मला कोणत्याही रेसमध्ये धावायला आवडत नाही – रूपाली भोसले

* सोमा घोष 

‘‘जागो मोहन प्यारे’ या कमर्शियल नाटकापासून अभिनयाच्या क्षेत्रात पदापर्ण करणारी मराठी अभिनेत्री रुपाली भोसले मुंबईची आहे. लहानपणापासून तिला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. ज्यात तिला तिच्या आईवडिलांनी सहयोग दिला. आरशासमोर वेगवेगळया अदाकारी करणे, डान्स करणे तिला खूप आवडायचे. स्वभावाने विनम्र आणि हसमुख रुपाली या दिवसात कोविड १९ मुळे आपल्या घरात लॉकडाऊन आहे. परंतु हा कालावधी ती आपल्या हॉबी पूर्ण करण्यात व्यतित करत आहे. तिने नाटकांशिवाय मराठी, हिंदी मालिकांमध्ये आणि फिल्ममधेही काम केले आहे. तिच्याशी तिच्या प्रवासाबद्दल चर्चा झाली, प्रस्तुत आहे त्यातील काही अंश :

या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

स्कूलच्या वेळेपासून वन एक्ट प्लेमध्ये मी काम केले आहे. मला डान्सची खूप आवड होती. कारण यासाठी दरवेळी नवीन कपडे घालून सजायला मला खूप आवडायचे. टिचरही कुठल्याही नृत्याच्या कार्यक्रमात माझे नाव सगळयात अगोदर लिहायची. तेव्हापासून मला यात आनंद यायला लागला. मोठे झाल्यावरही तिकडे जाण्याची इच्छा होती. परंतु कोणी गॉडफादर नव्हता, जो माझ्यासाठी सगळी कामे सोपे करून देईल.

थिएटर करता-करता हळू-हळू मी या फिल्डकडे वळले. ‘गांधी हत्या आणि मी’ माझे एक यशस्वी प्रोफेशनल नाटक आहे. या अगोदरही जवळपास १० अशी प्रोफेशनल नाटके असतील, ज्यांनी माझे नाव अभिनयात पुढे केले. या दरम्यान मला बऱ्याच मोठ-मोठया कलाकारांबरोबर काम करण्याची संधीही मिळाली. येथूनच माझा प्रवास सुरु झाला. माझे मामा दीपक शिर्केही अभिनयाशी जोडलेले आहेत. त्यांच्या नावाचा आधार मी कधीही घेतला नाही. याशिवाय माझे आजोबाही तरुण वयात नाटक करायचे, अशाप्रकारे अभिनय माझ्या रक्तातच आहे, ज्याचे स्वरूप आज मी पाहते आहे.

कुटुंबाने तुला कसा पाठींबा दिला?

हे क्षेत्र अनिश्चिततेने भरलेले असते. कधी काम असते तर कधी नसते. अशास्थितीत कुटुंबाचा आधार खूप आवश्यक असतो. कुटुंबाने मला सगळया प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यांनी मला आपली जबाबदारी घेण्यास शिकवले आहे. जे माझ्यासाठी चांगले होते. मी कधी डिप्रेशनमध्ये गेली नाही. मराठी बिग बॉस २ च्या अगोदर मी सब टीव्हीवर ‘बडी दूर से आए हैं’ मालिका करत होती. ही संपल्यावर ४ ते ५ वर्षापर्यंत मी घरीच होते. काही काम नव्हते. इन्कमही नव्हते, परंतु प्रत्येक महिन्याचा खर्च होता. त्यावेळेस कुटुंब माझयाबरोबर खंबीरपणे उभे होते.

काम न मिळण्याचे कारण काय होते?

माझ्यासाठी बहुतेक हा ब्रेक होता. मी तो सकारात्मकतेने घेतला. त्यादरम्यान मी वर्कआउट, योगा इत्यादी करत राहिले. मी ५ वर्षांनंतरही फिट राहिले. हे टिकविणे माझ्यासाठी आव्हान होते.

आता पुढे काय आहे? कोणत्या कथेने तुझे जीवन बदलले?

माझे नाटक ‘गांधी हत्या आणि मी’ अजून चालू आहे. सिंधुताई गोडसेंची खूप वेगळी भूमिका आहे. जी नथुराम गोडसे आणि पती गोपाळ गोडसे हे दोघे जेलमध्ये गेल्यानंतर आपले जीवन कसे व्यतित करते, ते दाखवले आहे. माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक भूमिका आहे. ही एका खंभीर महिलेची कथा आहे. मी आतापर्यंत कॉमेडी आणि हल्की-फुलकी भूमिका निभावली होती. परंतु मी या व्यक्तित्वाने खूप प्रभावित आहे. याशिवाय मी काही वेब सिरीज करत आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये तू काय करत आहेस?

मी आपल्या आईला थोडा आराम देण्याचा विचार केला आहे. घरात आत्ता आम्ही चार लोक आहोत आणि सगळयांसाठी डयुटी ठरवलेली आहे. घरात लादी पुसणे, झाडू मारणे, जेवण बनवणे, वर्कआउट करणे इत्यादी मी करते. मला कुकिंगचा छंद आहे. म्हणून मी जिलेबी आणि रबडी घरीच बनवली आहे. काही नवीन ट्राय करत असते. यांशिवाय काही जुन्या स्क्रिप्ट्स ज्या शेल्फवर पडलेल्या आहेत, त्यांना वाचत आहे.

या लॉकडाऊनने इंडस्ट्रीवर काय प्रभाव पडेल?

अभिनय आपण घरी करू शकत नाही. इतर कामे आपण घरातून करू शकतात. सर्वकाही ब्लॉक झाले आहे. नंतरही फिल्म किंवा नाटकापर्यंत प्रेक्षक येतील कि नाही ही विचार करण्यायोग्य बाब आहे. थोडी अडचण येईल, पण नंतर सर्वकाही ठीक होईल. आशा आहे लोक सरकारचे म्हणणे ऐकून घरात राहतील आणि या समस्येपासून लवकरच मुक्त होतील.

आता कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतो?

आता परिश्रमाचा योग्य मोबदला मिळावा यासाठीच सामना करावा लागतो. निर्माता, दिग्दर्शक एक चांगला आणि अनुभवी कलाकार आपल्या फिल्ममधे घेऊ इच्छितात, परंतु त्याला योग्य मोबदला देऊ इच्छित नाहीत आणि हीच एक मोठी समस्या आहे. मीही थोडी चुजी बनले आहे. कामाचे समाधान मला हवे. मला कुठल्या रेसमध्ये पळणे आवडत नाही.

तू किती फॅशनेबल आहेस?

मला नेहमी फॅशन करायला आवडते. मला सब्यसाची, मनीष मल्होत्रा इत्यादी डिझाइनर्सचे कपडे घालण्याची तीव्र इच्छा आहे.

अभिनयाव्यतिरिक्त काय करण्याची इच्छा आहे?

मला रेस्तराँ खोलण्याची इच्छा आहे. कारण पूर्वी दहिसर परिसरात राजश्री टॉकीजजवळ माझ्या कुटुंबाची एक हातगाडी होती, जेथे कोकणचे चिकन खूप प्रसिद्ध होते. मला तशीच डिश पुन्हा लोकांना खायला द्यायची आहे.

कुठले सामाजिक कार्य तू करू इच्छिते?

मी एक कॉलनी त्या तरुणांसाठी बनवू इच्छिते, जे अभिनयासाठी मुंबईत येतात आणि भटकत असतात. अशा सर्वांसाठी जेवण आणि राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये होवो आणि काम मिळाल्यानंतर ते निघून जावोत.

याशिवाय अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी काही करू इच्छिते.

गृहशोभिकेच्या महिलांसाठी काही संदेश देऊ इच्छिते?

महिलांनी इतरांची देखभाल करण्याबरोबरच स्वत:साठी काही वेळ काढावा आणि आपली काळजी घ्यावी. त्या जेवढया निरोगी राहतील, तेवढेच कुटुंबही निरोगी राहील.

आवडता रंग – काळा.

आवडता पोशाख – साडी.

वेळ मिळाल्यास – कुकिंग.

नकारात्मक विचार दूर करण्यासाठी – सकारात्मक आभा तयार करणे, एक दिवस स्वत:साठी व्यतित करणे.

आवडते पर्यटन स्थळ – निसर्गाच्या जवळ नेणारे.

मनास आवडणारा परफ्युम – ला वि ईस्ट वेले.

जीवनाचे आदर्श – आईवडिलांची काळजी घेणे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें