेस तेव्हा खूपच सुंदर दिसतेस आणि ते पाहून मला खूप आनंद होतो.’’

वेळ आपल्याच गतीने पुढे जात होती. माझ्या ताईचे लग्न होते. सर्व मेहंदी काढत होते. मीही दोन्ही हातांवर मेहंदी काढून घेतली आणि संध्याकाळी छतावर आले. अविनाशही छतावरच होता. त्याने हसून हात हलवला. न जाणो मला काय वाटले, पण मीही माझे मेहंदी लावलेले हात वर करून दाखवले. त्याने इशारा करून रेलिंगजवळ यायला सांगितले. मी काहीही विचार न करता भारावल्यासारखे गेले. त्याने माझ्या हातांचे चुंबन घेतले. मी लगेचच बाजूला झाले.

अविनाशला संधी मिळताच तो मला गुपचूप चिठ्ठी देत असे. अशीच हसत रहा, असे चिठ्ठीत अनेकदा लिहिलेले असायचे. मला ते आवडायचे. पण मी कधीच उत्तर दिले नाही किंवा होकारही दिला नाही.

शाळा संपून महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले. एके दिवशी ताईने माझ्यासाठी तिच्या सासरकडील एक चांगले स्थळ आईवडिलांना सुचवले. मला शिकायचे होते, पण सर्वांनी एका सुरात सांगितले, ‘‘एवढे चांगले स्थळ स्वत:हून आले आहे, ही संधी काही करून सोडायची नाही. उरलेले शिक्षण तू सासरी जाऊन पूर्ण कर.’’

माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली होती. अविनाशने एका छोटया मुलाच्या हातून मला चिठ्ठी पाठवली. त्यात लिहिले होते, लग्नासाठी शुभेच्छा. सासरीही अशीच हसत रहा. कदाचित तुझे लग्नाची मेहंदी लावलेले हात बघण्याची संधी मला मिळणार नाही, याचे नेहमी दु:ख राहील.

लग्नानंतर मी सासरी, इंदौऱला आले. पती संकल्प खरंच खूप चांगले आहेत, पण स्वत:च्या कामातच व्यस्त असतात. क्रिकेट आवडत असल्यामुळे कामातून उसंत मिळताच टीव्ही लावून क्रिकेटचा सामना पाहतात किंवा स्वत: मित्रांसोबत खेळायला क्रिकेट क्लबला जातात. पण यामुळे मी कधीच त्यांच्याकडे तक्रार केली नाही.

आईचा आवाज येताच माझी तंद्री भंगली. ‘‘दीपा, उद्या शेजारच्या प्रदीप काकांच्या मुलीची, मोहिनीची मेहंदी आणि संगीत आहे. तू तिला ओळखत असशील. तुझ्याच शाळेत होती. तुझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान आहे. तुला आवर्जून बोलावले आहे. दीपा ताईला घेऊन ये, असे मोहिनीने सांगितले आहे. तुला यावे लागेल.’’

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी मोहिनीकडे गेले. दोन्ही हातांच्या कोपऱ्यांपर्यंत तिने मेहंदी काढली होती. संगीत सुरू होताच मीही त्यात सहभाग घेतला. नंतर लाईट गेल्यावर घरी निघून आले. तसे तर तिथे जनरेटर सुरू होता. पण गाणी मोठमोठयाने वाजत होती.

मी छतावर गेले. मला अविनाशची आठवण झाली. अचानक मेहंदीचे दोन्ही हात मी वर उंचावले. शेजारच्या काकूने त्यांच्या छतावरून मला पाहिले. त्यांना वाटले मी त्यांना हात दाखवत आहे. त्या रेलिंगजवळ आल्या. मलाही जवळ बोलावले आणि माझे हात पाहून म्हणाल्या, ‘‘खूपच सुंदर दिसत आहेत मेहंदी लावलेले हात. खूप छान रंगली आहे मेहंदी, म्हणजे नवरा खूप प्रेम करत असणार.’’

मी लाजून माझे हात खाली केले. रात्री मी लॅपटॉपवर ऑनलाईन होते. त्यावेळी अविनाशची फ्रेंड रिक्वेस्ट पाहिली आणि लगेचच ती मान्य केली. थोडयाच वेळात त्याचा मेसेज आला, कशी आहेस दीपा?’’

मला आश्चर्य वाटले. याला संकल्पबाबत कसे काय माहीत? त्यामुळेच मी विचारले, ‘‘तू त्याला कसा काय ओळखतोस?’’

‘‘मी दुबईतील सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक आहे. संकल्प आमच्याकडे कॉम्पुटर आणि वायफाय लावायला आला होता. गप्पांमधून समजले की, तो तुझा नवरा आहे. त्याने मला तुझा व्हॉट्सअप नंबर दिला.’’

‘‘बरं, तू सांग कसा आहेस? बायको, मुले कशी आहेत?’’ मी विचारले.

‘‘आधी बायको तर येऊ दे, मग मुलेही येतील.’’

‘‘म्हणजे, अजून लग्न केले नाहीस?’’

‘‘नाही, पण आता करेन.’’

‘‘का?’’

‘‘प्रत्येक ‘का’ चे उत्तर असायलाच हवे, असे मुळीच नाही. एकदा तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य पाहाण्याची इच्छा होती. असो, बाकी काय चाललेय?’’

‘‘शेजारी मोहिनीच्या मेहंदीसाठी गेले होते.’’

‘‘म्हणजे तूही तुझ्या हातावर मेहंदी नक्की लावली असणार?’’

‘‘हो…’’

‘‘जरा व्हिडीओ सुरू कर. मलाही बघू दे. तुझ्या लग्नातली मेहंदी बघता आली नव्हती.’’

‘‘हो, बघ,’’ असे म्हणत मी व्हिडीओ सुरू करून माझे हात त्याला दाखवले.

‘‘खूप सुंदर. आता तुझे ते जुने हास्य पुन्हा एकदा दाखव.’’

‘‘तुझे बोलणे पुन्हा पुन्हा माझ्या हसण्यावर येऊन का थांबते?’’

‘‘तुला माहीत आहे का, एक भाषा अशी आहे जी सर्व जगाला समजते.’’

‘‘कुठली भाषा?’’

‘‘हास्य. माझी इच्छा आहे की संपूर्ण जग हसत रहावे आणि दीपाही.’’

मी हसले.

तो म्हणाला, ‘‘अरे वा, माझी ही इच्छाही पूर्ण झाली.’’

मला असे वाटले की, माझ्या अंतरीचीही सुप्त इच्छा पूर्ण झाली. अविनाशबाबत आणखी माहिती करून घ्यायची होती. म्हणून म्हटले, ‘‘लग्नाला बोलवायला विसरू नकोस.’’

‘‘आता पत्ता समजला. त्यामुळे विसरण्याचा प्रश्नच येत नाही. याच बहाण्याने पुन्हा एकदा तुझे मेहंदी लावलेले हात आणि चेहऱ्यावरील हास्य बघता येईल.’’

‘‘आता जास्त मस्का मारू नकोस. लवकरात लवकर लग्नाची पत्रिका पाठव.’’

‘‘लग्नानंतर तुला बोलायला आले, याचा आनंद झाला. यापूर्वी कधीच माझ्याशी एक शब्दही बोलली नव्हतीस.’’

‘‘हो, याचे दु:ख मलाही आहे.’’

पुन्हा एकदा लाईट गेली. इंटरनेट बंद झाला. अविनाशला मी किती निस्वार्थीपणे आवडत होते, हे मला कधीच समजले नसते जर आज त्याच्याशी बोलणे झाले नसते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें